Sunday, August 19, 2012

समाज साहित्य संमेलनः एक अनुभव

असे साहित्य संमेलन की ज्यात अध्यक्षपदाच्या निवडीचे वाद नाहीत, मुळात ज्याला अध्यक्षच नाही, उदघाटक नाही, कोणीही निमंत्रित वक्ते नाहीत, साचेबंद वेळापत्रक नाही, सर्व मान्यवर लेखक स्वखर्चाने येतात, जातात, तीन दिवस, चार रात्री रसिक वाचकांसोबत एकत्र राहून हृद्य संवाद साधतात, जाताना भरभरुन आनंद आणि वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा घेऊन जातात,  हे स्वप्नवत वाटते ना? पण असे साहित्य संमेलन आज अस्तित्वात आहे, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल काय?
पाचगणीजवळ खिंगर नावाचे एक टुमदार गाव आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले, नितांतसुंदर! तिथे 27 ते 29 जुलै या काळात हे समाज साहित्य संमेलन पार पडले. सुमारे 150 लेखक, कवी आणि रसिक तीन दिवस चार रात्री धो धो पावसात साहित्यात रमले होते. गप्पांचे फड रंगत होते. लेखकांसोबत रसिकही व्यासपीठावरुनच बोलत होते. ख्यातनाम लेखक श्री.राजन खान यांची ही साहित्यिक अलिबाबाची गुहा. त्यांच्या अक्षर मानव या संस्थेतर्फे गेली चार वर्षे हे साहित्य संमेलन भरविले जाते. `मी’, `आम्ही’, `आपण’ यानंतर `समाज’ हा या वर्षीचा विषय होता. यावर्षी रंगनाथ पठारे, विद्या बाळ, नीरजा, अशोक राणे, रेखा देशपांडे, किशोर कदम, अश्विनी धोंगडे, सुमती लांडे, प्रसाद कुलकर्णी, हरिश सदानी, हेमंत जोगळेकर, सुनिता अरळीकर, छाया कोरगावकर, विद्यालंकार घारपुरे, अनुराधा औरंगाबादकर, हेमंत पाटील, शरद लांजेवार, छाया महाजन, साहेबराव ठाणगे, पवन वैद्य, अनिल सपकाळ, महावीर जोंधळे, शमशुद्दीन तांबोळी, संतोष नारायणकर,प्रविण धोपट आणि इतर अनेकजण मोठय़ा गोळ्यामेळ्याने या संमेलनात घरचे कार्य समजून वावरत होते.या संमेलनाला उदघाटक, अध्यक्ष, निमंत्रित वक्ते असे चौकटीतील काहीही नसल्याने सगळे कसे अनौपचारिक, उत्स्फूर्त आणि मोकळेढाकळे असते. म्हणूनच जिवंत आणि सच्चे असते. या संमेलनाला कुठलेही शुल्क आकारले जात नाही. सगळ्यांचे सगळ्यांनी ऐकणे, स्वतःचे बोलून निघून न जाणे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित राहणे मात्र बंधनकारक असते.
राजन खान यांनी आस्थेवाईक प्रास्ताविक केल्यानंतर त्यांनी अचानक सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा यांना मंचावर निमंत्रित करुन मनोगत व्यक्त करायला सांगितले. हेच साहित्य संमेलनाचे उदघाटन होते. त्यानंतर समारोपापर्यंत तीन दिवस याच पद्धतीने कार्यक्रम चालू होते. आता यानंतर कोण बोलणार आहे हे राजन खान सोडले तर कोणालाही माहीत नसायचे. सस्पेन्स कायम असायचा. कोणाही वक्त्यांना पूर्वकल्पना दिली जात नसे. अनेकदा रसिक, वाचक किंवा श्रोते म्हणून आलेल्यांनाही बोलायला सांगितले जाई. तर दुसरीकडे अनेक मान्यवरांना तीन दिवसात मंचावरुन बोलण्याची संधी मिळू शकली नाही. नवीन मंडळींची तारांबळ उडे. पण अनेकदा फार दर्जेदार, ताज्या दमाचे, नवेकोरे आणि चाकोरीबाहेरचेही ऐकायला मिळे. गुजरातमधून घरातून पळून जाऊन लग्न केलेल्या शामिया मिर्झा आणि निमेष पटेल या नवविवाहित इंजीनियर जोडप्याचे अनुभव ऐकताना एखादा थरारक चित्रपट पाहिल्यासारखे वाटले. ते दोघे गर्भश्रीमंत,उच्चशिक्षित हिंदु-मुस्लीम कुटुंबातील तरुण. शाळेपासूनची दोघांची मैत्री. त्यांच्या आंतरधर्मिय लग्नाला मात्र दोन्ही घरचा कडवा विरोध. दहा महिने शामियाच्या आईवडीलांनी तिला घरात कोंडून ठेवले. मोबाईल काढून घेतला. टीव्ही बघायला बंदी केली. कडक पहारा. घराबाहेर जायचे नाही. मैत्रिणींनाही भेटायचे नाही. काम नाही, धाम नाही. आई 24 तास सोबत. मुलगी जणू तुरुंगात असावी तशी. पण मुलाने शेजारच्या घरी कुरियरवाला बनून जावून तिच्याशी संपर्क केला. आणि मग त्यांनी रात्री अडीच वाजता बंगल्याच्या टेरेसवरुन उडय़ा मारुन पोबारा केला. थेट पुणे गाठले आणि नोंदणी पद्धतीने विवाह केला. हे करताना भारत खरेच 21 व्या शतकात आहे का? असा प्रश्न पडत होता. आपला समाज जाती-धर्मात कसा वाटला गेलेला आहे त्याचे हे विदारक दर्शन होते.
`हिरकणीचे बिर्हाड’, हे नवे दलित आत्मकथन. अतिशय ताकदीचे. लेखिका सुनिता अरळीकर या चर्मकार समाजाच्या. त्यांचे पती दिलीप अरळीकर हे ब्राह्मण समाजाचे. त्यांच्या आंतरजातीय विवाहाला ब्राह्मण वडिलांनी विरोधासाठी जी गलिच्छ हत्यारे वापरली ती चीड आणणारी. त्यांच्या सहजीवनाचे अनुभव उपस्थितांना सामाजिक वास्तवाचे नवे पदर उलगडून दाखवणारे ठरले. त्यांचे अनुभव थरारुन सोडणारे होते. तरुण पिढीतील कविता आणि अमृता दोन मुलींनी आजच्या तरुणाईबद्दलची मांडलेली मते शॉक ट्रिटमेंट देणारी होती. `लिव्ह इन रिलेशनशिप’चं त्यांना आकर्षण वाटतं. तरुण मुलांना जे आवडतं तिथेच त्यांना रमू द्या, त्यातच खरं जगणं आहे, असंही त्यांनी सांगितलं. नातेसंबंधातील निष्ठा त्यांना महत्वाची वाटत असली तरी एकनिष्ठ राहणे अव्यवहारीपणाचे वाटते. नात्याचे ओझे घेवून जगायला त्यांचा नकार आहे. तरुण लेखक प्रविण धोपट म्हणाले, तरुण पिढीची काळजी करायचे सोडून द्या. ती वाचन करीत नाही म्हणून चिंता करु नका. जातीपाती नष्ट करायच्या असतील तर सर्वांनाच ब्राह्मण करा. ही तरुण पिढीची प्रातिनिधिक मतं नसतीलही, पण दिशा कळायला मदत होते. वारे नेमके कोणत्या दिशेने वाहत आहेत त्याचा कयास बांधता येतो. कवी  आणि अभिनेते किशोर कदम यांचे सिनेसृष्टीतील जिवंत अनुभव चिंतनाला खाद्य पुरविणारे होते. राष्ट्रीय पुरस्कार, सुवर्ण कमळ विजेत्या समर या चित्रपटात शाम बेनेगल यांनी कलावंत आणि जातीव्यवस्थेचे पदर स्पष्ट केले आहेत. त्यात कदमांनी केलेला रोल आव्हानात्मक होता.पण हा रोल देताना कदमांच्या जातीचा विचार झाला असावा, हे कळल्यानंतरची त्यांची मानसिकता, सत्यदेव दुबेंचे अनुभव, आयडेंटिटी क्रायसिस, याबद्दल ते खुलेपणाने बोलले. हेमंत पाटील आणि शरद लांजेवार यांनी गुजरात आणि आंध्रच्या सामाजिक जीवनाचे केलेले विश्लेषण संपूर्ण नवे आणि वेगळे होते. आंध्रातील कष्टाळू सामान्य माणसाचे सिनेमावेड, गुजराती समाजातील जातींची उतरंड आणि अर्थ अभियांत्रीकी हे चित्रण महत्वाचे होते. तीन दिवसात चाळीसपेक्षा अधिक लोक बोलले. त्यात क्वचित काही जणांचा सूर लागला नसला किंवा काहींनी थोडाफार अपेक्षाभंगही केला असला तरी एकूण लेखाजोखा समृद्ध करणारा होता. उदघाटनात नीरजा म्हणाल्या, समाज म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाच्या समाजशास्त्रीय व्याख्या झालेल्या आहेत. पण एक सामान्य माणूस म्हणून या समाजाकडे पाहताना नेमकं काय असतं आपल्या मनात? समाजातील राजकारण, अर्थकारण, जातीयता दंगे, अराजक, इतिहास, भूगोल, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कला, संगीत यांचा आपल्या जडणघडणीवर परिणाम होत असतो. तो आपल्या जगण्याच्या भूमिका ठरवत असतो. समाजाच्या दडपणामुळे कलावंताचा कोंडमारा होत असतो. शब्दाशब्दांवर आजकाल काही संघटना सेन्सॉरशीप लादताना दिसतात. निकोप लोकशाहीला आणि लेखन स्वातंत्र्याला बाधक असलेली जगण्यातली ही ढवळाढवळ, ही झुंडशाही कलावंतानी झुगारली पाहिजे. नीरजा यांच्या विवेकी, आत्मसंवादी आणि प्रागतिक चिंतनाने या संमेलनाची उत्तम पायाभरणी केली.
समारोपाला रंगनाथ पठारे यांनी शेती, शेतकरी, राज्यकर्ते आणि जागतिकरण यांचा एक धारदार छेद प्रस्तुत केला. आपण स्वतः शेतकरी समाजातून आलो असून आता शहरात राहून, आपला वर्ग आणि वर्गजाणीवा बदलल्या तरी या प्रश्नांशी नाळ जोडलेली असल्याने त्या जगातल्या गुंतागुतीच्या रसायनाशी आपले आतडयाचे नाते आहे. आजचे राज्यकर्तेच शेतकर्यांचे खरे शोषणकर्ते आहेत, असे खडे बोलही त्यांनी सुनावले. हरीष सदानी यांनी स्त्री भ्रूणहत्या या शब्दांऐवजी आपण स्त्रीलिंगी गर्भपात हे शब्द वापरावेत अशी साधार मांडणी केली. साहेबराव ठाणगे यांनी आजच्या खेडय़ाचे बदलते वास्तव उलगडून दाखवले. ते म्हणाले, माझ्या गावातील 40 वर्षांचे चुलत भाऊही ज्येष्ठ नागरिक म्हणून एस.टी.चे अर्धे तिकीट काढून प्रवास करतात आणि बापाला उपाशी मारणारेच दहाव्याला अख्या तालुक्याला जेवायला घालतात!
हेमंत जोगळेकरांनी समाजात सलणार्या अनेक गोष्टी शेअर केल्या. माझं आयुष्य म्हणजे केवळ एक टिंब आहे असं म्हणणार्या अनुराधा औरंगाबादकरांनी आपल्या अनुभवकथनाने उपस्थितांना खिळवून ठेवले. रेखा देशपांडे म्हणाल्या, बाईचं पिढय़ानपिढय़ा ऐकलं गेलं नाही. आता ते ऐकले जायला लागले आहे. तेव्हा आता बायकांनी कंठाळी बोलण्याऐवजी शांतपणे बोलले तर ते अधिक प्रभावी ठरेल. सुमती लांडे म्हणाल्या, मला बाईपणाकडून माणूसपणाकडे जायला आवडते. आज चाळीशीची प्रत्येक स्त्री घाबरलेली आणि तरुण पिढी गोंधळलेली आहे. मुलं अपडेट आहेत पण वाचत नाहीत त्यामुळे आई धास्तावलेली असते.
प्रत्येक सत्रात प्रश्नोत्तरे, चर्चा होत असत. काही वेळा त्या फार रंगत असत. रंगनाथ पठारे यांनी चर्चेत बोलताना लेसिंग डोरिस यांच्या `द गोल्डन नोटबुक’ या स्त्री-पुरुष संबंधावरील जागतिक साहित्यातील मानदंड ठरलेल्या ग्रंथांच्या तोडीचे लेखन भारतीय स्त्रियांनी करावे असे आवाहन यावेळी  केले.

मराठा सेवा संघाच्या अशोक राणांना रंगनाथ पठारे, हरिष साळवे आणि इतर अनेकांनी फैलावर घेतले. आधी आपण जात मानत नाही म्हणणारे राणा नंतर मात्र आपण अमुक जातीचे नाही वगैरे बोलू लागले. पुरुषोत्तम खेडेकरांचे जातीय दंगलीचे तसेच विशिष्ट समाजातील सर्व पुरुषांची कत्तल करण्याला चिथावणी देणारे लेखन आपण वाचलेले नाही असे सांगून त्यांनी अडचणीच्या प्रश्नांना बगल दिली. त्यांची ही दांभिक  भाषणबाजी कुणालाच आवडली नाही. जातीय संघटनांचा प्रचार करण्याच्या त्यांच्या भूमिकेला सर्वांनी कडाडून विरोध केला. राज्यात दहशतवाद पसविणा-या समाजविघातक विचारांना या साहित्यमंचावरुन  झालेला विरोध हे सुचिन्हच म्हटले पाहिजे. साहित्यिक मंडळी अनेकदा "अभासात" वावरतात आणि सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेण्याचे टाळतात. या पार्श्वभूमीवर हे चित्र फार भावणारे होते.
समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी, ख्यातनाम चित्रपट समिक्षक अशोक राणे, प्रा. अश्विनी धोंगडे, स्त्रीवादी विचारवंत विद्या बाळ, आणि स्वता: राजन खान  आदींच्या मनोगतांनाही उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. ही चिंतनशील मनोगते त्यांचा व्यासंग आणि अधिकार यांनी संपन्न होती. या ज्येष्ठांना ऎकणे फार सुखावह होते. तीन दिवस कोसळणा-या पावसात सतत होत असलेल्या या थेट संवादाने सगळेच चिंब भिजून निघाले. "स्त्री-भृणहत्या, स्त्रीपुरुष समता, आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह, आजचे बदलते जातीवास्तव, धार्मिक उन्माद आणि धर्माचे राजकारण, जागतिकीकरण आणि बाजार व्यवस्थेचे आक्रमण,शेतकरी आत्महत्या, अभिजात मराठी भाषा,संस्कृती आणि सांस्कृतिक राजकारण, सत्ता आणि माध्यमे यांचे समाजावरील नियंत्रण" अश्या अनेक विषयांवर खोलवर चर्चा झाल्या.
`अभासात’ संमेलनाला विटलेल्या साहित्यप्रेमींना एक चौकटीबाहेरची सुंदर वाट या संमेलनाने दाखविलेली आहे. महाराष्ट्रात वर्षभरात सुमारे 250 साहित्य संमेलने होतात. पण एका विषयाला वाहिलेले आणि इतके सळसळते संमेलन दुसरे नसावे. अशी संमेलने गावागावात झाली तर मराठी साहित्याची मरगळ आणि शीण झटकला जाईल आणि मराठीला नवी जोमदार पालवी फुटेल यात शंका नाही. पुढील वर्षीच्या संमेलनाला नक्की यायचंच असा निर्णय घेऊन मंडळी परतली. समाज साहित्य संमेलनाने मला दिलेली तीन दिवसांची शिदोरी पुढील 365 दिवस निश्चित पुरेल असा मला विश्वास वाटतो.
प्रा. हरी नरके