संपुर्ण देशाची मान आज खाली झुकलेली आहे.देशभर आज सन्नाटा पसरलेला आहे. आपण पुरुष असल्याची शरम वाटावी अशा घटना देशात आजूबाजूला घडत आहेत. २ ते ९ वर्षांच्या चिमुरड्या मुलींवर बलात्कार करून त्यांना मारून टाकण्याचे प्रयत्न देशात वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्याच्या घटना रोज नव्याने पुढे येत आहेत. २००१ साली संपुर्ण देशभरात २००० लहान मुलींवर बलात्कार झाले होते.२०११ साली ही संख्या ७००० वर गेली. गेल्या दहा वर्षात ४८००० लहान बालिकांवर बलात्कार झाले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती शीला दिक्षित म्हणतात, "माझ्या मुलीला दिल्लीत सुरक्षित वाटत नाही." राष्ट्रपतींची कन्या म्हणते, "दिल्ली शहर महिलांसाठी सुरक्षित राहिलेले नाही’. सगळीकडेच चिंताजनक वातावरण आहे. या देशातील कोणतीही चिमुरडी सुरक्षित नाही असेच प्रथमदर्शनी म्हणावे लागते आहे. माध्यमांतून महिला अत्याचाराच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. तरूणाई रस्त्यावर उतरत आहे. राजकारणी मात्र नेहमीप्रमाणे नक्राश्रू ढाळीत आहेत. त्यामुळे सामाजिक संवेदना तीव्र होऊ लागल्या आहेत. कायदे आणखी कडक करा, फास्ट ट्र‘क कोर्ट स्थापन करा, बलात्कार्यांना फाशी द्या, अशा मागण्या केल्या जात आहेत.
१६ डिसेंबरच्या दिल्लीतील बलात्काराच्या घटनेने सारा देश हादरला होता. देशाच्या सामुहीक विवेकबुद्धीला झिणझिण्या आणणारीच घटना होती ती. सरकारने याबाबतच्या महिलांविषयक कायद्यांमध्ये बदल सुचवण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल ताबडतोब दिला.सरकारनेही त्यातील अनेक शिफारशी तात्काळ लागू केल्या. न्यायालयांनी सक्रियता दाखवायला सुरूवात केली.तरीही दिल्ली आणि इतर अनेक ठिकाणी रोज नव्या घटना घडत आहेत. सरकारी अनास्था, आंधळा कायदा, बधीर पोलीस, मुर्दाड समाज, कोमात गेलेली नैतिकता आणि मृतप्राय संस्कार या सार्यांनाच लकवा मारला गेल्याचे चित्र दिसते आहे.लैंगिक अत्याचाराची अमाणुष घटना घडली की तिला "पाशवी बलात्कार" म्हटले जाते.खरे तर ही पशूंची बदनामी आहे. कोणताही पशू आपल्या मादीवर बलात्कार करीत नाही.तो तिचा अनुनय करतो, तिला मनवतो.कदापीही सक्ती करीत नाही.बळाचा वापर करून केली जाणारी लैंगिक हिंसा फक्त पुरूषच करतात असे कबूल करायला हवे. त्यामुळे यापुढे एखाद्या प्राण्यावर चुकूनमाकून बलात्कार झालाच तर त्याला "पुरूषी बलात्कार" म्हटले पाहिजे.
देशातील २००० सालापासूनच्या बलात्काराच्या घटना पाहिल्या तर प्रत्येक २९ मिनिटाला एक बलात्कार होत असतो. दरवर्षीच्या या अत्याचारांची एकुण संख्या १६४९४ पासून आता २०,००० च्याही वर गेलेली आहे.पुरूषांना पोलीस खात्याचा धाक उरलेला नाही. व्हीआयपींना सुरक्षा पुरवणे आणि बंदोबस्त करण्यात सारे पोलीस दल मश्गूल आहे.शोषक पुरूषी वर्चस्व वॄतीला अपराधभावाची बोच अशी ऊरलेली दिसत नाही. जागतिकीकरणाच्या झपाट्यात सारा समाज चंगळवादाच्या विळख्यात सापडलाय.घरातले संस्कार,सामाजिक दबाव,नैतिकता सारेच दिप विझू लागलेत.शिक्षण कुचकामी ठरू लागलेय. सुखाच्या कल्पना बाजारू बनू लागल्या आहेत. ज्यालात्याला सुख ओरबाडून घ्यायचे आहे.सोशल मिडीयामुळे आणि मोबाईलमुळे प्रत्येक शाळकरी मुलाच्या हातात पोर्नोग्राफी साहित्य पोचले आहे. जाहीराती आणि टिव्हीमालिकांमधून सदोदित मुलांना उत्तेजित करण्याचा धडाका लावण्यात आलेला आहे. लैंगिक शिक्षणाचा अभाव, बेकारी, शहरी लोंढे, अनारोग्य, यामुळे आणि हे कुतूहल शमवण्याचे वैध मार्ग हाती नसतील तर सामाजिक विकृती जन्माला येणे अटळ बनते. जगभरच कमीअधिक प्रमाणात बलात्कार वाढू लागले आहेत. शिक्षणातून स्त्री-पुरूष समतेची जाणीव वाढत असताना, स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत असताना,पुरूषी वर्चस्वभावना अधिक उफाळून यावी हे दुर्दैवी आहे.हा संक्रमण काळ आहे.प्रत्येक पुरूष बलात्कारी नसला तरी कोणताही पुरूष बलात्कारी असू शकतो हे लक्षात घेणे अटळ बनले आहे.
खरा प्रश्न पुरूषी मानसिकता बदलण्याचा आहे.बळजबरीत सुख नसते. बळाचा वापर ही हिंसा आहे.स्त्रियांच्या शरीरावर त्यांचाच हक्क असतो.स्त्रियांची वेशभूषा,केशभूषा, भाषा आणि मोकळे वागणे यामुळे पुरूष आपले नियंत्रण हरवतात हा युक्तीवाद बाष्कळपणाचा आहे. २ आणि ५ वर्षांच्या चिमुरड्यांवर होणारे बलात्कार त्यांच्या उत्तेजक कपड्यांमुळे होतात असे म्हणणारांना पागलच म्हटले पाहिजे.दिल्लीच्या घटनेनंतर काही ’पुरूषी’ प्रतिक्रिया आल्या होत्या. ’सितेने लक्ष्मणरेषा ओलांडली की रावण येणारच’ असे म्हणणार्या मंत्र्याच्या मध्यप्रदेशातील ५ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झालेला आहे. तिने कोणती लक्ष्मणरेषा ओलांडली होती? हे प्रकार फक्त इंडीयात होतात, भारतात नाही असे सांगणारे ग्रामीण भागातील बलात्कारावर तोंडाला चिकटा आल्याच्या स्थितीत आहेत.एक तथाकथित संत म्हणाले होते ’मुलींनी भय्या म्हणून पाय धरले तर मुले अत्याचार करणार नाहीत.’ हैवान झालेल्यांना बहिणभावाचे नाते कळते काय?
९० टक्के बलात्कार ओळखीच्या पुरूषांकडून होतात.सामुहीक बलात्कार बर्याचदा सूडभावनेतून किंवा जातीयवादातून होतात.कायदे कडक हवेतच.पण फक्त कायद्याने हा प्रश्न सुटणार नाही. पोलीस, न्यायव्यवस्था, समाज सार्यांनाच जागृक राहायला हवे.संवेदनशीलतेने वागायला हवे. आपल्या कोशातून बाहेर यायला हवे.आज कोणीच स्त्री सुरक्षित नाही अशी खूणगाठ बांधायला हवी. मुख्य म्हणजे सरकारी अनास्था संपायला हवी.बलात्कारीत स्त्रिचा काहीही गुन्हा नसतो. ती बळी असुनही अपराधी समजली जाते. ही सामाजिक चुक सुधारली जायला हवीय. पुरूष मग तो कोणीही असो, त्याची गय करता कामा नये.प्रसंगी त्याच्याविरूध्द सामाजिक बहिष्काराचे हत्यार उगारले जायला हवे.सामाजिक अवमानाला सामोरे जावे लागल्याशिवाय ही माजोरीवृती कमी होणार नाही. प्रसंगी समाजाला कठोर झाल्याशिवाय पर्याय नाही.
आपल्या देशात दांभिकपणाचे कोठार आहे.स्त्रियांना देवी मानायचे आणि भोगदासीसारखे वागवायचे हा दुटप्पीपणा थांबायला हवा. ’नको देवी नको दासी, समान स्थान हवे आम्हास’, अशी कणखर भुमिका स्त्री चळवळ घेत आहे तिचे स्वागत व्हायला हवे. ’रमा सावित्री घरोघरी, जोतीभिमाचा शोध जारी’, ही शोधमोहीम अधिक गतीमान व्हायला हवी.महात्मा फुले, महर्षि कर्वे, आगरकर,रानडे, लोहिया, गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातूनच स्त्रीपुरूष समतेचा मार्ग सुलभ होईल. स्त्रियांच्या प्रगतीवरूनच देशाची प्रगती मोजावी लागत असल्याने, भृणहत्येचा प्रश्न, लैंगिक हिंसाचार आणि पुरूषी वर्चस्वाची भावना याकडे फार गंभीरपणे पाहायला हवे.नुस्त्या प्रबोधनाने,प्रार्थनेने, विनंतीअर्जांनी हा प्रश्न सुटणार नाही. हा हितसंबंधांचा प्रश्न असल्याने प्रसंगी राजकीय ईच्छाशक्तीच्या जोरावर कठोर कायदेशीर पावले उचलूनच हा प्रश्न सोडवला पाहिजे. सामुदायिक विवेकबुद्धीचा भलेपणा आणि सामाजिक शहाणपण यांच्या जोरावर ह्या प्रश्नाला भिडले नाही तर गार्गी मैत्रेयीचा, जिजाऊ-सावित्रीचा,रमा-अहिल्येचा हा भारत बलात्कारभुमी झाल्याचे बघत बसावे लागेल.
अतिशय सडेतोड आणि डोळे उघडवुन बघायला लावणारा लेख..
ReplyDelete