Sunday, August 12, 2012

ह्रद्य संवाद


E-mailPrintPDF
ukal-hari-naik









अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. नेहमीप्रमाणे ही निवडणूक गाजू लागली आहे. पावसाळ्यात उगविणार्या छत्र्यांप्रमाणे हे वाद उगवतात, गाजतात आणि पेल्यातील वादळाप्रमाणे शमतातही. शासकीय अनुदान आणि देणग्या व  प्रायोजक यांच्याद्वारे  कोटय़ावधी रुपये जमा केले जातात, मानधन प्रवासखर्च आणि डामडौल यावर ते खर्ची पडतात. तेच ते वक्ते, तीच ती भाषणे आणि त्याच त्या कविता असा अत्यंत निर्जीव, निरस, शीण आणणारा एक निरर्थक उपचार पार पाडला जातो. जत्रा `जंक्शन' होते. निष्पन्न मात्र काहीच नाही असा हा आता परिपाठच झाला आहे. अशावेळी असे साहित्य संमेलन की ज्यात अध्यक्षपदाच्या निवडीचे वाद नाहीत, मुळात ज्याला अध्यक्षच नाही, कोणीही निमंत्रित वक्ते नाहीत, साचेबंद वेळापत्रक नाही. सर्व मान्यवर लेखक स्वखर्चाने येतात, तीन दिवस, चार रात्री रसिकवाचकांसोबत एकत्र राहून हृदयसंवाद साधतात, जाताना भरभरुन आनंद आणि वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा घेऊन जातात, असे साहित्य संमेलन आज अस्तित्वात आहे, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल काय? पाचगणीजवळ खिंगर नावाचे टुमदार गाव आहे. निसर्गाच्या कुषित वसलेले, नितांतसुंदर! तिथे 27 ते 29 जुलै या काळात हे साहित्य संमेलन पार पडले. सुमारे 150 लेखक, कवी आणि रसिक तीन दिवस चार रात्री धो धो पावसात रमले होते. गप्पांचे फड रंगत होते.
मान्यवरांसोबत रसिकही व्यासपीठावरुन बोलत होते. ख्यातनाम लेखक श्री.राजन खान यांची ही अलिबाबाची गुहा. यांच्या अक्षर मानव या संस्थेतर्फे गेली चार वर्षे हे साहित्य संमेलन भरविले जाते. रंगनाथ पठारे, विद्या बाळ, नीरजा, अशोक राणे, रेखा देशपांडे, किशोर कदम, अश्विनी धोंगडे, सुमती लांडे, प्रसाद कुलकर्णी, हरिश सदानी, हेमंत जोगळेकर, सुमती अरळीकर, छाया कोरगावकर, विद्यालंकार घारपुरे, अनुराधा औरंगाबादकर, हेमंत पाटील, शरद लांजेवार, छाया महाजन, साहेबराव ठाणगे, पवन वैद्य, अनिल सपकाळ, महावीर जोंधळे, शमशुद्दीन तांबोळी, संतोष नारायणकर आणि इतर अनेकजण मोठय़ा मेळ्याने या संमेलनात घरचे कार्य समजून वावरत होते. या संमेलनाला उद्घाटक, अध्यक्ष, निमंत्रित वक्ते असे चौकटीतील काहीही नसते. सगळे कसे अनौपचारिक, उत्स्फूर्त आणि मोकळे ढाकळे. म्हणूनच जिवंत आणि सच्चे. या संमेलनाला कुठलेही शुल्क आकारले जात नाही. सगळ्यांचे सगळ्यांनी ऐकणे, स्वतःचे बोलून निघून न जाणे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित राहणे मात्र बंधनकारक असते. राजन खान यांनी प्रास्ताविक केल्यानंतर अचानक सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा यांना मंचावर निमंत्रित करुन मनोगत व्यक्त करायला सांगितले. हेच साहित्य संमेलनाचे उद्घाटन होते. त्यानंतर समारोपापर्यंत तीन दिवस याच पद्धतीने कार्यक्रम चालू होता. आता कोण बोलणार आहे हे राजन खान सोडले तर कोणालाही माहीत नसायचे. कोणाही वक्त्यांना पूर्वकल्पना दिली जात नसे. अनेकदा रसिक वाचक किंवा श्रोते म्हणून आलेल्यांनाही बोलायला सांगितले जाई. त्यांची तारांबळ उडे पण अनेकदा फार दर्जेदार, ताज्या दमाचे, नवेकोरे आणि चाकोरीबाहेरचे ऐकायला मिळे. गुजरातमधून घरातून पळून जाऊन लग्न केलेल्या शामिया मिर्झा आणि निमेष पटेल या नवविवाहित जोडप्याचे अनुभव तसेच हिरकणीचे बिर्हाड, या गाजणार्या आत्मकथनाच्या लेखिका सुमती अरळीकर आणि त्यांचे पती दिलीप अरळीकर यांचे आंतरजातीय विवाहाचे आणि सहजीवनाचे अनुभव उपस्थितांना थरारुन सोडणारे होते. तरुण पिढीतील दोन मुलींनी मांडलेली मते शॉक ट्रिटमेंट देणारी होती. किशोर कदम यांचे सिनेसृष्टीतील अनुभव चिंतनाला खाद्य पुरविणारे होते. हेमंत पाटील आणि शरद लांजेवार यांनी गुजरात आणि आंध्रच्या सामाजिक जीवनाचे केलेले विश्लेषण संपूर्ण नवे आणि वेगळे होते. तीन दिवसात चाळीसपेक्षा अधिक लोक बोलले त्यात क्वचित काही जणांचा सूर लागला नसला किंवा काहींनी थोडाफार अपेक्षाभंगही केला असला तरी एकूण लेखाजोखा श्रीमंत करणारा होता. नीरजा म्हणाल्या, समाजाच्या दडपणामुळे कलावंताचा कोंडमारा होत असतो. शब्दाशब्दांवर आजकाल काही संघटना सेन्सॉरशीप लादताना दिसतात. निकोप लोकशाहीला आणि लेखन स्वातंत्र्याला बाधक असलेली ही झुंडशाही कलावंतानी झुगारली पाहिजे.
नीरजा यांच्या विवेकी, आत्मसंवादी आणि प्रागतिक चिंतनाने या संमेलनाची उत्तम पायाभरणी केली. समारोपाला रंगनाथ पठारे यांनी शेती, शेतकरी, राज्यकर्ते आणि जागतिकरण यांचा एक धारदार छेद प्रस्तुत केला. आपण स्वतः शेतकरी समाजातून आलो असून आता शहरात राहून, वर्ग आणि वर्गजाणीवा बदलल्या तरी या प्रश्नांशी नाळ जोडलेली असल्याने या जगातल्या गुंतागुतीच्या रसायनाशी आतडय़ाचे नाते आहे. आजचे राज्यकर्तेच शेतकर्यांचे खरे शोषणकर्ते आहेत, असे खडे बोल त्यांनी सुनावले. हरीष सदानी यांनी स्त्री भ्रूणहत्या या शब्दाऐवजी आपण त्रीलिंगी गर्भपात हे शब्द वापरावेत अशी साधार मांडणी केली. साहेबराव ठाणगे यांनी आजच्या खेडय़ाचे बदलते वास्तव उलगडूनदाखविले. ते म्हणाले, माझ्या गावातील 40 वर्षांचे चुलत भाऊही ज्येष्ठ नागरिक म्हणून एस.टी.चे अर्धे  तिकीट काढून प्रवास करतात आणि बापाला उपाशी मारणारेच दहाव्याला अख्या तालुक्याला जेवायला घालतात! हेमंत जोगळेकरांनी समाजात चालणार्या अनेक गोष्टी शेअर केल्या. माझं आयुष्य म्हणजे केवळ एक टिंब आहे असं म्हणणार्या अनुराधा औरंगाबादकरांनी आपल्या अनुभवकथनाने उपस्थितांना खिळवून ठेवले. रेखा देशपांडे म्हणाल्या, बाईचं पिढय़ानुपिढय़ा ऐकलं गेलं नाही. आता ते ऐकले जायला लागले आहे. तेव्हा आता बायकांनी कंठाळी बोलण्याऐवजी शांतपणे बोलले तर ते अधिक प्रभावी ठरेल. सुमती लांडे म्हणाल्या, मला बाईपणाकडून माणूसपणाकडे जायला आवडते.  आज चाळीशीची प्रत्येक स्त्री घाबरलेली आणि तरुणपिढी गोंधळलेली आहे. मुलं अपडेट आहेत पण वाचत नाहीत त्यामुळे आई धास्तावलेली असते. प्रत्येक सत्रात प्रश्नोत्तरे होत असत. रंगनाथ पठारे यांनी लेसिंग डोरिस यांच्या `द गोल्डन नोटबुक' या त्री-पुरुष संबंधावरील जागतिक साहित्यातील मानदंड ठरलेल्या गंथांच्या तोडीचे लेखन भारतीय त्रियांनी करावे असे आवाहन यावेळी बोलताना केले. मराठा सेवा संघाच्या अशोक राणांना त्यांच्या दांभिक भाषणामुळे रंगनाथ पठारे आणि इतर अनेकांनी फैलावर घेतले. आपण जात मानत नाही म्हणणारे राणा नंतर मात्र आपण अमुक जातीचे नाही वगैरे बोलू लागले.
खेडेकरांचे जातीय दंगलीचे तसेच विशिष्ट समाजातील सर्व पुरुषांची कत्तल करण्याला चिथावणी देणारे लेखन आपण वाचलेले नाही असे सांगून त्यांनी अडचणीच्या प्रश्नांना बगल दिली. त्यांची भाषणबाजी कुणालाच आवडली नाही. जातीय संघटनांचा प्रचार करण्याच्या त्यांच्या भूमिकेला सर्वांनी कडाडून विरोध केला. राज्यात दहशतवाद पसविणार्या समाजविघातक विचारांना अशा मंचावरुन झालेला विरोध हे सुचिन्हच म्हटले पाहिजे. साहित्यिक मंडळी अभासात वावरतात आणि सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेण्याचे टाळतात. या पार्श्वभूमीवर हे चित्र फार भावणारे होते. प्रसाद कुलकर्णी, अशोक राणे, अश्विनी धोंगडे, विद्या बाळ, राजन खान आणि हरी नरके आदींच्या मनोगतानाही उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. तीन दिवस कोसळणार्या पावसात सतत होत असलेल्या या द्वंदसंवादाने सगळेच चिंब भिजून निघाले. `अभासात' संमेलनाला विटलेल्या साहित्यप्रेमींना एक चौकटी बाहेरची सुंदर वाट या संमेलनाने दाखविलेली आहे. अशी संमेलने गावागावात झाली तर मराठी साहित्याची मरगळ आणि शिण झटकला जाईल आणि मराठीला नवी पालवी फुटेल यात शंका नाही. पुढील वर्षीच्या संमेलनाला नक्की यायचंच असा निर्णय घेऊन मंडळी परतली. समाज साहित्य संमेलनाने मला दिलेली तीन दिवसांची शिदोरी पुढील 365 दिवस निश्चित पुरेल असा मला विश्वास वाटतो.

1 comment:

  1. BY:FACEBOOK:
    "Lalit Samudra, Savita Mohite, Tej Ghanwat and 4 others like this.
    1 share

    Deepak Bidkar: once i was there..
    Yesterday at 6:27pm · Unlike · 2

    Sunil Tambe: बैल गेला नी झोपा केला.......आधी सांगायचं की.....
    Yesterday at 7:59pm · Unlike · 2

    Hari Narke: pudhilveli adhi sangato.yaveli mi prathamach gelo hoto.
    22 hours ago · Like · 2

    Sunil Tambe: Thanks.
    22 hours ago · Unlike · 2

    Dilip Telang wah kya bat hai.
    21 hours ago · Unlike · 2

    Archana Tatkar Khup SUndar sir!
    8 hours ago · Unlike · 2

    Giridhar Gajabe Sir, aapan sahbhagi zale hota kay ?
    3 hours ago · Unlike · 2

    Hari Narke hoy.
    2 hours ago · Like · 1

    Sharad Lanjewar: sir, khupach chhan. tya 4 ratri aani3 divsanchya aathvani pudhil sammelanaparyant urja det rahnar. aaple marathi bhashechya abhijat swarupavishyiche vivechan mhanje aamchyasarkhya anekansathi ek adarsh vastupathch. Aapla sammelanatla ekunach sahabhag khupach aashwasak.Aapan ek baju samarthpane lavun dharat aslyamule mazyasarkhya anekanna manmurad fatkebaji karta aali. Rajan sir niymitpane "ithe konihi celebraty nahi" ase bajavun saglyanna ekach patlivar thevnyache kam lilaya karit hote. Pudhil kalat aaple likhan aani bhashane chukavaychi nahit asa prayatn rahil. Dhannyavad.
    BY :FACEBOOK..

    ReplyDelete