Thursday, January 30, 2020

झरा आहे मुळचाच खरा-



सुमारे ४० वर्षांपुर्वीची गोष्ट. विद्याताई तेव्हा अतिशय प्रतिष्ठीत अशा स्त्री मासिकाच्या संपादिका होत्या. मी महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होतो. एका वक्तृत्व स्पर्धेतलं माझं भाषण ऎकुन त्या जवळ आल्या. मायेनं विचारपूस केली. आमच्या स्त्री मासिकासाठी लेख लिही म्हणाल्या. आजची तरूणाई काय वाचते, काय विचार करते? त्यावर मनातलं खरंखरं लिही म्हणाल्या. माझ्या आयुष्यतला तो पहिला लेख. विद्याताईंनी त्याला "घुसमट" असं शीर्षक दिलं. आपला लेख स्त्री मासिकासारख्या आघाडीच्या मासिकात छापून आल्यानं माझे पाय जमिनीवर टेकतच नव्हते. तिथपासून अगदी अलिकडे त्यांनी माझ्याकडून मिळून सार्‍याजणीत विकासपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरचा लेख लिहून घेतला हा ४० वर्षांचा प्रवास आज आठवतो. लेखणासाठी त्यांनी मला आईच्या मायेनं केलेलं मार्गदर्शन आणि मी काय वाचावं याबद्दल त्या सदैव देत असायच्या त्या टिप्स यांचा खजिना फार मोठाय.

तीस वर्षांपुर्वी मी साहित्य परिषदेच्या निवडणुकीला उभा होतो तेव्हा विद्याताईंनी मतदारांनी मला मतं द्यावीत यासाठी चक्क पत्रक काढलं होतं. खरं तर विद्याताई आणि माझ्यात खूप अंतर होतं.

त्या अत्यंत प्रतिष्ठीत आणि संपन्न शहरी घरातून आलेल्या होत्या. खूप मोठा ऎतिहासिक वारसा त्यांच्या पाठीशी होता. मी ग्रामीण भागतून आलेला एक फाटका कार्यकर्ता होतो. पण त्या इतक्या कळकळीनं बोलायच्या,वागायच्या की त्या घरातल्याच वाटायच्या. त्यांचं बोलणं अतिशय जिव्हाळ्याचं, तळमळीचं, मृदू तरिही कणखर आणि साधं, सोपं, प्रवाही असायचं. त्या आपल्याशी गप्पाच मारीत आहेत असं सतत वाटायचं. त्यांच्या तोडीच्या दुसर्‍या स्त्रीवक्त्या मी पाहिलेल्या नाहीत. अतिशय प्रगल्भ, मुद्देसूद आणि अभ्यासपुर्ण बोलण्यात त्यांची सर इतर कुणालाही येऊ शकत नसे. महाराष्ट्रातल्या सर्वश्रेष्ठ स्त्रीपुरूष वक्त्यांची यादी केली तर त्यांचं नाव पहिल्या दहांमध्ये नक्कीच घ्यावं लागेल.

एक साक्षेपी संपादक म्हणून त्यांची कामगिरी अतुलनीय होय. स्त्री सखी, नारी समता मंच आणि स्त्रीमुक्ती संपर्क समिती यासारख्या संस्था उभारण्यात, मोठ्या करण्यात त्यांनी हयात घालवली. अक्षरस्पर्श ग्रंथालयाच्या उभारणीत त्यांचाच पुढाकार होता. सावित्रीजोतिबा उत्सवाच्या माध्यामातून महात्मा फुलेवाड्यावर दरवर्षी त्या व्याख्यानमाला व जागरणाचे कार्यक्रम घ्यायच्या. २ वर्षांपुर्वी सत्यशोधक केशवराव विचारे यांच्यावर बोलण्यासाठी त्यांनी मला निमंत्रित केलं होतं. त्यावेळी बाबा आढाव, सदा डुंबरे, आनंद करंदीकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. कमलताई विचारे यांच्याशी आमचा दोघांचा घरोबा होता. त्यातनं अनेक उपक्रम एकत्र केले. एकत्र प्रवास केले. गप्पांच्या मैफिली झडल्या. मोर्चे, निदर्शनं, सभा, संमेलनं, फिचर्स प्रदर्शनं झाली.

अनेक सभांमध्ये विद्याताईंसोबत बोललो. त्यांना ऎकणं ही तर केवळ मेजवानीच असायची.

मध्यंतरी एका महिला अत्याचार प्रकरणात त्यांच्यासोबत येण्यासाठी त्यांनी मला फोन केला. आम्ही मिळून गेलो होतो. त्यावेळी पिडीत महिलांची विचारपूस विद्याताईंनी ज्या आपुलकीनं केली त्यानं त्या महिल्या गहिवरल्या. त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी विद्याताई खूप झगडल्या, झुंजल्या. धनदांडगे आणि सत्तेचा पाठींबा असलेले आरोपी जेव्हा जिंकले तेव्हा विद्याताई खूप उदास झाल्या. आजच्या काळात दुबळ्यांना न्याय मिळणं अवघड झालंय. अत्याचार करणारे जेव्हा त्याच समाजातून वर येऊन प्रस्तापित झालेले असतात तेव्हा तर लढाई अधिक गुंतागुंतीची बनते असे त्या म्हणाल्या.

माझ्या आणि त्यांच्या वयात २ पिढ्यांचे अंतर, तर माझ्या मुलीच्या आणि त्यांच्यात ३ पिढ्यांचे अंतर.पण त्या सर्वांशी कनेक्ट व्हायच्या. प्रमितीशी आणि संगिताशी त्यांचं एकदम गूळपिठ होतं. अनेक कौटुंबिक अडीअडचणीच्या प्रसंगी विद्याताई धावून यायच्या. भुमिका घ्यायच्या. त्याची किंमतही मोजायच्या.

स्त्रीमुक्ती आंदोलनात उभी हयात जाऊनही विद्याताई पुरूषद्वेष्ट्या झालेल्या नव्हत्या. स्त्रीही माणूस असते, तीही प्रसंगी पुरूषा इतकंच खोटं बोलू शकते, हितसंबंध तिलाही वापरून घेतात, दरवेळी पुरूषाचीच चूक असते असे मानायची गरज नसते, प्रत्येक केसच्या गुणवत्तेवरून, सखोल तपासाअंतीच मत ठरवलं पाहिजे, सब घोडे बारा टक्के असं करणं बरोबर नाही अशी भुमिका त्या जेव्हा घ्यायच्या तेव्हा व्यावसायिक मुक्तीवाल्या बायका पिसाळायच्या. रागवायच्या. पुरूष तेव्हढे सगळेच वाईट अशी ताठर भुमिका असलेल्या आजच्या एनजीओकरण झालेल्या काही संघटनांच्या काळात विद्याताई वेगळ्या होत्या. सरधोपट नव्हत्या.

कळवळ्याच्या होत्या. ऎशी कळवळ्याची जाती, करी लाभाविना प्रिती हा त्यांचा बाणा होता. कितीतरी अन्याय अत्त्याचाराच्या प्रकरणात त्यांनी न्याय दिला. खर्‍याची बाजू आणि न्यायाची भुमिका घेतली.

विद्याताईंचं जाणं खूप काही ओढून घेऊन गेलं. घरातलं वडीलधारं माणूस गेल्याची ठसठस आणि अपार दु:ख यांनी मन बधीर झालं. विद्याताई, आजच्या विपरीत काळात तुम्ही आम्हाला मार्गदर्शनासाठी हव्या होतात.

- प्रा.हरी नरके, ३० जाने. २०२०

Wednesday, January 29, 2020

निमित्त- मूकनायक शताब्दी, कुठे आहे फुले - आंबेडकरी पत्रकारिता ?






निमित्त- मूकनायक शताब्दी, कुठे आहे फुले - आंबेडकरी पत्रकारिता ? - प्रा.हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षापुर्वी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले. लोकशिक्षण, लोकसंघटन, लोकजागरण आणि जातीनिर्मुलन ही उद्दिष्टे गाठण्यात त्याला फार मोठे यश आले. त्याकाळात मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्र म्हणजे केसरी. तो सनातन्यांच्या हातात होता. मूकनायकाची जाहीरातसुद्धा छापायला केसरीने नकार दिला होता. पहिल्या अंकात  बाबासाहेब लिहितात,
"हिंदू धर्म तीन गटात विभागला गेलेला आहे.
१. ब्राह्मण,
२. ब्राह्मणेतर,
३. बहिष्कृत

ब्राहमण व इतर उच्चवर्णिय हे जातीव्यवस्थेचे लाभार्थी असल्याने जात टिकावी यासाठी ते झटतात.
सत्ता व ज्ञान नसल्याने ब्राह्मणेतर मागासले व त्यांची उन्नती खुंटली. मात्र ते कारागिर वा शेतकरी असल्याने चरितार्थ चालवू शकले.

दुर्बलता, दारिद्र्य व अज्ञान या त्रिवेणी संगमात अफाट बहिष्कृत समाज नागवला गेला. आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्‍या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास,तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खर्‍या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भुमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातीचे हितसंबंध पाहाणारी आहेत. इतर जातींच्या हितांची त्यांना परवा नसते.इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात.

दीनमित्र, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, सुबोधपत्रिका वगैरे पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते. मात्र बहिष्कृतांच्या प्रश्नांना पुरेशी जागा मिळत नाही.
तेव्हा बहिष्कृतांच्या प्रश्नाला वाहिलेले स्वतंत्र पत्र हवे म्हणून मूकनायकचा जन्म आहे. यापुर्वी सोमवंशीय मित्र, हिंद नागरिक, विटाळ विध्वंसक, बहिष्कृत भारत निघाली आणि बंदही पडली. तेव्हा स्वजनोद्धारासाठी मूकनायक जगायला हवा.

बाबासाहेबांनी वर उल्लेख केलेले एकही वर्तमानपत्र आज चालू नाही.

केसरी निघतो,पण तो कोणीही वाचत नाहीत...एकेकाळी सर्वाधिक लोकप्रिय असलेले हे वर्तमानपत्र आज लोकप्रियता आणि खप याबाबतीत पहिल्या हजारातही नाही. काळ सगळ्यांची मस्ती  उतरवतो.

आज खपाच्या व प्रभावाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील पहिली १० वर्तमानपत्रे बघितली तर त्यातल्या ४० टक्क्यांचे मालक जैन मारवाडी आहेत, ४० टक्क्यांचे मालक मराठा आहेत आणि २० टक्क्यांचे मालक इतर उच्चवर्णिय आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही.

अनु. जाती/जमाती/ओबीसीचे यात एकही नाही. पहिल्या २०० तही यातल्या कोणाचा नंबर लागत नाही. काही सटरफटर, लंगोटी पत्रे स्वत:ला नायक, राजा, सम्राट, बादशहा म्हणवतात,पण ते म्हणजे पोतराजा किंवा वासुदेवातले राजे, सम्राट असतात..

समाज माध्यमं सर्वांना खुली असली तरी अनु. जाती/जमाती/ओबीसीचे बहुसंख्य लोक त्यांचा वापर वाढदिवस, सणसमारंभ आणि धार्मिक कार्ये असल्या भुरट्या गोष्टींसाठी करताना दिसतात.

लिंगभाव, जात, वर्गीय विषमता, धार्मिक भेदभाव आणि असहिष्णूता यांच्यावर अचूक मारा करणारे मुद्रीत वा इलेक्ट्रॉनिक माध्यम आज बलुतेदार, अलुतेदार, ओबीसी वा बहिष्कृतांकडे नाही, शिक्षण,  ज्ञाननिर्मिती,  जातीनिर्मुलन, स्त्रीपुरूष समता, संवादातून विद्रोह आणि चिकित्सेकडे, संसाधनांचे फेरवाटप, या फुले- आंबेडकरी मुल्यांना वाहिलेले एकही वर्तमानपत्र आज दिसत नाही.

जात टिकवण्यासाठी सत्ताधारी जाती, करोडपती आणि निवडणुका जिंकणारे अभिजन जिवापाड झटताहेत. विषमतेचे बळी मात्र घोर निद्रेत आहेत.

१०० वर्षांने ही स्थिती आहे. आणखी १०० वर्षांनी काय असेल?

मूकनायक स्थापना ३१ जानेवारी १९२०, वार्षिक वर्गणी अडीच रूपये, संपादक- पी.एन.भटकर व ज्ञानदेव घोलप, प्रकाशक- डॉ. भीमराव आंबेडकर

-प्रा.हरी नरके, २९ जानेवारी २०२०

Friday, January 17, 2020

डॉ. बाबासाहेबांनी कशी जिंकली चवदार तळ्याची केस?

डॉ. बाबासाहेबांनी कशी जिंकली चवदार तळ्याची केस?- प्रा.हरी नरके

" डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा " ही मालिका सध्या एका रहस्यकथेसारखी पकड घेत आहे. आज मालिकेचा २११ वा भाग आम्ही सादर केला. महाडच्या चवदार तळ्याची केस बाबासाहेबांनी कशी जिंकली त्याचा उलगडा आजच्या भागात प्रेक्षकांना झाला असेल. ज्यांनी आजचा भाग बघितला नसेल त्यांनी तो हॉटस्टार वर अवश्य बघावा. टिम गौरवगाथाने, विशेषत: दशमी आणि स्टार प्रवाहच्या मंडळींनी, कलाकार, लेखक, दिग्दर्शक व सर्व संबंधितांनी अपार मेहनत घेऊन ही अभिनव मालिका आपल्यासमोर सादर केलेली आहे. या मालिकेने टेलिव्हीजन इंडस्ट्रीत प्रथमच एक नवा ट्रेंड निर्माण होत आहे.

बॅरिस्टर डॉ. आंबेडकरांचे युक्तीवाद कौशल्य, त्यावेळच्या नामवंत वकीलांपैंकी जे तोवर एकही केस हरले नव्हते अशा अ‍ॅड. ल.ब. भोपटकरांना बाबासाहेबांनी पराभूत करणे, सुरबानानांनी जिवावर उदार होऊन पुरावे जमा करणे, तोवर अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाने चळवळीच्या जोरावर कायदेशीर मार्गाने ब्रिटीश कोर्टात प्रथमच विजय मिळवणे हे मालिकेतले भाग आपल्याला कसे वाटले?

२११ भाग झाले तरी बुद्धीवंतांपैकी काहीजण या मालिकेबाबत मौनाच कट करून बसलेत. सामान्य प्रेक्षक मात्र प्रचंड प्रतिसाद देताहेत. मला या मालिकेच्या टिमचा एक प्रमुख सदस्य या नात्याने तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की,

तुमच्यापैकी किती लोकांना फत्तेखान देशमुख आणि केस जिंकण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी सुरबानानांमार्फत मिळवलेले सरकारी पुरावे याबाबत आधी माहित होते? कृपया कमेंटमध्ये लिहा.

-प्रा.हरी नरके, १७ जानेवारी २०२०

सुचना - उद्यापासून यापुढे शनिवारी ही मालिका नसेल. फक्त सोम ते शुक्र असेल.

Wednesday, January 8, 2020



प्रति.
सन्माननीय ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे, 
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
आदरणीय साहेब, 
आपले दि. १७/१२/२०१९ चे पत्र मिळाले.
आपली राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम मी आपले हार्दीक अबिनंदन करतो.
या पत्राद्वारे आपण राज्यातील प्रमुख साहित्यिक- कलावंत- सामाजिक कार्यकर्त्यांशी व्यापक संपर्क साधला असून राज्याच्या विकासासाठी संवाद, सहकार्य व सुचना करण्याचे आवाहन केले आहे. 
मा. मुख्यमंत्रीसाहेब, शिवराय-फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार, साने गुरूजींच्या स्वप्नातला प्रागतिक महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत. आमच्या हार्दीक शुभेच्छा सदैव आपल्यासोबत असतील. 
राज्याच्या प्रगतीसाठी उपयुक्त असे माझ्यायोग्य कोणतेही काम आपण हक्काने सांगावे, कोणतीही अपेक्षा न बाळगता निरपेक्षपणे ते पुर्ण केले जाईल.
आपल नम्र,
प्रा.हरी नरके, ०८/०१/२०२०

Wednesday, January 1, 2020

शहीद सावित्रीबाई : नेतृत्व, सेवाभाव आणि शौर्यगाथा













शहीद सावित्रीबाई : नेतृत्व, सेवाभाव आणि शौर्यगाथा  - प्रा. हरी नरके

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा उद्या १९० वा जन्मदिवस. अस्पृश्य मुलाला पाठीवर घेऊन पायी ८ किलोमीटर धावतपळत सावित्रीबाई दवाखान्यात पोचल्या. त्यातच त्यांना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. आपल्या दत्तक पुत्राला पाठीवर घेऊन स्वत:च्या गादीसाठी-संस्थानासाठी लढणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ गौरवाने सांगितल्या जातात. तथापि आजारी अपृश्य मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या आणि स्वत: शहीद होणार्‍या या शौर्यांगणेची कहाणी मात्र पाठ्यपुस्तकांत येत नाही. समाजधुरीणांकडून त्यावर मौनाचा कट केला जातो.

ज्ञानज्योती सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. बालहत्त्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, दुष्काळात १००० गरिब मुलांचे संगोपन करणे आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाव्ह्यांचा संप घडवणे या ४ कामांत सावित्रीने आपले नेतृत्व केले अशी कबुली दस्तुरखुद्द जोतीराव देतात, यातनं सावित्रीबाईंचं ऎतिहासिक योगदान अधोरेखित होतं.

राजकीय ऋषी नारायण महादेव उर्फ मामा परमानंद यांनी सयाजीराव गायकवाडांना लिहिलेल्या पत्रात सावित्रीबाईंबद्दल म्हटले आहे की, ‘जोतिरावांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. तिची योग्यता काय सांगावी? आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबर राहून वाट्यास येतील त्या हालअपेष्टा भोगल्या. उच्चवर्णीयांतील उच्चशिक्षण घेतलेल्या स्त्रियांतही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. त्या उभयतांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्च केले.’ (३१ जुलै १८९०)

जोतीराव सावित्रीबाईंची ‘विषयपत्रिका’
शिक्षण, स्त्रीपुरूष समता, सामाजिक न्याय या विषयांची "सावित्री- जोती" यांनी लिहिलेली ‘विषयपत्रिका’ आजही मार्गदर्शक आहे. त्यांचं समग्र क्रांतिकारी चिंतन आजही प्रस्तुत असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच त्यांच्या जीवनकार्य आणि विचारांबद्दल समाजाच्या सर्व स्थरात विशेष रस वाटू लागला. आज जो त्यांचा अभ्यास चालू आहे, त्यामागे हे समाजशास्त्रीय वास्तव दडलेलंय.

राज्य शासनाने प्रकाशित केलेले सावित्रीबाई फुले :समग्र वाड्मय आणि सावित्रीबाई फुले : गौरवग्रंथ यांना प्रचंड मागणी आहे. प्रस्तुत लेखकाने लिहिलेले सावित्रीबाईंचे इंग्रजी चरित्र दिल्लीच्या एन.सी.ई.आर.टी. ने प्रकाशित केलेले असून त्याचा मराठी अनुवाद इस्लामपूरच्या नाग नालंदा प्रकाशनाने छापलेला आहे. या पुस्तकाचे अनुवाद अनेक भारतीय भाषांमध्ये झालेले आहेत.

मुंबईच्या कु. शांताबाई रघुनाथ बनकर यांची १९३९ मधे प्रकाशित झालेली ‘सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे अल्पचरित्र’ ही पुस्तिका आणि त्यानंतर १९६६ साली सौ. फुलवंताबाई झोडगे यांनी लिहिलेलं ‘क्रांतिदेवता साध्वी सावित्रीबाई फुले’ हे चरित्र महत्त्वाचं आहे. त्यांनाच वाट पुसत डॉ. मा. गो. माळी यांनी ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ हा चरित्रग्रंथ १९८० साली लिहिला. डॉ. कृ. पं. देशपांडे यांनी सावित्रीबाईंच्या जीवन आणि साहित्यावर ‘अग्निाफुले’ हा ग्रंथ १९८२ साली प्रकाशित केला. नंतरचे सगळे ग्रंथ याच माहितीवर आधारित आहे.

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला झाला. पुण्यापासून जवळपास ५० किलोमीटरवर नायगाव हे त्यांचं जन्मगाव आहे. पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळपासून ५ किलोमीटरवर हे गाव वसलेलं आहे. सावित्रीबाई या खंडोजी नेवशे यांच्या ज्येष्ठ कन्या होत. १८४० साली वयाच्या १० व्या वर्षी त्यांचं जोतीरावांशी लग्न झालं. ११ एप्रिल १८२७ ला पुण्यात जन्मलेले जोतीराव त्यावेळी १३ वर्षांचे होते.

सावित्रीबाईंच्या जन्मस्थळाची अतिशय दुरावस्था होती. त्याची मुळाबरहुकुम पुनरउभारणी करणे, या गावाचा संपुर्ण कायापालट घडवणे, गावात शिल्पसृष्टी उभारणे, महाराष्ट्रातल्या कोणत्याही खेड्यात नसलेल्या असंख्य सुविधा या गावात उपलब्ध करून देणे यासाठी माझी २० वर्षे सत्कर्मी लागली याचा मला अभिमान आहे.

पुण्यातल्या महात्मा फुलेवाड्याचा समग्र विकास, दिल्लीच्या संसद भवनात महात्मा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे आणि पुणे विद्यापीठाचा नामविस्तार अशा असंख्य कामांमध्ये पुढाकार आणि यशप्राप्ती यांचा आनंद मला आयुष्यभरासाठी पुरणारा आहे. फुलेवाडा व नायगावला श्री. छगन भुजबळ यांना २८ वर्षांपुर्वी सर्वप्रथम घेऊन जाणे, त्यांच्याकडे व शासनाकडे या व इतर असंख्य कामांसाठी आग्रही राहणे, पाठपुरावा करून स्वत: राबून ही कामे करवून घेणे यातच माझ्या आयुष्याचे सार्थक आहे असे मी मानतो.


लग्नानंतर जोतीरावांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण दिल्याचं शासकीय कागदपत्रांवरून दिसून येतं. १ मे १८५१ ते ३० एप्रिल १८५२ च्या शैक्षणिक अहवालात म्हटल्याप्रमाणे, ‘जोतीरावांनी स्वत:च्या पत्नीला घरी शिक्षण देऊन शिक्षिका बनवले.’ २२ नोव्हेंबर, १९५१ च्या ‘बॉम्बे गार्डियन’ वृत्तपत्रातल्या बातमीवरून सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर (जोशी) यांनी घेतल्याचं दिसतं. सावित्रीबाईंनी अहमदनगर इथे फॅरारबाईंच्या आणि पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमधे अध्यापनाचं प्रशिक्षणही घेतलं. त्यामुळे सावित्रीबाई याच आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत, हे तत्कालीन दस्तऐवजांवरून स्पष्ट होतं. हीच देशाची खरी ज्ञानज्योती होय.

शेण नाही, ही तर फुलं आहेत
सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होय. समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करत होत्या. त्या शाळेत जाता  येताना सनातनी गुंड, टोळभैरव मुद्दाम रस्त्यावर थांबत. अचकट-विचकट बोलत. कधीकधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत.

शाळेत जाताना सावित्रीबाईंना सोबत २ साड्या न्याव्या लागत. रस्त्याने जाताना खराब झालेली साडी शाळेत गेल्याबरोबर बदलावी लागे. दुसरी परतताना खराब होई आणि तरीही सावित्रीबाई आपल्या कामात खंड पडू देत नव्हत्या. हा छळ असाच चालू राहिल्याने त्यांच्या आणि लहान मुलींच्या संरक्षणासाठी संस्थेने एका शिपायाची नियुक्ती केली.

त्याने लिहून ठेवलेल्या आठवणीनुसार सावित्रीबाई आपल्या अंगावर दगड किंवा चिखल फेकणार्‍यांना म्हणत, ‘मी माझ्या भगिनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करीत असताना तुम्ही माझ्यावर शेण अगर खडे फेकीत आहात, ही मला फुलेच वाटतात. ईश्वपर तुम्हाला सुखी ठेवो!’ बळवंत सखाराम कोल्हे यांच्या या आठवणी सावित्रीबाईंच्या धैर्यावर प्रकाश टाकणार्‍या आहेत.

ब्राम्हण विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह
१८६३ मधे जोतीराव सावित्रीबाईंनी विधवांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केलं. याबाबतची अस्सल माहिती अलीकडेच उपलब्ध झालीय. एक तर हे गृह फक्तर ‘ब्राह्मण विधवांसाठीच’ सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. ४ डिसेंबर १८८४ ला जोतीरावांनी मुंबई सरकारच्या अवर सचिवाला लिहिलेल्या पत्रात याबाबतची सगळी माहिती नोंदवलेली आहे.

जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’

दुसर्‍या एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.

बरोबर काय न्यायचं आहे?
हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्नदान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’ जोतीराव तापट तर सावित्रीबाई स्मितभाषी. जोतीराव आयुष्यात एकदाही सावित्रीबाईवर रागावल्याचे उदाहरण नाही.

सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.

जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्श शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई उत्तर आयुष्यात तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तयजनांत मोठा आदर होता.

पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता
मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकेचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.

सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.

जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला पुरात वाहून गेल्यानं निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता. पुढे त्याने दुसरा विवाह केला. त्याला एक मुलगी झाली. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोचे व मुलीचे फार हाल झाले. या मुलीली एका सापत्य बिजवराशी लग्न करावे लागले. त्याच्य पत्नीला बेवारस स्थितीत फूटपाथवर मृत्यू आला. तिच्या मदतीला तिची पोटची पोरही आली नाही. या मुलीचे आजचे वारसदार आपण सावित्री-जोतीचे जैविक वारस असल्याचा डांगोरा पिटीत असतात. अर्थात त्यांनाही आपण जैविक वारस आहोत ही माहिती प्रस्तुत लेखकाच्या पुस्तकातून मिळालेली आहे.

प्लेगच्या साथीत लोकांचे जीव वाचवण्याची धडपड
१८९३ मधे सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी डॉ. यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसर-महंमदवाडीला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी डॉ. यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेरच्या महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन पायी ८ किलोमीटर धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. आपल्या दत्तक पुत्राला पाठीवर घेऊन स्वत:च्या गादीसाठी-संस्थानासाठी लढणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ गौरवाने सांगितल्या जातात. तथापि आजारी अपृश्य मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या आणि स्वत: शहीद होणार्‍या या शौर्यांगणेची कहाणी मात्र पाठ्यपुस्तकांत येत नाही. समाजधुरीणांकडून त्यावर मौनाचा कट केला जातो.

ज्ञानज्योती सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. बालहत्त्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, दुष्काळात १००० गरिब मुलांचे संगोपन करणे आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाव्ह्यांचा संप घडवणे या ४ कामांत सावित्रीने आपले नेतृत्व केले अशी कबुली दस्तुरखुद्द जोतीराव देतात, यातनं सावित्रीबाईंचं ऎतिहासिक योगदान अधोरेखित होतं.

- प्रा. हरी नरके, २ जानेवारी २०२०