Tuesday, January 7, 2014

अभिजात मराठीचे ऐतिहासिक स्वरूप

http://www.eprabhat.net/news/46-story.aspx.....
http://epaper.eprabhat.net/208810/Pune-City-Edition/CITY-EDITION#page/4/1

दै.प्रभातच्या श्रीमती वसुधा जोशी यांचा मला फोन आला होता. म्हणाल्या "तुम्ही सादर केलेल्या अभिजात मराठीच्या अहवालाबद्दल माहिती हवी आहे. कधी भेटू?"मी म्हणालो, मीच येतो प्रभातवर.
२५ डिसेंबरला महाराजा यशवंतराव होळकर पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर मी दै.प्रभातच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.त्यांच्याशी दोन तास गप्पा मारल्या. त्यांना दिलेली ही माहिती त्यांनी शब्दांकीत केलेली आहे...साहित्य संमेलनाच्या निमित्ताने "अभिजात मराठीची" चर्चा पुढे जात आहे याचा आनंद आहे.त्यांनी पठारे समितीचा उल्लेख केला याबद्दल आभार. दै.प्रभातला धन्यवाद......by Hari Narke
..........................................
संपादकीय
अभिजात मराठीचे ऐतिहासिक स्वरूप
देशात तमिळ, संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम् या पाच भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळाला. मराठीलाही केंद्र सरकारने अभिजाततेचा दर्जा द्यावा, यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २० जुलै २०१३ रोजी अहवाल सादर केला. त्यामुळे मराठीला लवकरच अभिजाततेचा दर्जा मिळेल, अशी आशा आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगले असताना मराठीच्या या अभिजाततेची आठवण ठेवणे गरजेचे आहे.
- वसुधा जोशी

एक होता कावळा, एक होती चिमणी. चिमणीचे घर होते मेणाचे... बाळ जन्माला आल्यापासून घराघरांत सांगितली जाणारी ही गोष्ट. लीळा चरित्रात आलेली ही कथा; पण त्यापूर्वी किमान हजार वर्षे लोकपरंपरेत होती. इतका हा जुना वारसा आपण पिढ्यान् पिढ्या चालवत आलो आहोत. मग तो पुढे नेण्याचा वसाही आपणच घेतला पाहिजे. मराठी ही अभिजात भाषा आहे, याविषयी मराठी माणसाच्या मनात कोणताही शंका नाही. ज्ञानोबा-तुकारामांपासून आजपर्यंत मराठीने आपल्याला किती समृद्ध केले आहे, हे आपण जाणतोच; पण मराठीचा इतिहास ज्ञानोबा-तुकारामांच्या संत साहित्यापासून सुरू होत नाही. संत साहित्यात आलेली मराठी पूर्णतः विकसित, शिखरावर असलेली भाषा आहे. मराठीच्या इतिहासाचा शोध घेतला तर त्याची पाळेमुळे दोन हजार वर्षांपूर्वीपेक्षाही आधी जातात. सातवाहन राजा हल यांनी संकलित केलेली ‘गाथासप्तशती’चा काळ सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. गोदावरी काठच्या पैठणच्या लोकांचे जीवन या गाथेत आले आहे.
तमिळ भाषेत संगम साहित्य हे अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याचा काळ सुमारे २६०० ते २३०० असा आहे. या साहित्यातही मराठी भाषक लोकांचा उल्लेख आहे. गोदावरी नदीवर धरण बांधण्यासाठी जगभरातून तंत्रज्ञ आले. त्यात मराठीत बोलणारे गवंडी कामात अतिशय प्रवीण आहेत, असे मराठी लोकांबद्दलचे वर्णन आले आहे. याचा अर्थ त्या काळातही या भाषेला मराठी म्हटले जायचे, हे स्पष्ट होते. सातवाहन काळातील एक शिलालेख जुन्नर येथील नाणेघाटात सापडला आहे. सुमारे २२२० वर्षापूर्वींच्या या शिलालेखात लिपी ब्राह्मी आहे. त्यात महारठ्ठो असा उल्लेख आहे. त्याचबरोबर इतर लेण्यांमध्ये महारठ्ठींनो, महारठ्ठीगण, महारठ्ठी असे मराठी भाषक लोकांबद्दल उल्लेख आढळतात. बौद्ध धर्माची पहिली संगिनी बिहार राजगृह येथे झाली. त्यावेळी विनयपिटक पाली भाषेत लिहले. त्यामध्ये महाधम्मरक्षित नावाच्या भन्तेंना अपरांत (कोकण), कुंतल (प. महाराष्ट्र), अश्मक (मध्य महाराष्ट्र) येथे पाठवले असून, ते मराठीत धम्मप्रचार करतात, असा उल्लेख आला आहे. इ. स. दुसर्‍या शतकात वररूची या व्याकरणकाराने ‘प्राकृतप्रकाश’ हा व्याकरण ग्रंथ लिहला. पैशाची, शौरसेनी, मगधी, पाली, महाराष्ट्री या प्रमुख प्राकृत भाषा असून, या सर्वांना महाराष्ट्राचे (मराठीचे) नियम लागू पडतात, असा नियम त्यांनी सांगितला आहे. जम्मू-काश्मीरच्या गुणाढ्य याने बृहतकथा हा ग्रंथ पैशाची भाषामध्ये लिहिला. त्यामध्ये अनेक प्रकरणे मराठीत आहेत. कारण, तो मूळचा वत्सगुल्म म्हणजे वाशिमचा होता. हेमचंद्र हा व्याकरणकारही मराठीचे अनेक दाखले देतो. दीपवंश-महावंश हे पाली भाषेत व सिंहली लिपीतील ग्रंथ आहेत. त्यातही मराठीचे वैभव सांगण्यात आले आहे. जैन लेखक हरिभद्र तसेच, उदयोत्तन सुरी, शुद्रक, कालीदास यांनीही मराठीचे पुरावे दिले आहेत. कालीदासाच्या नाटकातील स्त्री पात्रे मराठीत संवाद साधतात.

मराठीचे आतापर्यंत विविध टप्पे दिसतात. त्यामध्ये महारठ्ठी हा पहिला टप्पा होता. त्यानंतर महाराष्ट्री, अपभ्रंश, देशी हे टप्पे दिसतात. हे टप्पे इ. स. पूर्व ६०० पासून आजपर्यंत म्हणजे २०१३ पर्यंतच्या काळातील आहेत. प्राकृत-अपभ्रंश-मराठी या तीन वेगळ्या भाषा नसून, तीन टप्पे आहेत. लिपीचाही प्रवास विविध टप्प्यात दिसतो. देवनागरी ही सुमारे हजार वर्षे अस्तित्वात आहे. त्यापूर्वी लिपीचा प्रवास ब्राह्मीपासून झाला आहे. मधल्या काळात सुंदर, सकला, मोडी ही धावती लिपी दिसतात. हॉर्वड विद्यापीठातील विट्झेल मिखाईल यांनी ‘ट्रेसिंग द वैदिक डायलेक्ट्स’ हा शोधनिबंध लिहिला. त्यामध्ये संस्कृती ही वैदिक पूर्व बोली भाषेतून जन्माला आली असे सांगितले आहे. मराठी ही अशाच वैदिक पूर्व बोलीभाषेतून जन्माला आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महामहोपाध्याय राजारामशास्त्री भागवत, श्रीधर व्यं. केतकर, ल. रा. पांगारकर, शं. गो. तुळपुळे, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, इरावती कर्वे अशा अनेकांनी मराठीचा इतिहास वेळोवेळी सिद्ध करून दाखविला आहे. भांडारकर संस्थेत सापडलेले कागदपत्रे, पोथ्या त्याचप्रमाणे विविध ठिकाणचे कोरीव लेख, ताम्रपट यावरून मराठीचे वय दोन हजार वर्षांपेक्षा अधिक असल्याचे पुरावे सापडले आहेत.
मराठीने इतर अनेक भाषांमध्येही आपले योगदान दिले आहे. तसेच इतर भाषांकडूनही तिने अनेक शब्द घेतले आहेत. वैदिकपूर्व बोली भाषा, पाली, शौरसेनी, मगधी, अर्धमागधी, संस्कृत, द्रविड भाषा, पर्शियन मुघल भाषा या सर्वांचा प्रभाव मराठीवर दिसतो. जगातील सर्वच भाषा अशा एकमेंकीकडून घेत-देत विकसित झालेल्या दिसतात. त्याचप्रमाणे मराठीही झाली आहे.

कशावरून ठरणार अभिजातता
केंद्र सरकारने भाषेची अभिजातता ठ़रविण्यासाठी काही निकष जाहीर केले. त्यामध्ये भाषेचे लिखित स्वरूप असलेले सुमारे १५०० ते २ हजार वर्षे इतके जुने पुरावे असणे गरजेचे आहे. भाषा ही दुसर्‍या भाषेचे प्रतिरूप असता कामा नये. भाषा म्हणून तिचे स्वतंत्र अस्तित्व असावे. त्या भाषेत श्रेष्ठ दर्जाचे साहित्य निर्माण झालेले असावे. भाषा प्रवाही असते. त्यामध्ये आजच्या भाषेचे दोन हजार वर्षापूर्वीच्या भाषेशी नाते असावे हे निकष मांडण्यात आले. मराठी हे सर्व निकष पूर्ण करते.
- See more at: http://www.eprabhat.net/news/46-story.aspx#sthash.u9SO7pPT.dpuf

No comments:

Post a Comment