Friday, March 8, 2019

कीर्तनांमध्ये महिलांचा अपमान- बायको म्हणजे पायातली चप्पल







जाणते राजे श्री शरदराव पवारसाहेब यांनी आपल्या "लोक माझे सांगाती" या आत्मचरित्रात आपण इंदुरीकर महाराज यांचे फॅन आहोत असे लिहिलेले आहे. आज हे इंदुरीकर महाराज ग्रामिण महाराष्ट्रात तुफान लोकप्रिय आहेत. त्यांच्या किर्तनाला हजारो लोक जमतात. त्यांची किर्तनाची सुपारी लाखो रुपयात असते. सर्वपक्षीय राजकारणी त्यांचे भक्त आहेत.
-प्रा.हरी नरके
निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज हे नाव आता घरोघरी ओळखीचं झालं आहे. खेडोपाड्यात कीर्तनं करून हसत हसत लोकांना चार आध्यात्मिक गोष्टी सांगणारे इंदुरीकर महाराज युट्यूबमुळे शहरांमध्येही पोहोचले आहेत.

पण त्यांच्या कीर्तनातील अनेक वक्तव्यं ही महिलांचा अपमान करणारी असतात, असा आक्षेप महिलांनीच नोंदवला आहे. या आक्षेप घेणाऱ्या महिला कोण आहेत, त्यांचे आक्षेप काय आहेत, त्यावर इंदुरीकर महाराजांचं काय मत आहे, हे सारं काही आपण पुढे पाहणार आहोतच.

इंदुरीकर महाराज कोण आहेत, याविषयीही आपण सविस्तर जाणून घेऊया. पण आधी पाहूया की ही वादग्रस्त विधानं काय आहेत.

"चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."

"पोरीच्या अंगात जितके कपडे कमी, तितकी पोरगी फटकावली पाहिजे."

"नोकरीवाल्याच्या बायकांनो सांगा, काय काम करता तुम्ही? लाज धरा लाज."

"नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?"

"पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. की बुडवला धर्म?"

"पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे."

"गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या."

इंदुरीकर महाराजांची अशी अनेक विधानं युट्यूबवर सहज उपलब्ध आहेत. काहींना ही विधानं विनोदी वाटू शकतात. कदाचित ती विनोदनिर्मितीच्या हेतूनेच केली असावीत. पण त्यात महिलांचा अपमान होत नाही का?

बारामतीच्या अॅड. कविता शिवरकर-कलगुटकर यांनी 22 नोव्हेंबर 2018 ला इंदुरीकर महाराजांविषयी एक फेसबुक पोस्ट लिहिली. 'इंदुरीकर तुम्हाला 'महाराज' म्हणावं इतका महाराष्ट्र नक्कीच बुरसटलेला नाही' या शीर्षकाची कविता यांची फेसबुक पोस्ट नंतर पत्राच्या स्वरूपात व्हायरल झाली.

पण या एका पोस्टमुळे मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल, शिव्या खाव्या लागतील, याची त्यांना कल्पनाही नव्हती. काही लोकांनी त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं, तर काहींनी त्यांना 'झोपण्याचा' सल्ला दिला.

कविता यांची इंदोरीकरांवरील फेसबुक पोस्ट
"एकीकडे महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरणासाठी आपण प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे हा माणूस या गोष्टींना धक्का लावतोय. जेव्हा हे माझ्या डोक्यात आलं तेव्हा मी फेसबुकवर पोस्ट लिहिली," पोस्ट का लिहिली यावर कविता सांगतात.

इंदुरीकरांविषयी तुम्हाला कसं कळालं, यावर कविता सांगतात, "मी वकिलीची प्रॅक्टीस करत असताना राज्यभर प्रवास करायचे. त्यावेळेस काही गावांमध्ये मी इंदुरीकरांच्या कीर्तनाविषयीचे होर्डिंग्स बघितले. पहिल्यांदा जेव्हा मी त्यांच्या क्लिप्स बघितल्या तेव्हा मला ते आक्षेपार्ह वाटलं. घटनेनं महिलांना माणूस म्हणून स्वातंत्र्य दिलं असतानाही हा माणूस आमच्या स्वातंत्र्याच्या मध्ये येतोय, असं मला वाटलं."

"मी इंदुरीकरांची एक क्लिप पाहिली तेव्हा त्यासंबंधीच्या अनेक क्लिप्स समोर येत गेल्या. मला ते खूप दुर्दैवी वाटलं. या क्लिप्स बघून मी एवढी निराश झाले की या माणसानं महिलांची कुठलीच बाजू सोडलेली नाहीये, असं मला वाटलं. एकीकडे महिलांचे कपडे, राहणीमान यांच्याबाबत हा माणूस अनादरानं बोलतो, तर दुसरीकडे नात्यावंरही बोलतो. तिसरीकडे मुलींनी मॉडर्न होण्यालाही विरोध आहे."

या फेसबुक पोस्टबद्दल अधिक विचारल्यावर त्या सांगतात, "कुणीतरी माझी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. यासाठी माझी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यानंतर लोक मला फेसबुकवर धडाधड मेसेज करायला लागले. काही महिलांनी माझ्या धाडसाचं कौतुक केलं तर काही माणसांनी मला 'जा झोप' असा सल्ला दिला.

"इतकंच काय तर माझ्या कुटुंबीयांनाही टार्गेट करण्यात आलं. 'बायकोला सांभाळ,' असा सल्ला माझा नवऱ्याला देण्यात आला. पोस्ट लिहिल्यानंतर पुढचे दोन महिने मी खूप मानसिक त्रास सहन केला. पण तरीही मी माझ्या मतावर ठाम होते आणि आजही आहे."

"काही लोकांचं म्हणणं आहे की, इंदुरीकर अनाथ मुलांसाठी शाळा चालवतात. पण असं असलं तरी यामुळे इंदुरीकरांच्या चुकीच्या वक्तव्यांची पाठराखण करता येऊ शकत नाही. काही जण असंही म्हणतात की, खेड्यातल्या लोकांना समजावं म्हणून इंदुरीकर अशी भाषा बोलतात. पण मला हे पटत नाही. मीसुद्धा एका छोट्या गावातून येते, त्यामुळे मी हे सांगू शकते की, गावातल्या माणसांना चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेलंही कळू शकतं."

"आपल्या राज्याला थोर संत परंपरा लाभली आहे. गावात लहानाचं मोठं होताना आम्ही कीर्तन ऐकत आलो आहे. कीर्तन म्हणजे काय आम्हाला चागलंच कळतं. पण इंदोरीकर कीर्तनाच्या नावाखाली महिलांना टार्गेट करतात, टुकार विनोद करत सुटतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे मग इंदुरीकरांविषयी माझं जे मत पूर्वी होतं, ते आजही ठाम आहे. इंदुरीकर तुम्हाला 'महाराज' म्हणावं इतका महाराष्ट्र नक्कीच बुरसटलेला नाही, असं मला आजही वाटतं," कविता मतावर ठाम असल्याचं सांगतात.

या आरोपांबद्दल इंदुरीकर महाराजांचं काय म्हणणं आहे, ते आपण पुढे पाहणार आहोतच, पण आधी पाहूया त्यांचा थक्क करून सोडणारा प्रवास.

निवृत्ती देशमुख ते 'इंदुरीकर' महाराज

निवृत्ती देशमुख यांचा 9 जानेवारी 2019ला 48वा अभीष्टचिंतन सोहळा पार पडला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचं गाव. या गावाच्या नावावरूनच त्यांना पुढे चालून इंदोरीकर या नावानं ओळखलं जाऊ लागलं. पुढे 'इंदोरीकर'चा अपभ्रंश 'इंदुरीकर' असा झाला आणि आता ते इंदुरीकर याच नावाने ओळखले जातात.

इंदोरीकरांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल त्यांचे सहकारी राधाकृष्ण गरड गुरुजी सांगतात, "कोतुळ इथल्या डी.एड कॉलेजवर इंदोरीकर शिक्षक होते. त्यांच्याकडे ज्ञान चांगलं होतं. शिवाय जनरल नॉलेजही उत्तम होतं. त्यामुळे ते सायकलवर खेड्यापाड्यांत जाऊन कीर्तन करायचे. विनोदाच्या माध्यमातून लोकांना खिळवून ठेवायचे.

"पुढे त्यांच्या कीर्तनाला लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद बघून आम्ही सहकाऱ्यांनी मिळून त्यांना कीर्तनाची कॅसेट काढायचा सल्ला दिला. 2000 साल होतं ते. मग कळसगावच्या दौलत वाघचौरे यांनी इंदोरीकरांचं लाईव्ह कीर्तन रेकॉर्ड केलं आणि त्याची कॅसेट काढली. या कॅसेट्स त्र्यंबकेश्वरला विकण्यासाठी ठेवण्यात आल्या, तेव्हा अवघ्या दोन तासात दोन हजार कॅसेट्स विकल्या गेल्या. नंतर मग महाराष्ट्रात त्यांची कीर्तनं गाजायला लागली."

यानंतर राज्यभरातल्या राजकीय नेत्यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त इंदोरीकरांच्या कीर्तनाचं आयोजन व्हायला लागलं. इंदोरीकरांच्या कीर्तनाची लोकप्रियता इतकी वाढली की त्यांची तारीख मिळण्यासाठी लोक वर्षानुवर्षं वाट पाहू लागले. इतकंच काय येरवडा मध्यवर्ती कारागृहासारख्या सरकारी वास्तूंमध्येही त्यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, इंदोरीकरांची तारीख मिळालेली एक व्यक्ती सांगते, "इंदोरीकरांची तारीख मिळण्यासाठी मला 5 ते 7 महिने लागले. त्यांची तारीख मिळवण्यासाठी मी वर्षभरापासून प्रयत्न करत होतो, पण तारीख मिळत नव्हती. इंदोरीकरांचं कीर्तन आवडतं, मनापासून त्यांचंच कीर्तन ठेवण्याची इच्छा होती. आई गेल्यानंतर मी ठरवलं होतं, 'काही होवो, कितीही पैसे जावो, आपण इंदोरीकरांचंच कीर्तन ठेवायचं.' कीर्तनासाठी मी महाराजांना 35 हजार रुपये दिले."

इंदोरीकरांना कीर्तनासाठी आम्ही 31 हजार रुपये देतो, असं औरंगाबादच्या बबन डिडोरी पाटील यांनी बीबीसीला सांगितलं.

एका कीर्तनात इंदोरीकर स्वत:हून सांगतात, "आम्हाला 100 रुपये मिनिट आहे पोरांनो. आता हे तिसरं कीर्तन आहे सकाळपासून. अजून एक करायचं आहे. आज चार आहेत. तीन कीर्तनं तर असे चालूचालू काढतो मी. मी काही सीझनल ब्वॉ नाही, कसाही महिना निघो 80 ते 90 कीर्तनं फिक्स. 70 किर्तनाला तर कव्हाच भेव नाही."

एबीपी माझाच्या कार्यक्रमानुसार, इंदोरीकरांच्या 2021 पर्यंतच्या तारखा बुक आहेत.

इंदोरीकरांच्या कीर्तनांत महिलांविषयी काय असतं?
इंदोरीकरांच्या कीर्तनाच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येतात. तुम्ही 'इंदुरीकर' असं युट्यबूवर सर्च केलं तर सर्वांत पहिले 'इंदुरीकर कॉमेडी कीर्तन' अशा आशयाच्या कीर्तनाच्या क्लिप्स समोर येतात. यात इंदोरीकरांनी त्यांचे मुद्दे पटवून देण्यासाठी महिलांबद्दल काही वक्तव्यं केली आहेत.

1. लव्ह मॅरेजविषयीचं मत पटवून देताना इंदोरीकर महिलांची तुलना चपलेशी करतात.

ते म्हणतात, "लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण पुरुष आहोत पुरुष. नवरा आहे नवरा. मह्या बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार तिचे?

"चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."


2.महिलांच्या कपड्यांवर इंदोरीकर टिप्पणी करतात. आई-वडिलांनी मुलींवर सतत लक्ष ठेवायला हवं, मुलींना बंधनात वाढवायला हवं, असा त्यांचा आग्रह आहे. हा मुद्दा पटवून देण्यासाठी ते महिलेला 'जनावर' संबोधतात.

एका कीर्तनात ते म्हणतात, "आपली पोरगी घरातून बाहेर पडताना कसे कपडे घालून बाहेर पडते, हे तिच्या आईला माहिती नाही का? का पारायणाला बसली तिची आई? आपलं जनावर पाहतंय कुणीकडं, चालतंय कुणीकडं, थोबाड कुणीकडं वाशीतय? आपलं जनावर कसं राहतंय, हे तिच्या आईला कळत नाही का? लोकांनी सांभाळायच्या का तुमच्या पोरी? पोरीच्या अंगात जितके कपडे कमी तितकी पोरगी फटकावली पाहिजे."

दुसऱ्या एका कीर्तनात इंदोरीकर जीन्स-पँट घातलेल्या आईविषयी आक्षेप नोंदवतात.

"आमच्या आईचं पोरगं दूध पीत होतं तर शेजारच्या बाईला कळत नव्हतं, ते पोरगं दूध पितंय. इतका खानदानी आमच्या आईचा पदर होता. पोराला पूर्वी पदर मिळत होता. आज पोराची आई जीन्स-पँट आणि टी-शर्ट घालते. पोर झाकावं कुठं आणि पोरानं घाईघाई प्यावं कसं? याला नाव दिलंय चेंज."

पुढे एका ठिकाणी शेतकरी आणि सर्व्हिसवाल्याच्या घरातील चहाचा फरक सांगताना ते म्हणतात, "सर्व्हिसवाल्यानं चहा सांगितला की ते (सर्व्हिसवाल्याची बायको) जनावर येतं चहा घेऊन, केसं बिसं मोकळे सोडेल, गाऊन-बिऊन घालेल...आपल्याला वाटतं जोडून अमावस्या आली की काय?"


3.लग्नात डान्स करणाऱ्या मुलींना इंदोरीकर खानदान तपासण्याचा सल्ला देतात.

ते म्हणतात, "पोरगी नाचती लग्नात. पोरी कमरापासून वर हालत्या आणि खाली बंद होत्या. काही हालत्या की बंद होत्या हेच कळत नाही. काय लाजा सोडल्या. वरून पोरीची आई थोबाड वासून पाहती. ओवाळणी टाकिती पोरीवर, दरिद्री! काय मही गुड्डी ताल धरती म्हणती. तूही गुड्डी जेव्हा एखाद्या गड्ड्या घेऊन पळून जाईल तव्हा कळेल तुला. नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?"

4. मुलींनी कसं राहावं, याविषयी इंदोरीकर काही सल्ले देतात. मुलींनी हातात बांगड्या घालायला हव्यात, हा त्यांचा आग्रह आहे. बांगड्यांचा संबंध ते धर्माशी जोडतात. शिवाय मुलींची नवीन हेअरस्टाईलही त्यांना रुचत नाही.

ते म्हणतात, "पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा, बांगडी आहे का बघा. की बुडवला धर्म? मुलींचे भांग तपासा. एक नवीन भांगाची स्टाईल आली, त्यात पोरगी झटके हानती की खुणवती हेच कळेना माणसाला."

पुढे ते पालकांना शाळेतल्या मुलींवर बारीक लक्ष ठेवायला सांगतात. मोबाईलमुळे मुली बिघडतात, असं त्यांचं मत आहे.

"शाळेतल्या मुलीचं दप्तर तपासत जा. वह्या चेक करीत जा. एसटीचा पास चेक करीत जा. 8-10 दिवस झाले आपल्या पोरीची पास पंच नाही. मग पोरगी भुयारातून वर्गात निघती की काय, हे पाहा.

"मुलीचे मोबाईल चेक करत जा. तीन-तीन सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे. दोन नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज देत नाही, सज्जन आहे तो. सायलेंट असतो. तो घरात फक्त कन्हतो. मुलीच्या मोबाईलमधला बॅलेन्स चेक करत जा. आपण तर 100 रुपये दिले होते, त्याच्यात 200 रुपये आले. 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बाबा. ही 1 जीबी आहे, 2 जीबी आहे, 4 जीबी आहे, का भूर्र जीबी (महाराज पोरगी पळून जाण्याच्या अर्थानं भूर्र म्हणत आहेत) आहे, जरा चौकशी करा," इंदोरीकर म्हणतात.

5. आज कालच्या मुली कुणावरही प्रेम करायला लागल्या आहेत. प्रेमाखातर पळून जाणाऱ्या मुलींनी बापाला इज्जत ठेवली नाही आणि अशा मुलींचे एका दणक्यात थोबाड फोडायला हवं, असा सल्ला इंदोरीकर देतात.

ते म्हणतात, "मुलींना एक वाक्य सांगतो, तुम्हाला शाळा शिकता आल्या तर शिका नाहीतर शिकू नका. नोकऱ्या करता आल्या नाही तर करू नका. पण ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली हाईल, असं वागू नका आणि तुमचे लग्न तुमच्या बापालाच जमू द्या. 80 टक्के लग्न सध्या मुली जमावतात, 80 टक्के. व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेट, ऑनलाईन कार्यक्रम सुरू आहे सध्या. म्हणून मुलींसाठी एक वाक्य सांगतो, मुलींनो तुमच्यावर जेवढे देवाचे उपकार आहेत ना त्याच्यापेक्षा बापाचे उपकार काकणभर श्रेष्ठ आहेत. पोरींनो तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहेत, तुम्ही फक्त पळून जाऊ नका. तुम्ही सध्या लय दणका उठवलाय. या 5 ते 7 वर्षांत तुम्ही बापाला इज्जत ठेवली नाही. लाज वाटली नाही तुम्हाला? थोबाड फोडून टाकलं पाहिजे एका दणक्यात."

मुलींच्या प्रेमप्रकरणाबाबत बोलताना ते म्हणतात, "पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कोणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे. आज पंचवीस टक्के पोरींनी बाप हातानं मारलेत. केवळ चिंता करून बाप मेलेत, तर 50 टक्के पोरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आयांनी केलं."

6. पुढे एका ठिकाणी इंदोरीकर गोरी बायको का करू नये, याची कारणं सांगतात.

त्यांच्या मते, "गोरी बायको उन्हात नेली की लाल पडिती आणि लाईट गेली की फॅनखाली उड्या हानती. काय उपयोग आहे तिचा, म्हणून गोरी बायको कधी करू नये. बायको सावळी पाहिजे. कापूस येचाया चालती आणि तुरीच्या शेंगा तोडाया पण चालती. ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या."

7. एका कीर्तनात इंदोरीकर नोकरीवाल्याच्या बायकांना लाज धरायचा सल्ला देतात. ते म्हणतात, "नोकरीवाल्याची बायको सांगा काय काम करती, तर टिफीन देते. टिफिनमध्ये काय तर एकच चपाती आणि अर्धी बटाट्याची फोड. पण पहाटंपासून बोंबलती की डबा करायचाय, डबा करायचा. जसं काही गाव जेवायला आहे यांच्याकडं. दुपारी अडीच वाजल्यापासून बोंबलती स्वयंपाक करायचा, स्वयंपाक करायचा. अन जेवायला माणसं अडीच, दोन फूल आणि एक हाफ. अरे काय लबाड्या आहेत या. लाज धरा लाज."

अशा प्रकारची आणखीही अनेक विधानं यूट्यूबवर उपलब्ध आहेत.

'महाराज संस्कृती वाचवण्यासाठी बोलतात'
भारतीय संस्कृती टिकावी म्हणून इंदोरीकर असं बोलतात, असं औरंगाबादमधल्या बबन डिडोरे पाटील यांचं मत आहे. ते गेल्या 20 वर्षांपासून माजी मंत्री आणि काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त इंदोरीकरांचं कीर्तन आयोजित करतात.

त्यांच्या मते, "महाराजांनी या भाषेत बोलणं वाईट आहे. पण महाराज संस्कृतीसाठी तसं बोलतात. बोलण्याआधी ते महिलांची माफी मागतात, मी तुमच्या मुलासारखा आहे, असं म्हणतात आणि मगच बोलतात. आपली संस्कृती टिकली पाहिजे म्हणून महाराज असं बोलतात."

किरण गुजर हे बारामतीच्या नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष आहेत. ते गेल्या 15 वर्षांपासून बारामती गणेश फेस्टिव्हलमध्ये गणपती आगमनानंतर दुसऱ्या दिवशी इंदोरीकरांचं कीर्तन आयोजित करतात.

"ही भाषा ग्रामीण संस्कृतीतील आहे. ग्रामीण महिलांना जे पटतंय त्याच भाषेत इंदोरीकर बोलतात. कीर्तनकारानं काळजाला भिडण्याचं काम करावं, इंदोरीकर महाराज हे काम तो ग्रामीण टच साधून करतात," असं किरण गुजर यांना वाटतं.

'महिलांना बंधनात ठेवण्याचं प्रचारतंत्र'
इंदोरीकरांचं प्रत्येक वेळी महिलांनाच टार्गेट करणं, पुण्याजवळील वाल्हा गावातल्या सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी पवार यांना खटकतं.

त्या म्हणतात, "पुरुष कसा चांगला आणि बाई कशी वाईट, हे सांगण्यासाठी इंदोरीकर छोटी-छोटी कारणं शोधतात. त्यात मग ते गाऊन घालणाऱ्या महिलेला जनावर म्हणतात. पण यांना समजून सांगायला हवं की, साडी घातली की महिलेची कंबर आणि पोट उघडं दिसतं. गाऊनमध्ये सगळं अंग झाकलं जातं. महिलांना साडीपेक्षा गाऊन जास्त कंफर्टेबल असतो."

"शिवाय एखादा मुद्दा समजून देण्याची पण एक रीत असते. तुम्ही भरपूर उदाहरणं देऊ शकता. तुम्हाला एखादी गोष्ट पुढच्याला पटवून द्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही दुसरी उदाहरणं देऊ शकता. पण प्रत्येक वेळी महिलेलाच टार्गेट करणं योग्य नाही."

यामुळे इंदोरीकर प्रबोधन नाही तर महिलांना बंधनात ठेवण्याचं प्रचारतंत्र राबवत आहेत, असा त्यांना आक्षेप आहे.

या आक्षेपाविषयी किरण गुजर म्हणतात की "कपडे कसे घालायचे हे कुणीतरी सांगितलं पाहिजेच की. आपली संस्कृती काय आहे, आपली परंपरा काय आहे, जे काही करायचं ते आपल्या संस्कृतीला धरून करा, असं महाराज सांगतात. महिलांना टार्गेट करून महाराज बोलतात, असं कुणी म्हणत असेल तर असाही महिलांचा वर्ग आहे ज्यांना महाराजांचं म्हणणं पटतंय. अलीकडच्या काळात तरुण पीढी भरकटत चालली आहे, या पीढीला मार्गावर आणण्याचं काम इंदोरीकर करत आहेत."

"अलीकडच्या काळात महिला स्वातंत्र्य या नावाखाली एक महिलांचा जो वर्ग तयार झालाय तो आणि ज्यांना इंदोरीकरांचा मेसेज घ्यायचा नाही, त्या महिला महाराजांना नावं ठेवताना दिसून येतात," असं ते पुढे म्हणतात.

शितल पाटील यांनी इंदोरीकरांवर आक्षेप घेत युट्यूबवर एक प्रश्न विचारला आहे. त्या विचारतात, "या माणसाचे सगळे कीर्तन महिलांवरच असतात. महिलांशी यांचा काय प्रॉब्लेम आहे?"

कीर्तन की कॉमेडी?
इंदोरीकरांच्या कीर्तनावर महिलांनी व्यक्त केलेल्या आक्षेपानंतर आम्ही इतर कीर्तनकारांची मतं जाणून घेतली. युवा कीर्तनकार ज्योत्स्ना गाडगीळ या नारदीय पद्धतीचं कीर्तन करतात. इंदोरीकरांचं कीर्तन फक्त मनोरंजनाच्या अंगानं खुलतं, असं त्यांना वाटतं.

त्यांच्या मते, "देवभोळ्या आणि ग्रामीण लोकांना इंदोरीकर महाराज हसवतात. हसवता हसवता रडवतात. ही गोष्ट या लोकांना स्पर्श करून जाते. मग त्यात अध्यात्म असो अथवा नसो. फक्त मनोरंजन या प्रकारातून त्यांच्याकडे पाहिलं जातं."

"ईश्वराचं स्मरण करणं आणि मग त्या अनुषंगानं प्रबोधन करणं, असा कीर्तनाचं अर्थ होतो. कीर्तनकाराला जुन्या-नव्याचा मेळ साधता आला पाहिजे. पण इंदोरीकर फक्त एक बाजू घेऊन चाललेत. पण यापद्धतीच्या कीर्तनातून कीर्तनाचा मूळ हेतू साध्य होत नाही आणि फक्त विनोदाच्या अंगानं इंदोरीकरांचं कीर्तन खुलतं. म्हणून त्यांची कीर्तनं ग्रामीण भागात गाजताहेत."

महिलांविषयीच्या टिप्पणीबद्दल विचारल्यार त्या सांगतात, "महिलांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरणं योग्य नाहीच. प्रबोधन अवश्य करावं, पण ते चांगल्या मार्गानं जाऊन. चांगले शब्द वापरले पाहिजे. पण इंदोरीकरांना आता मान मिळाला आहे. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, असं त्यांच्याबाबतीत झालं आहे. त्यांनी स्वत:चा एक बाज तयार केला आहे आणि आता इंदोरीकरांना तोच बाज घेऊन समोर चालावं लागेल. नाहीतर लोकांना ते आवडणार नाहीत."

तरुणांनी इंदोरीकरांना अंधपणे फॉलो करू नये, असंही त्या पुढे सांगतात.

"मला वाटतं, इंदोरीकरांकडे सांगण्यासारखं भरपूर आहे, पण तरुणांनी त्यांनी सांगितलेल्या विचारांवर स्वत: सुज्ञपणे विचार करायला पाहिजे."

चंदाताई तिवाडी
चंदाताई तिवाडी या प्रसिद्ध भारुडकार आहेत. चंदाताई कीर्तनाच्या बदललेल्या स्वरूपाबद्दल चिंता व्यक्त करतात.

त्यांच्या मते, "सध्या काही कीर्तनकारांमुळे हसण्यासाठी कीर्तन करणं आणि कीर्तनातून प्रबोधन होणं हा फरक जो जाणवतो, तो कुठेतरी वारकरी संप्रदायाला कलंक लावणारा आहे."

इंदोरीकरांच्या महिलांसंबंधित वक्तव्याबद्दल विचारल्यावर त्या सांगतात, "तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करायला नको, इथपर्यंत तुम्ही महिलांना सांगू शकता. पण मार द्यायची भाषा योग्य नाही.

"कीर्तनातील शब्दांचा वापर हा परंपरेनं चालत आलेल्या रुढीप्रमाणे असावा. कालांतराप्रमाणे रस्त्यावर बोलणाऱ्या किंवा रस्त्यावर शिव्या देणाऱ्या माणसांमध्ये आणि कीर्तनकारांमध्ये काही फरकच राहिला नाही.

"एखादा मुद्दा समजून सांगण्याची पद्धत त्यांनी सुधारायला हवी. ते हाडाचे शिक्षक आहेत. आपण काय करतो काय नाही हे त्यांना कळायला पाहिजे. आजच्या पुढारलेल्या शिक्षणप्रणालीमध्ये नव्या पिढीवरती संस्कारक्षम असं कीर्तनातून प्रबोधन व्हायला हवं," चंदाताई त्यांची अपेक्षा व्यक्त करतात.

संदीपान महाराज शिंदे
संदीपान महाराज शिंदे गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ कीर्तन करत आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश इत्यादी राज्यांमध्ये त्यांची कीर्तनं झाली आहेत.

२०१३पासून ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. या संस्थेची स्थापना १९१७ला झाली आहे. या संस्थेत वारकरी संप्रदायाबद्दल शिकवण दिली जाते.

कीर्तनाविषयी ते सांगतात, "अत्यंत खालच्या भाषेत बोलणं आमच्या लाईनमध्ये बसत नाही. समाजातील विडंबन इंदोरीकर आपल्या भाषेतून प्रकट करतात, हा भाग वेगळा. पण ते करत असताना खालची भाषा वापरायची नाही, तोंडात पवित्र शब्द असावेत, याची दखल घ्यायला हवी. कीर्तनाच्या शब्दाच्या मर्यादासुद्धा कीर्तनकारांनं साभाळल्या पाहिजेत. समोरची महिलासुद्धा कुणाची बहीण किंवा आई असेल, याचं भान असायला हवं. महिलांबद्दल जनावरं हा शब्द वापरणं, ही इंदोरीकरांची पद्धत चुकीची आहे.

"कीर्तनकारानं कॉमेडियन होणं योग्य नाही. कीर्तन हे विनोदाचं साधन नाही. लोकांना कीर्तनातून अध्यात्मिक भक्तीचा भाव मिळावा, असं आमचं म्हणणं आहे. विनोद करण्यासाठी कीर्तन नसावं तर लोकांमध्ये बदल होण्यासाठी ते असावं," ते पुढे सांगतात.

इंदोरीकरांच्या कॉमेडी स्टाईल कीर्तनाबाबत ते म्हणतात, "इंदोरीकरांची कॉमेडी सर्वच टाकाऊ आहे असं नाही. समाजाच्या निर्मितीचा विचार केला तर इंदोरीकर अत्यंत सूडबुद्धीच्या मंडळीला रस्त्यावर आणण्यासाठी ठोकवादी भूमिका घेतात. याचीसुद्धा गरज आहे."

पांडुरंग महाराज घुले
पांडुरंग महाराज घुले 1966 पासून कीर्तन करतात. 1993 पासून ते देहू गाथा मंदिराचे अध्यक्ष आहेत. लोकांची रुची बदलल्यामुळे संप्रदायात प्रदूषण वाढलंय, असं त्यांचं मत आहे.

ते सांगतात, "वारकरी संप्रदायाकडे आज लोक करमणुकीचं माध्यम म्हणून पाहत आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. काही लोक व्यवसाय म्हणून संप्रदायात उतरलेत आणि त्यांनी हे प्रदूषण केलंय. इंदोरीकरांच्या किर्तनाच्या पद्धतीवर आम्हाला आक्षेप आहे. पण संप्रदाय कुणावर बंधन घालू शकत नाही."

"लोकांना हसायला मिळतं, त्यामुळे लोकांनाही इंदोरीकरांचंच कीर्तन पाहिजे. लोकांना फक्त हसवणूक पाहिजे आजकाल. अध्यात्मात कुणाला रस राहिला नाही. पण यामुळे संप्रदायाची पातळी खालावत चालली आहे आणि याचं मला दु:ख वाटतं. लोकांनीच जागृत व्हायला हवं," ते पुढे सांगतात.

इंदोरीकरांचं म्हणणं काय?
महिलांचे आक्षेप आणि कीर्तनकारांची टीका, यावर इंदोरीकरांचं मत जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. ०४ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता आम्ही त्यांना फोन केला.

तुमचं कीर्तन नसून कॉमेडी शो आहे आणि यामुळे वारकरी संप्रदायाची पत खालावत चालली आहे, असा आरोप आहे, यावर ते सांगतात, "त्यांच्या मतावर आपण काय म्हणणार, काय सांगणार? ते तुम्हीच सगळं ऐकून ठरवा, तुम्हाला सगळं माहितीच आहे."

तुमच्या कीर्तनातील भाषा आणि मुद्दे समजून सांगण्याची पद्धत महिलांना खटकते, यावर इंदोरीकर सांगतात, "प्रत्येक माणूस वेगळाच विचार करणार ना. आपला दृष्टिकोन तो तर नाहीये ना."

त्यानंतर त्यांनी फोन ठेवला.

पुन्हा फोन केल्यानंतर ते म्हणाले, "सर फक्त पॉझिटिव्ह ठेवा, तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त पॉझिटिव्ह ठेवा. मी तुम्हाला एक १० मिनिटानं फोन करतो."


त्यानंतर जवळपास २० मिनिटांनी त्यांच्या फोनवरून फोन आला. पलीकडून किरण महाराज शेटे बोलत होते.

"मला महाराजांनी तुमच्याशी बोलायला सांगितलं आहे," असं त्यांनी म्हटलं.

"महाराजांवर लोकांनी आक्षेप नोंदवले आहेत, मला त्यांच्याशीच बोलायचं आहे. कारण मला त्यांचे विचार जाणून घ्यायचे आहेत," असं मी म्हटलं.

"यानंतर महाराज आवरत आहेत, त्यांना तासाभरानं फोन करा," असं शेटे यांनी सांगितलं.

तासाभरानं आम्ही फोन केला तेव्हा मात्र इंदोरीकरांचा फोन बंद होता. रात्री 9 नंतर त्यांच्याशी संपर्क झाला.

यावेळी महाराजांच्या वतीनं मीच मीडियाशी बोलत असतो, अशी भूमिका किरण शेटे यांनी घेतली. पण आम्हाला महाराजांशीच बोलायचं आहे, असं सांगितल्यानंतर त्यांनी 5 मिनिटांनंतर फोन करतो, असं सांगितलं.

त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या (०५ फेब्रुवारी) संध्याकाळी आमचा पुन्हा संपर्क झाला. पलीकडून पुन्हा किरण महाराज शेटे बोलत होते.

"महाराज बोलू शकत नाहीत, तुमचा मेसेज बघून त्यांनी मला तुमच्याशी बोलायला सांगितलं आहे. महाराज मीडियापुढे कधीच येत नाही. पत्रकारांशी बोलायचं असेल, तर मीच त्यांच्या वतीनं बोलत असतो. महाराजांचीच भूमिका मीच तुमच्यासमोर मांडणार आहे," अशी खात्री करून दिल्यानंतर आम्ही त्यांना प्रश्न विचारले.

प्रश्न - इंदोरीकरांचं कीर्तन हे कीर्तन नसून कॉमेडी शो आहे आणि यामुळे वारकरी संप्रदायाची पत खालावत चालली आहे आणि यातून कीर्तनातून प्रबोधनाचा मूळ हेतू साध्य होत नाही, असा आरोप महारांजावर होतो, काय सांगाल ?
उत्तर - कीर्तनाची पातळी खालावत चालली, असं त्यांचं म्हणणं आहे. पण आमचं जे म्हणणं आहे, ते प्रबोधनाचं आहे. ज्या गोष्टी समोरच्या माणसाला सांगून समजत नाही, त्या गोष्टी विनोद करून सांगायच्या असतात. तेव्हा ती गोष्ट पुढच्या माणसाला पटते. एखादी गोष्ट सरळ सांगून पटत नसेल, तर त्याच्यावर एक मार्मिक दृष्टांत देऊन त्यातून एक सिद्धांत सांगायचा असतो. यासाठी आम्ही विनोद करतो आणि विनोदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतो.

प्रश्न - महाराज कीर्तनात महिलांना टार्गेट करतात, महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरतात, असा आक्षेप आहे.
उत्तर - एखादी गोष्ट सरळ सांगून जमत नसेल, तर काहीकाही गोष्टी वाईट गोष्टीतून पण समजून सांगाव्या लागतात.

महिलांना टार्गेट करण्याचा आमचा हेतू मुळीच नाही. आमचं फक्त धर्म पाळा, संस्कृती पाळा, पाळा, आपला जो हिंदू धर्म आहे, हा भारतातील उच्चतम कोटी धर्म आहे, त्यानुसार आचरण करा, एवढंच म्हणणं आहे.

समाजातल्या चालू घडामोडींवर आम्ही बोलतो. आता मुली तोकडे कपडे घालताना दिसून येतात. यावर महाराजांचं एकच म्हणणं आहे की, समोरच्या मनात पाप येऊ नये, असे कपडे आपल्या अंगावर नसावेत.

जे काही महाराज बोलतात, एखादा माणूस त्यांना फोन करून सांगतो की मुलगी अशी वागतेय, मुलगी ऐकत नाही, मग प्रत्येकालाच महाराज प्रत्यक्ष भेटून उपदेश देऊ शकत नाही, म्हणून मग अशा गोष्टी ते कीर्तनातून मांडतात. हे असं बोलण्याची आम्हाला जी मागणी आहे ती समोरच्या श्रोतृवर्गाकडून आहे.


प्रश्न - महिलेची तुलना चपलेशी करणं, तिला जनावर संबोधणं योग्य वाटतं का?
उत्तर - आमचं जे म्हणणं आहे ते समाज स्वीकारतोय. समाजाला पटतंय म्हणून तर समाज ऐकतोय. आतापर्यंत जर समाजाला आमचं म्हणणं मान्य नसतं, तर समाजानं कधीच आमचे कार्यक्रम कमी करून टाकले असते. पण आमची तर सध्या २०२१ची बुकिंग चालू आहे. २०१९ला दररोज ३ किर्तनं आणि २०२०ला दररोज २ कीर्तनांची बुकिंग आधीच झाली आहे.

प्रश्न - कमी कपडे घातले तर मुलीला फटकावणं, मुलींचे मोबाईल तपासणं, बांगड्यांचा संबंध धर्माशी जोडणं, लग्नात नाचणाऱ्या मुलींना खानदान तपासण्याचा सल्ला देणं, या व अशा उदाहरणांतून महाराज महिलांना बंधनात ठेवण्यात प्रचारतंत्र राबवत आहेत, असा आरोप होतो.
उत्तर - आज आपला धर्म लोप पावत आहे. खेड्यातल्या आणि शहरातल्या संस्कृतीत जमीन अस्मानाचा फरक होत चाललाय. ही जी उदाहरणं आहेत ती महाराज शहरातल्या कार्यक्रमांसाठी वापरतात, कारण तिथं संस्कृतीचा ऱ्हास होत चाललाय. महिलांचं टिकली लावण्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि कुंकू संपत चाललंय. जिथं जिथं गरज आहे, तिथंच आम्ही ही उदाहरणं मांडतो.

प्रश्न - प्रश्न तर कायम राहतो, महिलांना बंधनात ठेवण्याचं प्रचारतंत्र इंदोरीकर राबवत आहेत, असा आरोप होतोय.
उत्तर - अजिबात महिलांना बंधनात ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत नाही. आमचं एकच म्हणणं आहे की, कमीतकमी १०० मुलींनी कीर्तन ऐकल्यानंतर त्यातल्या २ मुलींनी जरी ते आत्मसात केलं, तर आमचं कीर्तन सफल झालं. सगळंच ऐकावं, सगळ्यांनी बंधनात राहावं असं आमचं अजिबात म्हणणं नाही.

प्रश्न - सकारात्मक उदाहरणं देऊन तुम्ही मुद्दे समजावून सांगू शकत नाही का?
उत्तर - महिलांची भरारी, महिलांचा संघर्ष याची उदाहरणं आम्ही देतो. या महिलांची नावंही महाराज कीर्तनात घेतात.

प्रश्न - महिलांनी कसं राहायचं, काय घालायचं, हे सांगणारे महाराज कोण, असा प्रश्न उपस्थित होतो.
उत्तर - राज्यघटनेननं सर्वांना अधिकार दिलाय हे मला मान्य आहे. पण जो आपला संस्कृतीचा ऱ्हास होत चाललाय तो आम्हाला पटत नाही.

कमी कपडे घालणं, मोबाईलचे दुष्परिणाम, शाळेत जाता मुली फोनवर बोलताना दिसून येते, कमीतकमी घरी बोललं पाहिजे, रस्त्यावर नाही बोललं पाहिजे. गाड्यांची वर्दळ असते. आपल्या बोलण्यावरून बाकीच्या लोकांना त्रास होतो. छोटे मुलं ऐकतात तर त्यांच्यावर परिणाम होतो.

प्रश्न - प्रेम करणाऱ्या मुलींचं थोबाड फोडलं पाहिजे, ५० टक्के बाप आज पोरींनी मारलेत, असं महाराज म्हणतात, कशाच्या आधारवर म्हणतात?
उत्तर - प्रेम करू नये, असं महाराजांचं म्हणणं नाही. पण प्रेम त्या क्वालिटीचं असलं पाहिजे. मुलगा MBBS आहे, मुलगी MBBS आहे, होऊ द्या. प्रेम त्या क्वॉलिटीचं पाहिजे, असं महाराजांचं म्हणणं आहे.

पण ठरवून कसं प्रेम करणार, यावर ते सांगतात, प्रेमाचा विपर्यास होऊ नये. प्रेमाची क्वालिटी आपण तपासली पाहिजे आणि क्वालिटी पाहून प्रेम केलं पाहिजे, असं महाराजांचं म्हणणं आहे.

१२ वर्षांपासून महाराज २०० अनाथ विद्यार्थी स्वत:च्या खर्चानं सांभाळत आहेत. यासाठी महाराज ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय सेवा संस्था चालवतात. याच संस्थेच्या माध्यमातून महाराज खंडेराय महाविद्यालय ही शाळा चालवतात. ५वी ते १०वी पर्यंतची ही शाळा ओझर बुद्रुकला आहे. गेली ११ वर्षं ही शाळा महाराजांनी हातावर चालवली. महाराज स्वत: खिशातून स्टाफचा पगार देतात. एक रुपयाही विद्यार्थ्यांकडून घेत नाही. मागच्या वर्षी २० टक्के अनुदान मंजूर झालंय.

इंदोरीकरांचं राजकीय कनेक्शन
इंदोरीकरांचा 48वा अभीष्टचिंतन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला राज्याच्या महिला व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना इंदोरीकर म्हणाले, "गेल्या 20 वर्षांपासून मी गणपती बुडवायच्या आदल्या दिवशी परळी फेस्टिव्हलला असतो, तर गणपती बसवायच्या दुसऱ्या दिवशी बारामती फेस्टिव्हलला असतो. मी सगळ्या पक्षांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे."

याच कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी इंदोरीकरांच्या शाळेला 21 लाख रुपये, तर महादेव जानकर यांनी 10 लाख रुपये जाहीर केले.

इंदोरीकरांविषयी पंकजा यांनी म्हटलं की, "नेत्यांनी सांगितलेलं समाजाला कळेलच असं नाही, म्हणून मग आम्हाला तुमची गरज असते. आमचे जे विचार आहेत ते तुमच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहोचायला हवेत. मी इथून कोरडं जाणं योग्य दिसणार नाही. जानकर साहेबांपेक्षा कमी पैसे दिले तर पंचाईत होईल माझी. जानकरांनी 10 लाख तर मला जास्तच द्यायला पाहिजे. कारण मी मंत्री आहेत. शाळेच्या विकासासाठी मी तुम्हाला 21 लाख रुपयांचा निधी जाहीर करते."

महादेव जानकर यांनी इंदोरीकरांच्या आशीर्वादाची गरज असल्याचं म्हटलं.

ते म्हणाले, "कधी मलाही टेन्शन येतं. त्यावेळी महाराजांची कॅसेट मी ऐकत असतो. इंदोरीकर आपलं काम अतिशय चांगलं आहे, मी माझ्या आमदार फंडातून आपल्या संस्थेला १० लाख रुपयांची मदत करत आहे. तुमचा आशीर्वाद सर्व पक्षात असतो, तसा आमच्या छोट्या 'राष्ट्रीय समाज पक्षा'वर असावा, ही आमची इच्छा आहे. काँग्रेस आणि भाजप मोठे पक्ष आहेत, पण आमच्या छोट्या पक्षावरही आपला आशीर्वाद असावा, म्हणून मी नागपूरचा दौरा सोडून इकडे आलो आहे."

एका कीर्तनात तर इंदोरीकर स्वत:हून म्हणतात, "एवढी लोक सभेला आणायला शेंडगे पाटलांना 10 लाख रुपये लागले असते. मग मलाच एखादा लाख द्यायला काय अडचण आहे?"

इंदोरीकरांचे संबंधन सर्व पक्षांतल्या नेत्यांशी आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणतात, "प्रत्येकाची एक व्यक्तिगत शैली असते. कीर्तन सांगण्याची पद्धती, मांडणी वेगळी असते. महाराजांचं समाजाबद्दलचं निरीक्षण खूप चांगलं आहे. ते जे बोलतात ते पटतं. समाजात नुसतंच गोड बोलून चालत नाही. महाराज समाजातल्या चुकीच्या गोष्टींवर विनोदी शैलीत बोट ठेवतात."


इंदोरीकर कीर्तनात महिलांविषयी आक्षेपार्ह उद्गार काढतात, यावर थोरात म्हणतात, "कीर्तन मांडण्याच्या शैलीत महाराज काय काय म्हणतील हे सांगता येत नाही. त्यांनी मांडलेल्या प्रत्येक बाबीशी मी सहमत होईनच असं नाही. पण एकंदरीत विचार केल्यास ते समाजातल्या व्यंगावर बोट ठेवतात, त्यांची स्टाईल लोकांना खिळवून ठेवते आणि लोकांना ते पटतंही."

याच विषयावर मत जाणून घेण्यासाठी आम्ही पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांच्याशी वारंवार संपर्क साधला. पण त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

इंदोरीकर काळाची गरज?
राधाकृष्ण गरड गुरुजी 1997 पासून शास्त्रीय आणि वारकरी संगीत शिकवतात. इंदोरीकरांना कीर्तनाची कॅसेट काढण्याचा सल्ला देणाऱ्या व्यक्तींमध्ये यांचा समावेश होतो.

इंदोरीकरांच्या कीर्तनाविषयी ते सांगतात, "महाराज स्वत:ला कीर्तनकार नाही तर समाज प्रबोधनकार म्हणतात. त्यांची स्टाईल काही लोकांना आवडत नाही. पण प्रबोधनकार म्हणून ते समाजाला दिशा देण्याचं काम करतात. आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात, त्याबद्दलच महाराज प्रबोधन करतात."


"काही महिलांना त्यांच्याबाबतीत आक्षेप असेल, हे महिलांच्या दृष्टीनं बरोबर असेल. पण महाराज काही कुणावर बळजबरी करत नाही. ते फक्त सांगायचं काम करतात. महिलांनी चांगले कपडे घातले तर विकृती घडणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. महिलांना सल्ला देण्याआधी ते महिलांची माफी मागतात आणि मग बोलायला सुरुवात करतात. सुरुवातीला त्यांच्या वक्तव्यांबद्दल वारकरी संप्रदायालाही आक्षेप होता, पण आता त्यांची स्टाईल काळाची गरज बनली आहे. लोकांना महाराज शिव्या देणारे वाटत असतील तर ते कीर्तनाला कशाकरता आले असते? एवढी गर्दी त्यांच्या कीर्तनाला जमते याचा अर्थ ते चांगलं काहीतरी सांगतात म्हणूनच."


'कीर्तनाचं स्वरूप बदलतंय कारण...'
कीर्तन परंपरा आणि कीर्तनाची पद्धत याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही उदय जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्त्रीवादी साहित्यात पी.एचडी केली आहे, तसंच ज्ञानेश्वरी हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.

नव्या पिढीला खिळवण्यासाठी कीर्तनकारांना कीर्तनात कॉमेडीचा समावेश करावा लागला, असं त्यांचं मत आहे.

महाराष्ट्रातल्या बदलत्या कीर्तनाच्या स्वरूपाबद्दल ते सांगतात, "महाराष्ट्रातील कीर्तनाचं स्वरूप बदलतंय कारण लोकमानस बदलतंय. प्रसारमाध्यमांच्या अतिरेकामुळे जुन्या परंपरेचा जो भाग होता तिकडं तरुणाई वळायला तयार नाही. नव्या पिढीची भजन, कीर्तन आणि त्यामधील उद्बोधन, परमार्थ यातील अभिरुची कमी होत गेलीय. नव्या पीढीची अभिरुची लक्षात घेऊन कीर्तनामध्ये नसणारा बराचसा भाग कीर्तनकारांना त्यात समाविष्ट करावा लागला. नव्या पीढीला खेळवण्यासाठी कीर्तनकारांना कीर्तनात कॉमेडी आणावी लागली."

"नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, असं संत नामदेवांनी सांगितलं आणि यातच प्रबोधन आहे. महाराष्ट्रात खूप तरुण इंदोरीकरांकडे आकर्षित झाले आहेत. पण त्यांच्या कीर्तनातील परामर्थाऐवजी विनोद तेवढा तरुण मंडळी घ्यायला लागलीय. कीर्तनाला विनोदाचं स्वरूप प्राप्त झालंय. नामदेव महाराजांनी कीर्तन परंपरेचा पाया रचला. ज्ञानाचं दीप लावू, अशी जी नामदेवांची भूमिका होती, तिला बाजूला सारलं जातंय.

"कीर्तनकारानं मध्य साधणं गरजेचं आहे. अगदी खालच्या पातळीवर जाऊन कुणाची निर्भत्सना करणं योग्य नाही. अलीकडच्या कीर्तनांत नाट्य जास्त आणलं गेलं आहे. या नाट्यातच मंडळी गुंतली गेलीय. कीर्तनातील अभिनय मूळ परंपरेपेक्षा वेगळा व्हायला लागलाय. ठेका वगैरे धरायची पद्धत बदलली आहे," ते पुढे सांगतात.


कीर्तनातील भाषा कशी असावी, यावर उदय जाधव सांगतात, "माणसाचं बोलणं कसं असावं, यावर ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे.

तैसा वाग्विलास विस्तारू। गीतार्थे विश्व भरू।

आनंदाचे आवारू। मांडू जगा॥

आपल्या वाणीमुळे कुणालाही आघात होणार नाही, असं ज्ञानेश्वर त्यातून सुचवतात.

याशिवाय, बोल कसे असायला पाहिजेत, यावर संत नामदेवांचा अभंग आहे.

ज्या नामदेवांनी कीर्तन परंपरा निर्माण केली, ते म्हणतात,

ऐसे बोलू जाता बोल।

ज्या बोले विठ्ठल डोले॥

ज्या बोलानं प्रत्यक्ष विठ्ठल बोलायला लागेल, असं बोलणं असायला पाहिजे.

आताच्या काळात मात्र हे सगळं बाजूला जाऊन तिसरंच काहीतरी सुरू झालंय."

शेवटी ते म्हणतात, "आजचे कीर्तनकार लोकप्रियतेच्या पाठीमागे लागलेले दिसून येतात. भजन-कीर्तनात एक भाषिक मर्यादा ठेवणं पूर्वीच्या काळात आवश्यक असायचं. पण आज या भाषिक परंपरेला बाजूला ठेवलं गेलंय. मुलांना, मुलींना, पालकांना आणि एकंदरीत समाजाला जागं करण्यासाठी खालच्या पातळीची भाषा वापरण्यात येते, असं आजकाल म्हटलं जातं. परंतु, ज्ञानेश्वर-तुकाराम- एकनाथ यांच्या परंपरेनं चांगली भाषा वापरून समाजाला जागं केलं आहेच की."
.................................
https://www.bbc.com/marathi/india-47207896?fbclid=IwAR0jkjgdRSii5Gao5kUkxJMdSyP-Eu9ysY2F8yN6ng7-8Uw6U7TA1gpkP0M
इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनांमध्ये महिलांवर टीका का होते? श्रीकांत बंगाळे, बीबीसी मराठी प्रतिनिधी

Wednesday, March 6, 2019

राज्यकर्त्यांच्या तावडीत घुसमटतेय मराठी भाषा




राज्यकर्त्यांच्या तावडीत घुसमटतेय मराठी भाषा-
-प्रा.हरी नरके,समन्वयक, अभिजात मराठी भाषा समिती

पंधरा वर्षांपुर्वी तमीळ भाषेला अभिजात दर्जा दिला गेला. त्यानंतर संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम आणि उडीया यांनाही तो मिळाला. मराठीला हा दर्जा द्यावा अशी साहित्य अकादमीनं एकमतानं केलेली लेखी शिफारस मोदी सरकारनं दुर्लक्षित केलीय. राज्य सरकारही त्याबाबत संपुर्ण उदासिन आहे. मराठी भाषा,साहित्य, संस्कृती, शिक्षण हे सारेच विषय गेली ५ वर्षे विनोदाचे विषय बनवले गेलेत. राज्यकर्त्यांच्या तावडीत सापडलेली मराठी तर अक्षरश: गुदरतेय. राज्यातल्या प्रमुख चारही पक्षांचं मराठीप्रेम पुतणा मावशीचं आहे. मराठी भाषेचं स्वतंत्र विद्यापीठ, मराठीचं २५ वर्षांचं धोरण, मराठी सक्तीचा कायदा आणि अभिजात दर्जा या चारही बाबतीत खात्याचे मंत्री विनोद तावडे हे कृतीशून्य नी बोलघेवडे ठरलेले आहेत. खरंतर झेपत नसेल तर त्यांनी पायउतार व्हायला हवं.

माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. माणसाचं ते जीवसृष्ठीतील आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे.लाखो वर्षांच्या मानवी स्मृती भाषेच्या माध्यमातून जतन केल्या गेलेल्या आहेत.
त्यानं साहित्य, संस्कृती, कला, तत्वज्ञान यांची निर्मिती केली. माणसं संस्कृतीची जनुकं एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडं पोचवत असतात.
माणूस मातृभाषेतून विचार करतो. मातृभाषा ही एकप्रकारे माणसाच्या अस्तित्वाला विचारांचा प्राणवायू पुरवत असते. ते त्याचे ओळखपत्र असते. मातृभाषा ही माणसाची अस्मिता आणि अस्तित्वखूण असते.शहरी, महानगरी मराठी माणूस बहुभाषिक आहे. रोजगार, उद्योग, व्यापार, आर्थिक प्रगतीसाठी त्यानं बहुभाषिकतेची कास धरलेली आहे. पोटासाठी त्यानं इतर भाषा शिकायला कोणाचाच विरोध नाही. परंतु मराठी ही हलकी भाषा आहे, डाऊन मार्केट आहे म्हणुन त्याला तिची लाज वाटत असेल तर मात्र ती शरमेची बाब आहे. इंग्रजीतून, हिंदीतून बोलण्याला आज सार्वजनिक जीवनात विशेष प्रतिष्ठा आहे. समोरच्या माणसाला मराठी येत नसेल तर त्याच्याशी त्याला समजेल अशा भाषेत बोलयला काहीच हरकत नाही. पण मराठी माणूस बोलायला सुरूवातच मुळात हिंदी किंवा इंग्रजीतून करतो. त्यामुळे अनेकदा बराच वेळ बोलल्यानंतर लक्षात येते की दोघेही मराठीच असूनही ते उगीचच हिंदी किंवा इंग्रजीतून बोलत होते.मराठी माणसाला मराठीची लाज वाटते.

१९०७ साली ग्रियरसनने भारतीय भाषांचे सखोल सर्व्हेक्षण केले. तो म्हणतो की जी भाषा रोजगार देते तीच जगते. जी भाषा रोजगारक्षम नसते ती मरते. नष्ट होते. इंग्रजी आणि हिंदीच्या तुलनेत मराठीची रोजगार देण्याची क्षमता कमी आहे असं मराठी माणसाला मनोमन वाटतं, त्यामुळं तो आपल्या मुलाला मराठी माध्यमात घालायला तयार नसतो. मराठी मरणार अशी काळजी राजवाड्यांनी शतकापुर्वीच व्यक्त केली होती.बोलीभाषांची विविधता हे मराठीचं खरं वैभव असून, त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. मराठीला ५२ बोलीभाषा आहेत. जिला जास्त ओढे ती नदी मोठी, याच न्यायाने मराठीला रसद पुरवणार्‍या या सर्व बोली महत्वाच्या आहेत. या सर्वच बोलीभाषांतील साहित्य खूप सकस आहे. बहिणाबाई, उद्धव शेळके, रंगनाथ पठारे, व्यंकटेश माडगूळकर, प्र. ई. सोनकांबळे, बा. भ. बोरकर, नामदेव ढसाळ आदींमुळे मराठी समृद्ध झालेली आहे. दलित साहित्यानं मराठीला सामाजिक दस्तऎवज देऊन तिला खुप श्रीमंत केलेलं आहे.

"एक होता कावळा नी एक होती चिमणी..." ही प्रत्येक मराठी घरात आजही सांगितली जाणारी गोष्ट आहे. ती पहिल्यांदा ग्रंथात लिहिली गेली ८०० वर्षांपुर्वी. लिळाचरित्रात धानाई नावाच्या हट्टी मुलीला श्री चक्रधरांनी ती सांगितली असली तरी ती त्याआधी हजारबाराशे वर्षे मराठी लोकजीवनात सांगितली जात होती. ती विलक्षण लोकप्रिय होती.
तमिळ भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात "संगम साहित्याचा" मोठा वाटा आहे. हे साहित्य २३०० वर्षे जुने आहे. कावेरी नदीवर धरण बांधले जात असल्याचा प्रसंग त्यात आला आहे. या धरणाच्या कामासाठी जगभरातून तज्ञ मागवण्यात आलेले होते. महाराष्ट्रातील मराठी गवंडी मोठे कुशल असल्याचे वर्णन त्यात आले आहे.

इसवी सनाच्या २ र्‍या शतकात वररूचीने "प्राकृतप्रकाश " हा व्याकरण ग्रंथ लिहिला. त्यात त्याने शौरसेनी, मागधी, पैशाची व महाराष्ट्री या प्राकृत भाषांचे व्याकरण सिद्ध केले. आधीचे सगळे नियम सांगून झाल्यानंतर शेवटचा नियम सांगताना तो म्हणतो, " शेषं महाराष्ट्रीवत." यावरून देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रचलित असलेल्या सगळ्या भाषांना मराठीचे नियम लागू पडत होते. यातून मराठीची प्रतिष्ठा, मान्यता आणि श्रेष्ठता स्पष्ट होते.

संस्कृत महाकवी कालिदास आणि शूद्रक यांच्या "शाकुंतल" आणि "मृच्छकटिक" या नाटकांमध्ये अनेक संवाद मराठीत आहेत. महाभारत या जगप्रसिद्ध महाकाव्यात अनेक मराठी शब्द आलेले आहेत. यज्ञाच्या वेळी पंडीतांना मराठीत बोलायला बंदी घालण्यात आल्याची नोंद भागवत यांनी दाखवून दिलेली आहे. संस्कृत ही धर्मभाषा असली तरी हे पंडीत खाजगीत मराठीत बोलत असत हे यातून उघड होते. संत एकनाथांनी "संस्कृत वाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासोनी झाली?" असे संतप्त उद्गार काढले होते. "विंचू चावला..." ही  एकनाथांची भारूडांची मराठी आजची अस्सल मराठी असूनही ते तिला प्राकृत म्हणतात कारण महाराष्ट्री प्राकृत हीच मराठी आहे. रघुनाथराव गोडबोले यांनी १८६३ साली प्रकाशित केलेल्या मराठी शब्दकोशाला "महाराष्ट्रीय भाषेचा" कोश म्हटले आहे, ते यामुळेच.

जुन्या काळात धर्मग्रंथांची भाषा होती संस्कृत. पण तिचा जन्म झाला वैदीक भाषेपासून आणि वैदीकची आई होती वैदीकपुर्व बोली भाषा. हार्वर्ड विद्यापिठाचे डॉ. मायकेल विट्झेल यांनी आपल्या "ट्रेसिंग दि वैदीक डायलेक्ट्स" या ग्रंथात हे दाखवून दिले आहे. तेव्हा संस्कृत ही सर्व भाषांची मूळ भाषा होती ही माहिती खरी नाही. पाणिनीने जेव्हा या भाषेचे व्याकरण लिहिले तेव्हा तो तिला "छंद" भाषा म्हणतो. महाराष्ट्री प्राकृत किंवा महारठ्ठी या नावाने दोन-अडीच हजार वर्षांपुर्वी प्रचलित, लोकप्रिय व मान्यताप्राप्त असलेली भाषा ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे म.म. राजारामशास्त्री भागवत, विदुषी दुर्गा भागवत यांचे आजोबा, यांनी १८८५ सालीच दाखवून दिले होते. त्यांचा "मराठ्यासंबंधी चार उद्गार" हा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचावा. त्यांचा "मराठीची विचिकित्सा" हाही ग्रंथ महत्वाचा आहे. १९२७ साली ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास दोन खंडात लिहिला. त्यात त्यांनी मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले आहे.

मुल लहान असताना, रांगत असताना पीएच.डी. करू शकेल का? नाही.
मग कोणतीही भाषा बालवयातच "ज्ञानेश्वरी, लिळाचरित्र आणि विवेकसिंधू"  यांसारखे जागतिक दर्जाचे श्रेष्ठ ग्रंथ कसे प्रसवू शकेल? आठशे वर्षांपुर्वी मराठीत हे ग्रंथ लिहिले गेले तेव्हा मराठी बालभाषा नव्हती, तर ती एक परिपक्व झालेली समृद्ध भाषा होती.संत ज्ञानेश्वर मराठीची गोडी अमृताहूनही जास्त असल्याचे प्रतिपादन कोणाला उद्देशून करीत होते?
ज्ञाननिर्मिती, साहित्य, विचार, तत्वज्ञान आणि संस्कृतीची त्याआधीची फार मोठी परंपरा मराठीला होती.

मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ आहे, " गाहा सत्तसई " { गाथा सप्तसती} गाथा म्हणजे कविता. सातशे लोककवितांचा संग्रह म्हणजे हा ग्रंथ होय. पैठणच्या हाल या सातवाहन राजाने सुमारे दोन हजार वर्षांपुर्वी पन्नास कवींच्या या कविता संकलित केल्या.सातवाहनांची राजभाषा मराठी असल्याने त्यांचे जिथे जिथे राज्य होते, तिथे तिथे या ग्रंथाची हस्तलिखिते मिळालेली आहेत. सातवाहनांचे संपुर्ण भारतावर तर राज्य होतेच परंतु पार अफगाणिस्तानपर्यंत राजभाषा मराठीची पताका फडकत होती.गाथा सप्तसती, पादलिप्त, हरिभद्राची समरादित्याची कथा, उद्योतन सुरीची कुवलयमाला, चक्रधरांचे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, एकनाथांची भारूडे, माझा प्रवास, गावगाडा, धग, कोसला, बनगरवाडी, बॅरिस्टर अनिरूद्ध धोपेश्वरकर, गोलपिठा, शांतता कोर्ट चालू आहे, हे ग्रंथ इतके चिरेबंदी आहेत की मराठीची श्रेष्ठता स्वयंस्पष्ट आहे. फुले-आंबेडकर, टिळक - आगरकर, राजवाडे-केतकर, राजारामशास्त्री भागवत, प्रबोधनकार ठाकरे यांचे वैचारिक लेखन श्रेष्ठ प्रतीचे आहे.

मराठीला अभिजात दर्जा मिळणं म्हणजे मराठीच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे. त्यामुळे मराठी माणसाचा न्यूनगंड कमी होईल. मराठी शिकवण्याची सोय देशातील 450 विद्यापीठांमध्ये होईल. मराठीच्या समग्र विकासासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी 500 कोटी रुपये मिळतील. मराठी शाळा, शिक्षण, शिक्षक यांची दर्जावाढ, वाचन संस्कृती वाढणे, ग्रंथालये संवर्धित केली जाणे, मराठी पुस्तके स्वस्तात मिळणे, मराठी मुलामुलींना अधिकाधिक रोजगार मिळणे यासाठी या दर्जामुळे खुप मदत होईल.
मराठीचे गोमटे व्हायला अभिजात दर्जा गती देईल.

राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना दुर्गा भागवतांनी म्हटले आहे, की जुनी माहाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. मराठी संस्कृतोद्भव नाही. ती संस्कृतपेक्षा जुनी भाषा आहे. नात्याने ती संस्कृतची मावशी आहे.
गाथा सप्तसतीतील मराठी, जे महाराष्ट्री प्राकृत या नावाने ओळखले गेले, हरिभद्र, भद्रबाहू, उद्योतन सुरी आदींचे लेखन आणि चक्रधर, ज्ञानेश्वर, चोखा, चोंभा, सावतामहाराज, नामदेव, संत बहिणाबाई, एकनाथ, बखरी, ते फुले-आंबेडकर, अण्णाभाऊ, लोकहितवादी, आगरकर, रानडे, टिळक, विष्णुभट गोडशे, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरूजी, बेडेकर, भाऊ पाध्ये, नेमाडॆ, ढसाळ, कोलटकर, चित्रे, यांच्या साहित्याची महत्ता आणि त्यांचे "जैविक नाते" महत्वाचे आहे.

अभिजात मराठी भाषा म्हणजे श्रेष्ठ मराठी भाषा. खांद्यावर मायमराठीची पताका घेतलेल्या साडेबारा कोटींची ती "भाषांमाजी भाषा साजिरी आहे." संत एकनाथ म्हणतात, ती चोरांपासून जन्मलेली नाही. ती कष्टकर्‍यांची-ज्ञानवंतांची भाषा आहे. ही श्रमाची-घामाची, निर्मितीची भाषा आहे. मराठी ज्ञानभाषा आहे. धर्मभाषा आहे. अक्षरभाषा आहे. अजरामर भाषा आहे. जगातील सर्व भाषा मेल्या आणि अवघ्या चार जगल्या तरी मराठी जगणार आहे.स्वत:चे राज्य आणि श्रेष्ठ साहित्य असलेली मराठी ही जगातली चौथ्या क्रमांकाची राज्य भाषा आहे. मराठीतले कोश वांड्मय तर जगातले दुसर्‍या क्रमांकाचे कोश वांड्मय आहे.

आपण दक्षिण भारतात गेलो की तिथली सगळी माणसं त्यांच्या मातृभाषेबद्दल आग्रही असलेली दिसतात. तमीळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम हे सगळेच लोक आपापल्या मातृभाषेचा अभिमान बाळगतात. या बहुतेक सर्व राज्यांनी शिक्षण, साहित्य, संस्कृती, कला आदी क्षेत्रात फार मोठी भरारी घेतलेली आहे. मानव विकास निर्देशांकात ही राज्यं पुढं आहेत. हे सारे आपले शेजारी असूनही आपण त्यांच्याकडून मातृभाषाप्रेम मात्र शिकायला तयार नाही. तिथल्या सरकारांनी स्थानिक भाषेच्या सक्तीबाबत अतिशय कडक पावलं उचललेली आहेत. इंग्रजी आणि हिंदीच्या आक्रमणाचा प्रश्न त्यांनाही भेडसावतो आहे. पण त्यांनी त्यावर कशी मात केलीय हे आपण त्यांच्याकडून समजून घ्यायला हवं. तिथं भाषिक मतबॅंक, व्होटबॅंक असल्यानं राज्यकर्त्यांना ठाम आणि कडक भुमिका घ्यावीच लागते.

एखादी भाषा मरते तेव्हा एक संस्कृती संपते. तिच्या निर्मिती आणि संवर्धनासाठी शेकडो वर्षे लाखो लोक राबलेले असतात.
मराठी शाळांचा दर्जा चांगला नसतो अशी टिका केली जाते. मराठी शाळांचा दर्जा वाढवायला हवा याबाबत दुमत नाही. परंतु काही मोजक्या ईंग्रजी शाळा सोडल्या तर उरलेल्या शाळांना दर्जा सुमार असतो. पण संस्कृतीकरणाचा सिद्धांत सांगतो, सामान्य लोक अभिजनांचं, महाजनांचं अनुकरण करीत असतात. महाराष्ट्रात ज्या दिवशी बुद्धीजिवी मध्यम आणि उच्च मध्यम वर्गानं मराठीचं बोट सोडलं, त्यादिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला.
सावरकरांची क्षमा मागून सांगायचं झालं तर, ते जणू म्हणताहेत, "सागरा प्राण तळमळला, ने मजशी ने इंग्रजी शाळेला."

ज्यांनी ज्ञाननिर्मिती केली, देश समृद्ध केला असे बहुतेक सर्वजण मातृभाषेतून शिकलेले आहेत. परममहासंगणक बनवणारे विजय भटकर, मोबाईलची क्रांती घडवून आणणारे सत्यनारायण गंगाराम पित्रोदा, महान शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, वसंत गोवारीकर, माधव गाडगीळ, ज्ञानपीठ विजेते खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा, नेमाडे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी सावंत, तेंडूलकर, सुर्वे, एलकुंचवार, यशस्वी सनदी अधिकारी शरद जोशी, माधव गोडबोले, माधव चितळे, स.गो.बर्वे, राम प्रधान, ज्ञानेश्वर मुळे ते भूषण गगरानी हे सारेच मातृभाषेतून शिकलेले आहेत.

-प्रा.हरी नरके
harinarke@gmail.com
लेखक अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक आहेत.
http://epaperlokmat.in/main-editions/Mumbai%20Main%20/-1/8
लोकमत,पुणे, संपादकीय पृष्ठ, गुरूवार, दि. ७ मार्च २०१९