Sunday, February 26, 2017

मराठी भाषा गौरव दिन


27 फेब्रुवारी, ज्ञानपिठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.
यानिमित्ताने मराठी भाषेबद्दल साधक बाधक चर्चा होतेय याचा आनंद वाटतो.
आमच्या काही मित्रांनी अभिजात दर्जा नसला तरी मराठी अभिजातच आहे, दर्जाला महत्व नाही ते थेट अभिजात भाषेचा दर्जा नाही मिळाला तरी बेहत्तर इथपर्यंत लिहायला सुरूवात केलीय. मागे तर आमचे एरवी प्रसन्न असलेले एक पत्रकार मित्र मराठीवर एव्हढे भडकले की मराठी मेली तर काय हरकत आहे अशी विचारणा त्यांनी केली.
या मित्रांना एक नम्र प्रश्न विचारावासा वाटतो. एखाद्या विद्वानाला पदव्या असल्या काय आणि नसल्या काय फारसा फरक पडत नाही, मात्र हेच सत्य पदव्या असलेल्याने मांडले तर त्याला वेगळी झळाळी असते आणि नसलेल्याने मांडले तर त्याच्याकडे लोक कुत्सितपणे बघतात.
मराठी मरते आहे असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणाले, तेव्हा त्यामागे आर्त कळकळ होती, जिद्द होती मराठी जगवण्याची. तशीच भुमिका असूनही जर केवळ एक रणनिती म्हणून मराठी मेली तर काय हरकत आहे असे धक्कातंत्र विधान केले तर त्यामागची भावना वेगळी बनते,पण मराठी मरायलाच हवी, अशा धारणेतून केलेले हे चिंतन असेल तर मी त्यावर काहीही म्हणु इच्छित नाही.
दर्जा मिळविण्यासाठी एका जिद्दीने गेली अनेक वर्षे झटणार्‍यांना मदत करता येत नसेल तर नका करू पण मराठीला हा दर्जाच नको ही भावना मला तरी अनाकलनीय वाटते. जे आपल्या आईच्या मरणासाठी अतिव उत्सुक असतील त्यांना माझ्या शुभेच्छा. मात्र सगळेच असे आहेत असे नाही. आमचे मित्र डॉ. पृथ्वीराज तौर म्हणतात,
"भाषा मरते तेव्हा केवळ काही शब्द संपत नाहीत, तर एक संस्कृती संपून जात असते. एका मानवी समूहाचाच अंत होत असतो. ज्ञान-विज्ञानाच्या चर्चा ज्या काळात जोरकस पद्धतीने केल्या जातात, त्या वेळी भाषांचे मृत्यू दु:खद भासतात...
भाषा कशासाठी? या प्रश्नाचं खूप साधं उत्तर आहे- भाषा असते, ती संवाद साधण्यासाठी. भाषा होती म्हणूनच मानवाला आपल्या भावना, आपले विचार यांची देवाणघेवाण शक्य झाली. भाषेला घडवता घडवता माणूस स्वतःलाही घडवत गेला. किंबहुना मानवाचा सगळा विकास भाषेमुळेच शक्य झाला.
भाषेमुळेच मानवाला संस्कृती मिळाली, भाषेमुळेच सभ्यता निर्माण झाली, भाषेमुळेच विज्ञान अवतरले, भाषेमुळेच तत्त्वज्ञान आणि इतिहासाचे जतन शक्य झाले. भाषा नसती तर काहीच घडले नसते. शक्य नव्हते. जगभरच्या विविध मानवी समूहांनी विविध भाषा जन्माला घातल्या, जोपासल्या. भारतासारख्या देशात काही हजार भाषा आणि बोली बोलल्या जातात. भाषा केवळ भावना, विचार व्यक्त करण्याचे साधन अथवा माध्यम नाही. भाषेचे अस्तित्व एका मानवी संस्कृतीचे अस्तित्व असते. उत्क्रांतीचा एक मोठा अवकाश भाषेमध्ये नांदत असतो. त्यामुळे भाषा मग ती कोणतीही असो, ती टिकवणे महत्त्वाचे आहे.
जागतिकीकरणाच्या रेट्यात सगळ्या जगाला बाजारपेठ करण्याच्या ईर्षेने भाषिक सपाटीकरणाची प्रक्रिया मागच्या दोन-अडीच दशकापासून खूप गतिमान होत आहे. पाठोपाठ छोट्या-छोट्या समूहांच्या भाषाही नष्ट होत आहेत. त्या त्या भाषांसमवेत त्या-त्या भाषेतील ज्ञानाचाही अस्त होत आहे. भाषा मरते तेव्हा केवळ काही शब्द संपत नाहीत, तर एक संस्कृती संपून जात असते. एका मानवी समूहाचाच अंत होत असतो. ज्ञान-विज्ञानाच्या चर्चा ज्या काळात जोरकस पद्धतीने केल्या जात आहेत, त्या वेळी भाषांचे मृत्यू दु:खद आहेत. आत्यंतिक स्वभाषाप्रेमातून अन्य भाषांप्रती विद्वेशाची निर्मितीसुद्धा संवादाला घातक आहे. महत्त्वाचा आहे तो मानवी संवाद आणि म्हणून गरजेचे आहे जगातील प्रत्येक भाषेचे संवर्धन आणि तिची जोपासना करणे. या कविता आपणास भाषिक संवादाच्या सेतूवर घेऊन जातील अशा आहेत."
आज जगात 6 ते 7 हजार भाषा असाव्यात. त्यातल्या दोन हजार मरू लागल्यात.
मुळात भाषा हे संवाद व अभिव्यक्तीचे चलन होय. लोक आपले दैनंदिन व्यवहार भाषेच्या माध्यमातून करतात. ज्ञान, संस्कृती, कला, जगाकडे बघण्याचा स्वतंत्र दृष्टीकोन हे भाषानिहाय वेगवेगळे असू शकतात. भाषा संस्कृतीची जणुकं वाहून नेतात. भाषांना स्वत:चे सार्वभौमत्व असते.
हे विश्व सामान्यपणे 1400 कोटी वर्षांपुर्वी तर आपली पृथ्वी 450 कोटी वर्षांपुर्वी जन्माला आली असे मानले जाते.
माणसाचा पुर्वज 1 कोटी वर्षांपुर्वी जन्मला. पाच लख वर्षांपुर्वीचे आपले पुर्वज व आपण यात महत्वाचा फरक म्हणजे आपण भाषा बोलू शकतो. त्यांना भाषा माहित नव्हती. हावभाव, संगीत, स्वर ही अभिव्यक्तीची माध्यमे टप्प्याटप्प्याने विकसित झाली. भाषांची निर्मिती 70 हजार वर्षांपुर्वी झाली. आपली मराठी भाषा सुमारे 2500 वर्षांपुर्वी जन्माला आली. मुद्रण कलेने मराठी भाषा आणि देवनागरी लिपी टिकण्याची प्रक्रिया गतिमान झाली.
मात्र स्थलांतर, जागतिकीकरण, मराठी भाषकांची उदासिनता आणि पराभूत मानसिकता, जागतिक व भारतीय बाजाराचा मराठीकडे उपेक्षेने बघण्याचा दृष्टीकोन, इंग्रजीचे आक्रमण, परधार्जिणे राज्यकर्ते, केवळ आर्थिक संपन्नतेसाठी आणि दिखाऊ प्रतिष्ठेसाठी इंग्रजीला शरण जाण्यासाठी उत्सुक उच्च मध्यमवर्ग आणि बुद्धीजिवी, नवे तंत्रज्ञान अशा अनेक कारणांनी मराठीवरचे आक्रमण वाढत आहे. मराठी जगेल की मरेल ते मराठी शाळा टिकणार की बंद होणार यावर अवलंबून आहे. ज्या दिवशी मध्यमवर्गाने आणि उच्च मध्यमवर्गाने मराठीचा हात सोडला त्या दिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला.
इतर भाषांचा द्वेष नको पण मराठीचा आग्रह हवा. इंग्रजी किंवा हिंदीत बोलणे हे प्रतिष्ठेचे आणि मराठीत बोलणे मागासलेपणाचे असे ज्यांना वाटते त्यांना आम्ही सांगू "माफ करा मराठी अमृतातेही पैजा जिंकणारी आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले, चक्रधर, शेख महंमद,फादर स्टीफनसन,कित्येकांनी मराठीचा जयजयकार केला तो फुकाचा नाही.तो सार्थ आहे.जगातल्या सर्व देशांना राष्ट्रगितं आहेत पण विश्वगीत "पसायदान" फक्त मराठीतच आहे. धनाढ्यलोक जगभर असतील त्र गुणाढ्य मात्र एकट्या मराठीकडे आहे. तेव्हा जगात अवघ्या 10 भाषा टिकल्या तरी मराठी टिकेल.
आज संत एकनाथ असते तर ते सात्विक संतापाने म्हणाले असते, " आंग्लवाणी बाजारे केली मग मराठी काय चोरांपासून झाली?"
तर ज्यांच्या आजी - आजोबांची मातृभाषा मराठीच होती, पण ज्यांचे पालक आणि जे स्वत: इंग्रजी माध्यामातून शिकलेत आणि तरिही ज्यांना मराठीचे प्रेम आहे त्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा.
मात्र आंग्लाळलेल्या ज्यांना इंग्रजीच्या गुलामीचा विशेष अभिमान वाटतो, मराठीची अतिच लाज वाटते, ज्यांना मराठी ही हलकी भाषा आहे, ती ज्ञानभाषा आणि रोजगार देणारी भाषा नाही असे वाटते त्या "कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ" असणार्‍यांना वगळून इतर सर्व मराठीप्रेमींना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!

Friday, February 24, 2017

या झाडाला मुळं काही फुटतच नाहीयेत

नेहमीप्रमाणे एक मराठी आजोबा असतात. ते सिनियर सिटीझन वगैरे असतात. त्यांना एक स्मार्ट नातू असतो. तो रितीप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या ज्युनियर केजीमध्ये शिकत असतो.
गोष्टीतल्याप्रमाणे आजोबा नातवाला आंबे खायला मिळावेत म्हणून आंब्याचं झाड लावतात.
नातवाला जवळ बोलवून मायेनं शिकवतात, माती कशी खोदायची, तिचं आळं कसं बनवायचं, त्यात खत कसं घालायचं आणि झाड लावून त्याला पाणी कसं घालायचं असं सगळं काही.
त्याला आजोबा बजावतात, "हे बघ आजपासून या झाडाची निगुतीनं काळजी घ्यायची जबाबदारी तुझी. त्याला दररोज पाणी वगैरे घालायचं. एकदा का त्याला मुळं फुटली की मग काळजी मिटली. पुढे त्याला आंबेच आंबे येतील. मग काय तुझी मज्जाच मज्जा!"
काही दिवसांनी आजोबांनी पाहिलं तर झाड सुकून चाललेलं.
नातवाला ते ओरडले, "तू नीट काळजी घेतली नाहीस म्हणूनच असं झालं असणार."
नातू म्हणाला, "मी दररोज तुम्ही सांगितलेली सगळी काळजी नीटच घेतोय वगैरे. तुमच्या या झाडातच काहीतरी गडबड असणार.
इतकं सारं नीटच करूनही या झाडाला मुळं काही फुटतच नाहीयेत."
आजोबा आचंबित झाले, म्हणाले, "पण तुला कसं कळलं? मुळं तर जमिनीत असतात."
नातू म्हणाला, " मग काय झालं, मी दररोज सकाळी आधी झाड उपटून बघतो, मुळं फुटलीत की नाही!"
....................

आजच्या दिवसापुरता गणप्याचा गणपतराव

मताधिकार म्हणजे आपण या महान देशाचे मालक असल्याची जाणीव. मतदार यादीत नाव म्हणजे देशाच्या मालकीहक्काच्या 7/12 मध्ये नाव असल्याचा अभिमान.
1952 -- मालक म्हणायचे "काय गणप्या कसं?"
"मालक तुम्ही म्हणतान तसं", गणप्या म्हणायचा.
....................
2017-- मालक म्हणतात, " गणपतराव, आम्ही निवडणुकीला उभे आहोत, आमच्याकडं लक्ष असू द्या."
त्यावर गणप्या, ताठ मानेनं म्हणतय, "मालक इचार करावा लागंन. मिटींग घेताव आन मग ठरवताव आम्ही."
......................
आज आपली लोकशाही सिनिअर सिटीझन झाली. 1952 साली जानेवारीत पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या 65 वर्षात किती मोठा पल्ला गाठला या लोकशाहीने.
माझे आजोबा सांगायचे, पहिल्या निवडणुकीच्या वेळी निवडणुका कशा होतात, मताधिकार काय असतो, सार्‍याच गोष्टींचे अप्रुप होते. त्यापुर्वी ब्रिटीश भारतात फक्त राजे, महाराजे, सरदार, नबाब, आयकर भरणारे सावकार आणि पदवीधर यांनाच मताधिकार असल्याने त्या सर्वांची संख्या 1 टक्क्यापेक्षाही कमी असायची.
1952 ला मोठमोठे मालक लोक निवडणुकीला उभे होते. त्यांनी किल्ल्यांवरून, वाड्यांवरून,हवेल्या किंवा बंगल्यांवरून आदेश दिले की सारे गोरगरिब मतदार हात जोडून मालकांपुढे हजर व्हायचे. मालक म्हणायचे "काय गणप्या कसं?"
"मालक तुम्ही म्हणतान तसं", गणप्या म्हणायचा.
जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीनं सामान्य माणसाला काय दिलं?
आजही मालक आणि मालकीन उभे असतात. फरक इतकाच की त्यांच्या जोडीला, पालावरचे, शेतावरचे, पाड्यावरचे, फूटपाथवरचे असेही उभे असतात, आताशा ते गणप्याला बोलवून घेत नाहीत, तर ते किंवा त्या वस्तीत जातात, झोपडपट्टीत जातात, फाटक्या मतदारासमोर दोन्ही हात जोडून उभे राहतात आणि चेहर्‍यावर कृतक हासू आणून म्हणतात, " गणपतराव, आम्ही निवडणुकीला उभे आहोत, आमच्याकडं लक्ष असू द्या."
गणप्या, ताठ मानेनं म्हणतय, "मालक इचार करावा लागंन. मिटींग घेताव आन मग ठरवताव आम्ही."
...................
या लोकशाहीत अनेक त्रुटी, दोष, दांभिक गोष्टी आहेत, पण तरिही ज्या देशात एकाच देशात अनेक देश नांदतात, एकाच वेळेला 5000 वर्षांपुर्वीचा भारत, 1000 वर्षांपुर्वीचा भारत, आजचा भारत आणि 100 वर्षे पुढचा भारत असे भारत राहत असतात त्या देशात 130 कोटी लोकांना मणके असल्याचा प्रत्यय देणारा हाच एक दिवस असतो.
मताधिकार म्हणजे आपण या महान देशाचे मालक असल्याची जाणीव. मतदार यादीत नाव म्हणजे देशाच्या मालकीहक्काच्या 7/12 मध्ये नाव असल्याचा अभिमान.
संविधानाच्या कलम 326 अन्वये सर्व भारतीयांना सार्वत्रिक मताधिकार देणार्‍या डा.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आदींना वंदन.......
..........................

"सिंगल मिंगल"

"सिंगल मिंगल" - आजच्या तरूणाईचे भोवंडून टाकणारे चित्रण
"सिंगल मिंगल", ही प्रा. श्रीरंजन आवटे यांची पहिलीच पण कलदार मुद्रा असलेली कादंबरी. 208 पृष्ठांच्या दर्जेदार निर्मितीमुल्ये असलेल्या कादंबरीचे प्रकाशक आहेत मराठीतले आघाडीचे राजहंस प्रकाशन.
नायक कैवल्य हा दुसर्‍या वर्षात शिकणारा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्याचे समकालीन युवा भावविश्व चित्रशैलीत ही कादंबरी टिपत जाते.
त्याचे प्रेम जिच्यावर आहे ती महाविद्यालयीन तरूणी रेवा, तिचे अनेक प्रियकर, या सर्वांच्या मित्रपरिवारातील विविध जिंदादिल व्यक्ती आणि वल्ली, त्यांचे प्रेमविश्व असा फार मोठा पट ही कादंबरी कवेत घ्यायचा प्रयत्न करते आणि चांगल्यापैकी निभावतेही. आजच्या नव्या जनरेशनची स्पंदनं किती खोलवर पकडत जाते सिंगल मिंगल.
सध्याच्या अत्याधुनिक जगातील महानगरी तरूणाई, सोशल मिडीया, महाविद्यालयीन जगत, त्यांचे वादविवाद, त्यांचा प्राधान्यक्रम, सामाजिक प्रश्नांबद्दलचे भान आणि खळाळते तारूण्य, विकार, व्यसनं असं सगळं जगणं खोलवर चित्रित करणारी ही ठसठसीत कलाकृती. आजच्या महाविद्यालयीन तरूणांची चिडचिड, त्यांचे टोकदार स्वभाव, कारेपणा, कामजिज्ञासा, त्यांची भन्नाट,बेछूट भाषा यांचे अनेकपदरी जग ही कादंबरी वाचकाच्या पुढ्यात आणून खुले करते.
नवखेपणाच्या काही मोजक्या खुणा सोडल्या तर अतिशय प्रवाही, वाचनीय, अनेकदा भिडणारा आणि काहीवेळा भोवंडून टाकणारा घटनाक्रम हे या कादंबरीचे वैशिष्ट्य.
तरूणाईच्या जगाचे अतिशय धीट आणि टोकदार वास्तव यात असल्याने त्यात येणारे लैंगिक जीवनाचे संदर्भ अटळच होत.
मात्र कादंबरीची सुरूवात आणि शेवट अकारणच जास्त गडद झालाय असे वाटते. त्यातून या कादंबरीबद्दल एक सनसनाटी कादंबरी असा ग्रह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तरूण पिढी कदाचित या कादंबरीकडे पटकन वळेलही पण त्यामुळे लेखकावर काहीसे भडक लेखन करणारा असा शिक्का मारला जाण्याची भिती मला वाटते. प्रत्यक्ष कादंबरीत येणारी सखोलता आणि समग्र जीवनदृष्टी वरवरची नसून ती आरपार अस्वस्थता निर्माण करणारी आहे.
या कादंबरीचा बुद्धीमान नायक कैवल्य याची तगमग, प्रेमातली तडफड, दोस्तान्यातली भंकस, युवा अशोषी, प्रेमातील गुरूत्वाकर्षण, देहगंध हे सगळे लेखकाने अस्सलपणे चिमटीत पकडले आहे. हा साराच भाग अतिशय थेट भिडणारा असून तो मुळातूनच वाचायला हवा.या पहिल्याच लेखनात आवटेंनी त्यांची गुणवत्ता दाखवली असून त्यांच्याकडून आगामी काळात महत्वाचे लेखन होऊ शकेल अशी आश्वासकता या कृतीतून प्रगट होते. हे सारे रसायन अवश्य अनुभवावे इतके दमदार आहे.
आजच्या तरूणाईचे अलवार जग टिपणारी ही कलाकृती अस्वस्थ करून सोडते.
प्रा. श्रीरंजन आवटे यांनी या पहिल्याच कादंबरीद्वारे फार मोठ्या अपेक्षा निर्माण केलेल्या आहेत.

पारदर्शक खोटे

सालाबादप्रमाणे पारदर्शक वधुवर परिचय मेळावा चालू होता.
वर, : " मी उच्चशिक्षित आहे. मी पारदर्शक श्रीमंत कुटुंबातील आहे. मला अतिउच्च पगाराची मल्टीनॅशनलमधली पारदर्शक नोकरी आहे. माझे मुंबई, पुणे,ठाणे,नाशिकमध्ये 4 बेडरूमचे पारदर्शक फ्लॅट आहेत. मी एकुलता एक आहे. मी पारदर्शक निर्व्यसनी आहे. मी कष्टाळू, बुद्धीमान आहे. मला भाऊबहीण नसल्याने वडीलोपार्जित संपत्तीचा मी एकमेव पारदर्शक वारसदार आहे. मी निरोगी असून दिसायला पारदर्शक....."
वधु : "तुमच्यात एव्हढी पारदर्शक भारी गुणवत्ता असेल तर तुमचे स्थळ नाकारण्याचे मला काही कारणच दिसत नाही. फक्त एक सांगा,
तुम्ही पारदर्शक सर्वगुणसंपन्न आहात पण तुमच्यात एकतरी दुर्गुण असेलच ना?"
वर :- "दुर्गुण म्हणाल तर एकही नाही. फक्त किरकोळ उणीव म्हणाल तर एव्हढीच आहे की मला पारदर्शक खोटे बोलायची सवय आहे."

प्रमोद महाजन..खरा साहेब

प्रमोद महाजन हे एक अफलातून वक्ते होते.
एका भाषणात त्यांनी सांगितलेला किस्सा -
एक शाळेत शाळा तपासनीस आलेले असतात. ते एका मुलाला एक प्रश्न विचारतात, मुलाला नीट उत्तर देता येत नाही. ते वैतागतात, त्याला म्हणतात, अरे, तुला इतक्या साध्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, वर्षभर वर्गात काय झोपा काढतोस?
तो मुलगा म्हणतो, सर चुक माझी नाही.मुळात मी या वर्गातला विद्यार्थीच नाहीये. मला दुसर्‍या वर्गातून इकडे आणून बसवलय. मला कसं माहित असणार इकडचं?
साहेब शिक्षकाला झापतात, काय हो असा उद्योग करता काय? इकडची उपस्थिती वाढवण्यासाठी दुसर्‍या वर्गातली मुलं आणून बसवता?
शिक्षक गयावया करीत सांगतात, साहेब विश्वास ठेवा, मी हे केलेले नाही. आज इकडचे शिक्षक रजेवर असल्याने ऎनवेळी मला या वर्गावर पाठवलेय. मला हे काहीही माहित नव्हते.
साहेब भडकतात, मुख्याध्यापकाला बोलवून धारेवर धरतात.
असले धंदे करता?
मुख्याध्यापक म्हणतात, साहेब त्याचं असं झालं, इथल्या मुख्याध्यापकांच्या मुलीचा आज बाहेरगावी साखरपुडा आहे. ते नसल्याने संस्थेने मला आजचा दिवस दुसर्‍या शाळेतून इकडं पाठवलय. माझी काय चुक?
साहेबांचा पारा चढतो. ते संतापून म्हणतात, अरे चाललय काय या शाळेत? मुलं नकली, शिक्षक बदली, मुख्याध्यापक बाहेरचे, अरे मुर्खांनो, आज जर खरा साहेब आला तर असता तर काय शोभा झाली असती कळतय तुम्हाला?

कोंबडी विक्रेत्यांची पारदर्शक लोकशाही


आचार्य दादा धर्माधिकारी एका अस्सल लोकशाहीवादी पारदर्शक कोंबडी विक्रेत्यांची गोष्ट नेहमी सांगायचे.
तर हा कोंबडी विक्रेता कोंबड्यांचा पारदर्शक विकास करणारा हाडाचा लोकशाहीवादी व्यापारी असतो.
तो एकदा सर्व कोंबड्यांची सभा घेतो.
त्यांना तो सांगतो, बघा मी पारदर्शक लोकशाहीवादी असल्याने आणि हुकुमशाहीचा मी कट्टर विरोधक असल्याने मी तुम्हाला निर्णयाचा पारदर्शक सर्वाधिकार देणार आहे. मला सांगा, तुम्हाला मी मान सुर्‍याने कापून मारू, हलाल करून मारू, की उकळत्या पाण्यात बुडवून मारू, की तुमची मान मोडून मारू, की....? तुमचा जो काही पारदर्शक निर्णय असेल तो मला मोकळेपणाने सांगा.
एक कोंबडी घाबरत घाबरत म्हणाली, पण मालक, आम्हाला जगायचेय, आम्हाला मारू नका.
लोकशाहीवादी विक्रेता म्हणाला, मला माफ करा पण तुम्हाला मारायचा पारदर्शक निर्णय आधीच झालेला आहे. मारण्याची पारदर्शक पद्धत कोणती हवी एव्हढेच तुम्हाला विचारलेय. त्यावर पटपट बोला.