जातिव्यवस्थेचा शोध घेणारा मौलिक ग्रंथ-प्रा.हरी नरके
श्री सुनिल सांगळे यांनी "जातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जातीजमाती" हा ग्रंथ लिहून अतिशय मोलाचे काम केलेले आहे. जातीपातींचा विषय हा अस्मितेचा आणि वादंगाचा विषय असतो. अलिकडे तर तो अतिशय ज्वलंत किंबहुना स्फोटक विषय बनलेला आहे. या वादग्रस्त विषयाला हात लावण्याची हिंमत आज भलेभले विद्वानही करताना दिसत नाहीत. कोणाच्या भावना कधी दुखावल्या जातील आणि कधी रान पेटेल याची शाश्वती राहिलेली नाही. अशा काळात एक अतिनाजुक बनलेला विषय ज्या प्रगल्भपणे सांगळे यांनी उलगडून दाखवला आहे, ज्या संयमाने आणि समतोलपणे मांडणी केलेली आहे त्याच्यासाठी त्यांचे मी सर्वप्रथम हार्दीक अभिनंदन करतो. सांगळे यांच्या या पुस्तकाद्वारे एका विपरित सामाजिक व्यवस्थेची केलेली उकल ही सर्वांनाच आत्मपरिक्षणाला प्रवृत्त करेल असा मला भरवसा वाटतो.
या विषयावर मराठी व इंगजी भाषेत अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत. त्यातली डॉ. श्री. व्यं. केतकर, डॉ. गो.स. घुर्ये, डॉ. इरावतीबाई कर्वे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आर. ई. इंथोवेन, रसेल - हिरालाल, त्रिं. ना. आत्रे आदींची पुस्तकं महत्वाची आहेत. बाकी इतर भाराभर पुस्तकातली बहुतांश पुस्तकं एकतर सवंग, उथळ, कंठाळी तरी आहेत किंवा विद्वतजड तरी आहेत. ही दोन्ही टोकं टाळून सांगळे यांनी अतिशय सोप्या, प्रवाही, सुबोध भाषेत ही रचना केलेली आहे. हा ग्रंथ सर्वसामान्य वाचकांसाठी असला तरी संशोधक-अभ्यासकांनाही तो उपयुक्त ठरेल असा झालेला आहे.
याविषयावरील अक्षरश: डझनावारी ग्रंथांचा शोध घेऊन त्यातले विवेचन आपल्या सोप्या भाषेत सांगळे आपल्याला उपलब्ध करून देतात. बोजड लिहिणे सोपे असते. मात्र सोपे लिहिणे सर्वात अवघड असते. सोपं लिहिण्याच्या या कसोटीत सांगळे अव्वल ठरलेले आहेत. विषय सोपा करतानाही त्याचे मर्म किंवा गाभा सांगळे चिमटीत पकडून आपल्यासमोर सादर करतात.
खरंतर सांगळे यांनी कोणत्याही पीएच.डी. प्रबंधापेक्षा सरस कामगिरी केलेली आहे. एखाद्या विद्यापीठाने त्यांच्या या पुस्तकाचा मानद पदवीसाठी विचार करायला हवा. सांगळे एक निवृत्त सनदी अधिकारी असतानाही त्यांचे वाचन चौफेर असावे याचा आनंद वाटतो. या विषयातली बहुतांश महत्वाची संदर्भ पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत व त्याचे संदर्भ पुस्तकात दिलेले आहेत. हे पुस्तक वाचणारांना ही मूळ संदर्भ पुस्तके वाचण्याची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो.
मुळांचा शोध घेण्याची माणसाला अनावर ओढ असते. आपल्या जातीप्रधान देशात आपापल्या जातींबद्दल माहिती घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. बर्याचदा अशी माहिती निव्वळ ऎकिव असते. तिच्यामध्ये पुर्वगौरवाची भावना दडलेली असते. भारतीय समाज जातीपातींनी बनलेला समाज आहे. त्यातल्या काही जाती या व्यवस्थेच्या लाभार्थी असल्याने त्या एनकेण प्रकारेन या व्यवस्थेचे गोडवे गात असतात. तर ज्या या व्यवस्थेचे बळी आहेत तेही अज्ञानापोटी या व्यवस्थेचे वाहक बनतात. भारतीय समाजात उदात्तीकरण आणि मौन धारण करणे ही दोन षडयंत्रे सतत शिजत असतात. एक उच्चवर्णीय, पुरूषप्रधान, श्रीमंत मंडळींचे उदात्तीकरण करणे आणि दुसरे लिंगभाव, जात आणि वर्ग व्यवस्थेने ज्यांचे अतोनात शोषण केलेले आहे, पक्षपात आणि भेदभाव केलेला आहे त्यांच्या समस्यांबद्दल मौन धारण करणे. सांगळे मात्र या दोन्ही षडयंत्रांना नकार देतात आणि एका अभ्यासकाच्या नात्याने हा विषय निर्भयपणे आपल्याला समजाऊन सांगतात.
सांगळे यांनी अक्षरश: शेकडो जातींची माहिती या पुस्तकात दिलेली आहे. तथापि हे केवळ माहितीचे संकलन नाही तर तिचे सम्यक विश्लेषण आणि समतोल सत्यशोधन या ग्रंथात केलेले आहे.
मनु, कौटिल्य, विविध स्मृतीकार यांचे दाखले सांगळे यांनी दिलेले आहेत. साडेतीन हजार वर्षांचा प्रवास रेखाटताना विद्यमान राष्ट्रपती श्री रामानाथ कोविंद यांचा पुरीच्या मंदिरात कसा अपमान केला गेला यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्याचबरोबर शबरीमाला, शनि शिंगनापूर इथल्याही घटनांची आठवण त्यांनी करून दिलेली आहे. उच्चभ्रू आरक्षण विरोधक विद्यमान सामाजिक, आर्थिक, राजकीय वास्तवाकडे कशी डोळेझाक करतात यावरही झगझगीत प्रकाशझोत त्यांनी टाकलेला आहे.
ब्रिटीश राजवटीत हा देश, इथली माणसं समजाऊन घेण्यासाठी विल्सन, रसेल, इंथोवेन, क्रूक, रिस्ले, केनडी आदींनी या विषयांचा धांडोळा घेणारी पुस्तके लिहिली. दर दहा वर्षांनी जनगणना करून ही माहिती अद्ययावत करण्याची व गॅझिटियर मार्फत जिल्हावार अभ्यास उपलब्ध करून देणारी यंत्रणा विकसित करण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमाद्वारे या विषयाची तोंडओळख करून देण्याची गरज त्यांना वाटली.
त्यातून जातवार धर्मशाळा, संस्था, जातपंचायती, शाळा, महाविद्यालये, बॅंका, पेठा जन्माला आल्या. जातजाणिवा अधिक धारदार झाल्या. जातीव्यवस्था ही मनोर्यासारखी व्यवस्था असल्याने प्रत्येक जात आपण वरचे आहोत हे दाखवण्याचा खटाटोप करीत असते. समाज शास्त्रज्ञ डॉ. एम.एन. श्रीनिवासन म्हणतात त्याप्रमाणे " संस्कृतीकरणाचा " सिंद्धांत अर्थात वरच्यांचे अनुकरण करण्याची वृत्ती हा भारतीय जातींचा याकाळातला स्थायीभाव दिसतो.
महात्मा फुल्यांनी १८६९ साली न्यायासाठी आरक्षण द्या अशी मागणी केली. राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आरक्षण आले. त्यानंतर मात्र जादूची कांडी फिरावी तशी जातींची उतरंड आरक्षणाच्या रांगेत उभी राहिली. आपली जात कशी आणि किती मागासलेली आहे हे मांडण्याची, सिद्ध करण्याची चढाओढच लागली. त्यासाठी उग्र आणि प्रसंगी हिंसक आंदोलने होऊ लागली.
स्वतंत्र भारताचे मंडलपुर्व भारत आणि मंडलोत्तर भारत असे प्रवासाचे दोन ठळक कालखंड बनले.
जातीव्यवस्थेने कामांचे वाटप केले, ती जन्मावर आधारित नव्हती, ती कामांवर आधारित होती अशा प्रकारचे समर्थन कायम केले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मौलिक पुस्तकांद्वारे या मांडणीचे समर्पक खंडन केलेले आहे. मुळात ही व्यवस्था श्रमाचे वाटप करणारी नव्हती तर ती जन्मावर आधारित श्रमिकांचे वाटप करणारी अतिशय काटेकोर मनोर्याची रचना होती. तिने विषमतेचे श्रेणीबद्ध वाटप केले होते. जातीव्यवस्था मुलत: आर्थिक वाटप करणारी, शासनाच्या राजदंडाच्या आधारे चालवली जाणारी व्यवस्था होती.तिने शुद्र, अतिशुद्र आणि स्त्रिया यांचे वारेमाप शोषण केले, त्यांचे मानवी अधिकार हिरावून घेतले याकडे सांगळे लक्ष वेधतात. ही व्यवस्था हिंदुंइतकीच मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शिख आदी धर्मातही कशी पसरली यावरही ते भाष्य करतात.
सांगळे यांनी स्वामी विवेकानंद, ताराबाई शिंदे, लोकहितवादी, विविध दलित-भटक्यांच्या आत्मकथनांचे लेखक आदींचे दाखले देऊन विषयाचे सुबोध आकलन सादर केलेले आहे.
महाराष्ट्रातील शेकडो जातींची सांगळे यांनी दिलेली माहिती समजाऊन घेण्यासाठी तरी कार्यकर्ते, वाचक आणि अभ्यासक ह्यांनी हे पुस्तक संग्रही ठेवले पाहिजे. सुनिल सांगळे व संजय सोनवणी यांच्यासारखे नव्या समाजथरातले लेखक या विषयावर अभ्यासपुर्ण मांडणी करताना बघितले की आजवर खिळखिळी न होणारी ही व्यवस्था निदान किलकिली तरी होईल अशी उमेद वाटू लागते.
आजच्या आधुनिक युगात ही व्यवस्था कालबाह्य झालेली आहे, आज सगळ्यात महत्वाची आहे ती अर्थसत्ता. सारे जग तिकडे झेपावत असताना मध्ययुगीन जातीय मानसिकतेत लोळत पडलेल्या आपल्या समाजाला जातीसंघर्ष काबूत ठेवण्याची हाक सांगळे देतात.
सांगळे यांच्या या समतोल, सम्यक आणि अभ्यासपुर्ण शोधग्रंथाचे स्वागत होईल असा मला विश्वास वाटतो.
- प्रा.हरी नरके,
सदस्य- राज्य मागासवर्ग आयोग, [नि.]
पृष्ठे ३३२, किंमत रू.३५०/-
ग्रंथाली प्रकाशन,माटुंगा, मुंबई, संपर्क- ०२२- २४२१६०५७,२४३०६६२४
granthaliruchee@gmail.com