Monday, August 19, 2013

वय वर्षे ६६

कृषिवल, रविवार,मोहर, उकल, दि.१८ आगष्ट,२०१३

"भारत हे एक राष्ट्र आहे याचा विचार करताना आपण एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, ती म्हणजे, आजच्या भारताचे भवितव्य परमेश्वराच्या हातात नसून, सामान्य माणसाच्या हातात आहे. जोपर्यंत भारतीय संविधान ओळखू न येण्याइतपत बदलले जात नाही, जोपर्यंत निवडणुका नियमितपणे व योग्य पद्धतीने होत राहतील, जोपर्यंत व्यापक अर्थाने धर्मनिरपेक्षतेचे वातावरण टिकवले जाईल, जोपर्यंत देशातील लोक आपल्या पसंतीची भाषा बोलू व लिहू शकतात, जोपर्यंत सर्वसमावेशक बाजारपेठ अस्तित्वात आहे, जोपर्यंत बर्‍यापैकी नागरी प्रशासन व सैन्यसेवा उपलब्ध आहे, आणि हो...हेही विसरून चालणार नाही की, जोपर्यंत हिंदी सिनेमे सर्वत्र पाहिले जातातव त्यातील गाणी ऎकली जातात, तोपर्यंत भारत या राष्ट्राचे अस्तित्व राहील."                         ___ डा.रामचंद्र गुहा.


      लहानपणी आपण ऎकलेलं एक गाणं पंधरा आगस्टच्या निमित्ताने आपण पुन्हा ऎकलं असणार. "डाल डाल पर सोनेकी चिडीया करती थी बसेरा." जुन्या पिढीतले लोक आवर्जून सांगायचे की भारतात पुर्वी सोन्याचा धूर निघत होता. अर्थशास्त्रज्ञ सांगतात की, "दोन हजार वर्षांपुर्वी आपल्या देशाचा जगात आर्थिक बाबतीत दरारा नी दबदबा होता. आपला विकासदर त्याकाळात  थोडाथिडका नाही तर ३१% होता. त्याच काळात देशातली सुमारे ७५% जनता साक्षर होती. हे सारं खरं वाटत नाही ना?
      लोकशाही जीवनप्रणाली ही जगातली सर्वात आधुनिक व्यवस्था आहे. आज भारत हा जगातला सगळ्यात मोठा लोकशाही राज्यव्यवस्था असलेला देश आहे.आपल्या लोकशाहीने नुक्तेच ६७ व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. वयोमान जरी कमी असले तरी आपली लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे.आपल्या देशात आज जगातली १७% लोकसंख्या नांदते आहे.दुसरीकडे आकाराचा विचार करता जगातली अवघी अडीच टक्के जमीन आपल्याकडे आहे.
      या देशात जेव्हढी विविधता आहे तेव्हढी जगातल्या अन्य कोणत्याही देशात क्वचितच असेल.अनेक प्रांत, असंख्य भाषा, ४६३५ जाती. बारा धर्म, कितीतरी वंश, विपुल निसर्ग, मुबलक पाणी, अमाप सौर उर्जा, नाना वेष, आणि भिन्न संस्कृती एव्हढी रेलचेल जगात अन्यत्र कुठेय? जगातली अत्यंत बुद्धीमान आणि कर्तबगार माणसं या भुमीने जगाला दिलीत.त्याचवेळेला पराकोटीची जातीयता, विषमता, शोषण आणि अमानुषताही आपण सोसलीय, सोसतोय.
      जागतिकीकरणानंतर भारताकडे आगामी काळातली ’महासत्ता’ म्हणून पाहिलं जातंय. जगातली सर्वात मोठी तरूणाई भारताकडे आहे.हातात जादू असलेली बलाढ्य श्रमशक्ती हे भारताचे वैभव आहे.या देशातली जनता खूप शोषिक नी समंजस आहे. आणि तिचा सदसद्विवेक  व सामुदायिक शहाणपणा हा एक चमत्कारच मानायला हवा. राजकीय परिपक्वता हे आपल्या लोकांचे वैशिष्ट्य आहे.
      आपल्या व्यवस्थेत अनेक दोष असले तरी ते सुधारता येतील. तसे प्रयत्न करणार्‍या चळवळी आजूबाजूला चालू आहेत. विशेषत: जातीयता, लिंगभाव आणि गरीब-श्रीमंत ही वर्गीय दरी हे आपल्या देशातले पक्षपात आणि शोषणाचे केंद्रबिंदू आहेत.त्यावर अचुक मारा केल्याशिवाय आपल्याला सर्वांगीण समता प्रस्थापित करता येणार नाही. स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय यांच्यावर आधारलेली आपली राज्यघटना परंपरा आणि परिवर्तन यांचा मेळ साधण्याचा अटोकाट प्रयत्न करते. हजारो वर्षे आपल्याकडे अस्तित्वात असलेली मनुस्मृतीची घटना ही बहिष्कृतता म्हणजे वजाबाकीवर आधारलेली होती. आपले आजचे संविधान हे समावेशकता म्हणजे सर्वांना संधी या तत्वाचा पुरस्कार करणारे आहे.बेरजेचे गणित मांडणारे आहे.
      आज जातीव्यवस्थेच्या कब्ज्यात सापडलेली निवडणुक व्यवस्था आणि भ्रष्टाचाराचे बेसुमार पीक यांनी आपल्या लोकशाहीचा गळा आवळलेला आहे.बहुमतासाठी पैसा, दंडशक्ती, जात आणि अनुनय यांचा होणारा सरसकट वापर चिंताजनक आहे.आश्वासनांचा पाऊस आणि इच्छाशक्तीचा अभाव हे सर्वच राजकीय पक्षांचे आत्मे बनत चाललेत.
      अन्नसुरक्षा योजना येऊ घातलेली आहे.एकीकडे अन्नधान्याने गोदामे भरलेली असताना कुपोषणाने माणसे मरावीत ही शरमेची गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर कोरडे ओढल्यानंतर आता सरकार स्वस्त दराने अन्नधान्य देणार आहे. त्यामुळे  या देशात
यापुढे निदान उपासमारीची तरी पाळी कोणावर येणार नाही ही जमेची गोष्ट आहे.पण अन्नासाठी काम करणे हीच ज्यांची कार्यप्रेरणा आहे, त्यांना २ दिवसाच्या पगारात महिन्याचे अन्न मिळाले तर त्यांच्या कार्यप्रेरणेवर त्याचा विपरित परिणाम होईल का याचाही विचार करायला हवा.
      जनतेला सक्षम करणारे शिक्षणहक्क कायदा, माहिती अधिकार कायदा, असे अनेक महत्वपूर्ण कायदे याकाळात केले गेले.मात्र अद्यापही भटक्या- विमुक्त समाजासारखे घटक विकासाच्या छावणीपासून कोसो दूर आहेत.आरक्षण हा आता प्रतिनिधीत्वाऎवजी गरिबी हटावचा कार्यक्रम बनवण्यात आलाय. देशातल्या बहुतेक सगळ्या जातींना मागासपणाचे डोहाळे लागलेत. पुर्वी जात हे बंदीस्त वर्ग होते. आता काही अपवाद वगळता सर्व जातीत वर्ग निर्माण झालेत.प्रत्येक जातीत मध्यमवर्ग तयार झालाय. ४० कोटी लोकांनी आयकर भरायला हवा मात्र त्याच्या अवघे दहा टक्के लोक तो भरतात. तर ९०% लोक तो बुडवतात.काळा पैसा, निवडणुक व्यवस्थेला पैशांचे लागलेले ग्रहण अशी गैरव्यवस्थेची यादी मोठी आहे.पण निराश होण्याचे कारण नाही.
      असे सगळे असले तरीही भारतीय लोकशाही मजबूत होत चाललीय यात दुमत नाही.दारिद्र्य कमी होतेय. शिक्षण वाढतेय. जागरूकता वाढतेय.आज १०० कोटी लोकांजवळ मोबाईल आहेत. ११० कोटी लोक सिनेमे बघतात. टिव्ही सर्वत्र पोचलाय.भारतीय चर्चाविश्व संपन्न होतेय.  वरखाली होणारे रहाटगाडगे असतेच. त्याची चिंता नको. आपण पुन्हा एकदा निर्धार केला तर आपल्याला पुढे जाण्यापासून रोखण्याची हिम्मत कोणातच नाही. गरज आहे ती निर्धाराची...सामुहिक इच्छाशक्तीची.....!




No comments:

Post a Comment