Thursday, November 27, 2014

जोतीराव - विनम्र अभिवादन...

२८ नोव्हेंबर २०१४
महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन.

आज त्यांना आपल्यातून जाऊन १२४ वर्षे पूर्ण झाली नी १२५ वे वर्ष लागले. शतकोत्तर रौप्य वर्ष....
हा माणूस काळाच्या एव्हढा पुढे होता की एव्हढी वर्षे झाली तरी त्यांचे विचार कालबाह्य झाले नाहीत, आजही प्रस्तुत आहेत ते.
आयुष्य त्यांचे समर्पित होते, ज्ञानार्जन नी ज्ञाननिर्मिती व ज्ञानप्रसाराला...
हा माणूस झुंजला सार्‍यासार्‍या शोषित वंचितांसाठी....
सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना हे त्यांचे मिशन होते.
स्त्री-पुरूष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा, आंतरजातीय विवाह या पंचसुत्रीतला कोणताही कार्यक्रम  बाद झाला नाही,
जसजसा काळ जातोय तसतसा हा माणूस अधिकाधिक समकालीन बनतोय.
विनम्र अभिवादन...

Saturday, November 8, 2014

दिलदार पु.ल.

दिलदार पु.ल.



शाळकरी वयात पुलंच्या साहित्याने मनावर गारूड केलेले होते.

त्यांच्या वाढदिवसाला त्यांना  शुभेच्छा द्यायला त्यांच्या घरी गेलेलो. एव्हढा लहान मुलगा एकटा सायकलवर दुरून आला याचे त्यांना कौतुक वाटलेले. मी बावळटासारखी  त्यांना "हरी नारायण आपटेंची" ’गड आला पण सिंह गेला.  ही कादंबरी भेट द्यायला नेलेली. पुलंनी त्या भेटीचेही बहुधा मला बरं वाटावं म्हणुन छान कौतुक केलं.

म्हणाले, "मुला, अरे तू कितवीत आहेस?"

"चौथी"

"अरे, मीही चौथीत असतानाच पहिली एकांकिका लिहिली होती. ती याच कादंबरीवर आधारित होती. किती छान योगायोग. बरं सांग, तू हेच पुस्तक का निवडलस?"

मी सरळ खरं कारण सांगून टाकलं.

"ही माझी आवडती कादंबरी आहे, नी सध्या सर्वात स्वस्तात मिळणारी एकमेव चांगली कादंबरी आहे, म्हणून मी ती निवडली."

तेव्हा माझा महिन्याचा पगार पाच रूपये होता नी पुस्तकाची किंमत १ रूपया २५ पैसे होती.
पुल दिलदार होते. हजरजबाबी तर होतेच. त्या पहिल्याच भेटीत त्यांनी आपलंसं केलं.

पुढे सतत भेटत राहिलो. पत्रं लिहित राहिलो. ते प्रत्येक पत्राला आवर्जून उत्तर द्यायचे.

भालचंद्र नेमाडे यांनी पुलंवर केलेली टिका मला फार झोंबली होती. मी पुल भक्तच होतो ना!

मी भाईंकडे नेमाडॆंवर खूप चिडून बोललो. म्हटलं, मला नेमाडॆंचा पत्ता द्या. मी त्यांना खरमरीत पत्रं लिहितो.
त्यांनी विचारलं, " तू नेमाडेंचं कायकाय वाचलेयस?"
"काहीच नाही."

" आधी कोसला वाच. मग मी तुला त्यांचा पत्ता देईन."

भाईंची आज्ञा. वाचली कोसला.

केवळ ग्रेट. खूप भाराऊन गेलो.

म्हटलं, "भाई, नेमाडे तर बाप माणूस आहे. एव्हढा मोठा लेखक तुमच्यावर का भडकतो?"

"हे बघ, तू अजून खूप लहान आहेस. थोडा मोठा झालास की कळेल तुला. अरे, मी मध्यमवर्गियांची करमणूक करणारा बरा लेखक आहे. मात्र माझा रोल विदुषकाचा आहे.मात्र  नेमाडे हा मराठीतलाच नव्हे तर जागतिक साहित्यातला अफाट लेखक आहे. त्यांची माझ्यावरची टिका फारशी चुकीची नाही.तू या वादात पडू नकोस. नेमाडेंची साहित्यातली झेप बघ. त्यांची दृष्टी बघ.हे सारं महाराष्ट्राला पुढं नेणारं आहे हे कधीही विसरू नकोस."

"पु.ल". - असा दिलदार "भाई " पुन्हा होणे नाही.
...............................................

Tuesday, November 4, 2014

एबीपी माझा प्रमितीची मुलाखत

एबीपी माझा प्रमिती मुलाखत 

Interview of Pramitee Narke { as Avalee - Jijai - Wife of Saint Tukaram } on ABP Majha, In Remote Majha, at 1.30pm & 5.30pm.. Monday, 3 Nov.2014

{about Marathi Serial "Tu Majha Sangatee" on Life of Saint Tukaram and Avalee _ Jijai, on Etv Marathi. }

एबीपी माझावर प्रमिती नरकेची मुलाखत, { रिमोट माझा } सोमवार, दि. 3 नोव्हें. 2014, रोजी दु.१.३० वाजता आणि सायं.५.३० वाजता.}
"तू माझा सांगाती" या
 आवली उर्फ जिजाई आणि संत तुकाराम यांची संसारगाथा साकारणार्‍या मालिकेतील आवलीची भुमिका प्रमिती नरके करीत असून, या मालिकेच्या प्रवासाबाबत प्रमितीची मुलाखत....

Monday, November 3, 2014

सदाशिव अमरापूरकर

सदाशिव अमरापूरकर हे सामाजिक प्रश्नांवर पोटतिडकीने बोलणारे कलावंत होते. कार्यकर्त्यांना मदतीचा हात  मिळावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या "सामाजिक कृतज्ञता निधी" ची संकल्पना कृतीशीलपणे उचलून धरणारा आणि गेली २५-३० वर्षे सामाजिक चळवळींची पाठराखण करणारा मित्र चळवळींनी गमावला आहे.
अमरापूरकर "अर्धसत्य" मधील भुमिकेने प्रकाशझोतात आले. त्यांची कन्यादान मधील कामगिरी लक्षणीय होती. मात्र त्यांच्या हिंदी चित्रपटातील नंतरच्या बहुतेक खलनायिकी भुमिका बर्‍याचशा एकसाची आणि भडक होत्या.
सामाजिक प्रबोधनासाठी उभ्या राहिलेल्या "लोकशाही प्रबोधन मंचा" च्या निमित्ताने अमरापूरकरांशी जवळून संबंध आला. औरंगाबाद, नगर, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, राजापूर ते मुंबई अशा दौर्‍यात गावोगाव लोकशाही बचाव च्या भुमिकेतून आम्ही मांडणी करण्यासाठी फिरलो होतो.
डा.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, डा. नरेंद्र दाभोळकर यांच्या टिममध्ये मी सर्वात ज्युनियर आणि बडबड्या. प्रवासात अमरापूरकर मला त्यांच्या कारमध्ये घ्यायचे. अतोनात गप्पा व्हायच्या. अनेक प्रश्नांवरील भुमिका त्यांना समजाऊन घ्यायच्या असायच्या. प्रसिद्धीच्या झोतात असलेला हा रंगकर्मी माझ्यासारख्याशीही अतिशय जिव्हाळ्याने गप्पा मारायचा. अनेक मुद्दे टिपून घेऊन त्यांचा ते भाषणात वापर करायचे. भाषणात सतत नवा कंटेंट असावा यासाठी ते प्रयत्नशील असायचे.
प्रसिद्धीचे अफाट वलय असूनही त्यांचे पाय कायम मातीत घट्ट रुजलेलेच राहिले.
सुमारे दहा दिवसांचा तो दौरा अविस्मरणीय होता. मी सभेचा पहिला वक्ता असायचो. डा.लागू सर्वात शेवटी बोलायचे. डा.लागू, निळूभाऊ आणि अमरापूरकरांना बघायला तुफान गर्दी व्हायची. सभेनंतर झोळी फिरवली जायची. कार्यक्रमाच्या खर्चासाठी सभेला आलेल्या लोकांकडूनच निधी मागितला जायचा. ते न लाजता झोळी फिरवायचे.लोक भरभरून मदत करायचे. डा. दाभोलकर आमचे व्यवस्थापक होते.
रात्री मुक्कामी सगळे एकत्र जेवायचो, गप्पांचे फड रंगायचे.
खरेच तो प्रवास किती सुंदर होता!...
त्यांनी अहमदनगरला अ.भा.मराठी नाट्यसंमेलन घेतले. त्यांनी मला अगत्याने निमंत्रित केले. परिसंवादात बोलायला लावले. महात्मा फुले हे मराठीचे पहिले आधुनिक नाटककार असल्याचे आम्ही याच नाट्यसंमेलनात आवर्जून मांडले. ते पुढे रुजले. अमरापूरकरांचा त्याकामी आग्रह आणि पुढाकार होता.
पुढे त्यांची कायम भेट होई. भरभरून बोलत. विचारपूस करीत.
एक जवळचा मार्गदर्शक आणि हितचिंतक गेल्याचे अपार दु:ख आहे.
विनम्र श्रद्धांजली.