Thursday, October 31, 2013

सावित्रीला नकार, गर्जे विश्वंभर!

सावित्रीला नकार, गर्जे विश्वंभर!
"नामाचा गजर, गर्जे मुठा तीर!" हा श्री.विश्वंभर चौधरी यांचा लेख वाचला.{लोकसत्ता, पुणे, दि.२९आक्टो.२०१३} श्री.चौधरी हे उजव्या छावणीचे परमपुज्य विचारवंत आहेत. ते अण्णा हजारे यांचेही मार्गदर्शक आहेत.भ्रष्टाचार,शिक्षण, पर्यावरण आदी सगळ्याच विषयांमधला त्यांचा अधिकार दांडगा मानला जातो.त्यांचा शब्द शेवटचा मानला जावा असेही त्यांचे समर्थक सांगत असतात.
पुणे विद्यापिठाच्या सिनेटने सर्वानुमते "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ"असा  विद्यापिठाचा नामविस्तार करण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद असल्याचे मौलिक प्रतिपादन या लेखात करण्यात आलेले आहे.राजकीय डावपेचांचा भाग म्हणून श्री.चौधरी यांनी या लेखात "नामविस्तारास माझा विरोध नाही असे  स्वसंरक्षणार्थ नमूद करतो" असेही लिहिण्याची खबरदारी घेतलेली आहे. नामांतराने विद्यापिठाची गुणवत्ता जर वाढणार नसेल आणि देशाच्या प्रतिभेत जर   भर पडणार नसेल  तर नामांतर फजूल आहे असा त्यांचा दावा आहे. "माझा विरोध नाही" असे एकदा लिहिले म्हणजे मग लेखात पुढे कितीही विरोध  केला तरी मी विरोध नसल्याचे म्हटले होते याकडे बोट दाखवता येते. हा बचाव फार जुना झाला.चतुराईचा भाग म्हणून लेखक काय घोषणा करतो,यापेक्षा त्याचा सगळा लेख काय म्हणतो हे अधिक महत्वाचे असते. चौधरींचे सगळे प्रतिपादन नामविस्ताराची  खिल्ली उडवणारे आहे.
जगभर अनेक विद्यापिठे, रस्ते, इमारती, पुल, विमानतळ यांना आदरणीय व्यक्तींची नावे देण्याची पद्धत आहे.नव्यापिढीला  स्मारके, पुतळे, नावे यातून प्रेरणा मिळत असते. शेवटी हे सारे प्रतिकात्मकच असते. त्यातून प्रश्न सुटणार नसले, समस्या संपणार नसल्या तरी आपल्या पुर्वजांबद्दल आदरभाव व्यक्त करण्याची ती एक प्रतिकात्मक पद्धत असते. नाही तर जगातले सगळे पुतळे आणि स्मारके उखडूनच टाकावी लागतील. महापुरूषांची सगळी नावे पुसून काढल्याने आणि सगळी प्रतिके नष्ट केल्याने जर चौधरीमहाशयांचे प्रश्न आपोआप सुटणार असतील तर ही जादुची कांडीच म्हटली पाहिजे. मग देशाचा राष्ट्रध्वज,राष्ट्रगीत, बोधचिन्ह यांना कशालाच महत्व द्यायला नको.
शब्दच्छल करण्यात मला रस नाही. "सावित्रीबाईंच्या नावाला विरोध नाही पण विद्यापिठाचे नाव बदलल्याने भ्रष्टाचार संपणार आहे का?  असे विचारणे म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपविणेच होय.चौधरींना  नामविस्ताराला विरोध करण्याचा जरूर घटनात्मक हक्क आहे, पण आम्हालाही त्यांच्या भुमिकेची झाडाझडती घेण्याचा अधिकार आहे.
मुळात पुणे विद्यापिठाच्या सिनेटने एकमताने केलेल्या ठरावाचा सर्वांकडून आदर केला जायला हवा असे मला वाटते. ब्रांड नेमचे महत्व मलाही कळते.तथापि अनेक जागतिक किर्तीच्या कंपन्यांनी आजवर अनेकदा आपली नावे बदललेली आहेत.उदाहरणार्थ टॆल्कोचे टाटा मोटर्स  झाले,......इ.इ." शहरांची नावे बदलण्यात आली. अगदी देशांचीही.सगळ्याच विद्यापिठांना आजवर महापुरूषांची नावे देण्यात आली. ते योग्यच झाले.
एक खटकणारी गोष्ट म्हणजे इतर नावांचा सन्मान राखला जातो,पण डा. बाबासाहेब आंबेडकर किंवा सावित्रीबाईंचे नाव आले की आडवळणाने खळखळ केली जाते असे का? ही कोणती मानसिकता आहे.नामविस्ताराला थेट विरोध करणे परवडणारे नाही म्हणून शाब्दीक चलाखी करायची आणि सटरफटर मुद्दे उपस्थित करायचे ही लबाडी झाली. तुम्हाला सावित्रीबाईंची आलर्जी आहे हेच खरेय.
भ्रष्टाचार समूळ नष्टच व्हायला हवा, पण म्हणून उद्या कोणी असे विचारले, की "विश्वंभरजी, भ्रष्टाचार गेला की आपोआप जातीयता नष्ट होईल काय? दुष्काळ हटेल, भारतपाक वैर, दहशतवाद, प्रदुषण संपेल काय? गरीबी आपोआप हटेल किंवा सगळ्यांना आरोग्य-शिक्षण मिळेल काय?" तर याचे उत्तर नाही असेच असणार. कारण हे वेगवेगळे विषय आहेत. त्यांची गल्लत करायची गरज नाही. उद्या एखाद्या नवविवाहीत जोडप्याला तुम्ही आशिर्वाद द्यायच्याऎवजी असेही विचाराल,की तुमच्या लग्नामुळे देशातील भ्रष्टाचार दूर होणार आहे काय? नसेल तर मग तुम्ही लग्न कशाला करता?"
हातचलाखी करून जेव्हा "आमचा नामांतराला विरोध नाही पण..." असे प्रवचन सुरू केले जाते तेव्हा "ओठात एक पोटात एक" अशीच बेइमानी असते, हे न कळण्याइतके कोणीही आता बालीश राहिलेले नाही. आज देशात जातीव्यवस्था पाळणे हाही एक भ्रष्टाचारच आहे, त्याचे लाभार्थी मात्र त्यावर सोयिस्कर मौन पाळतात, याचे रहस्य आम्हाला कळत नाही काय? जात, वर्ग, लिंगभाव यातून होणारे कोट्यावधींचे शोषण ज्यांना दिसत नाही तेच नावामुळे प्रश्न सुटतील काय असला साळसूद प्रश्न विचारून बुद्धीभेद करित असतात.  विश्वंभरजी, तुम्ही नामविस्ताराला विरोध करून तुमच्या मनातला स्त्रीविरोधी पुरूषी आकस आणि सामाजिक उपहासच प्रगट केलेला आहे.
१२१ कोटींच्या देशात मी म्हणेल तोच प्राधान्यक्रम असे जर विश्वंभरजींना म्हणायचे असेल तर इतरांच्या मतस्वातंत्र्याचे काय?तुम्हाला सगळा प्राधान्यक्रम ठरवण्याचा ठेका कोणी आणि केव्हा दिला? तुम्ही देशाचे मालक कधी झालात? फुले-शाहू-आंबेडकरांची नावे सुचवणे हा गुन्हा केव्हापासून झाला? अजुनतरी या देशात भारतीय संविधानाचेच राज्य आहे.
शिक्षणाच्या घसरणार्‍या दर्जावर लिहिण्यासाठी त्यांना नामविस्ताराचाच मुहुर्त का निवडावासा वाटला? नामविस्तारामुळे दर्जा वाढणार नसेलही कदाचित, पण नामविस्तारामुळे दर्जा आणखी घसरणार आहे काय? आजवर अनेक नामांतरे झाली, आजही क्रिकेटक्षेत्रात ती चालूयत पण त्यावर तुमची मिठाची गुळणी यातला कावा आम्हाला कळत नाही काय?
आमची अस्मिता, आमची प्रतिके यांची खिल्ली उडवणार असाल तर त्यामागचे तुमचे जात-वर्ग-लिंगभावाचे राजकारण तपासलेच जाणार नाही या भ्रमात यापुढे राहू नका.





Monday, October 21, 2013

झारखंडमध्ये ओबीसी आरक्षणासाठी एल्गार

सौजन्य:सकाळ, {सर्व आवृत्या} दि.२१ आक्टोबर,२०१३
http://epaper3.esakal.com/21Oct2013/Normal/Nashik/index.htm....
http://epaper3.esakal.com/21Oct2013/Normal/Nashik/page10.htm.....
भुजबळांचा झारखंडमध्ये ओबीसी आरक्षणासाठी एल्गार