Sunday, October 30, 2016

मोठा विचारवंत!



काही लोक अतिशय भाग्यवंत असतात. बेताचा वकुब असूनही भक्तांच्या आरत्यांच्या जोरावर त्यांचे ढोल वाजत असतात. ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. विचारवंत वगैरे म्हणून ख्यातनामही होतात. काही मोजके लोक मात्र प्रसिद्धीपासून दूर राहून व्रतस्थपणे ज्ञानार्जन/ज्ञाननिर्मिती करीत असतात. त्यांच्यामुळेच समाज श्रीमंत होतो. त्याची उंची वाढते.
भालचंद्र नेमाडे आणि रावसाहेब कसबे यांच्यामधून गेले काही महिने विस्तवही जात नाही. परंतु त्यांचे किमान एका विषयावर एकमत आहे. ते दोघेही दिवंगत वसंत पळशीकरांना थोर विचारवंत मानतात. या दोघांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव असल्याने मी पळशीकरांना मानायचो. मानतो.
खाजगी भेटीत पळशीकरांशी गप्पा मारताना त्यांचा अवाका आणि व्यासंग सदैव जाणवायचा. ते तसे ऋजु आणि सुहृद होते. वैचारिक पुस्तकांचा त्यांनी सहवास केलेला होता. त्यांचे वक्तृत्व मात्र अगदीच वाईट होते.
सातारच्या किशोर बेडकीहाळ यांच्या डा. बाबासाहेब आंबेडकर अकादमीच्या प्रत्येक कार्यक्रमात पळशीकर असणारच हा जणू घटनात्मक नियम होता.
अकादमीने समकालीन मराठी साहित्यातले दणकट लेखक रंगनाथ पठारे यांच्या साहित्यावर एक विशेष चर्चासत्र घेतले होते. सालाबादप्रमाणे पळशीकरच उद्घाटक होते.
पठारे यांना पळशीकर कोणता "ताम्रपट" बहाल करतात याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले होते. ते बोलायला उठले आणि त्यांनी पहिलेच वाक्य उच्चारले, " मी पठारेंचे एकही पुस्तक वाचलेले नाही." आणि तरिही ते पुढे सुमारे तासभर बोलले. हे धाडस केवळ थोरच! हा प्रसंग मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. पठारे माझे अतिशय आवडते लेखक असल्याने मला फारच जोराचा धक्का बसला. असे बोलून आपण पठारेंसारख्या मोठ्या लेखकाचा अपमान करतोय याचे काहीही सोयरसुतक पळशीकरांना नव्हते. ज्यांनी काहीच वाचलेले नाही त्यांनी एकतर कार्यक्रमाचे निमंत्रणच स्विकारायला नको होते, आणि स्विकारलेच तर जो विषय आपल्याला दिलाय तो वाचूनच कार्यक्रमाला यायला हवे होते असे माझ्यासारख्या सामान्य माणसांना वाटते. आपण एव्हढे मोठे/व्यस्त आहोत की असल्या किरकोळ मंडळींचे आपल्याला वाचायला सवडच नाही असे सुचित करणारा यातला पळशीकरांचा तुच्छताभाव आणि अहंगंड मला तरी खटकला. तथापि पठारेंचे मोठेपण असे की या विधानावर पळशीकरांना सणसणीत उत्तर देणे शक्य असतानाही ते देण्याऎवजी पठारे विनयपुर्वक शांत राहिले.
पळशीकर माझ्या मनातून उतरले.
पठारेंसारख्या श्रेष्ठ लेखकाबाबतच त्यांचे असे होते असे नाही. त्यांचे ललित साहित्याचे एकुण वाचन अजिबातच नसावे किंवा अगदीच वरवरचे असावे असे त्यांच्याशी गप्पा मारताना कायम जाणवत असे. मात्र तरिही त्यांची याबाबतची ठाम मते होती आणि त्यांच्या कंपूला ती सरसकट अनुकरणीय किंबहुना वंदनीय वाटत असत.
स्वा. सावरकर यांच्या नावावर पळशीकरांनी कितीतरी काल्पनिक अवतरणे तयार करून सावरकरांना कसे झोडपून काढले होते यावर शेषराव मोरे यांनी सोदाहरण प्रकाशझोत टाकलेला होता. त्याचा प्रतिवाद पळशीकरांनी कधी केल्याचे किमान मला तरी ज्ञात नाही.
ज्याअर्थी पुरोगामी विचारवंत म्हणून पळशीकरांचा फार मोठा दबदबा आणि दरारा होता त्याअर्थी ते मोठे असणारच! मात्र माझ्या मर्यादित कुवतीमुळे मला त्यांचा हा मोठेपणा नीट कळला नसावा.

पळशीकरांना विनम्र आदरांजली.
.......................
पुन्हा पळशीकर ---
[मूळसंदर्भ --- Dinanath Manohar यांची माझ्या पोस्टवरील प्रतिक्रिया,]
...................................
प्रा. शेषराव मोरे यांनी "सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास" या त्यांच्या ग्रंथात याबाबतचे पुरावे पृ.क्र.176 ते 218 [एकुण 43 पृष्ठे ] दिलेले आहेत. कृपया ते वाचावेत. ती 43 पाने [ सुमारे 60 अवतरणे ] मी फेसबुकवर टाकावीत अशी अपेक्षा कृपया करू नये. मोरे यांनी वसंत पळशीकरांनी "बनावट" अवतरणे तयार केल्याचे दाखवून दिलेले आहे.
-- समग्र सावरकर साहित्य सवडीअभावी आपण वाचलेले नव्हते. सावरकर साहित्याच्या तिसर्‍या खंडातील एकच भाग वाचून आपण सावरकरांवर लिहिल्याची कबुली स्वत: पळशीकरांनीच ’आजचा सुधारक’ एप्रिल मे 1993 मध्ये दिलेली आहे, तीही पाहावी.
.........Dinanath Manohar,Sunil Tambe, Deepak Pawar,Shraddha Kumbhojkar , Nitin Bharat Wagh, Sameer Paranjape --
........................................................
[मूळसंदर्भ -- --
Dinanath Manohar ; पळशीकरांना आदरांजली वाहाणारा हा लेख वेगळा आहे हे निश्चितच. म्हणजे माझी लेख वेगळा असायला काहीच हरकत नाही. स्वा. सावरकर यांच्या नावावर पळशीकरांनी कितीतरी काल्पनिक अवतरणे तयार करून सावरकरांना कसे झोडपून काढले होते यावर शेषराव मोरे यांनी सोदाहरण प्रकाशझोत टाकलेला होता. हे विधान करताना निदान शेषराव मोरे ह्यांनी दिलेले एखादे उदाहरण टाकले असते तर योग्य झाले असते. श्रीमान शेषराव मोरे ह्यांचं साहित्य बहुसंख्य लोकांनी वाचलं असेल असं गृहित धरणं तेवढसं योग्य नाही, असं मला वाटतं. (चुकभूल देणेघेणे)]
.................................

दिवाळी अंक , 2016




आपल्या मराठी भाषेत दरवर्षी सुमारे 350 दिवाळी अंक निघतात. मराठीची ही श्रीमंती अन्य भाषेत क्वचितच असेल.
यातले सुमारे 50% अंक जरी नेहमीचा रतिब घालणारे आणि केवळ जाहिराती मिळवण्यासाठी काढलेले सुमार अंक असले तरी उर्वरित 50% तले बरेचसे बरे तर किमान 10% अतिशय दर्जेदार असतात. दरवर्षी असे किमान 30-35 अंक हाती लागले की दिवाळी मजेत, अगदी सुखात जाते.
यावर्षीच्या दिवाळी अंकात मला सर्वाधिक आवडलेला अंक म्हणजे "ऋतुरंग"
माझे मित्र अरूण शेवते यांनी संपादित केलेला हा 24 वा दिवाळी अंक म्हणजे अगदीच भारी झालाय. शंभर नंबरी. या "मी आणि माझे वडील विशेषांक" यात गुलजार, जावेद अख्तर, विद्या बालन, मुक्ता बर्वे, राजीव खांडेकर, लता मंगेशकर, जानराव प्रकाशराव जानुमल [जोनी लिव्हर], नागराज मंजुळे, मनोज जोशी, शोभा डे, अमृता सुभाष, संदिप वासलेकर, सदानंद मोरे, सिसिलिया कार्व्हालो, ज्ञानेश्वर मुळे आदींचे एकुण 27 लेख आहेत. अतिशय झकास.
मला पहिल्या वाचन फेरीत आवडलेले काही दिवाळी अंक खालील प्रमाणे ---
1."ऋतुरंग",
2. मौज,
3.अंतर्नाद,
4. दीपावली,
5. म.टा.,
6. अनुभव,
7. पुणे पोस्ट,
8. साहित्य सूची,
9. साधना,
10. कालनिर्णय,
11. अक्षर,
12. मुक्त शब्द
13. ललित,
14. लोकसत्ता,
15. मेहता ग्रंथ जगत
16. शब्दाई पत्रिका,
17. साप्ताहिक सकाळ,
18. चिंतन आदेश,
19. पुण्यभूषण,
20. आपले वाड्मय वृत्त.
..............................