Thursday, August 13, 2015

स्वातंत्र्य आणि शोषणाची साखळी--प्रतिमा जोशी

http://maharashtratimes.indiatimes.com/edit/article/porn-ban-freedom-and-harassment/articleshow/48429161.cms
प्रतिमा जोशी या सामाजिक विचारवंत आणि लेखिका आहेत. त्यांनी एका ज्वलंत विषयाच्या दुखर्‍या आणि दुसर्‍या बाजूवर समर्पक प्रकाशझोत टाकला आहे. आपल्याला काय वाटते?
म.टा. मंगळवार, दि.११ आगष्ट, २०१५,संपादकीय पानावरील ’विचार’
सौजन्य : म.टा.
स्वातंत्र्य आणि शोषणाची साखळी
Maharashtra Times| Aug 11, 2015, 12.10 AM IST
प्रतिमा जोशी
स्वातंत्र्याच्या दुसऱ्या टोकाला बरेचदा शोषणाची एक अदृश्य साखळी असू शकते. कोण बांधले गेलेय त्या साखळीत? त्यांच्या व्यक्ती म्हणूनच्या स्वातंत्र्यासह सर्व थरांतल्या सर्व नागरिकांचे उपभोगाचे स्वातंत्र्य कसे अबाधित ठेवायचे?

तुम्ही पोर्न पाहता, म्हणजे नेमके काय पाहता? असा प्रश्न व्हेनेसा बेलमाँडने उपस्थित केला आहे. ही पंचविशीतली अमेरिकन तरुणी अलेक्सा क्रुज या नावाने अगदी आताआतापर्यंत पोर्न स्टार म्हणून कार्यरत होती. तिच्या या प्रश्नामागे नैतिक-अनैतिकतेचा सोवळा पवित्रा नाही, माणसाच्या लैंगिक प्रेरणांना ती अपवित्र मानत नाही.. मात्र तरीही सामाजिक न्यायाची बाजू घेणाऱ्या संवेदनशील व्यक्तींना दखल घ्यावी लागेल असे काहीतरी तिच्या या प्रश्नात दडलेले आहे. हे 'काहीतरी' तिच्याच शब्दांत सांगायचे, म्हणजे वेदना, मानसिक खच्चीकरण, सामान्य आयुष्य जगण्याच्या इच्छेची धुळधाण हेच अनुभव देणारा मनुष्यदेहांचा व्यापार आहे. सहासात वर्षांच्या बालकांपासून मध्यम वयातल्या स्त्रीपुरुषांपर्यंतच्या व्यक्ती इथे फक्त सेक्स ऑब्जेक्ट म्हणून वापरल्या जातात आणि आयुष्यभर जगभरात नाना वर्गवारीत चालत असलेल्या फ्लेश ट्रेडमधील 'माल' म्हणून मरण येईपर्यंत जगत राहतात.

काय आहे ही शोषणाची साखळी? कोण बांधले गेलेय त्यात? त्यांचे स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? आणि त्यांच्या व्यक्ती म्हणूनच्या स्वातंत्र्यासह सर्व थरांतल्या सर्व नागरिकांचे उपभोगाचे स्वातंत्र्य कसे अबाधित ठेवायचे? या सर्वांची उत्तरे व्हेनेसानेच द्यायला हवीत असे नाही. जगभरात मोठ्या संख्येने पोर्न फिल्म पाहिल्या जातात. या फिल्म ज्यांच्यावर चित्रित झालेल्या असतात, त्या सर्वच व्यक्ती स्वेच्छेने त्यात सहभागी झालेल्या असतात अशा समजुतीत बव्हंश असतात किंवा हा प्रश्नच फारसा कुणाला पडत नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. व्हेनेसाने तर स्वेच्छेचीही जी चीरफाड केली आहे, ती अंतर्मुख करणारी आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी ओळखीच्याच व्यक्तीने तिला 'तसे' करायला लावले, त्याचे चित्रण होते आहे याची कल्पनाही नसलेली ही मुलगी प्रचंड 'हिट' झाली आणि मग तेच तिचे आयुष्य बनले.

पोर्न सातत्याने पाहणाऱ्या व्यक्ती कालांतराने काहीतरी अधिक अनैसर्गिक, आक्रमक, हिंसक पाहू मागतात. या मागण्या पूर्ण करताना पोर्न व्यापारी अधिक भडक दृश्ये बाजारपेठेला पुरवतात, मात्र या मागणी-पुरवठ्याच्या खेळात पोर्नमध्ये काम करणाऱ्या शरीरांची चाळण होत असते. वेगवेगळे रोग, आजार, मानसिक संतुलन ढळणे याची ते शिकार होतात. अशाच एका दृश्यात व्हेनेसा रक्तबंबाळ झाली, वेदनेने मरणासन्न झाली..आणि मग तिने यातून बाहेरच पडायचा निर्णय घेतला. पण तिच्यासारखी स्वतःची सुटका सर्वांनाच करून घेता येत नाही. गावशहरांतले कुंटणखाने, शरीरव्यापाराची नानाविध दुकाने येथे नवनव्या व्यक्ती दाखल होत राहतात, त्यांना या साखळीत गुंतवणाऱ्या दलालांच्या इशाऱ्यावर पोर्नसाठी काम करत राहतात.

खरे तर या साऱ्याशी आपण अगदीच अपरिचित नाही आहोत. कधी गोव्यात (खरे तर देशभरच) छोट्या मुलांचा व्यापार चालत असल्याच्या बातम्या आपण वाचतो, बरेचदा हरवलेल्या मुलामुलींच्या जाहिराती पाहतो, चेहरे रंगवून रस्त्यावर उभ्या राहिलेल्या स्त्रिया आपल्याला ठावूक असतात... आणखीही कितीतरी गोष्टी आपल्याला ठावूक असतात. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राला हालवून सोडणाऱ्या जळगाव वासनाकांडामागे अशीच कहाणी होती, आणि हे एक केवळ उदाहरण! पाहणाऱ्याला उत्तेजित करणाऱ्या, पाहण्याचे स्वातंत्र्य बहाल करणाऱ्या पोर्नमधली माणसे मात्र त्यांचे स्वातंत्र्य गमावून बसलेली असतात. सर्वसामान्य आयुष्यात परतण्याच्या त्यांच्या वाटा पुसल्या गेलेल्या असतात.

आणखी एक महत्वाचा मुद्दा गेल डाइन्स या सामाजिक कार्यकर्तीने मांडला आहे. सतत पोर्न पाहून व्यक्तीची 'नजर मरते' असे निरीक्षण त्यांनी मांडले आहे. अशा व्यक्ती दुसऱ्याकडे व्यक्ती म्हणून नव्हे, तर शरीर म्हणूनच पाहतात आणि एकतर हिंसक होतात किंवा नैराश्याने विझून जातात. दिल्लीतील निर्भया प्रकरण किंवा शक्ती मिल प्रकरण ही याची उदाहरणे म्हणून पुरेशी ठरावीत. पोर्नमुळे लैंगिक इच्छांचा निचरा होतो, की आक्रमक नि असंवेदनशील लैंगिकतेला खतपाणी मिळते हा वादाचा विषय ठरू शकतो.

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने ८५७ पोर्न साइट ब्लॉक केल्या, त्यावर असंख्य प्रतिक्रिया उमटल्या. त्या बव्हंशी नाराजी आणि निषेधाच्याच होत्या. मात्र त्यामागे सरकार आपल्या अधिकारांच्या कक्षा चौकटीबाहेर ताणत समाजव्यवहारांवर नियंत्रण ठेवू पाहतेय हा 'विचार' कितपत प्रबळ होता, याविषयी शंका आहे. आमच्या घरात आम्ही काय पाहावे हे आता तुम्ही ठरवणार का असा सूर उमटला. सरळ आणि सपाटपणे पाहिले, तर अत्यंत वाजवी असाच तो सूर आहे. कामशास्त्राचे 'मूर्तिमंत' लेणे असलेले खजुराहो कापडाने झाकून ठेवल्याचे विडंबनात्मक चित्रही सोशल मिडियात फिरले. मनुष्याच्या लैंगिक प्रेरणा या नैसर्गिक असतात आणि त्यावर नीती-अनीतीच्या कल्पनांचे ओझे टाकून त्यांचे दमन करू नये या विधानाशीही असहमत होण्याचे कारण नाही.

ज्याला पाहायचे तो पोर्न पाहेल, नाही तो पाहणार नाही..पण कुणी पाहूच नये अशा हेतूने बंदी घालून नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नये हा युक्तिवाद पूर्णपणे समर्थनीय आहेच; पण स्वातंत्र्याच्या दुसऱ्या टोकाला बरेचदा शोषणाची एक अदृश्य साखळी असू शकते हे वास्तवही समजून घेण्याची गरज आहे. विसंगती अशी, की आपल्या अधिकाराबाबत जागृत असणारी मंडळी या साखळीचे जे शोषित घटक आहेत, त्यांच्या सन्मानाने जगण्याच्या स्वातंत्र्यावषयी बेफिकीर असतात. एकाच्या स्वातंत्र्याच्या वेदीवर दुसऱ्याचे स्वातंत्र्य नांदत असते.

पोर्नबंदीविरोधी आवाज वाढला, तशी सरकारने ती मागे घेतली. याचा अर्थ ती मूळात लागू झाली होती, तीच मुळी पावित्र्याशी निगडित नैतिक-अनैतिकतेच्या निसरड्या पायावर आणि संस्कृतीरक्षणाचा पवित्रा घेऊन! असंख्य दुबळ्या, निर्णयाचे आणि निवडीचे स्वातंत्र्य नसलेल्या व्यक्तींच्या शोषणाचा मुद्दा सरकारच्याही गावी नव्हता. लोक आणि सरकार, या दोहोंतही असे साम्य क्वचितच आढळते!
...................

No comments:

Post a Comment