Friday, February 20, 2015

योद्धा..गोविंद पानसरे लढता लढता गेले. वाशीमला ग्रंथमहोत्सवात असताना त्यांच्यावर खुनी हल्ला झाल्याची बातमी आली. मी त्यावेळी  "मी मराठी" वाहिनीशी बोलताना  ८२ वर्षाच्या या लढवय्यावर हा प्राणघातक हल्ला करणारांचा धिक्कार केला होता. त्यांची इच्छाशक्ती अफाट होती. ते हीही लढाई जिंकतील असे वाटत होते. रूग्णालयात अखेरची झुंज ते देत असताना त्यांचे आत्मबळ त्यांना नव्या लढाईसाठी प्राणवायू देईल असा ठाम विश्वास वाटत होता.

त्यांची झोकून देऊन समर्पित वृत्तीने चळवळीसाठी चाललेली धडपड गेल्या ४० वर्षांत खूप जवळून बघता आली. एकत्र अनेक कामे करता आली. खूप खूप शिकता आले.

आद्य फुले चरित्रकार पानसरे पाटील हे त्यांचे पूर्वज असल्याचे मी सांगितले तेव्हा म्हणाले होते, "अरे आपलं नातं किती जुनं आणि घट्ट आहे बघ." पानसरेसर, उमाताई, सौ. संगिता आणि मी अनेकदा एकत्र प्रवास केले. प्रवासात सर अखंड बोलत असायचे.नवंनवं सांगत असायचे. या वयात एव्हढा उत्साह येतो कुठून?

बालभारतीच्या आमच्या बैठकांना सर कितीप्रकारे सजगता द्यायचे.

झरा आतला होता. अस्सल होता.

ऎशी कळवळ्याची जाती, करी लाभाविना प्रिती.

समता परिषदेच्या प्रबोधन शिबीरांना सर अनेकदा आले. त्यांच्याशी रूमवर, व्यासपिठावर अखंड गप्पा होत असत.

मुंबईला भुपेश गुप्ता भवन, कोल्हापूरला त्यांच्या घरी आणि श्रमिकवर अनंत भेटी झाल्या.

आज खूप सुनंसुनं वाटतय. विषन्न आणि नाउमेद वाटतय.

उर्जाच हरवलीये.