Thursday, June 13, 2013

कृषिवल: नव्या पर्वाची पेरणी


मराठी वृत्तपत्र सृष्टीचा इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. लोकशिक्षण,जागरण, लोकरंजन आणि माहितीच्या प्रसारात वर्तमानपत्रांनी मोठे आणि भरिव योगदान दिलेले आहे.प्रामुख्याने शिक्षण, साहित्य, संस्कृती, सामाजिक क्षेत्र आणि माध्यमे यांचा वर्तमान आलेख सांगतो की. त्यांचा प्रवास धर्म, व्रत,व्यवसाय आणि आता किफायतशीर धंदा असा  वेगाने होऊ लागला आहे. टिकून राहण्यासाठी करावी लागणारी जागतिक पातळीवरची तीव्र स्पर्धा,राजकारण्यांचा सर्वदूर हस्तक्षेप, सर्वच क्षेत्रात मूल्यांचा होत असलेला र्‍हास आणि सोशल मिडीया,मोबाईल असे बदलते प्रवाह यामुळे वातावरण ढवळून निघत आहे. जाहिरातदार आणि वाचक यांना आकर्षित करून घेण्यासाठी तर्‍हेतर्‍हेचे फंडे वापरले जात आहेत. वर्धापन दिनाच्या निमित्ताने पानसुपारी,हळदीकुंकू,चहापानाचे किंवा स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करून वाचक भेटीचा घाऊक कार्यक्रम करण्यावर सगळ्यांचाच भर असतो.
कृषिवल हे शेतकरी-कामगारांच्या चळवळीतून जन्माला आलेले आणि आपले स्वत्व आणि वेगळे अस्तित्व कायम राखलेले वॄत्तपत्र आहे.परवा कॄषिवलचा ७७वा वर्धापन दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.राज्यातील अनेक तरूण स्तंभ लेखक अलिबागला जमले होते.राज्यातील स्तंभ लेखकांची पहिली विचार परिषद आयोजित करून कृषिवलने औपचारिक-अनौपचारिक असे रसरशित साहित्य संमेलन पार पाडले. मान्सूनचा पहिला पाऊस आणि विचारांची मुसळदार बरसात असा अनोखा सोहळा यानिमित्ताने अलिबागला संपन्न झाला. दुसर्‍या दिवशी रायगड जिल्ह्यातील सर्व वॄत्तपत्रांच्या ग्रामीण पत्रकारांची कार्यशाळा आयोजित करून कॄषिवलने  एक नवा पायंडा पाडला. या जोमदार आणि बहारदार पेरणीद्वारे कॄषिवलने एका नव्या पर्वाची सुरूवात केलेली आहे.
१८७८ साली पुण्यात पहिले ग्रंथकार संमेलन आयोजित करण्यात आले होते.त्यातून आजच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जन्म झाला.आज या संमेलनाला दरवर्षी लाखो रसिक उपस्थित असतात आणि कोट्यावधी रूपयांची ग्रंथविक्री होते.ही देशातील सगळ्यात मोठी ग्रंथ,ग्रंथकार आणि रसिकांची महाजत्रा असते.नेमेची येतो पावसाळा अशा पद्धतीने साहित्य संमेलन आणि वाद यांचे अतूट नाते आहे.दशवार्षिक जनगणना,पंचवार्षिक निवडणुका आणि दरवर्षीचे साहित्य संमेलन यांनी मराठी माणसाच्या भावजीवनात जब्राट स्थान पटकावलेले आहे.
१९९० चे दशक हे २०व्या शतकातले शेवटचे दशक होते. शतकभरातील विविध क्षेत्रातील वैचारिक धांडोळा आणि लेखाजोखा मांडण्यासाठी विचारवेध संमेलने भरवण्यात आली.सखोल वैचारिक आदानप्रदान करणारा मौलिक उपक्रम म्हणून या संमेलनांनी  लक्षणीय योगदान दिले.शतकभराचा चिकीत्सक शोधपट अभ्यासकांना श्रीमंत करून गेला.
गेली काही वर्षे ख्यातनाम लेखक राजन खान पाचगणीजवळ खिंगर येथे पावसाळ्यात ३ दिवसांचे अनौपचारिक साहित्य संमेलन भरवित असतात.कोणतीही आखीव रेखीव कार्यक्रम पत्रिका नसूनही मोठेमोठे लेखक आणि रसिक गोळ्यामेळ्याने इथे साहित्याचा आनंद घेतात.खूप मजा येते.हे भन्नाट साहित्य शिवार आता भलतेच जोमात फुलले आहे. पुण्यात आणि इतर अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडतात.जगातल्या उत्तमोत्तम  चित्रपटांची ही महापर्वणी म्हणजे चित्रपट रसिकांची दिवाळीच असते.अभिरूचीला पैलू पाडणारे हे पर्व मनाची कवाडे सताड उघडायला भाग पाडते.
या चारही मौलिक कार्यक्रमांचा संगम घडवण्याची अनोखी किमया कृषिवलच्या या परिषदेने साधली होती.
नेटका आणि विचारगर्भ उद्घाटन सोहळा, ३ ज्वलंत आणि संवेदनशील विषयांवरील परिसंवाद, लघुपट महोत्सव, कवीसंमेलनम आणि पुस्तक लोकार्पण सोहळा अशा भरगच्च कार्यक्रमांनी पहिला दिवस संस्मरणीय ठरला.
दादू:एक नि:शब्द हुंदका{दिग्दर्शक:किरण साष्टे}, पंचगंगा:द जर्नी{दिग्द. अनुप जत्राटकर} या २ लघुपटांनी पर्यावरण प्रदूषणाचे नदी,समुद्र नी मासेमारीवर होणारे विपरित परिणाम कलात्मक पद्धतीने ताकदीने टिपले होते. लाइफ सर्कल{दिग्द.प्रथमेश इनामदार} या लघुपटाने मानवी भलेपणातून अनाथांना मायेची पाखर घालणारे "माझे घर"ची भेट घडवून आणली.दर्जेदार निर्मितीमूल्ये, पकड घेणारी कथा, भिडणारी मांडणी यामुळे या युवा दिग्दर्शकांनी फार मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत.दादुची व्यथा तर काळजाला आरपार भेदून जाते.वेळेअभावी या दिग्दर्शकांशी चर्चा होऊ शकली नाही याची रुखरुख वाटत राहिली.
"ही जात का जात नाही?" या परिसंवादातील प्रा.जी.एस.भोसले, भगवान दातार,निलेश येलगुंडे,आलोक जत्राटकरा अणि जगदीश मोरे यांची मांडणी अंतर्मुख करणारी होती. ताजे टवटवीत चिंतन, प्रांजळ आत्मपरिक्षण,सखोल व्यासंगातून आलेले संदर्भ आणि वर्तमानातील सगळी गुंतागुंत चिमटीत पकडणारी ही चर्चा खूप काही टोकदार असे देउन गेली.खरेतर हा वादग्रस्त आणि ज्वलंत विषय असतानाही वादाऎवजी निखळ संवाद घडला हे एक आश्चर्यच म्हटले पाहिजे.
"माझी बाईमाणसाची कहाणी" सांगितली, सुजाता पाटील, स्मिता थोरात, मधू निमकर, अश्विनी सातव-डोके, प्रियदर्शिनी मोरे-कदम, श्रद्धा वार्डे आणि स्मिता पाटील-वळसंगकर यांनी. कवयत्री,पत्रकार, उद्योजक,शासकीय अधिकारी, मुख्याध्यापिका,कार्यकर्ती आणि संपादक अशा विविध पदांवर नी  भुमिकांमध्ये काम करणार्‍या या महिलांनी स्त्री जीवनातील विविध समस्यांची गुंतागुंत अलगदपणे उलगडवून दाखवली.मतमतांतरे आली आणि अंतरविरोधही टिपले गेले.प्रश्न अनेकपदरी आहे आणि स्त्री-पुरूष दोघे मिळून झटल्याशिवाय तो मार्गी लागणार नाही अशा स्वरूपाची उमेद वाढवणारी ही चर्चा होती. स्त्री प्रश्नावरची चर्चा असल्याने त्यात स्त्रियाच बोलणार हे उचितच होते पण कवी संमेलनात जसे स्त्री-पुरूष दोघे सहभागी झालेले होते तसेच प्रत्येक परिसंवादात व्हायला हरकत नव्हती.
"लिहिल्याने काय फरक पडतो?" या चर्चेत वाचन आणि लेखन संस्कृतीने जगणे कसे सुंदर होते ह्यावर शाम जोगळेकर,राहूल कदम, विलास नाईक,बाळ सिंगासने,अभिजीत पेंढारकर, अशोक धुमाळ झकास बोलले.लिहिले नाही तर काय फरक पडणार आहे असा प्रश्न स्वता:ला विचारत या वक्त्यांनी चर्चेत अनेक रंग भरले. कविसंमेलनात दिलीप पांढरपट्टॆ यांनी आपल्या खेळकर शैलीने उंची कायम ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न केला.सुनील पाटील, हर्षवर्धन पवार,सुजाता पाटील,स्मिता पाटील-वळसंगकर आदींच्या कविता दर्जेदार होत्या. स्थानिक नवोदित कवींना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न स्तुत्य असला तरी त्यामुळे उत्तम कवितेसोबतच कविता कशी असू नये त्याचेही प्रात्यक्षिक मिळून जाते.
प्रतिम सुतारची मिमिक्री हे खास आकर्षण होते. डा.श्रीराम लागू, शरद पवार, राज ठाकरे, दिलीप प्रभावळकर यांच्या नकला अप्रतिम होत्या.
दुसर्‍या दिवशी पत्रकारितेतील बदलते प्रवाह सर्व ताकदीनिशी अनेक स्टार आणि ज्येष्ट पत्रकारांनी टिपले. एबीपी मा्झा चे प्रसन्न जोशी यांनी जोरदार बेटींग केली.दोन्ही दिवस न्या.यशवंत चावरे आणि कृषिवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांचा सहभाग खूपच महत्वाचा ठरला.परिषदेला दोन्ही दिवस जाणकार रसिक आणि दर्दी साहित्यप्रेमींनी उदंड गर्दी केली होती.
कृषिवलचे संपादक संजय आवटे हे तरूण पिढीतले व्यासंगी,साक्षेपी आणि सामाजिक प्रश्नांची सखोल जाणीव असणारे महत्वाचे संपादक आहेत. ते लिहितात जितके चित्रशैलीत तितकेच बोलतातही मार्मिक! त्यांची भाषणे ही एक मेजवाणीच होती.त्यांची या परिषदेमागची संकल्पना प्रत्यक्षात आणायला.त्यांना पूर्वतयारीसाठी फारसा वेळ मिळालेला नसतानाही ही परिषद त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्‍यांनी फार मोठ्या उंचीवर नेली.या परिषदेने एक नवी वाट चोखाळलेली आहे.आजवर कोणत्याही बड्या वर्तमानपत्रानेही न केलेला परिषदेचा असा पराक्रमी उपक्रम कृषिवलच्या टिमने उत्तुंग यशस्वी करून दाखवलेला आहे.
गेली ३ वर्षे चिमुकले कृषिवल मराठीतली "द हिंदू" ची जागा भरून काढण्याचा अटोकाट प्रयास करीत आहे.संजय आवटेंमध्ये ती क्षमता आहे.त्यांची सर्वंकष आणि दमदार वाटचाल बघता आणि या ऎतिहासिक परिषदेचे घवघवीत यश पाहता ते मराठी वर्तमानपत्रांमधले द हिंदू नक्कीच उभे करू शकतात अशी आशा करायला खूप जागा आहे.ही पेरणी नव्या पर्वाची आहे हे निर्विवाद!No comments:

Post a Comment