निमित्त- मूकनायक शताब्दी, कुठे आहे फुले - आंबेडकरी पत्रकारिता ? - प्रा.हरी नरके
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षापुर्वी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले. लोकशिक्षण, लोकसंघटन, लोकजागरण आणि जातीनिर्मुलन ही उद्दिष्टे गाठण्यात त्याला फार मोठे यश आले. त्याकाळात मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्र म्हणजे केसरी. तो सनातन्यांच्या हातात होता. मूकनायकाची जाहीरातसुद्धा छापायला केसरीने नकार दिला होता. पहिल्या अंकात बाबासाहेब लिहितात,
"हिंदू धर्म तीन गटात विभागला गेलेला आहे.
१. ब्राह्मण,
२. ब्राह्मणेतर,
३. बहिष्कृत
ब्राहमण व इतर उच्चवर्णिय हे जातीव्यवस्थेचे लाभार्थी असल्याने जात टिकावी यासाठी ते झटतात.
सत्ता व ज्ञान नसल्याने ब्राह्मणेतर मागासले व त्यांची उन्नती खुंटली. मात्र ते कारागिर वा शेतकरी असल्याने चरितार्थ चालवू शकले.
दुर्बलता, दारिद्र्य व अज्ञान या त्रिवेणी संगमात अफाट बहिष्कृत समाज नागवला गेला. आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास,तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खर्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भुमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातीचे हितसंबंध पाहाणारी आहेत. इतर जातींच्या हितांची त्यांना परवा नसते.इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात.
दीनमित्र, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, सुबोधपत्रिका वगैरे पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते. मात्र बहिष्कृतांच्या प्रश्नांना पुरेशी जागा मिळत नाही.
तेव्हा बहिष्कृतांच्या प्रश्नाला वाहिलेले स्वतंत्र पत्र हवे म्हणून मूकनायकचा जन्म आहे. यापुर्वी सोमवंशीय मित्र, हिंद नागरिक, विटाळ विध्वंसक, बहिष्कृत भारत निघाली आणि बंदही पडली. तेव्हा स्वजनोद्धारासाठी मूकनायक जगायला हवा.
बाबासाहेबांनी वर उल्लेख केलेले एकही वर्तमानपत्र आज चालू नाही.
केसरी निघतो,पण तो कोणीही वाचत नाहीत...एकेकाळी सर्वाधिक लोकप्रिय असलेले हे वर्तमानपत्र आज लोकप्रियता आणि खप याबाबतीत पहिल्या हजारातही नाही. काळ सगळ्यांची मस्ती उतरवतो.
आज खपाच्या व प्रभावाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील पहिली १० वर्तमानपत्रे बघितली तर त्यातल्या ४० टक्क्यांचे मालक जैन मारवाडी आहेत, ४० टक्क्यांचे मालक मराठा आहेत आणि २० टक्क्यांचे मालक इतर उच्चवर्णिय आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही.
अनु. जाती/जमाती/ओबीसीचे यात एकही नाही. पहिल्या २०० तही यातल्या कोणाचा नंबर लागत नाही. काही सटरफटर, लंगोटी पत्रे स्वत:ला नायक, राजा, सम्राट, बादशहा म्हणवतात,पण ते म्हणजे पोतराजा किंवा वासुदेवातले राजे, सम्राट असतात..
समाज माध्यमं सर्वांना खुली असली तरी अनु. जाती/जमाती/ओबीसीचे बहुसंख्य लोक त्यांचा वापर वाढदिवस, सणसमारंभ आणि धार्मिक कार्ये असल्या भुरट्या गोष्टींसाठी करताना दिसतात.
लिंगभाव, जात, वर्गीय विषमता, धार्मिक भेदभाव आणि असहिष्णूता यांच्यावर अचूक मारा करणारे मुद्रीत वा इलेक्ट्रॉनिक माध्यम आज बलुतेदार, अलुतेदार, ओबीसी वा बहिष्कृतांकडे नाही, शिक्षण, ज्ञाननिर्मिती, जातीनिर्मुलन, स्त्रीपुरूष समता, संवादातून विद्रोह आणि चिकित्सेकडे, संसाधनांचे फेरवाटप, या फुले- आंबेडकरी मुल्यांना वाहिलेले एकही वर्तमानपत्र आज दिसत नाही.
जात टिकवण्यासाठी सत्ताधारी जाती, करोडपती आणि निवडणुका जिंकणारे अभिजन जिवापाड झटताहेत. विषमतेचे बळी मात्र घोर निद्रेत आहेत.
१०० वर्षांने ही स्थिती आहे. आणखी १०० वर्षांनी काय असेल?
मूकनायक स्थापना ३१ जानेवारी १९२०, वार्षिक वर्गणी अडीच रूपये, संपादक- पी.एन.भटकर व ज्ञानदेव घोलप, प्रकाशक- डॉ. भीमराव आंबेडकर
-प्रा.हरी नरके, २९ जानेवारी २०२०
No comments:
Post a Comment