कुमार केतकर म.फुले समता पुरस्काराचे मानकरी
ख्यातनाम विचारवंत, संपादक आणि वक्ते कुमार केतकर यांना यावर्षीचा महात्मा फुले समता परिषदेचा "महात्मा फुले समता पुरस्कार" घोषित करण्यात आला आहे. पुरस्कारात रुपये एक लाख, मानपत्र, फुले पगडी आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. निवड समितीचे निमंत्रक प्रा. हरी नरके आणि कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
केतकर यांनी गेल्या ४० वर्षात आपल्या निर्भीड आणि व्यासंगी लेखणीद्वारे व प्रखर वक्तृत्वाद्वारे केलेल्या समाजजागृतीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे निवड समितीने म्हटले आहे. देशातील लोकशाही आणि समता,स्वातंत्र्य,बंधुता,सामाजिक न्याय,धर्मनिरपेक्षता यांच्या बाजूने प्रभावीपणे जागरण करण्यात केतकर अग्रभागी आहेत. त्यांचे ग्रंथ आणि वृतपत्रीय लेखन यातील त्यांचे सर्व प्रतिपादन या मुल्यांच्या रक्षणासाठी आग्रही भुमिका घेणारे आणि आक्रमक असते.त्यातील जागतिक संदर्भ आणि समकालीनता यासाठी अपार व्यासंग, युक्तीवाद आणि कमिटमेंट यांच्याद्वारे केतकर व्यक्त होत असतात.
फुले-आंबेडकरांचा विचार पुढे नेण्यात केतकरांचा फार मोठा वाटा आहे. लोकसत्ता,लोकमत आणि म.टा.यांचे प्रमुख संपादक राहिलेले केतकर सध्या दिव्य मराठीचे मुख्य संपादक आहेत. ते अनेक पुरस्कारांचे मानकरी असून त्यांना पद्मश्री सन्मान मिळालेला आहे.
यापुर्वी रावसाहेब कसबे, आ.ह.साळुखे,बाबा आढाव,भालचंद्र मुणगेकर,प्रा.हरी नरके आणि विरप्पा मोईली यांना हा पुरस्कार देण्यात अलेला आहे. येत्या २८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता पुण्यात म.फुलेवाड्यावर पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
No comments:
Post a Comment