९४ वर्षांपुर्वी १ जुलै १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "ब्राह्मण व ब्राह्मणवाद" यातील फरक स्पष्ट करणारा अग्रलेख "बहिष्कृत भारत" मध्ये लिहिला होता. ब्राह्मण ही व्यक्ती किंवा जात असते तर ब्राह्मणवाद ही विषमतावादी प्रवृत्ती असते असे बाबासाहेब म्हणतात. या महिन्यात समाज माध्यमावर ब्राह्मणवाद हा शब्द वापरल्याबद्दल सुप्रसिद्ध कन्नड अभिनेते चेतनकुमार यांच्याविरुद्ध बेंगलुरुत २ गुन्हे दाखल झाले आहेत. धार्मिक भावना दुखावणे व राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणे अशी गंभीर कलमे त्यांच्यावर लावण्यात आलेली आहेत. भाजप सरकारने कर्नाटकात "ब्राह्मण विकास महामंडळ" स्थापन केलेले आहे. त्याचे शासननियुक्त अध्यक्ष सच्चिदानंद मुर्ती यांनी हे गुन्हे दाखल केलेले आहेत. चेतनकुमार यांनी समाज माध्यमांवर केलेल्या लेखणात " आपण ब्राह्मणांचे व्यक्ती वा समाज म्हणुन विरोधक नसून ब्राह्मणवादाचे विरोधक आहोत, ही विचारसरणी मला मान्य नाही. " असे म्हटले होते. "पुरोहितशाहीची विचारधारा ही समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि बंधुतेला बाधक असल्याचे" बाबासाहेब आंबेडकर सांगतात असे नमूद करून ते पुढे म्हणतात, " अनेक पुरोगामी ब्राह्मण हे ब्राह्मण्याचे किंवा ब्राह्मणवादाचे विरोधक होते, आहेत नी अनेक ब्राह्मणेतर हे ब्राह्मणवादाचे शिकार, प्रचारक वा वाहक आहेत. तेव्हा मी व्यक्तींचा नव्हे तर विचारसरणीचा विरोध करतो." चेतनकुमार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषण व लेखणातील अनेक संदर्भ यासाठी दिलेले होते. हे नमूद करुनही बेंगलुरूच्या दोन पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. भाजपाशासित राज्यांचा प्रवास विचारांच्या कोणत्या चिंताजनक दिशेने चालू आहे हे आपल्याला कळावे यासाठी ही पोस्ट समाजहितास्तव केली आहे.
- प्रा. हरी नरके,
१ जुलै, २०२१
No comments:
Post a Comment