Sunday, September 15, 2013

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण?

http://epaper.tarunbharat.com/158834/Tarun-Bharat/BELGAUM#page/4/1....
Belgaon Tarun Bharat, Thursday, 12 Sept.2013, All Edition

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आहेत. विराट साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवडला यावर्षी संमेलन होणार आहे.अध्यक्षपदाच्या रिंगणात संजय सोनवणी, प्रभा गणोरकर,अरुण गोडबोले आणि फकीरराव मुंजाजी शिंदे असे ४ साहित्यिक आहेत. १६ आ‘क्टोबरला निवडणूक निकाल घोषित होणार आहे. साहित्यबाह्य वादांमुळे ही निवडणूक गाजू नये अशी या चौघांचीही इच्छा असल्याचे त्यांनी घोषित केलेले आहे.त्यामुळे वादांची वादळे होण्याची परंपरा मोडीत निघणार की काय याची अनेकांना चिंता लागली आहे.निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही जेव्हा काही मंडळी निवडणूक नकोच असे म्हणतात तेव्हा उत्तम विनोदाचा नमुना म्हणून त्याकडे बघायला हरकत नसावी.महामंडळाच्या घटनेप्रमाणे प्रमोद आडकर या निर्वाचन अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रक्रिया सुरु होवून १ महिना झालेला आहे.
अखिल विश्वातील साडेदहा कोटी मराठी भाषकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या या संमेलनाच्या अध्यक्षांची निवड अवघे १०६९ मतदार करणार आहेत.याचा अर्थ लाखात फक्त एकाला मताचा अधिकार आहे. या मतदार यादीकडे एक नजर टाकली तर काय दिसते? १४ माजी अध्यक्ष, ९ महामंडळाच्या महाकोशाचे विश्वस्त, महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई, विदर्भ साहित्य संघ, नागपूर या चार घटक संस्थांचे प्रत्येकी १७५ याप्रमाणे ७०० प्रतिनिधी, मराठी साहित्य परिषद,हैद्राबाद, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, गुलबर्गा, मध्यप्रदेश मराठी साहित्य संघ, भोपाळ, गोमंतक साहित्य सेवक मंडळ, पणजी, गोवा, छत्तीसगड मराठी साहित्य परिषद, बिलासपूर, या ५ समाविष्ट साहित्य संस्थांचे प्रत्येकी ५० याप्रमाणे २५० प्रतिनिधी, मराठी वाड्मय परिषद,बडोदे या संलग्न संस्थेचे ११ प्रतिनिधी आणि सासवडच्या स्वागत मंडळाचे ८५ प्रतिनिधी असे हे १०६९ मतदार आहेत.
आजवर ८६ साहित्य संमेलने झालेली असून त्याच्या अध्यक्षपदावर कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष या चार महिला विराजमान झालेल्या आहेत. कवी अनिल आणि कुसुमावतीबाई हे पतीपत्नी अध्यक्ष झालेले होते. यावर्षी पूर्वाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या पत्नी प्रभा गणोरकर या निवडणूक लढवित आहेत.फ.मु.शिंदे आणि श्रीमती गणोरकर यांची ओळख प्रामुख्याने कवी ही आहे. सोनवणी हे तरूणांचे प्रतिनिधी असून ते लोकप्रिय नी समिक्षकप्रिय कादंबरीकार,कवी, नाटककार, वैचारिक लेखक, संशोधक अशा बहुआयामी प्रतिभेचे धनी आहेत. ते मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय ब्लोगर असून त्यांच्या ब्लोगला आजवर ३लाख,६हजार,३७१ हिट्स मिळालेल्या आहेत.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जनआंदोलनाचा रेटा निर्माण करण्यासाठी आपण निवडणूक लढवित आहोत.यानिमित्ताने साहित्य, तरूण आणि सोशल मिडीया याकडे लक्ष वेधण्यासाठी आपली उमेदवारी आहे ही त्यांची भुमिका विविध थरांतून उचलून धरली जात आहे.
या मतदारांमध्ये ७७% पुरुष मतदार असून महिला अवघ्या २३% म्हणजे २४४ आहेत.मराठी साहित्य परिषद,हैद्राबाद, आंध्र प्रदेश,येथील मतदारात ५०% महिला मतदार असून सर्वात कमी महिला मतदार म्हणजे अवघ्या ९% मतदार मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादच्या आहेत. दादा गोरे आणि सुनंदा दादा गोरे तसेच डहाके आणि गणोरकर पतीपत्नी दोघेही मतदार आहेत. मराठवाड्याच्या यादीत अमेरिकेचे अरुण प्रभुणे मतदार आहेत. मतदारांचा विचार करताना साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा विचार करायला हवा. त्यांच्या जातीधर्माचा उल्लेख गैरलागू ठरणार हे स्वाभाविकच होय. तरीही सामाजिक चित्र पाहायचे झाल्यास काय दिसते? या मतदारांत २९ कुलकर्णी आहेत तर २८ पाटील आहेत.स्वागत समितीत जगताप या आडनावाचेच १५% मतदार आहेत. टक्केवारी बघायची झाली तर आजवर साहित्य क्षेत्रात ज्या पांढरपेशा समाजाची एकहाती मक्तेदारी होती ती मोडीत काढीत सत्ताधारी समाजाने या मतदारातही जोरदार मुसंडी मारलेली आहे. फार लवकरच हे प्रमाण समसमान होईल असे चित्र आहे. मुस्लीम समाजाला मतदारात अवघा अर्धा टक्का स्थान मिळालेले आहे. मतदार यादीतील जयंत साळगावकर यांचे २०आ‘गष्ट रोजी निधन झाले आहे.
अध्यक्षपदाची निवडणुकच नको असे म्हणणारे ना.धों. महानोर आणि शिरिष पै हे दोघे अध्यक्षपदाचे मतदार मात्र आहेत. या मतदारांमधील पुर्वाध्यक्षांव्यतिरिक्त सर्वात ज्येष्ट साहित्यिक म्हणजे मंगेश पाडगावकार आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे यावेळी चक्क अनेक श्रेष्ठ साहित्यिक मतदार आहेत. साहित्याच्या क्षेत्रातील काही दिग्गज या मतदारात आहेत. आशा बगे, रावसाहेब कसबे, ह.मो.मराठे, अरुणा ढेरे, आनंद यादव, सदानंद मोरे,श्रीनिवास कुलकर्णी, सुधीर रसाळ,जनार्दन वाघमारे, राजन खान,आसाराम लोमटे, इंद्रजित भालेराव, प्रभाकर बागले, रा.रं.बोराडे, रामदास भटकळ, दिलीप माजगावकर, दिनकर गांगल, वसंत सरवटे, नीरजा, शंकर वैद्य, माधव भागवत,अशोक कोठावळे, प्रेमानंद गज्वी,अरुण टिकेकर, अंबिका सरकार, अशोक नायगावकर, वसंत दत्तात्रय गुर्जर, गंगाधर पाटील, मीना प्रभू,सतिष काळसेकर, अप्प परचुरे, प्रतिभा रानडे, नामदेव कांबळे, ही काही नावे वाणगीदाखल सांगता येतील.
मराठवाड्याची एकगठ्ठा मते औरंगाबादचे फमु घेणार तर अमरावतीच्या गणोरकर विदर्भाची मते खाणार अशा भाषेत काही मंडळी बोलतात तेव्हा साहित्याच्या क्षेत्रातही प्रांतवाद असतो असे म्हणायचे काय? भोपाळच्या मतदारांच्या यादीत अपवादालाही बहुजनातील फारसे कोणी नसावे आणि मराठवाड्याच्या यादीत बहुसंख्य नावे एकट्या सत्ताधारी जातीचीच असावीत हे दुर्दैव नाही काय? मराठवाडा सरंजामी मानसिकतेमधून बाहेर येताना कधी दिसणार असाही प्रश्न काहीजण विचारतात. १७५ मतदारांमध्ये ठालेपाटलांना १६ पेक्षा जास्त महिला मिळू नयेत हे कशाचे लक्षण आहे?
या मतदार यादीवर साहित्य क्षेत्रापेक्षा साहित्यबाह्य क्षेत्राचा ६० ते ७०% प्रभाव असावा हे बघून ही निवडणूक साहित्य संमेलनाची आहे की जिल्हा परिषदेची? असाही प्रश्न विचारता येईल. महाराष्ट्राबाहेरीलही मंडळी मराठीवर अपार प्रेम करतात.बेळगाव,निपाणीच्या सीमाभागातील लोक गेली अनेक पिढ्या मराठीसाठी संघर्ष करीत आहेत. पण त्यातले कोणीच या मतदारात का नाहीत? समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्था यातील मतदारात साहित्यिक किती आहेत? त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीही का नसावी?प्रश्न अनेक आहेत. तथापि प्रथमच या निवडणुकीत मतदार संख्येचा विस्तार करण्यात आला आहे, तिच्यात बर्‍याच घटकांना पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळत आहे, याचे स्वागत करायला हवे.निवडणूक प्रक्रियेत येत असलेल्या पारदर्शकतेसाठी महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांना धन्यवाद द्यायला हवेत.
अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याचा निर्णय १६ आ‘क्टोबरला लागेल. गुणवत्तेवर निर्णय व्हावा, जात किंवा प्रांतीय भावनेवर नाही एव्हढीच अपेक्षा.सर्व उमेदवारांना शुभेच्छा.
.............................................................................................

No comments:

Post a Comment