Sunday, December 29, 2013

२०१४ चे प्रास्ताविक








माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. तो अतिशय आशावादी आणि चिवटही आहे.जगण्याचा उत्सव साजरा करताना नववर्षाचे जल्लोशात स्वागत करण्याची आपली परंपरा आहे. अशावेळी २०१३ च्या कडूगोड आठवणी जागवत २०१४ ला सामोरं जाताना ....
२०१३:
महापुरूष मंडेला गेले.
जादूटोणा विरोधी कायदा राज्यात लागू झाला...
त्यासाठी डा. नरेंद्र दाभोलकरांना शहीद व्हावे लागले..
त्यांचे मारेकरी साडेचार महिने झाले तरी सापडलेले नाहीत.
तेलंगणाची घोषणा झाली.
"आदर्श" अहवाल आला...फेटाळला...फेरविचाराचा सल्ला मानला जाणार का?
महिला सुरक्षा कायदे कडक झाले.
लक्ष्मण माने अडकले की अडकवले गेले?
अरुषी हत्याकांड शिक्षा सुनावली गेली.
निर्भया केस दिल्लीचा निकाल आला.
गांगुली, तेजपाल यांच्यावर आरोप झाले.
मिडीया ट्रायल होऊन गेली...न्यायदानाची नवी पद्धत लागू झाली.
ओबीसी म्हणतात, दोनवर्षे झाली जातवार जनगणना सुरू होऊन..२०१४ ला तरी ती पुर्ण होणार का?
नरेंद्र मोदींचा अश्वमेध ५ राज्यांच्या निकालाच्या पार्श्वभुमीवर सुसाट सुटणार असे संकेत मिळत आहेत.
दिल्लीत केजरीवालांचे सरकार आलेय. आता जादूची कांडी फिरणार.भ्रष्टाचार आता छूमंतर होणार. १२५ कोटी भारतीयांनी आता दिल्लीत राहायला जाऊया.पाणी,वीज मोफत. कुठेही राहा, सरकार घर बांधून देईल. कांदा मोफत.भाजीपाला मोफत.आणखी काय हवे?
हा देश म्हणजे परस्परविरोधी हितसंबंधाचे महागाठोडे आहे.
जात, वर्ग, धर्म, भाषा. प्रांत, लिंग अशा परस्परांना छेद देणार्‍या हितसंबंधाना सामोरं जाण्याऎवजी समस्यांचे सपाटीकरण {सुलभीकरण करा. देशात फक्त एकच प्रश्न आहे असे सांगत राहा.
केजरीवाल म्हणणार भ्रष्टाचार संपला की देशात रामराज्य येणार.
मोदी म्हणणार, कोंग्रेस संपली की नमोराज्य येणार.
मेटे आणि युवराज{छत्रपती} म्हणणार मराठा आरक्षण आले की देश सुखी होणार.
मेधा पाटकर म्हणणार, नर्मदा,लवासा यात सगळी कीड आहे.
अण्णा हजारे म्हणणार लोकपाल आले की अण्णाराज्य येणार.
.........
देशात आज दहशतवाद, प्रदुषण, भ्रष्टाचार,दलित-महिला-गरिबांवरचे अत्याचार, महागाई, शेतकरी आत्महत्त्या, बेकारी, वाढती गुन्हेगारी, वाढती लोकसंख्या,परमेश्वराला पर्याय जागतिकीकरणाचे गारूड,...असे डोंगरभर प्रश्न आहेत.
२०१४ मध्ये त्यावर मंथन होणार? प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पावले पडणार?
की निवडणुक वर्ष असल्याने अस्मिता, गर्जना, सपाटीकरण, मतदारांचे ध्रूवीकरण  होणार?
देशाचा पंतप्रधान मोदी ? राहूल गांधी ? शरद पवार ? की अन्य कोणी?
उत्तरे यथावकाश मिळतीलच.
तोवर शुद्धीत राहून मावळत्याला निरोप देऊया आणि उगवत्याचे स्वागत करूया.
बधीर होणे, बेहोश होणे टाळूया.
टीआरपीच्या सुनामीत वाहून जाण्याऎवजी विवेक जागा ठेवूया..
मध्यममार्ग स्विकारूया..
रंगनाथ पठारे सरांची नवी कादंबरी " एका आरंभाचे  प्रास्ताविक " नुकतीच वाचली.जबरदस्त आहे. समृद्ध अडगळीसह कसे जगायचे याची इनसाईट हा लेखक आपल्याला देतो.
२०१४ चे प्रास्ताविक करताना आपापली "पणती" जपून ठेऊया.....
चला नववर्षाचे स्वागत करूया...

Wednesday, December 25, 2013

आज २५ डिसेंबर:




आज २५ डिसेंबर:
१८७३ साली: जोतीराव सावित्रीबाईंनी या दिवशी पहिले सत्यशोधक लग्न लावले. त्यात त्यांनी हुंडा, डामडौल, अवाजवी खर्च, बालविवाह, भटजी यांना नकार दिला.वय,गुण,प्रेम व आवडीनिवडी बघून लग्न करावीत असा सल्ला दिला. स्त्रियांचे मानवी अधिकार स्थापन करण्यासाठी झटण्याची प्रतिज्ञा या लग्नात नवरा मुलगा जाहीरपणे करीत असे.
आज बहुजनांनी बडेजाव, अवाजवी खर्च, हुंडा आणि मानपानाद्वारे जोतीराव-सावित्रीबाईंचा सगळा पराभव करून टाकला आहे.तुम्हाला काय वाटते?
१९२७ साली: बाबासाहेबांनी महाडला मनुस्मृती जाळली. गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, सुरबा नाना टिपणीस, पोलादखान पठाण हे त्यांच्या सोबत होते. तेव्हा मनुस्मृती हे भारतीय संविधान होते. आज बाबासाहेब असते तर त्यांनी काय जाळले असते?
आजही मनुस्मृतीला आणि ब्राह्मणांना तोंडाने शिव्या देत पण ती डोक्यावर घेऊन स्वत:मध्ये उच्चनिचतावादीवृत्ती मुरवून कोण तिचे पालन करतायेत?अशाप्रकारे बहुजन आजही भारतीय संविधान पायदळी तुडवित असतील तर त्यांनी बाबासाहेबांचे नाव घ्यावे काय? तुम्हाला काय वाटते?

Sunday, December 8, 2013

फुले-आंबेडकर समकालीनच



पुढारी, रविवार, पुणे, दि.८ डिसेंबर, २०१३
Pudhari, Pune, 8 Dec.2013
http://epaper.pudhari.com/epapermain.aspx
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=416104&boxid=12442881&pgno=4&u_name=0

Friday, December 6, 2013

नेल्सन मंडेला

१९९०-९१ हे फुले स्मृतीशताब्धी आणि डा‘.बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्धी वर्ष होते



. नेल्सन मंडेला भारतभेटीवर आलेले असताना आम्ही त्यांना भेटून या दोघांचे ग्रंथ भेट दिले. जोतीरावांनी १८७३ साली आपला गुलामगिरी हा ग्रंथ कृष्णवर्णियांच्या चळवळीला अर्पण केल्याचे बघून ते भारावून गेले. "आम्हाला भारताशी जोडणारा हा गांधीपुर्व दुवा आहे," असे ते म्हणाले.बाबासाहेबांचे संविधान आणि जातीनिर्मुलनवादी लेखन ही आमची उर्जा आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले. मायदेशी गेल्यावर त्यांनी आमच्याकडून फुले-आंबेडकरांच्या पुस्तकांच्या प्रत्येकी हजार प्रती खरेदी करून त्यांच्या देशातील सर्व ग्रंथालये, महाविद्यालये, विद्यापिठे यांना भेट दिल्या. "ला‘ग वा‘क टू फ्रिडम" "Long Walk To Freedom" लिहिणारा हा महामानव. ते या सहस्त्रकातले मानवी अधिकार चळवळीतले महान व्यक्तीमत्व होते....विनम्र आदरांजली.

Thursday, November 28, 2013

पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय योग्यच





http://ncp.org.in/stories/initiative/262....

'पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय योग्यच - प्रा. हरि नरके'
पुणे विद्यापिठाच्या अधिसभेने {सिनेटने} सर्वानुमते विद्यापिठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेतला आहे. व्यवस्थापन परिषदेकडे हा निर्णय पाठवून त्याला मान्यता मिळाली की, सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल. विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी विद्यापीठाकडून प्रस्ताव आल्यास सरकार त्याबाबत जरूर विचार करेल, असे आश्वासन दिले होते. यावरून नामविस्ताराची प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याचे दिसते. ही आनंदाची बाब आहे.

दोन विरोधी सूर निघाले, हे खरे आहे, मात्र हे दोघेही विद्यापीठाबाहेरचे असल्याने आणि ती त्यांची व्यक्तिगत मते असल्याने त्याला लोकांचा पाठिंबा नाही. एकाचे म्हणणे असे होते की, विद्यापीठाची गुणवत्ता नामविस्ताराने वाढणार नाही किंवा भ्रष्टाचारही संपणार नाही, त्यामुळे नामांतराची गरज नाही. हा युक्तीवाद मुख्य विषयाकडून लोकांचे लक्ष दुसरी कडे वेधणारा आहे. त्यात फारसे तथ्य नाही. नामविस्ताराशी गुणवत्तेची सांगड घालून विरोध करणे, योग्य नाही.

नामविस्तार करताना विद्यापीठाच्या नावामध्ये पुणे शब्द नको, कारण पुण्याला पेशव्यांचा जातीयवादी इतिहास आहे. असा आक्षेप घेतला गेला आहे. तो अतिशय बालिश आणि तथ्यहीन आहे. पुणे शहर हे जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवराय, थोरले बाजीराव, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, टिळक, आगरकर, रानडे, कर्वे, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे यांच्यापासून जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, अनिल अवचट, बाबा आढाव अशा गुणवंतांचे आहे. पुणे हे शिक्षण, संस्कृती, कला, विज्ञान, उद्योग आणि व्यापार यांचे माहेरघर आहे. महात्मा गांधी यांनी पुण्याला ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ म्हटले होते. हा वारसा पाहता पुणे या नावाला विरोध करणे आयोग्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि लोकसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अशी नामविस्ताराची गेल्या २० वर्षांची परंपरा आहे. तिला अनुसरूनच पुणे हा शब्द ठेवणे उचित होईल.

सावित्रीबाई फुले या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी १५० वर्षांपूर्वी शाळा सुरू केली, तेव्हा त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण ते दाम्पत्य डगमगले नाही. सावित्रीबाई जोतिरावांकडे आधुनिक शिक्षणतज्ज्ञ म्हणून बघणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाची आमुलाग्र फेररचना करणे, तंत्रशिक्षण आणि शेतीशिक्षणाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे, शैक्षणिक गळतीची कारणे शोधून ती दूर करण्यासाठी उपाययोजना करणे, प्रौढ साक्षरता अभियान सुरू करणे, महिला व दलितांच्या शिक्षणासोबतच अल्पसंख्याकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे, याबाबतचे सावित्रीबाई-जोतिरावांचे कार्य अतुलनीय आहे.

महिला आज शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी भरारी घेत आहेत. सावित्रीबाईंच्या नावामुळे महिलांच्या मानवी अधिकारांच्या चळवळीला फार मोठी ऊर्जा मिळेल, असा मला विश्वास वाटतो. हा नामविस्तार अतिशय सलोख्याच्या वातावरणात पार पडत असल्याचा आनंद आहे. मी पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळांचे अभिनंदन करतो.

'शिवरायांची समाधी शोधण्याचं श्रेय जोतिरावांचंच!'

http://ncp.org.in/stories/ourachievers/260
'शिवरायांची समाधी शोधण्याचं श्रेय जोतिरावांचंच!'

पोवाडारुपी ‘शिवचरित्र’ (Shivcharitra) लिहून आणि प्रकाशित करून महाराजांचा पराक्रमी वारसा घराघरांत पोहोचवण्याचं खरं श्रेय जातं ते महात्मा फुले यांनाच. जोतिरावांच्या या महान कार्यावर प्रकाश टाकलाय, प्रा. हरि नरके (Prof. Hari Narke)... यांनी

शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय सामान्यपणे लोकमान्य टिळक यांना दिलं जातं. १८९५-९६ साली लोकमान्य टिळक शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला. ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. तथापि त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे १८८० साली पुण्याचे महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध झाले आहेत. १८६९ साली जोतिराव फुल्यांनी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले आहे. आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. छपाईची सुरूवात झाल्यापासूनचे मराठीतले हे पहिले शिवचरित्र आहे. जोतिरावांनी सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणा सांगताना शिवरायांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जोतिरावांच्या सगळ्या लेखनात, आणि भाषणांमध्ये शिवरायांचा प्राधान्याने उल्लेख आढळतो. त्यांच्या शिवचरित्राच्या आजवर २५ हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याची भाषांतरंही विविध भाषांमध्ये झालेली आहेत. १८८० साली जोतिराव पुण्यातून चालत रायगडावर गेले. तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती जोतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे. या सभेत साफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंची उत्सव सुरू करण्याचा विचार जोतिरावांनी मांडला. आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले. १८८०साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत. १८९३ साली गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन टिळकांनी त्याचे चळवळीमध्ये रूपांतर केले. त्यांना शिवजयंतीचेही महत्त्व वाटत होते. म्हणूनच पंधरा वर्षे सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात टिळक जातीने उपस्थित राहिले. आणि आपला सहभाग देऊन त्यांनी हा उत्सव आणखी मोठा केला.

१८८२ साली टिळक-आगरकरांना शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या लेखनासंदर्भात एका खटल्याला सामोरं जावं लागलं. त्यावेळी त्यांना डोंगरीच्या तुरुंगात राहावं लागलं. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ बापुशेठ उरवणे यांना रूपये दहा हजार रोख घेऊन जामिनासाठी मुंबईला पाठविलं. आपल्या जामिनासाठी जोतिरावांनी ही धडपड केल्याचे खुद्द टिळक आगरकरांनी ‘केसरी’मध्ये नमूद केली आहे. टिळक-आगरकर तुरुंगातून सुटल्यावर सत्यशोधकांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली, सत्कार करून मानपत्र दिले. हे मानपत्र ‘केसरी’मध्ये छापून आलं. उरवणे यांच्या मृत्युनंतर खुद्द टिळकांनी या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा पोलिस खात्याचे अहवाल, सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज, पुरावा लेखागारातील कागदपत्रे आणि सत्यशोधक माधवराव बागल यांनी १९३३ साली सत्यशोधक समाज हिरक महोत्सव ग्रंथात केलेले लेखन, हे सर्व दस्तावेज असे सांगतात की, जोतिरावांनी १८८० साली देशात सर्वप्रथम शिवसमाधी शोधणं, तिचे सुशोभिकरण करणं आणि शिवजयंती उत्सव सुरू करणं, अशी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कामे केलेली आहेत.

जामिन आणि मानपत्र याबाबतची नोंद तर खुद्द टिळकांनी केली आहे. तेव्हा आज आपण असे म्हटले पाहीजे की, शिवजयंती सुरू करणारे जोतिराव आहेत आणि ती मोठी करण्यात लोखंडे आणि लोकमान्य टिळक यांचा महत्त्वाचा वाटा आहे.


महात्मा जोतीराव फुले हे आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ



















कुमार केतकर, शारदा साठे, छगन भुजबळ, हरी नरके, कृष्णकांत कुदळे व इतर मान्यवर
......................
महात्मा फुले पुण्यतिथी -- फोटो - समता भूमी . . . .फोटो-- महेश जांभुळकर - 98600 88820
.......................................


महात्मा जोतीराव फुले हे आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ- कुमार केतकर
पुणे: दि.२८ नोव्हें. "डा. जी.एस.घुर्ये आणि एम.एन.श्रीनिवासन यांच्या अनेक वर्षे आधी महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजाचे विशेषत: जातीव्यवस्थेचे ज्या पद्धतीने शास्त्रीय विश्लेषण केले होते ते पाहता, जोतीराव हेच आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ ठरतात.त्यांचे हे लेखन आंतरराष्ट्रीय दर्जाचे होते. त्यांच्या साहित्यातील हा वैचारिक भाग एकत्र करून त्याची मांडणी करण्याचे काम नव्या पिढीतील अभ्यासकांनी हाती घ्यावे" असे प्रतिपादन दिव्यमराठीचे प्रमुख संपादक कुमार केतकर यांनी आज येथे केले. अ.भा.महात्मा फुले समता परिषदेतर्फे देण्यात आलेला "महात्मा फुले समता पुरस्कार" स्विकारताना ते बोलत होते. राज्याचे सार्व. बांधकाम तथा पर्यटन मंत्री आणि समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स्त्रीमुक्ती चळवळीच्या नेत्या शारदा साठे,खासदार समीर भुजबळ, आमदार गिरीष बापट, जयदेव गायकवाड, उल्हास पवार, जयंत जाधव, दिप्ती चवधरी, महापौर चंचला कोद्रे, कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, महिला अध्यक्ष पार्वती शिरसाठ,सुधीर गाडगीळ व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यभरातून समतासैनिक प्रचंड मोठ्या संख्येने अभिवादनासाठी उपस्थित होते.
केतकर पुढे म्हणाले, "अमेरिकन यादवी युद्धात अब्राहम लिंकन यांनी कृष्णवर्णीयांच्या मुक्तीसाठी सर्वस्व पणाला लावले. त्याचकाळात जोतीरावांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ या चळवळीला अर्पण करून जागतिक दृष्टीचा प्रत्यय दिला.विचारांचे असे जागतिकीकरण करणारे जोतीराव जातीनिर्मुलनाची चळवळ रुजवून गेले. आपल्याकडे विचारवंत आणि सक्रीय कार्यकर्ते अशी विभागणी झालेली आहे.जोतीराव सक्रीय कार्यकर्ते होतेच पण ते विद्वानही होते. त्यांनी लोकशाही विचारांचा पाया घातला. आज अनेक फ्रेंच आणि जर्मन विचारवंत जोतीरावांचा अभ्यास करीत आहेत. देशातील ६ हजार जातींच्या अस्मिता कुरवाळत न बसता त्यांच्या काचातून समाज बाहेर यावा यासाठी त्यांनी सत्यशोधक चळवळ केली. आज देश संकटातून जात असताना आणि १५-२० वर्षांनी आपला देश कुठे असेल याचा विचार करताना थरकाप उडतो.माओ आणि महात्मा गांधी यांच्या विचारातील अनेक मौलिक सुत्रे आपल्याला शतकभर आधीच जोतीराव देऊन गेले होते."
रुपये एक लक्ष, फुलेपगडी.मानपत्र, स्मृतीचिन्ह, उपरणे आणि फुले समग्र वाड्मय यांचा पुरस्कारात समावेश होता.
यावेळी शारदा साठे, छगन भुजबळ यांची भाषणे झाली. कृष्णकांत कुदळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.प्रीतेश गवळींनी आभार मानले. सुत्रसंचालन विजय लडकत यांनी केले.
कार्यक्रमाला समता परिषदेचे राज्य पदाधिकारी, बापू भुजबळ, डा. कैलास कमोद, डा.संजय गव्हाणे, जयराम साळुंखे, सुशील जाधव, अंबादास गाडेकर, दत्ता घाटगे, मकरंद सावे, बाळासाहेब माळी, आबा खोत, सुभाष राऊत, राजेश मनोरे, पत्रकार अरूण खोरे, संजय शिंदे, अद्वैत मेहता, शैलेंद्र परांजपे उपस्थित होते.


........................................................................................