Tuesday, November 12, 2013

पृथ्वीमध्ये मराठीचं रिंगण



MAHARASHTRA TIMES, MUMBAI, 12 NOV2013
http://maharashtratimes.indiatimes.com/moviearticleshow/25598812.cms#gads.
पृथ्वीमध्ये मराठीचं रिंगण
Nov 12, 2013, 12.00AM IST
आर्टिकल प्रतिक्रिया
ringan
स्वाती केतकर

पृथ्वी फेस्टिवलमध्ये येत्या १४ नोव्हेंबरला ' रिंगण ' या मराठी नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. या रिंगणात उतरणार आहेत, ललित कला केंद्रातले सुमारे ५० विद्यार्थी. इतक्या मानाच्या फेस्टिवलमध्ये परफॉर्म करण्याचा पहिलाच अनुभव त्यांनी ' मुंटा ' शी शेअर केला. 

रंगभूमीवर आपली ओळख मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्नं असतं की पृथ्वी थिएटरमध्ये एकदा तरी परफॉर्म करायला मिळावं. त्यातच तो पृथ्वी फेस्टिवलसारखा योग असेल तर दुधात साखरच. ललित कला केंद्र पुण्याच्या सुमारे ५० तरुण रंगकर्मींना ही संधी मिळणार आहे. यंदा १४ नोव्हेंबरला पृथ्वी थिएटरमध्ये हे विद्यार्थी ' रिंगण ' हे मराठी नाटक सादर करतायत.

बर्टोल्ड ब्रेख्त या कम्युनिस्ट नाटककाराचं ' द कॉकेशिअन चॉक सर्कल ' या नाटकाचं प्रवीण भोळे यांनी केलेलं रुपांतर म्हणजेच ' रिंगण ' हे नाटक. हे नेहमीचं, चार भिंतीत घडणारं नाटक नाही. ब्रेख्तने डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करणारी नाटकं लिहिली हे त्यातलंच एक नाटक. याचा अनुवाद चिं.त्र्यं खानोलकरांनी ' अजब न्याय वर्तुळाचा ' या नावाने केला तर १९७२ साली विजया मेहतांनी तो दिग्दर्शित केला होता. पण प्रवीण भोळेंनी पुन्हा एकदा ' द कॉकेशिअन चॉक सर्कल ' चं रुपांतर केलं. पण आता त्यांनी त्याला काफ्का या जर्मन कथालेखकाच्या कथेची जोड दिलीय. या दोन्ही परस्पर‌विरोधी दिग्गजांच्या साहित्यातून तयार झालेलं रिंगण म्हणूनच वेगळं आहे. याविषयी बोलताना प्रवीण भोळे म्हणतात, ' नाटककार म्हणून ब्रेख्त खूप मोठा आहे. ललित कला केंद्रामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना फक्त नाटक शिकवायचं नसतं तर त्यामागची जा‌णीवही शिकवायची असते. म्हणूनच हे नाटक करायचं ठरवलं. ‌दुसरं म्हणजे विद्यापीठीय पातळीवरच्या रंगभूमीची समीक्षकांनी आजवर फार कमी दखल घेतली आहे. म्हणूनच पृथ्वीने हे नाटक निवडणं ही मोठी गोष्ट आहे. ' ब्रेख्तच्या इतर नाटकांप्रमाणे यातही गाणी, बाहुल्या, मास्क यांचा समावेश आहे. यात कोणीही एक नायक किंवा नायिका नाही.
[ पुढे वाचा ]

आनंद पाटील हा ललित कला केंद्रातल्या बीए शेवटच्या वर्षाचा कलाकार या नाटकात काम करतोय. तो म्हणतो, ' पृथ्वीला आमचं नाटक सिलेक्ट झालं याचा खूप आनंद झालाय. जिथे नसिरुद्दीन शाह, मकरंद देशपांडेसारखी लोकं काम करतात तिथे आपण नाटक करायचं ही कल्पना भन्नाट होती. भोळे सरांमुळेच ही संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे खूप आभार. पृथ्वीचं हे मैदान आम्ही मारूच असा विश्वास आहे. '

प्रियांका तेंडोलकर ही सेकंड इयरची विद्यार्थिनी नाटकात सेट करतेय शिवाय कामही करतेय. ती म्हणते, ' मुंबई टाइम्सला जेव्हा पृथ्वीची बातमी वाचली होती तेव्हाच खूप भारी वाटलं होतं. पृथ्वीचं थिएटर नवं आहे, प्रेक्षक नवे असणार. '

लक्षवेधी कलाकृती

आम्हाला पृथ्वी फेस्टिवलमध्ये जुन्या क्लासिकवर बेतलेलं किंवा एखादा क्लासिक फॉर्म वापरणारं मराठी नाटक हवं होतं. अशावेळी ‌ललित कला केंद्राच्या ' रिंगण ' ने आमचं लक्ष वेधून घेतलं. ब्रेख्तसारख्या नाटककाराची कलाकृती साकारण्याचं शिवधनुष्य त्यांनी उचललं होतं. त्यांचा प्रयोग पाहून तर आमची खात्रीच पटली. आणि पृथ्वीमध्ये या नाटकाचा प्रवेश निश्चित झाला.

- कुणाल कपूर, विश्वस्त, पृथ्वी थिएटर — at http://maharashtratimes.indiatimes.com/moviearticleshow/25598812.cms#gads.
 — at MY Daughter Pramitee in Lead Role of Ringan.

No comments:

Post a Comment