मराठीच्या अभिजात दर्जाचं काय झालं?
27 फेब्रुवारी : मराठी भाषा दिनानिमित्त...
साहित्याची श्रेष्ठता, भाषेच्या वयाचे 1500 ते 2000 वर्षांचे लिखित पुरावे, भाषेची स्वतंत्रता आणि भाषेचे मूळ रूप व आजचे रूप यांचे नाते असणे हे अभिजात दर्जाचे चारही निकष मराठी सहज पूर्ण करते. आम्ही तसे सिद्धही केलेय. आता गरज आहे ती राजकीय रेट्याची. त्यासाठी मराठीची लॉबी दिल्लीत उभी करावी लागेल. संस्कृतचे ओझे नाकारावे लागेल.
मोदी सरकारच्या मराठीबद्दलच्या अनास्थेमुळे व उदासीनतेमुळे मराठीला मिळू शकणारा अभिजात दर्जा गेली सात वर्षे रखडला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेली चौदा वर्षे आपण अहोरात्र झटतो आहोत. पठारे समितीने लिहिलेला मराठीचा अहवाल केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ज्ञांनी सर्वानुमते मंजूर केला... त्यालाही सात वर्षे उलटून गेली. केंद्रातील नेत्यांच्या मराठीद्वेषामुळे ही घोषणा रखडलेली आहे. मनमोहन सिंह यांच्या काळात सहा भाषांना हा दर्जा दिला गेला. मोदी सरकार संस्कृतलॉबीच्या दबावाखाली काम करत असल्याने त्यांनी एकाही भारतीय भाषेला हा दर्जा दिलेला नाही. ही नीती लोकभाषाविरोधी आहे.
एक वेळ पैशांचे सोडा... पण मायमराठीचा होणारा सन्मान रोखला गेला याचा खेद प्रत्येक मराठी माणसाला वाटायला हवा. अभिजात मराठी भाषा म्हणजे श्रेष्ठ मराठी भाषा. ज्या भाषेतले साहित्य श्रेष्ठ दर्जाचे असते तिला अभिजात दर्जा मिळतो. मराठी अमृतातेही पैजा जिंकणीरी असल्याची ग्वाही 700 वर्षांपूर्वीच ज्ञानेश्वर देऊन गेलेत. जगातील सर्व भाषा मेल्या आणि अवघ्या चार जगल्या तरी मराठी जगणार आहे. स्वतःचे राज्य आणि श्रेष्ठ साहित्य असलेली मराठी ही जगातली चौथ्या क्रमांकाची राज्यभाषा आहे. मराठीतले कोशवाङ्मय तर जगातले दुसर्या क्रमांकाचे कोशवाङ्मय आहे.
कोणताही माणूस मातृभाषेतून विचार करतो. मातृभाषा ही एक प्रकारे माणसाच्या अस्तित्वाला विचारांचा प्राणवायू पुरवत असते. ते त्याचे ओळखपत्र असते. मातृभाषा ही माणसाची अस्मिता आणि अस्तित्वखूण असते. शहरी, महानगरी मराठी माणूस बहुभाषक आहे. रोजगार, उद्योग, व्यापार, आर्थिक प्रगती यांसाठी त्यानं बहुभाषकतेची कास धरलेली आहे. पोटासाठी त्याने इतर भाषा शिकायला कोणाचाच विरोध नाही... परंतु मराठी ही हलकी भाषा आहे, डाऊन मार्केट आहे म्हणून त्याला तिची लाज वाटत असेल... तर मात्र ती शरमेची बाब आहे. इंग्लीशमधून, हिंदीतून बोलण्याला आज सार्वजनिक जीवनात विशेष प्रतिष्ठा आहे. एखादी भाषा मरते तेव्हा एक संस्कृती संपते. तिच्या निर्मितीसाठी आणि संवर्धनासाठी शेकडो वर्षे लाखो लोक राबलेले असतात. महाराष्ट्रात ज्या दिवशी बुद्धिजीवी मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाने मराठीचे बोट सोडले... त्या दिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला.
साहित्याची श्रेष्ठता, भाषेच्या वयाचे 1500 ते 2000 वर्षांचे लिखित पुरावे, भाषेची स्वतंत्रता आणि भाषेचे मूळ रूप व आजचे रूप यांचे नाते असणे हे अभिजात दर्जाचे चारही निकष मराठी सहज पूर्ण करते. आम्ही तसे सिद्धही केलेय. आता गरज आहे ती राजकीय रेट्याची. त्यासाठी मराठीची लॉबी दिल्लीत उभी करावी लागेल. संस्कृतचे ओझे नाकारावे लागेल.
17 वर्षांपूर्वी तमीळ भाषेला अभिजात दर्जा दिला गेला. त्यानंतर संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि उडिया यांनाही तो मिळाला. मराठीला हा दर्जा द्यावा अशी साहित्य अकादमीने एकमताने केलेली लेखी शिफारस मोदी सरकारने गेली सहा वर्षे दुर्लक्षित केली आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, शिक्षण हे सारेच विषय मागे गेले आहेत. मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ, मराठीचे 25 वर्षांचे धोरण, मराठीसक्तीचा कायदा आणि अभिजात दर्जा यांबाबतीत तडजोड होता कामा नये.
1907मध्ये ग्रियरसनने भारतीय भाषांचे सखोल सर्वेक्षण केले. तो म्हणतो की, जी भाषा रोजगार देते तीच जगते. जी भाषा रोजगारक्षम नसते ती मरते, नष्ट होते. बोलीभाषांची विविधता हे मराठीचे खरे वैभव असून मराठीच्या 52 बोलीभाषा आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, साने गुरूजी, जी.ए. कुलकर्णी, उद्धव शेळके, बा.सी. मर्ढेकर, व्यंकटेश माडगूळकर, नामदेव ढसाळ, भालचंद्र नेमाडे, वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, दुर्गा भागवत, पु.ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, भाऊ पाध्ये, अरुण कोलटकर, महेश एलकुंचवार, रंगनाथ पठारे अशा अनेकांमुळे मराठी समृद्ध झालेली आहे. दलित साहित्याने मराठीला सामाजिक दस्तऐवज देऊन तिला खूप श्रीमंत केलेले आहे.
‘एक होता कावळा नि एक होती चिमणी...’ ही प्रत्येक मराठी घरात आजही सांगितली जाणारी गोष्ट आहे. ती पहिल्यांदा ग्रंथात लिहिली गेली 800 वर्षांपूर्वी. लीळाचरित्रात धानाई नावाच्या हट्टी मुलीला श्री चक्रधरांनी ती सांगितली असली तरी ती त्याआधी हजारबाराशे वर्षे मराठी लोकजीवनात सांगितली जात होती. ती विलक्षण लोकप्रिय होती.
महाराष्ट्री प्राकृत किंवा महारठ्ठी या नावाने दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी प्रचलित, लोकप्रिय व मान्यताप्राप्त असलेली भाषा ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे म.म. राजारामशास्त्री भागवत (विदुषी दुर्गा भागवत यांचे आजोबा) यांनी 1885मध्येच दाखवून दिले होते. ‘मराठ्यासंबंधी चार उद्गार’ हा त्यांचा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचावा. त्यांचा ‘मराठीची विचिकित्सा’ हा ग्रंथही महत्त्वाचा आहे.
राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना दुर्गा भागवतांनी म्हटले आहे की, जुनी महाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. मराठी संस्कृतोद्भव नाही. ती संस्कृतपेक्षा जुनी भाषा आहे. नात्याने ती संस्कृतची मावशी आहे. 1927मध्ये ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास दोन खंडांत लिहिला. त्यात त्यांनी मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. 1932मध्ये पांगारकरांनी दाखवून दिलेले आहे की, महाराष्ट्री, महारठ्ठी, मर्हाठी, मराठी या वेगळ्या भाषा नसून ती एकाच भाषेची प्राचीन, मध्यकालीन व अर्वाचीन रूपं आहेत.
गाथा सप्तशतीतील मराठी, जे महाराष्ट्री प्राकृत या नावाने ओळखले गेले; हरिभद्र, भद्रबाहू, उद्योतन सुरी आदींचे लेखन आणि चक्रधर, ज्ञानेश्वर, चोखा, चोंभा, सावता महाराज, नामदेव, संत बहिणाबाई, एकनाथ, बखरकार ते फुले-आंबेडकर, अण्णाभाऊ, लोकहितवादी, आगरकर, रानडे, टिळक, विष्णुभट गोडसे, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरुजी, बेडेकर, दिलीप चित्रे यांच्या साहित्याची महत्ता आणि त्यांचे ‘जैविक नाते’ महत्त्वाचे आहे.
मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ आहे, ‘गाहा सत्तसई’ (गाथा सप्तसती) गाथा म्हणजे कविता. सातशे लोककवितांचा संग्रह म्हणजे हा ग्रंथ होय. पैठणच्या हाल या सातवाहन राजाने सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी पन्नास कवींच्या या कविता संकलित केल्या. सातवाहनांची राजभाषा मराठी असल्याने त्यांचे जिथे-जिथे राज्य होते तिथे-तिथे या ग्रंथाची हस्तलिखिते मिळालेली आहेत. सातवाहनांचे संपूर्ण भारतावर तर राज्य होतेच... शिवाय पार अफगाणिस्तानपर्यंत राजभाषा मराठीची पताका फडकत होती.
मूल लहान असताना, रांगत असताना पीएच्.डी. करू शकेल का? नाही. मग कोणतीही भाषा बालवयातच ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र आणि विवेकसिंधू यांसारखे जागतिक दर्जाचे श्रेष्ठ ग्रंथ कसे प्रसवू शकेल? आठशे वर्षांपूर्वी मराठीत हे ग्रंथ लिहिले गेले तेव्हा मराठी बालभाषा नव्हती... तर ती एक परिपक्व झालेली समृद्ध भाषा होती. संत ज्ञानेश्वर मराठीची गोडी अमृताहूनही जास्त असल्याचे प्रतिपादन कोणाला उद्देशून करत होते? संस्कृतलाच ना? ज्ञाननिर्मिती, साहित्य, विचार, तत्त्वज्ञान आणि संस्कृती यांची त्याआधीची फार मोठी परंपरा मराठीला होती. गाथा सप्तसती, पादलिप्त, हरिभद्राची-समरादित्याची कथा, उद्योतन सुरीची कुवलयमाला, चक्रधरांचे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, एकनाथांची भारुडे, माझा प्रवास, गावगाडा, धग, कोसला, बनगरवाडी, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर, गोलपिठा, शांतता कोर्ट चालू आहे हे ग्रंथ इतके चिरेबंदी आहेत की, मराठीची श्रेष्ठता स्वयंस्पष्ट आहे.
मराठीला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे मराठीच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे... त्यामुळे मराठी माणसाचा न्यूनगंड कमी होईल. मराठी शिकवण्याची सोय देशातील 450 विद्यापीठांमध्ये होईल. मराठीच्या समग्र विकासासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी पाचशे कोटी रुपये मिळतील. मराठी शाळा, शिक्षण, शिक्षक यांची दर्जावाढ; वाचन संस्कृती वाढणे; ग्रंथालये संवर्धित केली जाणे; मराठी पुस्तके स्वस्तात मिळणे; मराठी मुलामुलींना अधिकाधिक रोजगार मिळणे या सगळ्यामुळे मराठीचा दर्जा आणखी सुधारण्यास खूप मदत होईल. विशेषतः बृहन्महाराष्ट्रात मराठीच्या संवर्धनाला यातून अर्थबळ पुरवता येईल. मराठीचे गोमटे व्हायला अभिजात दर्जा गती देईल... त्यामुळे मराठीचा हा सन्मान महत्त्वाचा आहे.
- प्रा. हरी नरके
harinarke@gmail.com
(लेखक अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक आहेत.)
Tags: भाषा हरी नरके अभिजात भाषा साहित्य Marathi https://kartavyasadhana.in/view-article/prof-hari-narke-on-classical-language-status-to-marathi?fbclid=IwAR1k7g_BN8vzuEeMYJkVo0mDtc65HT3fMjlOvKm-tB6Vy_LHs9-1Y_-guxY