पुरावे आहेत, जनसमर्थन हवे.
मल्याळम भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला आहे.जगभरातील ३कोटी ३३लख लोक ही भाषा बोलतात.असा दर्जा मिळविणारी ही पाचवी भारतीय भाषा ठरली आहे.यापुर्वी तमिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड चार भाषांना हा दर्जा मिळालेला आहे. यापुर्वी मल्याळमचा अभिजाततेचा दावा गुणवत्तेवर फेटाळण्यात आला होता. केरळचे सत्ताधारी व विरोधी पक्ष एकत्र येवून त्यांनी पुन्हा नव्याने प्रयत्न केल्याने त्यांना शेवटी यश मिळाले आहे.हा दर्जा मिळाल्याने मल्याळमची प्रतिष्टा वाढली असून केंद्र सरकारकडून दरवर्षी किमान १००कोटी रुपयांचा निधी त्यांना मिळणार आहे. याशिवाय विद्यापिठ अनुदान आयोग केंद्रीय विद्यापिठांमध्ये या भाषेची अध्यासने स्थापन करण्यासाठी निधी देईल तो वेगळा. यानिर्णयामुळे मराठीच्या अभिजाततेच्या दाव्याला बळकटी मिळाली असून मराठीचे एक पाऊल पुढे पडले आहे.
भाषेच्या अभिजातपणासंबंधीचे केंद्र सरकारचे ४ निकष आहेत - भाषेची श्रेष्ठता, भाषेची दीड ते दोन हजार वर्षाची प्राचीनता आणि सलगता, भाषिक आणि वाड्मयीन परंपरेचे स्वयंभूपण, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणार्या खंडासह असलेले नाते. या चारही मुद्यांच्या अनुषंगाने विचार करता मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, हे सबळ पुराव्यानिशी सिद्ध करणारा १२५ पृष्टांचा अहवाल आम्ही याच आठवड्यात राज्य सरकारला सादर केलेला आहे. पुरावे आहेत, जनसमर्थन तेव्हढे हवेय.मराठी भाषा अभिजात ठरण्यासाठी काही पूर्वग्रह आणि खोलवर रुजलेल्या गैरसमजुती यांचा फार मोठा अडथळा होता. आहे. मराठीचे वय अवघे आठशे वर्षे आहे, अशी लोकसमजूत करून देण्यात आलेली आहे.खरे तर आपल्या भाषेचे वय किमान दोन हजार वर्षे असल्याचे सज्जड पुरावे आहेत. महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी या तीन वेगळ्या भाषा नसून ही एकाच मराठीची तीन रुपे आहेत हे वास्तव आजवर नजरेआड करण्यात आलेले होते.प्राचीन महारठ्ठी भाषा, मरहठ्ठी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास झालेला आहे. या वेगवेगळ्या भाषा मुळीच नसून मराठीचाच हा बारदाना आहे असे ल. रा. पांगारकर यांनी सोदाहरण दाखवून दिलेले आहे.
मराठीतले आद्यग्रंथ मानले जाणारे 'लीळाचरित्र', 'ज्ञानेश्वरी', 'विवेकसिंधू' हे मराठी प्रगल्भ व श्रीमंत झाल्यानंतरचे श्रेष्ठ ग्रंथ आहेत. जागतिक तोडीचे असे ग्रंथ भाषेच्या बालवयात निर्माण होणे शक्य आहे का? आठशे वर्षांपूर्वी ज्या भाषेत हे जागतिक दर्जाचे ग्रंथ लिहिले गेले ती त्याच्या आधी हजार बाराशे वर्षे अत्यंत समृद्ध भाषा होती याचे शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रांथिक पुरावे आज उपलब्ध झाले आहेत.
मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ सुमारे दोन हजार वष्रे जुना असून, त्याचे नाव 'गाथासप्तशती' असे आहे. संस्कृतवाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली, असा संतप्त सवाल संत एकनाथांनी विचारला होता. एकनाथांची भाषा आजची मराठी भाषा असूनही ते तिला प्राकृत म्हणतात. यावरून या दोन वेगळ्या भाषा नाहीत हेच स्पष्ट होते. ज्ञानेश्वरांनी मराठीला देशी भाषा म्हटलेले आहे. हेमचंद्रांचे 'देशी नाममाला' हे या भाषेचे व्याकरण प्रसिद्ध आहे.वररुची (कात्यायन), चंड, हेमचंद्र, त्रिविक्रम, वसंतराज, मार्केंडेय, लक्ष्मीधर या ख्यातनाम व्याकरणकारांनी महाराष्ट्रीला सर्वाधिक महत्वाचे स्थान दिलेले आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेकडे सुमारे 30 हजार प्राचीन पोथ्या उपलब्ध असून त्यातील दीड ते दोन हजार वर्षे जुन्या असलेल्या सुमारे ८0 ग्रंथांमध्ये मराठी भाषा सापडते. त्यात संस्कृतातील कालिदासाचे शाकुंतल (चौथे शतक) आणि शुद्रकाचे मृच्छकटिक (सहावे शतक) यांच्यासह प्रवरसेनाचे सेतुबंध (पाचवे शतक), वाक्पतीराजाचे गौडवध [इ.स.७५०], भद्रबाहूचे आवशयका निरयुक्ती (तिसरे शतक), विमलसुरीचे पौमचरिया (पहिले ते तिसरे शतक),लीलावती-कौतुहल[आठवे शतक] आदींचा समावेश आहे. रामायण, महाभारतातही शेकडो मराठी शब्द सापडतात. दोन हजार वर्षांपूर्वी 'बृहत्कथा' हा पैशाची भाषेतील ग्रंथ गुणाढय़ या मराठी लेखकाने लिहिलेला आहे. 'विनयपिटक', 'दीपवंश', 'महावंश' या बौद्ध ग्रंथांमध्ये पाली व सिंहली भाषेत महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. मोगलिपुत्तातिष्य याने काही 'थेर' म्हणजे र्शेष्ठ धर्मोपदेशक निरनिराळ्या देशांना पाठवल्याचा उल्लेख आहे. पैकी 'महारठ्ठ' देशात थेरोमहाधम्मरखिता यास पाठवले, {'रक्खितथेरं वनवासि योनक धम्मरक्खित थेरं अपरंकतं महाधम्मरक्खित थेरं महारठ्ठ.'} असे त्यात म्हटले आहे.
हार्वर्ड विद्यापिठाचे प्रा.विट्झेल यांचे ताजे संशोधन सांगते की, संस्कृत ही वैदीक भाषेतून विकसित झाली. वैदीक भाषा ही त्या आधीच्या वैदीकपूर्व बोली भाषांमधून जन्मली. मराठी ही मुख्यत: महाराष्ट्राची लोकभाषा असून वेदपूर्वकाळापासून चालत आलेल्या वैदीकपूर्व बोलीतून जन्माला आलेली आहे. आजपर्यंत मराठीवर आर्यांची बोलीभाषा, वैदिक, संस्कृत व विविध प्राकृत तसेच द्रविडी भाषा यांचा परिणाम जरुर झालेला असला तरी मराठी ही संस्कृतची मुलगी नक्कीच नव्हे. मराठीत तत्सम, तद्भव व देश्य यात तीनही प्रकारचे शब्द आढळतात. महाराष्ट्री म्हणून जी प्राकृत भाषेतील विशेष प्रौढ व वाड्मयीन भाषा तीच मराठी होय. मराठी भाषेतील पहिला शिलालेख 2220 वर्षांपूर्वीचा आहे. तो ब्राह्यी लिपीतील असून, तो पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटातील आहे. या शिलालेखात 'महारठिनो' लोकांचा स्पष्ट उल्लेख आहे. डॉ. वा. वि. मिराशी यांनी आपल्या ’सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख' या ग्रंथात हा शिलालेख प्रकाशित केला आहे. (''..व महरठिनो अंगियकुलवधनस सगरगिरिवलयाय पथविय पथमवीरस वस.. य महतो मह.. '' अनुवाद- ''..महारठी अंगिय कुलोत्पन्न गिरिसमुद्रवलयांकित पृथ्वीवरील वीर्शेष्ठ.. महान अशा पुरुषांत र्शेष्ठ अशा..'') असेच उल्लेख कार्ले,भाजे, बेडसे येथील शिलालेखातही मिळतात.मराठी भाषा ब्राम्ही,देवनागरी आणि मोडी लिपीत लिहिली गेलेली आहे. संस्कृत भाषेला संस्कृत हे नाव मिळण्याआधी महाराष्ट्री भाषा अस्तित्वात होती. एवढेच नाही तर ती प्रगल्भ झालेली होती. हाल सातवाहनाची 'सत्तसई', जयवल्लभाचा 'वज्जालग्ग' हा सुभाषित कोश, प्रवरसेन वाकाटकाचे 'रावणवहो', वाक्पतीराजाचे 'गऊडवहो' ही महाकाव्ये हे महाराष्ट्री प्राकृतातील मुख्य ग्रंथ. पैकी 'सत्तसई' व 'रावणवहो' नि:संशय महाराष्ट्रात लिहिले गेले. उद्योतनसुरीने इ. स. ७७८मध्ये लिहिलेल्या 'कुवलयमाला'त 'मरहट्ट' भाषेचा उल्लेख आहे. {'दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य। दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे।' बळकट, ठेंगण्या, सावळ्या अंगाच्या काटक, अभिमानी, भांडखोर, दिण्णले (दिले), गहिल्ले (घेतले) असे बोलणाऱ्या मराठ्यांस त्याने पाहिले.) असे तो म्हणतो.
'महाराष्ट्राश्रया भाषां प्रकृष्ट प्राकृतं विदु:।' असे महाकवी दंडी [६ वे शतक] म्हणतो. म्हणूनच महाराष्ट्री प्राकृत हा महाराष्ट्रीयांचा अभिमानविषय आहे. महाकवी बाणभट्ट (सातव्या शतकाचा प्रथमार्ध) याने हर्षचरिताच्या प्रास्ताविकात गाथा कोशाचा उल्लेख केला आहे. अपभ्रंशापासून मराठी निघाली, हे डॉ. वि. भि. कोलते यांनी वाड्मयीन पुराव्याने सिद्ध केले आहे. वराहमिहिराने 'बृहत्संहिते'त महाराष्ट्रीयांविषयी 'भाग्ये रसविक्रयिग: पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्र': असे म्हटले आहे. (बृहत्संहिता 10.8) ऐहोळे शिलालेखात (इ.स. 634) सत्त्याश्रय पुलकेशी (चालुक्य) हा तिन्ही महाराष्ट्राचा सार्वभौम राजा झाल्याचा उल्लेख आढळतो. (एपि. इं. 6.4). प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यु-एन-त्संग (इ. स. 629 ते 645) महाराष्ट्रास 'मोहोलाश' असे संबोधून त्याविषयी विस्ताराने लिहितो.राजशेखर स्वत:ला 'महाराष्ट्र चुडामणी' म्हणवून घेतो.
राजाराम शास्त्री भागवत, ज्ञानकोशकार केतकर, शं.गो.तुळपुळे, अन फेल्डहाऊस,विट्झेल, पांगारकर, मिराशी,कोलते,यांची मांडणी आणि शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित पोथ्या, प्रकाशित ग्रंथ या सार्यांच्या संशोधनातून एक 'प्रमाणक परिवर्तन' (पॅराडाइम शिफ्ट) होणार असून मराठीची श्रेष्टता, मौलिकता, प्राचिनता आणि प्रवाहीपण याबाबत शिक्कामोर्तब करणारी अभिजात दर्जाची मोहोर उमटणार आहे. मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे.आजवर सुमारे एक लाख पुस्तके प्रकाशित झालेल्या मराठीत दरवर्षी दोन हजार पुस्तके प्रकाशित होतात. पाचशे दिवाळी अंक निघतात आणि छोटीमोठी सुमारे दोनशे साहित्य संमेलने होतात. नामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल,तसेच पाठ्यपुस्तके, धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे दोनशे पन्नस कोटींपर्यंत आहे. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राबाहेरील १५ विद्यापिठांमध्ये मराठी शिकवली जाते. देशातील ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यात आणि जगातील ७२ देशांमध्ये मराठी भाषकांची वस्ती आहे.सव्वा अकरा कोटी लोकांच्या या राष्ट्रीय ज्ञानभाषेला, महानुभाव आणि जैनांच्या धर्मभाषेला, अमृतातेही पैजा जिंकणार्या अभिजात मराठीला तिच्या लेकरांचा एकमुखी पाठींबा मिळाला तर तिला या दर्जापासून कोणीही रोखू शकणार नाही.