Friday, November 30, 2012

पुणे विद्यापीठ, महात्मा फुले पुतळा अनावरण


शिक्षणाचे सार्वत्रीकरण व्हावे
-
Thursday, November 29, 2012 AT 04:30 AM (IST)

पुणे - 'शेतकऱ्यांचे उत्थान आणि महिलांचे सबलीकरण यासाठी महात्मा फुले यांनी 19 व्या शतकात सुरू केलेले कार्य अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही. त्यासाठी शिक्षणाचे सार्वत्रीकरण आणि समतेचे वातावरण तयार करावे लागेल. ते करण्यासाठी पुणे विद्यापीठातील त्यांचा पुतळा सामाजिक समतेची प्रेरणा देईल,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी केले.

पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, पुण्याचे पालकमंत्री सचिन अहीर, खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, प्रभारी कुलसचिव डॉ. (कॅप्टन) चंद्रशेखर चितळे आदी या वेळी उपस्थित होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा भव्य पुतळा पुणे विद्यापीठास भेट देण्यात आला आहे.

चव्हाण म्हणाले, 'महात्मा फुले हे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे खऱ्या अर्थाने जनक होते. शिक्षण व समता या दोन शब्दांत त्यांच्या कार्याची महती स्पष्ट होते. पुणे ही त्यांच्या या कार्याची कर्मभूमी होती. त्यामुळे पुणे विद्यापीठात त्यांचा पुतळा उभा राहणे ही औचित्यपूर्ण घटना आहे. महिला, दलित व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांनी सर्वप्रथम मागणी केलेला सक्‍तीचे मोफत शिक्षण देण्याचा कायदा प्रत्यक्षात येण्यास मोठा कालावधी गेला. आजही महिला आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी मांडलेले विचार पूर्णत्वास नेण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. त्यासाठी सामाजिक समतेच्या विचारांची प्रेरणा सर्वांना मार्गदर्शक ठरेल.''

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे महाराष्ट्राला प्रगतीचा वेगळा टप्पा गाठणे शक्‍य झाल्याचे सांगून राज्यपाल के. शंकरनारायणन म्हणाले, 'महिलांच्या सबलीकरणासाठी विविध प्रयत्न झाले असले, तरी हुंडाबळी आणि स्त्रीभ्रूणहत्या यासारख्या घटना समाजाला मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. शिक्षण व स्वयंरोजगार याद्वारेच महिलांचे सबलीकरण शक्‍य आहे. शेतकऱ्यांसमोर आज अनेक गंभीर समस्या असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी कृषी विद्यापीठे, उद्योजक व शेतकरी यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.''
डॉ. हरी नरके व डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

'डॉ. आंबेडकरांचाही पुतळा देऊ'
महात्मा फुले यांच्याप्रमाणेच पुणे विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा लवकरात लवकर उभारण्यात यावा. बाबासाहेब आंबेडकरांचाही पुतळा महात्मा फुले समता परिषद विद्यापीठास देण्यास तयार आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. स्त्री शिक्षणाचा पाया इतर कोणी नाही, तर सावित्रीबाई फुले यांनीच घातला होता; या संदर्भातील इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

Sunday, November 18, 2012

कोत्तापल्ले अध्यक्षपदी




आणि अखेर अखिल भारतीय  मराठी साहित्य  संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड झाली.या मतदारांमध्ये सर्वाधिक मतदार ब्राह्मण आहेत असे बघुन ह.मो.मराठे यांनी जातीय प्रचाराचा धडाका लावला होता.त्यावरुन वादाच्या भोव-यात ही निवडणुक सापडली होती.मतदारांनी जातीय प्रचाराला भिक न घालता मराठेंना त्यांची जागा दाखवुन दिली. सांस्कृतिक सत्तेचे हे शिर्ष पद मानले जाते.ते कोत्तापल्लेंना दिले जाणे हा प्रागतिक महाराष्ट्रातील पुरोगामी विचांरांचा विजय आहे. कोत्तापल्ले स्वत:ला फुले-केशवसुतांचे वारसदार मानतात.ज्या आसनावर बसुन आजवर गं.बा. सरदार,तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, य.दि. फडके, वसंत बापट, शंकरराव खरात, केशव मेश्राम, रा.ग.जाधव,अरुण साधु,उत्तम कांबळे आणि  डहाके यांनी आपले चिंतन व्यक्त केले तेथे बसुन आपली भुमिका मांडायचा सन्मान आणि संधी मराठी भाषकांनी कोत्तापल्लेंना दिलेली आहे. कोत्तापल्ले यांचे  व्यक्तीमत्व हे एक समतोल,चिंतनशील आणि प्रागतिक व्यक्तीमत्व आहे.  एक शिक्षक,नामवंत प्राध्यापक आणि  यशस्वी कुलगुरु म्हणुन त्यांची जशी ओळख आहे तसेच ते एक साक्षेपी समिक्षक, कवी, लेखक, कादंबरीकार आणि संपादक म्हणुनही महाराष्ट्राला परिचित आहेत."कवीची गोष्ट," "देवीचे डोळे", "राजधानी", "रक्त आणि पाऊस," "सावित्रीचा निर्णय","गांधारीचे डोळे", "ताराबाई शिंदे" हे त्यांचे ग्रंथ महत्वपुर्ण आहेत. 
मराठवाडा साहित्य परिषदेत कारकुन म्हणुन नोकरी करीत त्यांनी आपले शिक्षण घेतले.पुढे तिथेच ते पदाधिकारी झाले. नाशिकच्या ओबीसी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. डा‘.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील आणि पुणे विद्यापिठातील त्यांची कारकिर्द गाजली.एक स्वच्छ आणि निर्भय कुलगुरु म्हणुन  त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.मराठवाडा साहित्य परिषदेचे ते पदाधिकारी असताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर त्यांनी काम केलेले आहे.त्यावेळी महामंडळावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मी  प्रतिनिधित्व करीत होतो.आम्ही अनेकवर्षे एकत्र काम केलेले असल्याने मला त्यांची कार्यपद्धती जवळुन बघता आलेली आहे.कोत्तापल्लेसर सौम्य व्यक्तीमत्वाचे असुन  त्यांनी कायम दुबळ्या-वंचित घटकाची बांधीलकी मानुन  सामाजिक भुमिकेतुन आपले वक्तृत्व आणि लेखन केलेले आहे.आज ते महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि अभिजात मराठी भाषा समितीचे  सदस्य म्हणुन कार्यरत आहेत.
या निवडणुकीत त्यांना ६५% मते मिळाली.त्यांच्या विरोधातील तिघांना मिळुनही ३५% पर्यंत जाता आले नाही.सुमारे ११०० मतदारांपैकी ८०% नी म्हणजे ८८९ जणांनी मतदान केले.कोत्तापल्ले यांना सर्वाधिक ५८४ मते मिळाली.ह.मो.मराठे यांना १६४,शिरिष गोपाळ देशपांडे यांना १०४ आणि अशोक बागवे यांना २३ मते मिळाली. कोत्तापल्ले यांचा विजय मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा ज्यांच्याकडे नाही अशातील काही सनातन्यांनी साहित्यात लोकशाहीच नको, हा झुंडीच्या दबावाखालचा विजय आहे अशी मुक्ताफळे उधळली.या मतदारांमध्ये सर्वाधिक मतदार ब्राह्मण आहेत असे बघुन ह.मो.मराठे यांनी जातीय प्रचाराचा धडाका लावला होता.त्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवुन दिली.
महामंडळाची रचना फार बंदिस्त आहे.प्रामुख्याने पुणे,मुंबई, नागपुर आणि औरंगाबाद येथील साहित्य संस्थांचे त्याच्यावर वर्चस्व  आहे.इतरांना तेथे पोचताच येणार नाही असा घटनेत कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे.सत्ताधारी जातीने सत्तेच्या जोरावर तेथे शिरकाव करुन या सांस्कृतिक सत्तेची किल्ली आपल्या ताब्यात घेण्यासाठी जोरदारी मुसंडी मारलेली आहे.त्याखालोखाल महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे नेतृत्व करणा-या एका समाजाने स्थान पटकावलेले आहे.अश्याप्रकारे हे महामंडळ आजतरी तीनच जातींच्या ताब्यात आहे. पुढची १०० वर्षे राहिल.या तिघांशी जमवुन घेणे ज्यांना जमते आणि त्या त्या वेळी महामंडळाच्या सुत्रधारांशी ज्यांचे लागेबांधे असतात,सामाजिक समिकरणे,  जातीय समतोल, काळाची गरज आणि शेवटी साहित्यिक गुणवत्ता हे रसायन जमले की भट्टी आणि बत्ती लागते आणि ते अध्यक्षपदी निवडुन येतात.
हमोंनी केलेली गणिते अंगलट आली आणि हमो पडले. खरे तर साहित्यिक म्हणुन यावेळच्या रिंगणात तेच जास्त प्रसिद्ध होते. निवडुन येण्याची संधीही त्यांना जास्त होती. पण महामंडळातील पदाधिका-यांशी कोत्तापल्लेचेंचे असलेले सलगीचे संबंध बघुन हमो बिथरले आणि त्यांनी हाराकिरी करायचे ठरवले.कोकण, ब्राह्मण्य आणि सर्जनशील लेखनातील प्रसिद्धी यांच्या जोरावर तेच निवडुन यायचे.पण महामंडळाचे जे बुरुज उखडणे  भल्याभल्यांना जमले नाही,तेथे हमोंनी ढुश्या मारायला सुरुवात केली. महामंडळाच्या ४ शंकराचार्यांशी जमवुन घेण्याऎवजी त्यांना आपण वाकवु शकु,फरफटत नेवु शकु असा त्यांचा व्होरा होता.तो चुकला. जेथे महामंडळाच्या विहीरीतच {मनात}नव्हते तेथे हमोंच्या पोह-यात कुठुन येणार? त्यामुळे हमो सपशेल तोंडावर आपटले. त्यापेक्षा त्यांनी महामंडळाच्या पदाधिका-यांशी सुत जमवले असते आणि जातीय प्रचार केला नसता तर हमोंना संधी मिळण्याची जास्त शक्यता होती. असो.
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे अडिच दिवसाचे "शिराळशेट" असतात.नंतर वर्षभर त्यांना केवळ उत्सवमुर्ती म्हणुन तोंडपाटिलकी करण्याव्यतिरिक्त दुसरे काहीही काम नसते.  तरीही या निवडीला प्रतिकात्मक महत्व आहेच.ज्या संमेलनाचे निमंत्रण १८८५ साली फुल्यांनी नाकारले होते त्याच्या अध्यक्षपदी १२७ वर्षांनी एका फुलेवादी साहित्यिकाची  निवड होणे ही एक महत्वाची घटना आहे.या संमेलनाला लाखो लोक जमतात. फार मोठी प्रसिद्धी आणि मान्यता हे या पदाचे वैशिष्ट्य असते. एका सांस्कृतिक महोत्सवाचा मानबिंदु होण्याचे भाग्य कोत्तापल्लेंना लाभल्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन!
                                           ................................