Thursday, November 28, 2013

पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय योग्यच





http://ncp.org.in/stories/initiative/262....

'पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय योग्यच - प्रा. हरि नरके'
पुणे विद्यापिठाच्या अधिसभेने {सिनेटने} सर्वानुमते विद्यापिठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेतला आहे. व्यवस्थापन परिषदेकडे हा निर्णय पाठवून त्याला मान्यता मिळाली की, सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल. विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी विद्यापीठाकडून प्रस्ताव आल्यास सरकार त्याबाबत जरूर विचार करेल, असे आश्वासन दिले होते. यावरून नामविस्ताराची प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याचे दिसते. ही आनंदाची बाब आहे.

दोन विरोधी सूर निघाले, हे खरे आहे, मात्र हे दोघेही विद्यापीठाबाहेरचे असल्याने आणि ती त्यांची व्यक्तिगत मते असल्याने त्याला लोकांचा पाठिंबा नाही. एकाचे म्हणणे असे होते की, विद्यापीठाची गुणवत्ता नामविस्ताराने वाढणार नाही किंवा भ्रष्टाचारही संपणार नाही, त्यामुळे नामांतराची गरज नाही. हा युक्तीवाद मुख्य विषयाकडून लोकांचे लक्ष दुसरी कडे वेधणारा आहे. त्यात फारसे तथ्य नाही. नामविस्ताराशी गुणवत्तेची सांगड घालून विरोध करणे, योग्य नाही.

नामविस्तार करताना विद्यापीठाच्या नावामध्ये पुणे शब्द नको, कारण पुण्याला पेशव्यांचा जातीयवादी इतिहास आहे. असा आक्षेप घेतला गेला आहे. तो अतिशय बालिश आणि तथ्यहीन आहे. पुणे शहर हे जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवराय, थोरले बाजीराव, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, टिळक, आगरकर, रानडे, कर्वे, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे यांच्यापासून जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, अनिल अवचट, बाबा आढाव अशा गुणवंतांचे आहे. पुणे हे शिक्षण, संस्कृती, कला, विज्ञान, उद्योग आणि व्यापार यांचे माहेरघर आहे. महात्मा गांधी यांनी पुण्याला ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ म्हटले होते. हा वारसा पाहता पुणे या नावाला विरोध करणे आयोग्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि लोकसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अशी नामविस्ताराची गेल्या २० वर्षांची परंपरा आहे. तिला अनुसरूनच पुणे हा शब्द ठेवणे उचित होईल.

सावित्रीबाई फुले या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी १५० वर्षांपूर्वी शाळा सुरू केली, तेव्हा त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण ते दाम्पत्य डगमगले नाही. सावित्रीबाई जोतिरावांकडे आधुनिक शिक्षणतज्ज्ञ म्हणून बघणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाची आमुलाग्र फेररचना करणे, तंत्रशिक्षण आणि शेतीशिक्षणाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे, शैक्षणिक गळतीची कारणे शोधून ती दूर करण्यासाठी उपाययोजना करणे, प्रौढ साक्षरता अभियान सुरू करणे, महिला व दलितांच्या शिक्षणासोबतच अल्पसंख्याकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे, याबाबतचे सावित्रीबाई-जोतिरावांचे कार्य अतुलनीय आहे.

महिला आज शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी भरारी घेत आहेत. सावित्रीबाईंच्या नावामुळे महिलांच्या मानवी अधिकारांच्या चळवळीला फार मोठी ऊर्जा मिळेल, असा मला विश्वास वाटतो. हा नामविस्तार अतिशय सलोख्याच्या वातावरणात पार पडत असल्याचा आनंद आहे. मी पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळांचे अभिनंदन करतो.

No comments:

Post a Comment