Sunday, February 22, 2015

एक आगळा वेगळा माणूस गोविंद पानसरे!

सौजन्य: शांताबाई रानडे
शांताबाई रानडे यांचा लेख. कॉ. पानसऱ्यांची ओळख करून देणारा. अवश्य वाचावा असा -
एक आगळा वेगळा माणूस गोविंद पानसरे!
आमच्या कोल्हापुरात एक जुनी रीतच आहे. कुणी परगावचा पुढारी राजकारणात आला, की त्याचा पंचनामा करायचा आणि म्हणायचे, ‘‘हे आणि नवं बेनं कुठलं रे?’’ तसंच गोविंदरावांचं झालं. त्यात पुन्हा त्यांचं नाव गोविंद पानसरे. ‘‘पानसरे म्हणजे कुणापैकी रे? ब्राह्मण, मुसलमान की दलित आणि कुणी? असले प्रश्नही भेडसावले.’’ असे त्यांचे मित्र बाबूराव धारवाडे सांगतात. पण हे ‘बेनं’ वेगळेच निघाले. ते जात मानत नाहीत, की धर्म मानत नाहीत. फक्त माणूसपण मानतात ते! या माणूसपणाच्या नात्याने पानसरेंनी गोरगरिबांसाठी, कष्टकर्‍यांसाठी तळमळीने जे काम केले त्यामुळेच कोल्हापूरकरांनी त्यांना ‘आपले’ म्हणून स्वीकारले.
शिक्षणासाठी संघर्ष
पानसरे मूळचे नगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातल्या कोल्हार या लहानशा गावातले. त्यांचे वडील पंढरीनाथ यांची प्रथम थोडी शेती होती. नंतर तीही गेली. आई हरणाबाई शेतमजूर. रस्त्याच्या, पुलाच्या बांधकामावर आईवडिलांनी खडी फोडण्याचे कामसुद्धा केल्याची आठवण पानसरे सांगतात. एकच चांगली गोष्ट होती. कोल्हारमध्ये सातवी पर्यंत शाळा होती. त्यावेळेपासूनच पानसरे राष्ट्रसेवा दलात जात होते. त्यामुळे त्यांची पत्की गुरुजींशी ओळख झाली. पत्की गुरुजी राष्ट्रसेवा दलाचे काम करायचे. वारणेच्या दोन्ही तीरांवरील प्रदेशात त्यांचा वावर होता. प्रतिसरकारच्या कार्यकर्त्यांना ते मदत करायचे. ७ वी पास झाल्यावर पानसरे राहुरीला आले आणि पत्की गुरुजींनी चालवलेल्या बोर्डिंगमध्ये राहून विद्यामंदिर शाळेत शिक्षण घेऊ लागले. पुन्हा एक अडसर! त्या शाळेतून मॅट्रिकला बसता येत नव्हते. म्हणून नगरला आले. सोसायटी हायस्कूलमध्ये ते पहिल्या वर्गात पास होऊन मॅट्रिक झाले. पुढे काय? कॉलेजात जाण्याची इच्छा होती. पण पैसा नव्हता. याचवेळी पत्की गुरुजींना काही घरगुती कारणामुळे कोल्हापूरला स्थलांतर करावे लागणार होते. पहिल्यापासूनच हुशार आणि धडपड्या असलेल्या मुलावर पत्की गुरुजींचे लक्ष होते. ते पानसर्‍यांना म्हणाले, ‘‘तू पण चल माझ्याबरोबर कोल्हापूरला. तिथे खूप बोर्डिंग आहेत. तिथे राहून तुला पुढे शिकता येईल.’’
कोल्हापुरात चांगले मार्क असूनही सायन्सला पानसर्‍यांना प्रवेश मिळाला नाही. म्हणून त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये कलाशाखेला प्रवेश घेतला. यायला उशीर झाल्यामुळे त्यांना बोर्डिंगमध्ये मात्र प्रवेश मिळाला नाही. मग त्यांनी ‘बुकस्टॉल दि रिपब्लिक’ या कम्युनिस्टांनी चालवलेल्या पुस्तकांच्या दुकानात नोकरी मिळवली आणि ते तिथेच राहू लागले. जवळच्या कोटीतीर्थ तलावात स्नान कधी भोसले गुरुजींच्या घरी जेवण तर कधी मित्रांच्या घरी जेवण, पेपर वाटण्याचे काम. कधी कधी ते बिंदू चौकातल्या महात्मा फुले, आंबेडकर पुतळ्यांच्या पायाशी बसून अभ्यास करायचे आणि तिथेच झोपी जायचे. असे एक वर्ष काढल्यावर पानसरेंना ‘प्रिन्स शिवाजी फ्री मराठी बोर्डिंग हाऊस’मध्ये प्रवेश मिळाला. स्थैर्य आले मात्र संघर्ष संपला नाही. पैसेे मिळवण्यासाठी कोल्हापूर म्युनिसिपालिटीच्या ऑक्ट्राय खात्यात त्यांनी नोकरी मिळवली. पोरगा शिक्षणासाठी धडपड करतोय म्हणून ऑक्ट्राय सुपरिटेंडंटनी त्यांना कमी काम असलेली रात्रपाळीची ड्युटी दिली. रात्रपाळी आणि दिवसा कॉलेज असे करत त्यांनी बी. ए. ची पदवी मिळवली. महाविद्यालयात असल्यापासूनच ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर परखडपणे बोलत व त्यांच्यासाठी आवाज उठवत असत. विद्यार्थी संघटनेचेही काम करत असत. या कामाला मदतकारक ठरू शकेल म्हणून त्यांनी शाहू कॉलेजमध्ये एल. एल. बी.ला प्रवेश घेतला. आता त्यांना म्युनिसिपल शाळा नं. आठ मध्ये प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाली होती. तिथेही त्यांनी आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला. त्यावेळचे त्यांचे विद्यार्थी श्री. पी. जी. मेढे सांगतात, ‘उच्चशिक्षित असूनही लहान वर्गातल्या आम्हाला ते विषय सोपा करून शिकवत. त्यामुळे आमच्या मनी तो विषय बिंबवला जाई. त्यांनी त्यावेळी आमच्यावर टाकलेली छाप आमच्या भावी प्रगतीचा घट्ट पाया ठरून भावी वाटचालीस उपयुक्त ठरली.’ अभ्यासक्रमाव्यतिरिक्तच्या उपक्रमांमुळे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावाजले गेले. एल. एल. बी. झाल्यावर त्यांना बोर्डिंग सोडावे लागले. ते खोली घेऊन राहू लागले व वकील म्हणून कोर्टात प्रॅक्टिस करू लागले. पण तेथेही कामगार, कष्टकरी, गरीब अशीलांचीच प्रकरणे अधिक असत.
प्रिन्स शिवाजी फ्री मराठी बोर्डिंग हाऊस
या बोर्डिंगला पानसरेंच्या जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. त्याबद्दल पानसरे म्हणतात, ‘‘माझं कोल्हापूरला येणं हा तिथल्या बोर्डिंगचा परिणाम आहे. कोल्हापूरला बोर्डिंगची जननी असं रास्तपणे म्हणण्यात येतं. तिथे जवळ जवळ प्रत्येक जातीची बोर्डिंग आहेत. ती शाहू महाराजांच्या काळापासून आहेत. बोर्डिंग अजूनही चांगली चालू आहेत. बोर्डिंगमधलं जीवन आनंददायी होतं. मित्र होते. मी इतरांपेक्षा वेगळा आहे हे त्यांना जाणवत होतं. पण जवळ जवळ सर्व मुलांना मी त्यांचा मित्र आहे, मी त्यांच्या बोर्डिंगमध्ये राहतो याचा अभिमान वाटत होता.’’ या बोर्डिंगमधून शेकडो गरीब विद्यार्थी शिकून मोठे झाले. नंतरच्या काळातही पानसरेंचा या बोर्डिंगच्या कामाशी सतत संपर्क राहिला. याच बोर्डिंगच्या मैदानावर भव्य मंडप उभारून अविस्मरणीय असा अमृत महोत्सवी सत्कार समारंभ पानसरेंच्या आप्तेष्टमित्रांनी साजरा केला!
जोडीदारीण
जीवनाला थोडे स्थैर्य आल्यावर लग्नाचा प्रस्ताव येऊ लागला, तेव्हा पानसरेंनी मुलगी शोधण्याचे काम चळवळीतल्या एका कार्यकर्तीवरच सोपवले. विजयाताई भोसलेंनी उमाला पाहिले ते तिच्या मामीच्या घरच्या एका कार्यक्रमात. मॅट्रिकच्या वर्गात शिकणारी, शांत सोज्ज्वळ उमा पानसरे वकिलांसाठी चांगली आहे, असे विजयाताईंना वाटल्यावर मुलगी पाहण्याचा अनौपचारिक कार्यक्रम झाला. लग्न ठरले. त्याबद्दल उमा सांगते, ‘‘पानसरेंचा पक्ष कोणता हे माहीत नव्हते, पण ते गरिबांसाठी, तळागाळातल्या माणसांसाठी काम करतात एवढंच त्यावेळी माहीत होतं. लग्नापूर्वी त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, ‘पोटभर जेवण मिळेल एवढं मी नक्कीच कमवेन. पण आंदोलने, मोर्चे, शिबिरं हे सारं मला करावंच लागेल.’ पुढे २६ एप्रिल १९६६ ला राजाराम टॉकीजमध्ये विवाह झाला तो शाहू वैदिक स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या श्री. घाटगे यांच्या साक्षीने. हुंडा नावाचा प्रकार तर आमच्या विवाहात नव्हताच. विवाहानंतर दुसर्‍याच महिन्यात दिल्लीला महागाईविरोधी विराट मोर्चा होता. त्याला आम्ही गेलो. (हाच त्यांचा हनिमून!) तिथे चळवळीतल्या तारा रेड्डी, मंजू गांधी, शांता रानडे, मालिनी तळपुळे या कार्यकर्त्या आणि अरुणा असफअली, रेणू चक्रवर्ती, गीता मुखर्जी या नेत्यांशी ओळखी झाल्या. चळवळीची गाणी ऐकून भारावून गेले आणि ही चळवळ महत्त्वाची असल्याचे मलाही पटले. घरी ‘युगांतर’ यायचा तो वाचून मलाही हळूहळू चळवळ समजू लागली. वत्सलाताई पाटील, विमलाबाई बागल यांच्या बरोबरीने मीही चळवळीत सक्रिय झाले.’’ आजपर्यंत उमा त्यांना सर्वार्थाने साथ देत आहे. अलीकडे पानसर्‍यांची दृष्टी कमी होऊ लागल्यामुळे प्रवासात सतत त्यांच्याबरोबरच असते. त्यांना महत्त्वाचे लिखाण वाचून दाखवण्याचे काम न कंटाळता करत असते.
बुद्धिप्रामाण्य आणि पुरोगामी विचार यांच्याशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. उक्ती आणि कृतीत कधी अंंतर पडू दिले नाही. म्हणूनच त्या दोघांनी मुलींचे आंतरजातीय विवाह आनंदाने मान्य केले. पानसरेंच्या आईच्या मृत्यूनंतर कुठलेही धार्मिक विधी तर केले नाहीतच शिवाय प्रदूषण होऊ नये म्हणून नदीत रक्षा विसर्जन न करता शेतात पसरून दिली. आपल्या धकाधकीच्या जीवनातही आपले पालकत्व त्यांनी किती सुजाणपणाने निभावले याचे उत्तम उदाहरण म्हणजे जावई सुनेसह पानसर्‍यांचे संपूर्ण कुटुंब डाव्या चळवळीत सक्रिय आहे, उच्च शिक्षित आहे आणि सुसंस्कारीही!
राजकीय जीवन
कम्युनिस्ट पक्षसंघटना आणि मार्क्सवादी विचार हा कॉ. पानसरेंच्या जीवनाचा गाभा आहे. कामगार संघटना आणि विविध जनसंघटना हा पक्षवाढीचा स्रोत आहे हे लक्षात घेऊन कॉ. पानसरे यांनी कोल्हापूर व परिसरात जवळ जवळ १७ कामगार संघटना उभ्या करून उत्तम प्रकारे चालवल्या आहेत. जनसंघटनांमध्ये किसान सभा व विद्यार्थी संघटना यावर त्यांचे जास्त लक्ष आहे. कामगार किसान विद्यार्थी संघटनांमधील चांगले कार्यकर्ते हेरून त्यांना मार्क्सवादाचे धडे देणे, त्यांचे संघटन कौशल्य वाढवून त्यांना डाव्या चळवळीतले सक्षम नेते बनवणे यासाठी पानसरेंची सतत धडपड चालू असते. विशेषतः विद्यार्थ्यांचा अभ्यासवर्ग, दरवर्षी १० दिवसांची होणारी विद्यार्थी-विद्यार्थिनींची कार्यशाळा यात ते फार बारकाईने लक्ष घालतात आणि विद्यार्थ्यांना आवडेल, पचेल, रुचेल असे त्यांचे स्वरूप ठेऊन ती कार्यशाळा लाभदायक करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो.
कॉ. पानसरे शाळेपासूनच राष्ट्रसेवा दलात जात होते. १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात राष्टसेवादलाचा स्वयंसेवक म्हणून त्यांनी भाग घेतला. समाजवादी कार्यकर्त्यांच्या संपर्कामुळे ते काही काळ समाजवादी पक्षाचे काम करत होते. १९५२ साली कॉ. माधवराव गायकवाड, कॉ. बापूराव जगताप आदिंचा डावा समाजवादी पक्षाचा गट कम्युनिस्ट पक्षात आला. त्यांच्याबरोबरच कॉ. पानसरे पक्षात आले. आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. कॉ. माधवराव गायकवाड महाराष्ट्र राज्य कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस असताना कॉ. पानसरे पक्षाच्या कामाचा बराच भार उचलत होते. त्यानंतर ते पक्षाच्या महाराष्ट्र कौन्सिलचे नऊ वर्षे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे ते अनेक वर्षे सदस्य होते. वयाच्या ७५ व्या वर्षीही ते पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सचिव मंडळाचे सन्माननीय सदस्य आहेत. ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसच्या महाराष्ट्र शाखेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते.
एक लढवय्या
नगरमध्ये मॅट्रिकच्या वर्गात असताना कॉ. पानसरेंचा अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशन बरोबर संपर्क सुरू झाला. महाविद्यालयात दाखल झाल्यापासून ते विद्यार्थी फेडरेशनचे काम हिरीरीने करू लागले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ते परखडपणे बोलत व त्यासाठी वरिष्ठांशी भांडणही करत. १९५५ साल उजाडले. गोवा मुक्ती संग्रामाला उधाण आले. सत्याग्रही तुकड्या गोव्यात जाऊ लागल्या. सालाझाराचे क्रूर सैनिक त्यांच्यावर थेट गोळीबारच करत. काही सत्याग्रही हुतात्मा झाले. १५ ऑगस्ट १९५५ रोजी कॉ. व्ही. डी. चितळे यांनी एक हजार सत्याग्रहींसह सत्याग्रहाची घोषणा केली. पानसरेंनी त्यात भाग घेण्याचे ठरवले. वृत्तपत्रात बातमी आली. वसतिगृहाचे प्रमुख कोल्हापूरचे निवृत्त न्यायाधीश श्री. व्ही. सी. चव्हाण यांनी पानसर्‍यांना बोलावून घेतले. ‘‘गोव्याला जाणार आहे असे कळले. परवानगी घेतली नाहीस.’’
‘‘नाही घेतली.’’ (पानसरे ताठ्यातच होते.)
‘‘आईवडिलांना विचारलंस?’’
‘‘नाही विचारले.’’
‘‘तुला जाता येणार नाही.’’ पानसरे गप्प!
‘‘लक्षात आलं ना तुझ्या?’’
‘‘मी जाणार आहे.’’ किरकिर नको म्हणून पानसर्‍यांनी सांगितले. त्यांनी परोपरीने पटवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणणे आधी शिक्षण पूर्ण करावे, त्यानंतर काय करायचे ते करावे. तोवर जाऊ नये.
‘‘जो उद्या त्याग करीन म्हणतो, तो केव्हाच त्याग करत नाही.’’ पानसर्‍यांनी त्यांना ऐकवले. ते हसले आणि म्हणाले, ‘‘बरं जा. माझा मुलगाही असलंच काहीतरी करतोय. बघू या काय करताय.’’ तेव्हा पानसरे कॉलेजमध्ये शिकत होते. राजाराम कॉलेजच्या मुलांनी खूप मोठा सत्कार केला. स्टेशनवर पोचवायला गेले. एका हुतात्म्याच्या मृतदेहाजवळ उभ्या असलेल्या पानसर्‍यांचा फोटो छापून आला.
१९५६ साली ऑक्टोबरपासून संयुक्त महाराष्ट्र लढ्याला सुरुवात झाली. पानसरे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या जिल्हा शाखेचे सेक्रेटरी होते. त्यावेळी ते फक्त २५-१० वर्षांचे होते. गांधी मैदानावर प्रचंड संयुक्त महाराष्ट्र आणि सीमा परिषद झाली. पानसर्‍यांनी कार्यकर्त्यांची उत्कृष्ट टीम तयार करून उत्तम नियोजन केल्याने परिषद अत्यंत चांगली झाली. सत्याग्रहात भाग घेऊन कारावासही भोगला.
कॉलेज संपवून वकिली करू लागल्यावर पारीख पुलावरच्या भाजीवाल्यांच्या लढ्यापासून ते केंद्र सरकारने केलेल्या भारत-अमेरिका अणुकरार विरोधी लढ्यापर्यंतच्या कोल्हापुरातल्या प्रत्येक लढ्यात कॉ. पानसरेंचा सहभाग होता. आणि अन्याय अत्याचारविरोधी, शोषणविरोधी श्रमिकांचा बुलंद आवाज म्हणजे कॉ. गोविंद पानसरे असेच समीकरण झाले होते. त्यातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण लढ्यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा.
गुंडगिरीविरोधी मोर्चा ही खास पानसरेंचीच कल्पना. कोल्हापुरात फार मोठ्या प्रमाणात गुंडगिरी सुरू होती. गोरगरीब हैराण आणि विचारवंत अस्वस्थ! गुंडगिरी विरुद्ध सभ्य माणसांनीच लढले पाहिजे. पण या सभ्य समाजाला रस्त्यावर उतरवणे किती अवघड! पण पानसरंनी ते केले. गुंडविरोधी घोषणा लिहिण्याची स्पर्धा तरुणांसाठी जाहीर केली. उत्तम घोषणा लिहिणार्‍यांना बक्षीस देण्याची योजना जाहीर केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. वातावरण बदलू लागले. ‘आम्ही गुंडगिरीचा निषेध करतो.’ ‘त्याविरुद्ध आम्ही उभे राहतो.’ अशा घोषणा देत मोर्चा निघाला. अनंत दीक्षितांसारखे संपादक त्यात सहभागी झाले.
विश्वशांती यज्ञविरोधी लढा
ज्या कोल्हापुरात शाहू महाराज कर्मकांडाविरुद्ध लढले, तिथेच हजारो किलो धान्य, मोठ्या प्रमाणावर तेलतुपासारखे खाद्यपदार्थ जाळून वरूण तीर्थावर होणार्‍या यज्ञाच्या विरोधात जनजागरण करण्यात आले. बिंदू चौकात मोठी जाहीर सभा घेण्यात आली. त्यात खुद्द छत्रपतींनी भाग घेतला. पुढे १० दिवस मिरजकर तिकटीजवळ धरणे धरले जाई. त्यावेळी ज्ञानविरोधी धरण्यात हजारो लोक सामील आणि यज्ञाच्या बाजूने थोडेसेच हिंदूत्ववादी असेच दृश्य असे. महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांनी धरणे आंदोलनाला भेट देऊन मार्गदर्शन केले. जिल्ह्यातले सर्व पुरोगामी या धरण्यात आले. अशा पाठिंबा देणार्‍या संघटनांची संख्या शंभरच्यावर होती. प्रा. एन. डी. पाटील आणि कॉ. पानसरे पूर्णवेळ मार्गदर्शन करत. जनतेनेच यज्ञावर बहिष्कार टाकला. यज्ञाचा बोजवारा उडाला. यज्ञासाठी भव्य मंडप उभारणार्‍या संयोजकांचे घातलेले प्रचंड भांडवलही वसूल झाले नाही आणि त्यांना गाशा गुंडाळून पळ काढावा लागला. कोल्हापूरचा पुरोगामी चेहरा टिकवून ठेवण्यात कॉ. पानसरेंचा मोठा वाटा होता.
जमीन बळकाव मोहीम
कॉ. नाना पाटील व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सेलिंगपेक्षा अधिक असलेली जमीन ताब्यात घेण्याचा लढा झाला. त्यावेळी सहस्त्र भोजनफेम यशवंतराव मोहितेंच्या ४०० एकर जमिनीवर सत्याग्रह करून कॉ. पानसरे यांनी महाराष्ट्र गाजवला होता.
खासदार आमदारांना कोल्हापूर बंद
हे आंदोलन मोडून काढण्यासाठी यशवंतराव चव्हाणांचा दौरा मुद्दामच आयोजित करण्यात आला होता. कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. तरीही पानसरेंच्या नेतृत्वाखाली एक जथा यशवंतरावांची गाडी अडवण्यासाठी निघाला. पोलिसांनी क्रूरपणे लाठीमार चालू केला. जथ्याचे पुढारी म्हणून पोलीस पानसरेंवर तुटून पडले. बर्‍याच लाठ्या पानसर्‍यांना बसल्या. ते पाहिल्यावर कॉ. पन्हाळकर धावत आले आणि त्यांनी आपल्या अंगावर लाठ्या झेलल्या.
शेतमजूर मोर्चा
कॉ. संतराम पाटील आणि कॉ. पानसरे यांनी शेतमजूर युनियनच्या वतीने त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. कॉ. संतराम पाटलांना लाठ्या बसत आहेत, हे पाहिल्यावर पानसरे त्यांच्या अंगावर पडले आणि आपल्या अंगावर लाठ्या झेलल्या. पोलिसांनी सर्वांना अटक करून पाच दिवस येरवड्याला पाठवले. कॉ. पानसर्‍यांनी तुरुंगात अभ्यास शिबीरच सुरू केले. सरकारच्या खर्चाने घेतलेले ते अभ्यास शिबीर झाले. त्यावेळी कॉ. पानसर्‍यांनी शिवाजी कोण होता यावर वर्ग घेतला. वर्ग संपल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी सुचवले, की शिवाजी कोण होता? यावर पुस्तकच लिहावे पानसर्‍यांनी. त्याची आवश्यकता आहे. आणि त्यानंतर शिवाजी कोण होता? हे पुस्तक प्रसिद्ध झाले.
अशा अनेक लढ्यामधून पानसर्‍यांना अनेकवेळा कारावास भोगावा लागला. पानसरेंचे बरेचसे लढे यशस्वी झाले. पण काही अयशस्वीही झाले. मनासारखे झाले नाही की वाईट वाटायचे, चिडचिड व्हायची, पण ते कधी निराश नाही झाले! खचले नाहीत. त्यांचे एक वाक्य मला फार आवडते, ‘लढणार्‍यांचा कधीच पराभव होत नसतो.’
वक्ता, लेखक, प्रबोधक
पानसर्‍यांच्या या तीनही भूमिकांमध्ये मला एक समान सूत्र दिसते. सोपे लिहिणे-बोलणे, साधे लिहिणे-बोलणे आणि कठीण विषय सोपा करून मांडणे. याशिवाय विषयाच्या सर्व बाजू दाखवून देणे, आक्षेपाचे खंडन करणे आणि शंकांचे निरसन करणे. या सगळ्या प्रक्रियेतून मग श्रोता वाचक शिबिरार्थीपर्यंत तो विषय नीटपणे पोचतो. पानसरे जेव्हा भाषण करतात, तेव्हा श्रोत्यांनाच प्रश्न विचारतात. मग ते भाषण न राहता वक्ता-श्रोता यातील अंतर नाहीसे होऊन तो परस्पर संवाद बनतो. आणि प्रतिपादनाचा विषय श्रोत्यांच्या गळी उतरवणे खूप सोपे होऊन जाते. आपल्या भाषणात पानसरे जेव्हा एखादा नवा विचार किंवा नवा मुद्दा मांडतात, तेव्हा तो आक्रमकपणे मांडत नाहीत. तर ‘मला असं वाटतं, पहा तुम्हाला पटतंय का?’ असे म्हणून मांडणी करतात. त्यामुळे त्यावर वादंग न माजता समंजसपणे चर्चा होऊ शकते. पानसरेंचे भाषण म्हणजे एक अभ्यासवर्गच असतो. पण तो कंटाळवाणा नसतो, तर प्रसन्न, मनमोकळा असतो. अफाट व चौफेर वाचनामुळे ज्ञानाचा खजिना आणि एकपाठी बुद्धिमुळे माहितीचा समृद्ध साठा याची चुणूक त्यांच्या भाषणांमधून जाणवते.
कॉ. पानसरे यांनी लिहिलेल्या २१ पुस्तकांच्या यादीवर नजर टाकली, तर असे आढळून येईल, की त्यातल्या बहुतांश पुस्तिका या त्या त्या वेळी वादग्रस्त ठरलेल्या विषयावरच्या आहेत. सर्वसामान्य माणसांचे त्या त्या विषयांचे आकलन वाढावे, त्यांचे प्रबोधन व्हावे या हेतूनेच त्या लिहिल्या गेल्याचे जाणवते. ‘मुस्लिमांचे लाड’ या पुस्तिकेबद्दल हुसेन जमादार म्हणतात, ‘‘या छोट्याशा पुस्तिकेने मुस्लिम समाजाला मोठा विश्वास मिळवून दिला. हिंदू धर्मियांच्या वाढीचा सरासरी दर सतत वाढतो आहे व मुस्लिम धर्मियांच्या वाढीचा सरासरी दर सतत कमी होतो आहे ही मांडणी एका गैरमुस्लिमाने करणे ही गोष्ट मुस्लिम समाजाला आश्वासक वाटते.’’
‘‘पानसर्‍यांची प्रत्येक पुस्तिका लढणार्‍या कार्यकर्त्याला कधी ढालीसारखी तर कधी तलवारीसारखी उपयोगी पडते.’’ ही प्रतिक्रियाही वरील विधानाला पुष्टी देणारीच आहे. त्यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तिकेने तर मराठीतील पुस्तकांच्या खपाचा उच्चांक केव्हाच ओलांडला आहे. आजवर लाखाहून अधिक प्रती या पुस्तकाच्या खपल्या आहेत. अनेक भारतीय भाषांमध्ये याचा अनुवाद झाला आहे. इतर पुस्तिकांच्याही ३-३, ४-४ आवृत्या निघाल्या आहेत. त्यावरून त्यांची उपयुक्तता आणि लोकप्रियता सहज समजते.
उपक्रमशीलता
पक्षाचे काम, कामगार संघटनांचे काम, वकिली, शेकडो व्याख्यानांसाठी, अभ्यासवर्गांसाठी सतत प्रवास असे अत्यंत व्यस्त आयुष्य असूनही पानसरे सतत नवनवे उपक्रम सुरू करत असतात आणि नव्याजुन्या कार्यकर्त्यांच्या मदतीने यशस्वीपणे पार पाडत असतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून पानसर्‍यांचा या कामाशी संबंध आहे. अं. नि. स. ची इतर ठिकाणी चालणारी प्रबोधन शिबिरे, बुवाबाजी विरोधी मोहिमा वगैरे कामे या समितीत चालूच असतात. पण जटा निर्मूलनाचा एक नवाच कार्यक्रम कोल्हापुरात करण्यात आला. जवळ जवळ ५० स्त्रियांच्या जटा कापून त्या स्त्रियांना त्या घाणेरड्या ओझ्यातून मुक्त करण्यात आले. स्त्रीलंपट तोडकर महाराजांच्या द्रोणागिरी मठावर पोलिसांकडून छापा टाकून दोन युवतींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून तोडकर, त्याचा व्यवस्थापक आणि एक महिला कर्मचारी यांना अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सरकारकडून घेतलेल्या जागेचा गैरवापर, अफाट संपत्ती गैरमार्गाने मिळवणे वगैरे अनेक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. खटले चालू आहेत. २००० साली शंकराचार्यांनी चित्रलेखा या मासिकाला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी स्त्रीशूद्रांबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते. त्या विरुद्ध पुरोगामी, परिवर्तनवादी संघटनांनी एकत्र येऊन समिती स्थापन केली. तिच्यावतीने कॉ. पानसरे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात हजारो लोक सामील झाले होते. शंकराचार्यांच्या मठामधून घटनाविरोधी वर्चस्ववादी विचार सतत पेरले जातात. त्याचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यावेळी ‘शंकराचार्यांची राखीव जागा’ या पुस्तिकेच्या १ हजार प्रती २ तासात खपल्या.
श्रमिक प्रतिष्ठान
कॉ. पानसरे यांनी अनेक कामगार संघटना चालवल्या आहेत. त्यांच्या आर्थिक मागण्या, इतर प्रश्नांसाठी संघर्ष चालू असतो. पण कवीवर्य नारायण सुर्वे म्हणतात त्याप्रमाणे ‘‘श्रमिकाला भाकरी प्यारी खरी| पण आणखी काही हवे आहे.’’ ते आणखी काही म्हणजे साहित्य, संगीत, कला-क्रिडा, प्रबोधन इत्यादी अंगांनी श्रमिक समाजाचा विकास करण्यासाठी ‘श्रमिक प्रतिष्ठान’ची स्थापना कॉ. पानसरे यांच्या प्रेरणेने करण्यात आली. सुरुवातीला देशात व महाराष्ट्रात घडणार्‍या घडामोडी, दरवर्षीचे देशाचे, महाराष्ट्राचे व कोल्हापूर महानगरपालिका यांचे अंदाजपत्रक यावर कोल्हापूरमधल्याच तज्ज्ञांची व्याख्याने केली जात. २००२ सालापासून दरवर्षी एक विषय घेऊन त्यावर सात-आठ तज्ज्ञांची व्याख्याने करायची आणि त्यांचे पुस्तक प्रकाशित करायचे असा उपक्रम गेले नऊ वर्षे चालू आहे. त्यातून तीनचारशे प्रगल्भ श्रोत्यांचा वर्ग तयार झाला आहे. दुसर्‍या व्याख्यानमालेच्या एक महिना आधी अविनाश पानसरेंचे दुःखद निधन झाले. तरीही व्याख्यानमाला होणारच असे पानसरेंनी सांगितले. आणि ही व्याख्यानमाला आता अवी पानसरे व्याख्यानमाला या नावाने ती चालवली जाते.
समाजवादी प्रबोधिनी
१९७७ साली कॉ. शांताराम गरुड यांच्या पुढाकाराने या संस्थेची स्थापना झाली. कॉ. पानसरे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. या संस्थेच्या वतीने ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ या मासिकासाठी लेखन, पुस्तक प्रकाशन व व्याख्याने, प्रबोधन शिबिरे इत्यादी उपक्रमांमध्ये पानसरेंचा फार मोठा सहभाग आहे. शिवाजी कोण होता? राजर्षी शाहू वसा आणि वारसा, अजून न स्वीकारलेला मंडल आयोग, मुस्लिमांचे लाड, मंडल आयोग या पुस्तिका समाजवादी प्रबोधनासाठीच पानसर्‍यांनी लिहिल्या.
कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन
हा एक वेगळा उपक्रम. कॉ. अण्णाभाऊंचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. पण काहींनी फक्त साहित्यिक म्हणून, काहींनी फक्त शाहीर म्हणून अण्णाभाऊंची ओळख रुजवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. त्यांची कम्युनिस्ट म्हणून ओळख तर पुसूनच टाकण्याचा प्रयत्न सुरू असतो. हे बदलायला हवे, कॉ. अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्त्वातील कम्युनिस्ट कार्यकर्ता, लेखक, कवी, शाहीर, प्रचारक इत्यादी विविध अंगांनी त्यांची ओळख करून घेऊन त्यांची एकसंध समर्थ प्रतिमा जनमानसात रुजावी, त्यांच्या साहित्यातील कथा, कादंबरी, पोवाडे, गीते, कविता इत्यादी प्रकारांची नीट समीक्षा केली जावी अशी या संमेलनाकडून कॉ. पानसरेंची अपेक्षा आहे. कोल्हापूर, नगर येथे अशी दोन संमेलने झाली. अशी किमान १० तरी संमेलने व्हावीत अशी पानसरेंची इच्छा आहे.
आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह सहायता केंद्र
असे विवाह करू इच्छिणार्‍या तरुण-तरुणींसमोर अनेक समस्या असतात. अशावेळी त्यांना मुख्यतः मानसिक आधाराची फार गरज असते. ते काम हे केंद्र करते. आणि त्यांचे इतर प्रश्न सोडवायला मदत करते. त्यातल्या कायदेशीर बाजूची सर्व जबाबदारी पानसेंची असे. पण आता कार्यकर्ते तयार झाले आहेत आणि हे केंद्र सक्षम झाले आहे.
कॉ. गोविंद पानसरे अमृत महोत्सव समितीची प्रकाशने
महाराष्ट्रातच नव्हे, भारतातही एकमेवाद्वितिया ठरावा असा हा उपक्रम आहे. कॉ. पानसरे या आपल्या लाडक्या नेत्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटाने करावा अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. पण पानसरेंनी त्याला साफ नकार दिला. परंतु पक्षाच्या- लोकांच्या आग्रहाखातर ते सत्कारास तयार झाले ते एका अटीवर. कम्युनिस्ट नेते कार्यकर्ते यांची १०० चरित्रे पसिद्ध झाल्यावरच मी सत्कार करायला मान्यता देईन. त्याप्रमाणे महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यकर्ते कामाला लागले आणि आनंदाची गोष्ट अशी, की आज जवळ जवळ ५० हून अधिक मौलिक पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. त्यात कॉ. श्रीपाद अमृत डांगे, कॉ. गंगाधर अधिकारी, कॉ. गंगाधर चिटणीस, कॉ. एस. व्ही. देशपांडे, विदर्भातील नेते कॉ. सुदाम देशमुख, मराठवाड्यातील कॉ. व्ही. डी. देशपांडे, कॉ. चंद्रगुप्त व करुण चौधरी, कॉ. अनंत नागापूरकर यांची चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. ‘मंझील अजून दूरच आहे’ या ग्रंथातून गिरणी कामगारांच्या चळवळीचा इतिहास उलगडत गेला आहे. ‘हैद्राबादचा मुक्ती संग्राम’ या पुस्तकातून मराठवाड्याच्या मुक्ततेचा इतिहास पुढे आला आहे. जागतिकीकरणाचे अरिष्ट, कोरडवाहू शेती यासारखे दोन अभ्यासपूर्ण संपादित ग्रंथही प्रकाशित झाले आहेत. सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे कॉ. गोविंद पानसरे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारा कॉ. गोविंद पानसरे गौरव गंथ! असा बहुमोल वाङ्मयीन खजिना या प्रकाशनांमधून वाचकांना उपलब्ध झाला आहे. एक प्रकारे कम्युनिस्ट पक्षाच्या आणि परिवर्तनवादी चळवळीच्या इतिहासाची सामुग्रीच या सर्व ग्रंथांमधून जमा झाली आहे. याबद्दल कम्युनिस्ट पक्ष व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते कॉ. पानसरे यांचे ऋणी राहतील.
आघात
कॉ. पानसरेंचा मुलगा अविनाश विद्यार्थी असल्यापासूनच ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे काम मोठ्या हिरीरीने करत होता. कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व चळवळींमध्येही त्याचा सक्रिय सहभाग असे. एल. एल. बी. झाल्यावर तर तो कॉ. पानसरेंच्या बरोबरीने सर्वच आघाड्यांवर अत्यंत जोमाने काम करत होता. त्यामुळे या सर्व कामांची जबाबदारी अवीवर सोपवून इतर कामात लक्ष घालण्याचा विचार कॉ. पानसरे करत होते. अशावेळी केवळ ३५ वर्षांचा अविनाश हृदयविकाराच्या झटक्याने या जगातून निघून गेला. कॉ. पानसरे यांच्या कुटुंबावर तर आकाशच कोसळले. अंत्ययात्रा निघाली. हजारो माणसे त्यात सामील झाली होती.
अंत्ययात्रा बिंदू चौकातल्या कम्युनिस्ट पक्षाच्या ऑफिसपाशी पोचल्यावर तर जमावाला अश्रू आवरणे कठीण झाले. अवीचा वावर सतत तिथे असायचा. अशावेळी कॉ. पानसरे माइक हातात घेऊन जीपवर चढले. संभ्रमित जमाव साश्रू नयनाने पानसरेंकडे पाहत होता, आता काय होणार? दुःखावेगामुळे पानसरे बोलू तरी शकतील का? तोच कणखर आवाजातली घोषणा कानावर आली, ‘‘कॉम्रेड अवी का अधूरा काम कौन पुरा करेगा?’’ जमाव शहारला आणि हजारो कंठातून उत्स्फूर्तपणे घोषणा आली, ‘‘हम करेंगे, हम करेंगे!’’
खरंच, कॉ. पानसरे! तुम्ही फार फार मोठे आहात!
-----
शांता रानडे
४०/७, मनोहर अपार्टमेंट,
भोंडे कॉलनी, एरंडवणा,
पुणे - ४११००४
दूरभाष ०२०- ६५००९५९४

No comments:

Post a Comment