Sunday, June 23, 2013

शरीरसंबंध हेच लग्न?


वटसावित्रीचा सण नुकताच साजरा करण्यात आला. युनोने हाच दिवस नेमका विधवादिन म्हणून घोषित केला. दरम्यान संमतीने ठेवलेले शरीरसंबंध हेच लग्न होय, हा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय खळबळ माजवून गेला. चित्रपट अभिनेता शाहरूख खानने बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान चाचणी केल्याची अफवा उठवली गेली. या सार्‍या घटनांमुळे समाज आणि स्त्रिया ही चर्चा पुन्हा एकदा ऎरणीवर आलेली आहे.
  शाहरूख खान याने गर्भलिंग चाचणी केल्याची बातमी मिड- डे या इंग्रजी वृत्तपत्राने दिली होती. हीच बातमी काही मराठी वृत्तपत्रांनीही दिली. नंतर चॅनलवाल्यांनी ही बातमी चालविली.सतत प्रसिद्धीच्या झोताची चटक लागलेल्या एका महिला कार्यकर्तीने तर कोणतीही शहानिशा न करता यानिमित्ताने चमकून घेण्यासाठी दवाखाना आणि किंग खानवर सरळ कारवाईची मागणीच केली. माझाच "तारा अजिंक्य" या तोर्‍यात उठसूठ कोणावरही बदनामीकारक आरोपांचा  "वर्षाव" करण्याची ही उथळ वॄती स्त्री चळवळीला मारक ठरते. आता दवाखान्याने मानहाणीची नोटीस देवून बाईंच्या माफीची मागणी केलेली आहे.
मुळात शहारूख खानने कुठे तरी मला मुलगा होणार आहे,असे वाक्तव्य केले होते,त्यावरून साप,साप म्हणून भुई धोपटण्याचा हा प्रकार घडला.मात्र शहारूख खान याने हे वक्तव्य कुठे आणि कधी केले होते,याची माहिती कोणाकडेही नव्हती.
भारतात ज्या दिवशी असंख्य सौभाग्यवती वडाला फेर्‍या मारीत होत्या तोच दिवस नेमका युनोने विधवादिन म्हणून घोषित केला.भारतीय संस्कृतीमध्ये मिथक कथांना खूप महत्व आहे. नवर्‍याचे प्राण यमाकडून परत आणणार्‍या सावित्रीची कथा महाभरतात आहे. हजारो वर्षे तिच्या प्रभावाने अनेक स्त्रिया वटसावित्रीची ही पुजा  करीत आल्यात. सालाबादप्रमाणे अनेक भाविक आणि उच्चशिक्षित स्त्रियांनी हा सण उत्साहात  साजरा केला. आमच्याकडे येणारी मदतनिस मुलगी सकाळीच माझ्या पत्नीला विचारीत होती, "ताई, तुम्ही का जात नाही वडाला फेर्‍या मारायला?" माझी बायको म्हणाली, "माझा आणि माझ्या नवर्‍याचा या प्रकारांवर विश्वास नाही. मुळात आमचा पुनर्जन्मावरच विश्वास नाही. हा जन्म आनंदात जावा एवढीच आमची मनापासूनची धडपड आहे."
तिला काही हे पटलेले दिसले नाही. "असे कुठे असते काय? यांचे आपले जगावेगळे काहीतरीच!" असे काहीसे भाव तिच्या चेहर्‍यावर होते.
कुमुद पावडे यांच्या "अंत:स्फोट" मध्ये एक प्रसंग आहे. त्यांच्या आत्याला चांगली ४० वर्षे संसार केल्यानंतर नवर्‍याने सोडले. कारण दिले, "बायको आवडत नाही!"आत्या माहेरी भावाकडे येऊन राहू लागली. वटसावित्रीच्या दिवशी भक्तीभावाने वडाला सात फेर्‍या मारून "हाच नवरा सात जन्म मिळू दे"अशी प्रार्थना करून आली. कुमुदने आत्याला विचारले,"ज्या नवर्‍याने तुला सोडले, तो कशाला सात जन्म हवाय तुला?" आत्या म्हणाली, त्याने त्याचा धर्म सोडला, आपण कशाला आपला धर्म सोडायचा? मी फेर्‍या मारणारच!" कुमुदने कपाळावर हात मारुन घेतला.
आत्याच्या नवर्‍याने दरम्यान दुसरी बायकोही केली.तरी आत्याच्या फेर्‍या चालूच! कुमुद म्हणाली," अगं आत्या, तू म्हणतेस हाच नवरा सात जन्म हवा, त्याची दुसरी बायको म्हणते हाच नवरा सात जन्म हवा, म्हणजे हीच सवत तुला सात जन्म मिळणार!" आत्या हादरली, म्हणाली "नको गं बाई, ही सवत मला नको." आत्याने वडाला फेर्‍या मारायचे तात्काळ बंद केले.
मध्यंतरी आम्ही एक सर्वेक्षण केले होते.यादिवशी वडाला फेर्‍या मारणार्‍या स्त्रियांच्या आम्ही मुलाखती घेतल्या. त्यांच्याकडून एक प्रश्नावली भरून घेतली. यात मुद्दाम शहरी,ग्रामीण, निरक्षर ते पीएच.डी., मजुरी करणार्‍या ते आय.ए.एस.,वय वर्षे १५ते ८५ असा सगळा मोठा स्त्री गट घेतला होता.
तुम्ही दबावापोटी ही पूजा करता की मनापासून करता? हाच नवरा तुम्हाला सात जन्म खरेच हवाय का? या प्रश्नावर २५% महिलांचे उत्तर होते, "हो. नवरा खूप छान आहे. आमचा संसार खूप सुखाचा आहे.ही पूजा मी मनापासून करते."
५३% महिला म्हणाल्या, सात जन्माचे सोडा, याच जन्मात नवरा नको झालाय. उल्ट्या फेर्‍या मारायची सोय असती तर आत्ताच मारल्या असत्या.पण काय करणार? फेर्‍या नाही मारल्या तर नवरा मारहाण करणार.शेजारीण संशय घेणार. एव्हढा ताप कुणी सांगितलाय?फेर्‍या मारा मोकळे व्हा."
१३% महिला म्हणाल्या," ही आमची गुंतवणूक आहे. लग्न झाले तेव्हा नवरा खूप वाईट वागायचा. २०/२५ वर्षे खूप मेहनत घेतली. नवर्‍याचे लाड केले. कायदा, नातेवाईक, संघटना सारे फंडॆ वापरले. नवरा आता दुरूस्त झालाय. आता हाच सात जन्म हवा. दुसरा करायचा म्हणजे कोणताही असला तरी भारतीय "नग"असणार. म्हणजे पुन्हा उमेदीची २०/२५ वर्षे वाया घालवावी लागणार. त्यापेक्षा आमची ही गुंतवणूक कामी येईल."
६% बायका म्हणाल्या," आम्ही मनापासून पूजा करतो. आमची  देवाला एकच प्रार्थना आहे. देवा एक मेहरबानी कर.हाच जन्म सातवा घोषित कर."                                                                                                                                                                                                         शरीरसंबंध हेच लग्न होय, या तामिळनाडूमधील मद्रास उच्च न्यायालयाच्या ताज्या निकालपत्राने कुटुंबसंस्थेत भुकंप घडवून आणला आहे. कोईमतूर येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये एका महिलेने पोटगीसाठी प्रकरण दाखल केले होते. नवर्‍याचे चपलांचे दुकान आहे व त्याचे उत्पन्न २५ हजार आहे, असा दावा तिने केला होता. या नवर्‍यापासून दोन मुले जन्माला आल्याचा तिने दावा केला होता. दुसरीकडे नवर्‍याने सदर अर्जदार ही आपली लग्नाची बायको नसल्याचा बचाव सादर केला होता.पतीने तो दुकानदार नसून, चपलांच्या गोडाऊनमध्ये  नोकर असल्याचे  न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते. हे दोघेही  मुस्लिम धर्माचे आहेत.कौटुंबिक न्यायालयाने   दोन्ही मुलांची पोटगी म्हणून पित्याने  ५00 रुपये रक्कम द्यायचा आदेश दिला. पण महिला ही लग्नाची बायको असल्याचे सिद्ध करू न शकल्याने तिला पोटगी नाकारली. या निकालाविरुद्ध महिलेने मद्रास उच्च न्यायालयात अपील दाखल केले. या अपिलाच्या सुनावणीला सदर पुरुष हजर राहिला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने एकतर्फी निर्णय दिला आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                
दुसर्‍या अपत्याच्या जन्मावेळी त्या महिलेचे सीझरिंग ऑपरेशन करावे लागले होते. त्यासाठी संमतीपत्रावर प्रतिवादीने नवरा म्हणून स्वाक्षरी केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने महिलेला पत्नीचा दर्जा दिला.निकालात न्यायालय असे म्हणते, की दोन्ही व्यक्ती एकत्र होत्या व संमतीने त्यांनी शरीरसंबंध केला होता. त्यामुळे संमतीने शरीरसंबंध झाला, त्यावेळी महिलेला पत्नीचा दर्जा प्राप्त झाला आणि पुरुषाला पतीचा दर्जा प्राप्त झाला. एवढेच नव्हे, तर या दोन व्यक्तींमधील विवाह हा नोंदणीकृत झाला नसला तरीदेखील सदर विवाह वैध आहे. वैध विवाहासाठी असणारी सप्तपदी किंवा  कबूलनामा अशा गोष्टी महत्त्वाच्या नसून, शरीरसंबंध हा महत्त्वाचा असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.  हिंदू विवाह कायद्यामध्ये विवाह पूर्ण होण्यासाठी सप्तपदी होण्याचे बंधन आहे.
पारसी विवाहामध्येदेखील आशीर्वाद नावाचा महत्त्वाचा विधी कायद्याने आखून दिला आहे. अन्य धार्मिक कायद्यांमध्ये आणि विशेष विवाह कायद्यामध्येही आवश्यक गोष्टींची यादी आहे. परंतु या निकालपत्रामुळे या सर्व गोष्टी गौण झाल्या असून, शरीरसंबंध हा एकच निकष महत्वाचा बनला आहे.                                                                                                                                   आजपर्यंत कायद्याने विवाहपूर्व संबंधांना आणि विवाहबाह्य संबंधांना कधीच मान्यता दिलेली नाही. विविध कायद्यांतील तरतुदींत अशा कृत्यांना प्रतिबंध केला असून, तो गुन्हा मानलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये  मद्रास उच्च न्यायालयाच्या या  निकालपत्राने बरेच गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.हिंदू विवाह कायदा १९५५ सालचा आहे. सर्वच कायद्यांमध्ये काळानुरूप बदल करणे गरजेचे असते. आज आपल्या समाजामध्ये विवाहाशिवाय एकत्र राहणारी काही तरूण जोडपी आहेत. "लिव्ह इन रिलेशनशिप"च्या या वाढत्या प्रकाराला कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा मुद्दा विचारार्थ आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे हे निकालपत्र सर्वोच्च न्यायालयात टिकेल किंवा नाही हेही पाहावे लागेल. भारतीय विवाह संस्थेच्या गढीला या निकालाने जोरदार हादरा दिला एव्ह्ढे मात्र खरे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,