Thursday, November 28, 2013

'शिवरायांची समाधी शोधण्याचं श्रेय जोतिरावांचंच!'

http://ncp.org.in/stories/ourachievers/260
'शिवरायांची समाधी शोधण्याचं श्रेय जोतिरावांचंच!'

पोवाडारुपी ‘शिवचरित्र’ (Shivcharitra) लिहून आणि प्रकाशित करून महाराजांचा पराक्रमी वारसा घराघरांत पोहोचवण्याचं खरं श्रेय जातं ते महात्मा फुले यांनाच. जोतिरावांच्या या महान कार्यावर प्रकाश टाकलाय, प्रा. हरि नरके (Prof. Hari Narke)... यांनी

शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय सामान्यपणे लोकमान्य टिळक यांना दिलं जातं. १८९५-९६ साली लोकमान्य टिळक शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला. ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. तथापि त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे १८८० साली पुण्याचे महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध झाले आहेत. १८६९ साली जोतिराव फुल्यांनी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले आहे. आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. छपाईची सुरूवात झाल्यापासूनचे मराठीतले हे पहिले शिवचरित्र आहे. जोतिरावांनी सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणा सांगताना शिवरायांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जोतिरावांच्या सगळ्या लेखनात, आणि भाषणांमध्ये शिवरायांचा प्राधान्याने उल्लेख आढळतो. त्यांच्या शिवचरित्राच्या आजवर २५ हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याची भाषांतरंही विविध भाषांमध्ये झालेली आहेत. १८८० साली जोतिराव पुण्यातून चालत रायगडावर गेले. तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती जोतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे. या सभेत साफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंची उत्सव सुरू करण्याचा विचार जोतिरावांनी मांडला. आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले. १८८०साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत. १८९३ साली गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन टिळकांनी त्याचे चळवळीमध्ये रूपांतर केले. त्यांना शिवजयंतीचेही महत्त्व वाटत होते. म्हणूनच पंधरा वर्षे सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात टिळक जातीने उपस्थित राहिले. आणि आपला सहभाग देऊन त्यांनी हा उत्सव आणखी मोठा केला.

१८८२ साली टिळक-आगरकरांना शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या लेखनासंदर्भात एका खटल्याला सामोरं जावं लागलं. त्यावेळी त्यांना डोंगरीच्या तुरुंगात राहावं लागलं. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ बापुशेठ उरवणे यांना रूपये दहा हजार रोख घेऊन जामिनासाठी मुंबईला पाठविलं. आपल्या जामिनासाठी जोतिरावांनी ही धडपड केल्याचे खुद्द टिळक आगरकरांनी ‘केसरी’मध्ये नमूद केली आहे. टिळक-आगरकर तुरुंगातून सुटल्यावर सत्यशोधकांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली, सत्कार करून मानपत्र दिले. हे मानपत्र ‘केसरी’मध्ये छापून आलं. उरवणे यांच्या मृत्युनंतर खुद्द टिळकांनी या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा पोलिस खात्याचे अहवाल, सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज, पुरावा लेखागारातील कागदपत्रे आणि सत्यशोधक माधवराव बागल यांनी १९३३ साली सत्यशोधक समाज हिरक महोत्सव ग्रंथात केलेले लेखन, हे सर्व दस्तावेज असे सांगतात की, जोतिरावांनी १८८० साली देशात सर्वप्रथम शिवसमाधी शोधणं, तिचे सुशोभिकरण करणं आणि शिवजयंती उत्सव सुरू करणं, अशी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कामे केलेली आहेत.

जामिन आणि मानपत्र याबाबतची नोंद तर खुद्द टिळकांनी केली आहे. तेव्हा आज आपण असे म्हटले पाहीजे की, शिवजयंती सुरू करणारे जोतिराव आहेत आणि ती मोठी करण्यात लोखंडे आणि लोकमान्य टिळक यांचा महत्त्वाचा वाटा आहे.


4 comments:

  1. yacha arth shivjayanati ti mahatma phule ni suru keli tar tila sarvjanik karanyach kam he lokmanyani kel

    ReplyDelete
  2. तुम्ही या लेखात लिहिलेलं आहे कि महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ बापुशेठ उरवणे यांना रूपये दहा हजार रोख घेऊन जामिनासाठी मुंबईला पाठविलं. आपल्या जामिनासाठी जोतिरावांनी ही धडपड केल्याचे खुद्द टिळक आगरकरांनी ‘केसरी’मध्ये नमूद केली आहे., तर त्यासंबंधी काही लिखित पुरावे आज आहे का ?

    ReplyDelete
  3. लेख अतिशय उत्कृष्ठ लिहिलेला आहे

    ReplyDelete
  4. prasad pachpande: होय. ३ आक्टोबर, १८८२ रोजीचा केसरी पाहावा.

    ReplyDelete