*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली ! *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्न! *’लोक माझे सांगाती’ शरद पवारांची धावती यशोगाथा!
*पुस्तकाचे नाव राजकीय आत्मकथेऎवजी 'गौरवग्रंथ' असायला हवे होते!
...........................................
शरद पवारांच्या 75 व्या वाढदिवशी ’लोक माझे सांगाती’ ही शरद पवारांची यशोगाथा सांगणारी राजकीय आत्मकथा प्रकाशित करण्यात आली. 402 [16+354+32] पानांच्या या पुस्तकात असंख्य रहस्यं उलगडलेली असतील अशा अपेक्षेने हे पुस्तक वाचायला घेणाराची जिज्ञासा हे पुस्तक पूर्ण करतं का?
आपल्या हयातीतच दंतकथा बनलेल्या आणि चोवीस तास अखंड राजकारणी असलेल्या या माणसाची विराट यशोगाथा पानापानावर कथन करण्यात आलीय. शरद पवार हे अतिशय मुत्सद्दी राजकारणी. समोरच्या भल्याभल्यांचा कायम कात्रजचा घाट करण्यासाठी ख्यातनाम. 50 वर्षे सत्तेत असताना पवारांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा धावता आढावा या पुस्तकात आलेला आहे. राजहंस प्रकाशनची निर्मिती असलेल्या या पुस्तकाच्या तीन आवृत्या हातोहात संपल्या. हा महत्वाचा राजकीय दस्तावेज पुढे आणल्याबद्दल संबंधितांचे अभिनंदन.
पवार बोलले त्याचे हे पुस्तक झाले असणार. जेष्ठ संपादक सुजाता देशमुख आणि अभय कुलकर्णी यांनी हे लेखन, शब्दांकन, संपादन केले असणार. पुस्तकाला पवारांच्या कन्या खा.सुप्रिया सुळे यांची ’माझे बाबा, माझे हिरो’ ही प्रस्तावना आहे. "जगातले सर्वोत्कृष्ठ आईवडील कुणाचे? माझेच!" अशी त्या सुरूवात करतात.
एकुण नऊ भागात ही आत्मकथा समोर येते.
1.मूस घडताना, 2.मंत्रीपदाची पहिली इनिंग, 3.मुख्यमंत्रीपद : अंक 2, 4. मुक्काम नवी दिल्ली, 5. संयुक्त पुरोगामी आघाडी आकारताना, 6.कर्करोगाला भिडताना,7.व्यक्ती आणि प्रकृती, 8. बारामतीची यशोगाथा,9.येत्या काळात डोकावताना असे हे नऊ भाग.
"भूतकाळात मी फारसा रमणारा नाही" अशी ते पुस्तकाची सुरूवात करतात. "जनतेचं सामुदायिक शहाणपण हाच भारतीय लोकशाहीचा कणा आहे. त्या भरवशावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे. या देशातील जनतेचा विश्वास मला 55 वर्षे लाभला, यापेक्षा अधिक काय हवं? [असू शकतं?] " या शब्दात पवारांनी पुस्तकाचा शेवट केलेला आहे.
जन्माच्या अवघ्या तिसर्या दिवशी पवारांचे राजकारण सुरू झाल्याचे ते सांगतात.पवारांच्या 75 वर्षातील प्रवासाचे प्रामुख्याने तीन टप्पे पडतात. 1975 पर्यंतचा पहिला टप्पा जडणघडणीचा, त्यानंतरचा 1995 पर्यंतचा काळ प्रागतिक, समावेशक आणि उदारमतवादी गतिमान नेता तयार होण्याचा, त्यानंतरचे पवार उघडपणे आयपीएल, ग्लोबल अर्थसत्ता, उद्योगपती आणि लवासामय होत जातीय राजकारणाचा आधार घेणारे दिसतात. ’देशातला सर्वात श्रीमंत राजकारणी’, ’ देशातील सर्वात धनिक व्यक्ती’, ’भूखंडांचे श्रीखंड’ अशा सर्व आक्षेपांचा उल्लेख करून त्या [आळ] अफवांमध्ये तिळमात्रही सत्य नसल्याचे पवार सांगतात. पवारांची विश्वासार्हता अगम्य असल्याने आपण त्यावर विश्वास ठेवायचा!
राज्य आणि देशाच्या अनेक महत्वाच्या पदांवर काम केलेल्या या राजकारण्याला शेकडो रहस्य माहित आहेत त्यातली किरकोळ दोनतीन या पुस्तकात लिहून पवारांनी पुढच्या भागात [जर लिहिली तर ] ती येतील अशी अंधुक आशा निर्माण केलीय.
1. राम जन्मभूमी न्यास आणि बाबरी मशिद समिती यांच्यात सलोखा घडवण्याची जबाबदारी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी पवार आणि भाजपाचे भैरोसिंग शेखावत यांच्यावर सोपवली होती, ते दोघे त्या कामात यशस्वी होणार इतक्यात राजीव गांधींनी सरकारचा पाठींबा काढून घेतल्याने सरकार कोसळलं आणि हे काम अर्धवट राहिलं.
2. पंजाब प्रश्न चिघळला असताना राजीव गांधींनी मध्यस्थी करायला सांगितली आणि पवारांनी लोंगोवाल, प्रकाशसिंग बादल यांच्याशी बोलून सलोखा घडवून आणला.
3. बाबरी मशिद पाडली जाताना आपण संरक्षण मंत्री असल्याने त्या घटनेचे संपुर्ण चित्रण संरक्षण खात्याच्या अधिकार्यांकरवी आपण करून ठेवलय.
4.मनमोहन सिंग यांच्या सरकारचा कारभार सोनिया गांधींच्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेतील झोळीवाल्यांमुळे ठप्प झाल्याने आपण व प्रफुल्ल पटेल यांनी मंत्रीपदाचे राजीनामे दिले होते.
5. गेल्या सरकारवर घोटाळ्याचे व भ्रष्टाचाराचे जे आरोप झाले त्यात काही प्रमाणात तथ्य होते. आहे. इ.इ.
बाकी मग इतर सगळी माहिती येते ती आत्मसमर्थन, आत्मगौरव, यशोगाथा कथन आणि आपले देशविदेशातील सगळ्या महत्वाच्या उद्योगपती, राजकारणी आणि कर्तबगार लोकांशी कसे आणि किती जिव्हळ्याचे संबंध आहेत त्याबाबतची.
शेती आणि शेतकरी यावर पवारांची हुकमत असल्याचा सदैव दावा केला जातो. या पुस्तकात शेतकरी आत्महत्यांबाबत काही ’पवारदर्शन’ वाचायला मिळेल अशी अपेक्षा ठेवणारांच्या पदरी घोर निराशेशिवाय काहीही पडत नाही.
पवारांची या पुस्तकातली काही मतं सामाजिक बाबतीत वादग्रस्त ठरू शकतात. उदा. पृ.क्र.351 वर ते आरक्षणाबाबत लिहितात. त्यांच्यामते आरक्षण जातीआधारित हवे. मात्र आरक्षण फक्त प्रवेशापुरतंच मर्यादित असावं असं मला वाटतं असे ते म्हणतात. पदोन्नतीत आरक्षण ठेवायला त्यांचा विरोध आहे, कारण अकार्यक्षम व्यक्तीस पदोन्नती मिळाल्यास प्रशासनाच्या गुणवत्तेचा बोजवारा तर उडेलच शिवाय नोकरशाहीमध्ये वैफल्याची भावना वाढीला लागेल, अशी चर्चा तरूणाईत असल्याचे पवार सांगतात.
पवारांचा लोकसंपर्क दांडगा आहे. पण त्यातही अभिरूची कोणती? तर जे जे लोकप्रिय ते ते पवारांना प्रिय. उदा. आमच्या भागात निवृत्तीमहाराज इंदूरीकर यांची विनोदी किर्तनं लोकप्रिय आहेत. त्यांचे विचार प्रतिगामी आणि भाषा इरसाल पण ती पवारांना आवडतात असं ते आवर्जून सांगतात. त्यात गुणवत्ता, दर्जा, श्रेष्ठता नसली तरी लोकप्रियता महत्वाची.पवारांचे आवडते कवी पाहा. बहुतेक सगळे अतिशय सुमार पण लोकप्रिय.
लालूप्रसाद यादवांनी बारामती भेटीनंतर पवारांना एक सल्ला दिल्याचे पवार सांगतात. ते म्हणाले, "स्वजातीचे जोरदार संघटन केले की एव्हढी विकासकामे करायची गरज नाही." आयुष्याच्या पुर्वार्धात पुरोगामी, सर्वसमावेशक असलेले पवार 1990 पासून ग्लोबल, क्रिकेटमय, उद्योगपतीमय, लवासामय, लोकानुनय करणारे बनत गेले. ते मराठा जातीमय,जातीयवादी संघटनांचे संरक्षणकर्ते का होत गेले? असा प्रश्न अनेकांनी पवारांवर या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिताना विचारला होता. [पाहा :म.टा.चा अग्रलेख.] मला वाटते त्याचा काही प्रमाणात उलगडा यातून व्हावा.
गांधी घराण्याशी पवारांचे संबंध कधीही सलोख्याचे नव्हते त्याचे कारण त्या घराण्याची रीत.[परंपरा] असे पवार सांगतात. आपल्यावर अनेक आरोप झाले, पण त्यातल्या कोणत्याही आरोपात काहीही तथ्य कसे नव्हते याचीही सफाई पवार देतात.
या संपुर्ण पुस्तकात आत्मपरिक्षण शोधूनही सापडत नाही.
पवार कर्तृत्ववान आहेत यात शंकाच नाही. लढाऊ, मेहनती, उद्योगी आहेतच. मात्र त्यांच्यावर घेतले गेलेले सगळेच आक्षेप निराधार आणि चुकीचे होते असे ते म्हणत असले तरी त्याचे स्पष्टीकरण मात्र आपण कधी दिले नाही, यापुढेही देणार नाही. कारण त्यात काही तथ्य नाही, असे पवार म्हणतात. बस्स! एव्हढ्यावरच त्याची बोळवण करणे ही तर राजकीय चतुराई झाली. पुस्तकाच्या सुरूवातीला ते संत तुकारामांचे वचन उद्धृत करतात. पुस्तकाचे नावही तुकारामांच्या वचनाशी नाते सांगते. मात्र सदा सावध राजकारणी असलेले पवार प्रांजळपणाने काही बोलत नाहीत, पारदर्शकपणाने काहीही सांगत नाहीत, असेच वाचकाला वाटत राहते. या आत्मकथनाद्वारे ’खेळीया’ पवार आणखी एक राजकीय खेळी करीत असल्याचेच जाणवत राहते.
आपले प्रत्येक पाऊल जणूकाही अचुक आणि सुयोग्यच होते असा दावा पुस्तकात पवार करीत असल्याचे पानापानावर बघायला मिळते.
75 वय झाल्यावरही पवार आत्मपरिक्षण करायला तयार नाहीत हाच ह्या पुस्तकाचा संदेश आहे. एव्हढी मोठी सुवर्णसंधी त्यांनी का बरं गमावली असेल? त्यांचे राजकारण आजही गतिमान असल्याने व मुलगी आणि पुतण्या राजकारणात असल्याने पवारांना ’रिस्क’ घ्यायची नसणार. खरंतर मग या पुस्तकाचे नाव आत्मकथेऎवजी 'गौरवग्रंथ' असे असायला हवे होते.
या पुस्तकात मुद्रणाच्या काही चुका आहेत. एखादठिकाणी वाक्य निसटले असावे असे वाटते. उदा. पृ.17, " मीना जगधने यांचा विवाह सासणे कुटुंबात झाला." या आधी आपली एक बहीण जगधने तर एक सासणे यांना दिली असल्याचे पवार सांगतात. यावरून यातील वाक्य सुटले असणार हे लक्षात येते.
पृ.11, उधवणे, पृ.352, झुबिना, असे आहे. प्रत्यक्षात ते उरवणे, रूबिना असे हवे होते.
पृ. 292 ते 296 वर पवारांनी 31 मार्च 1969 ला यशवंतराव चव्हाण यांना लिहिलेले एक जुने पत्र छापलेले आहे. गंमत अशी की या पत्रात चक्क 1972 साली घडलेल्या गोष्टींचे वर्णन आहे. यावरून एकतर हे पत्र तरी नंतरचे असणार किंवा 1972 ची म्हणून आलेली घटना ही 1969 च्या आधीची असणार. पवार येणार्या काळातील [1972 च्या] निवडणूका म्हणजे आगामी निवडणुकांबद्दल लिहित असतील तर संपादकांनी तळटिपेत तसा संदर्भ द्यायला हवा होता. पुढील आवृत्तीत या सर्व दुरूस्त्या करता येतील.
अतिशय उत्सुकतेने वाचायला घेतलेल्या या पुस्तकात जागोजाग पवारांनी पान्हा चोरल्याने हाती फारच थोडे लागल्याची, असमाधानाची, हातचे राखून लिहिल्याची भावना बळावत जाते. मी पवारांचा निस्सिम चाहता असूनही मला असे वाटते. इतरांचे अभिप्राय समजून घ्यायला मला आवडतील.. .... ..
...........................................................