Sunday, August 25, 2013

तरूणांनी राजकारणात कशासाठी यावे?

आज पुण्यात लोकमत दैनिकाने
तरूणांनी राजकारणात कशासाठी यावे? या विषयावर परिसंवाद आयोजित केलेला आहे. 
त्याबाबत एक छोटे टीपण:
तरूणांनी राजकारणात कशासाठी यावे? या विषयाचे २ भाग पडतात असे मला वाटते.
राजकारण हा सामाजिक कामाचा, कल्याणकारी लोकशाही समाज घडविण्याचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याने त्यात तरूणांनी आले पाहिजे.त्यामागील ध्येयवाद समजून घेतला पाहिजे, या अर्थाने हा विषय समजून घेणे, उलगडणे, हा एक भाग.
राजकारणाबद्दल तरूण पिढीतील अनेकांचे गैरसमज आहेत. हे क्षेत्र भ्रष्ट आहे. चुकीच्या लोकांनी भरलेले आहे.सगळे राजकारणी आप्पलपोटे आहेत, इ.इ.. त्यामुळे या क्षेत्रात कशाला पडा? या क्षेत्रात न पडलेलेच बरे..या अर्थाने कशासाठी यावे? असा नकारार्थी प्रश्न म्हणूनही याकडे बघता येईल. त्यामागील तथ्य शोधता येईल.
यातले संयोजकांना नेमके काय अभिप्रेत आहे? की या दोन्ही गोष्टी त्यांना चर्चेत आणायच्या आहेत?
स्वातंत्र्यपुर्व काळात लोकमान्य टिळक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी, डा.बाबासाहेब आंबेडकर, पंडीत नेहरू, सुभाषचंद्र बोस, या नेत्यांवर जनतेची श्रद्धा होती. भक्ती होती.त्यांचा त्यागही अतुलनीय होता.ते पुर्णवेळ राजकारणी असले तरी त्यावेळची युवापिढी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकीत होती.
१९५२ सालच्या पहिल्या सार्वत्रिक निडणुकीनंतर राजकारणात झपाट्याने बदल होऊ लागला. लोकशाहीमध्ये मतदार महत्वाचे बनले. निवडून येण्याची क्षमता ही सर्वात महत्वाची गुणवत्ता बनली.संख्येला महत्व आल्याने जात, धर्म, समाज,प्रदेश,भाषा, आदींच्या अस्मिता टोकदार बनल्या. निवडणुका खर्चिक बनत गेल्या. व्होट ब्यांक महत्वाची झाली.व्यवहारवाद बोकाळला. असामाजिक तत्व{मसल पावर} आणि जात धर्माचे राजकारण यांची चलती वाढली. त्यामुळे अनेक सज्जन लोक राजकारणापासून दोन हात दूर राहिलेले बरे असे मानू लागले. राजकारणाचा स्तर झपाट्याने खालाऊ लागला.
राजकारणात उतरले की व्यक्तीगत उन्नती फार झपाट्याने करून घेता येते असाही समज सर्वदूर पसरलेला आहे. प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा आणि सत्ता यांच्या जोरावर काहीही करता येते असेही गैरसमज आहेतच.
आजची पिढी व्यवहारी आहे. करियरला महत्व देणारी आहे. तिला भाबडेपणा मान्य नाही. टोकाचा आदर्शवाद ती नाकारते. व्यापार,उद्योग, नोकरी यातून उत्तम आर्थिक प्राप्ती करून घ्यावी याकडे तिचा कल आहे.यातून व्यक्तीगत उन्नती नक्कीच होते. पण ज्यांना देशासाठी,समाजासाठी काही करण्याची इच्छा आहे, त्यांना हे समजले पाहिजे की त्यासाठी राजकारणातच आले पाहिजे. आज सगळी निर्णयप्रक्रिया राजकारणात होते. लोकांचे भले करण्याची इच्छा असेल तर ध्येयवादी राजकारण हा फार प्रभावी मार्ग आहे.
आपला देश जगातला सर्वात तरूण देश आहे. बुद्धीमत्ता आणि कर्तबगारी यांची खाण म्हणजे भारत. पण आपल्याकडील जातीपाती, गरिबी, भ्रष्टाचार,प्रदुषण, सामाजिक विषमता, अन्याय, अत्याचार, पुरूषी वर्चस्व यावर मात करण्याची ताकद फक्त शिक्षण, प्रबोधन आणि राजकीय सत्ता यातच आहे.दलित, भटके, आदिवासी,ओबीसी, महिला यांना न्याय मिळवून देण्याची शक्ती फक्त राजकीय सत्तेत आहे. चांगली माणसे राजकारणापासून दूर राहिली तर मग परिवर्तन कोण घडवणार? राजकीय इच्छाशक्ती आणि अजेंडा जर प्रागतिक असेल तर राजकरणाद्वारे समाजपरिवर्तन शक्य आहे.
राजकारणी आणि राजकीय क्षेत्र हे काही स्वतंत्र बेट नाही. त्यामुळे समाजातल्या भल्याबुर्‍या प्रवृती तिथेही असणारच.ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात, त्यामुळे त्यातल्या चुकीच्या गोष्टींची अवास्तव चर्चा होते. त्यातून तरूणांची राजकारणाबद्दलची मतं गढूळ होतात.पण आजही राजकारणात असंख्य चांगली माणसं आहेत.महात्मा फुले, लोकहितवादी, लोकमान्य टिळक, नामदार गोखले, महात्मा गांधी, डा.बाबासाहेब आंबेडकर, एसेम जोशी, नानासाहेब गोरे, मधू दंडवते, मृणाल गोरे,अहिल्या रांगणेकर, रामभाऊ म्हाळगी, मधुकरराव चौधरी ही गेल्या पिढीतली माणसं. आज आदरणीय गणपतराव देशमुख, बी.टी. देशमुख, गोविंद पानसरे, एन.डी.पाटील, आणि इतर अनेक नावं सांगता येतील. समाजकारण आणि राजकारण यांनी हातात हात घालून चाललं पाहिजे असं मानणारे शरद पवार, जातीपातींचं राजकारण न करणारे बाळासाहेब ठाकरे ही आपल्यापुढची उदाहरणं विसरून कसं चालेल?
तरूणांनी राजकारणात आलं पाहिजे, ते विकासाचं राजकारण करण्यासाठी. राजकीय प्रदूषण हटवण्यासाठी..आपल्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी...सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी...आजचं राजकारणाचं वाईट चित्र बदलण्यासाठी...१२१ कोटींच्या भारताला योग्य दिशा देण्यासाठी..विचारांचं आणि विकासाचं राजकारणच देशाला नवी दिशा देऊ शकेल.
चढ उतार येत असतात. मी निराश नाही. माझा तरूण पिढीवर विश्वास आहे. हातात गाडगेबाबांचा झाडू घेऊन तरूण पिढी राजकारणाचे सफाई अभियान घडविल असा मला विश्वास वाटतो.जगाचा इतिहास साक्षीदार आहे, की माणसाचा जगभरचा प्रवास कायम "चांगल्याकडून अधिक चांगल्याकडे" असाच झालेला आहे.तेव्हा मी तरूणांना आवाहण करीन की उत्तम करियर करण्यासाठी, प्रोफेशनल राजकारणी म्हणून या क्षेत्रात या.मनाशी ध्येयवाद घेऊन या. चांगले काम करा. लोकांना मदत करण्याचे समाधान मिळवण्याची जागा तुम्हाला येथे सापडेल. सुख, समाधान आणि जगण्याचा पुरेपूर आनंद हवा असला तर राजकारणात पडा. हे क्षेत्र धकाधकीचे आहे. तीव्र स्पर्धेचे आहे. जोखमीचे आहे. आव्हाने अनेक आहेत, पण म्हणूनच या क्षेत्रात पडण्याची गरज आहे असे मला वाटते...तुम्हाला काय वाटते?
......