Sunday, September 20, 2015

धनगरांचा गौरवशाली इतिहास









धनगरांचा गौरवशाली इतिहास,’ संजय सोनवणींचे नवे मौलिक संशोधन -एक हजार प्रती हातोहात संपल्या.

”ख्वाडा’ चे प्रतिभावंत दिग्दर्शक भाऊराव कर्‍हाडेंना यशवंतराव होळकर पुरस्कार प्रदान-

पुणे, दि.२० सप्टें.: आज सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयाचे सभागृह तुडुंब भरलेले होते. तरूणांची एव्हढी हाऊसफुल्ल गर्दी पुण्यात तरी मी प्रथमच पाहात होतो.
निमित्त होते इतिहासकार संजय सोनवणी यांच्या ८५ व्या पुस्तकाचे प्रकाशन व ख्वाडाचे दिग्दर्शक भाऊराव कर्‍हाडे यांना यशवंतराव होळकर पुरस्कार प्रदान करण्याचे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा.स.प.चे अध्यक्ष आमदार महादेव जानकर होते.
याप्रसंगी संजय सोनवणींनी पुस्तकलेखनामागील भुमिका मांडली. "आम्हाला नव्या जगातील महापुरूष घडवायचे आहेत. त्याचे भान देण्यासाठी हे लेखन आहे.केवळ इतिहासात रमण्यासाठी किंवा गमजा मारण्यासाठी नाही. इतिहास लेखन व ज्ञानविज्ञान संशोधनासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करायला हव्यात’ असे ते म्हणाले.
भाऊराव कर्‍हाडे यांनी ख्वाडाच्या निर्मितीमागच्या प्रेरणा, हालअपेष्टा आणि खडतर वाटा यांचे प्रांजळ कथन केले. त्यांच्या सच्चेपणाने उपस्थित भाराऊन गेले.
नागपूरचे होमेश भुजाडे यांनी सोनवणींच्या इतिहासलेखनाची सामर्थ्ये उलगडऊन दाखवली.
महादेव जानकर यांनी सोनवणी व कर्‍हाडे यांच्या पाठीशी सगळे बळ उभे करू असे सांगितले.
हरी नरके यांनी "मराठी चित्रपटात स्थलांतरितांची व्यथा चित्रभाषेत ज्या ताकदीने कर्‍हाडेंनी चिमटीत पकडून मांडली आहे, ती काळीज पिळवटून टाकणारी आहे. पथेर पांचालीच्या तोडीची श्रेष्ठ दर्ज्याची कलाकृती निर्माण करून आजच्या काळाचा सत्यजित रे होण्याची क्षमता भाऊंरावांमध्ये असल्याचे त्यांनी दाखऊन दिले आहे.या मुलाने अशीच मेहनत घेतली तर फार लवकर तो जागतिक किर्तीचा दिग्दर्शक होऊ शकेल. समकालीन सामाजिक आणि राजकिय वास्तवाचा उभा छेद ज्या धाडसाने आणि कलात्मक ताकदीने हा चित्रपट घेतो असे काम आजवर कोणताही मराठी चित्रपट करू शकला नव्हता" असे सांगितले.
नरकेंनी संजय सोनवणींच्या संशोधन आणि लेखनाचे असंख्य पुरावे श्रोत्यांपुढे ठेऊन पुस्तकाची पहिली आवृत्ती एका दिवसात संपल्याबद्दलच्या प्रतिसादाचे कौतुक केले.
कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून मान्यवर लोक आले होते. सोनवलकर यांनी सुत्रसंचालन केले. उपस्थितांनी पुस्तकाची एव्हढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी केली की एक हजार प्रती हातोहात संपल्या.
एक अतिशय देखणा आणि वैचारिक समृद्धता निर्माण करणारा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश खाडे यांना धन्यवाद.

No comments:

Post a Comment