{महाराष्ट्र टाइम्स, दि.२९ जून २०१३, संपादकीय पान, सर्व आवृत्त्या}
समाजक्रांतीचे उर्जाकेंद्र
प्रा. हरी नरके
जोतिराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केले. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता.
..........................................................
आधुनिक भारताच्या सामाजिक जडणघडणीत महाराष्ट्राचा, विशेषत: पुण्याचा, लक्षणीय वाटा आहे. १९व्या शतकात पुणे हे भारतीय प्रबोधन चळवळींचे केंद्र होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकहितवादी, न्या. रानडे, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, आगरकर, महर्षी कर्वे, बायजा कर्वे, महर्षी शिंदे आदींनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींना ऊर्जा पुरवली. पुण्यातील त्यावेळच्या जुन्या गंज पेठेतील फुलेवाडा सुमारे ५० वर्षे सामाजिक चळवळींना रसद पुरवित होता. या वाड्याच्या खाणाखुणा पाहताना या अभिमानास्पद इतिहासाचा पोवाडा आपल्या कानात गुंजत राहतो. पूर्व पुण्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यावरण संमिश्र आणि विविधतेने नटलेले आहे. सर्व जाती, धर्मांचे कष्टकरी या भागात राहतात. तेथील वाड्यातच जोतिराव फुले यांचा ११ एप्रिल १८२७ रोजी जन्म झाला. मिशनऱ्यांच्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले. १८४८मध्ये त्यांनी देशातील मुलींची पहिली भारतीय शाळा सहकाऱ्यांच्या मदतीने भिडे वाड्यात सुरू केली, तेव्हा सावित्रीबाई याच वाड्याचा उंबरठा ओलांडून सार्वजनिक जीवनात पहिले पाऊल टाकत्या झाल्या. भारतीय स्त्रियांचे सार्वजनिक जीवन अशा रीतीने येथून सुरू झाले. भारतातील प्रौढ साक्षरता अभियान १८५४मध्ये याच वाड्यात सुरू झाले. रात्रीच्या स्त्री-पुरुषांच्या दोन पहिल्या शाळा याच वाड्यात सुरू झाल्या.
विधवांच्या बाळंतपणाची सोय करणारे केंद्र आणि देशातील पहिला भारतीय माणसांनी चालवलेला अनाथाश्रम (बालहत्या प्रतिबंधक गृह) येथेच सुरू झाला. अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला पाण्याचा हक्क देणारा पहिला हौद याच वाड्यात आहे. १८७३ साली याच घरात स्थापन करण्यात आलेला सत्यशोधक समाज देशातील सर्वदूर ग्रामीण भारतात पसरलेले पहिले जनआंदोलन ठरले. येथेच जोतिरावांनी मराठीतील पहिले आधुनिक नाटक 'तृतीय रत्न' लिहिले. १८६९ साली शिवरायांचा पोवाडामय चरित्रपट येथेच निर्माण झाला. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या मुक्ती चळवळींना अर्पण करण्यात आलेला 'गुलामगिरी' हा ग्रंथ येथेच जन्माला आला. 'शेतकऱ्यांचा असूड' आणि सार्वजनिक सत्यधर्माचे क्रांतिकारक तत्त्वज्ञान येथेच साकारले. आयुष्यातील ५० वर्षे सामाजिक परिवर्तनाची लढाई लढून जोतिराव-सावित्रीबाई या दोघांचेही पार्थिव येथेच विसावले. जोतिरावांची समाधी याच वाड्यात आहे.
राज्य सरकारने १९६७ साली हे घर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. १९९३ साली छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून त्याची फेरउभारणी करून ते तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. या वाड्याला राष्ट्र्पतींनी समतेचे राष्ट्रतीर्थ म्हणून 'समता भूमी' घोषित केले. सुमारे १४० वर्षे जुन्या असलेल्या या वाड्यात जोतिरावांचे वडिलोपार्जित घर, ज्याचा जुना गंज पेठ, घर नं. ३९५, होता ते आणि त्यांनी स्वकष्टार्जित कमाईतून खरेदी केलेले घर यांचा समावेश आहे. जोतिरावांच्या नोंदणी केलेल्या मृत्युपत्रात त्यांनी या घराचे सर्व तपशील दिले आहेत.
यातले त्यांनी नवे बांधलेले घर ११ खणांचे होते. त्याच्या पूर्वेला रस्ता, पलीकडे तुंबडीवाले बैराग्याची आणि बापूभाई पिठवाल्याची घरे, पश्चिमेला बोळापलीकडे राजाराम गोविंदराव फुले यांची दोन घरे, दक्षिणेला बोळापलीकडे रामचंद्र किसन कुंभार यांचे घर व बाबाजी राणोजी फुले यांची बखळ; तसेच उत्तरेला रस्ता आणि नगरपालिकेचे पाण्याचे दोन हौद होते. यातील काही जागा वडिलोपार्जित, काही जोतिरावांनी लिलावात खरेदी केलेली, तर काही खरेदीद्वारे घेतलेली होती. जोतिरावांचे घर नं. ३९४, हे तीन खणांचे दीड मजल्याचे होते. त्याच्या पूर्वेला रा. कि. कुंभार, पश्चिमेला खंडोजी कृष्णाजी व बाबाजी राणोजी फुले, दक्षिणेला सटवाजी कृष्णाजी फुले यांची घरे. तर उत्तरेला बा. रा. फुले यांची बखळ होती. जोतिरावांची स्वत:ची खरेदी केलेली बखळ जागा ४३ फूट लांबी २८ फूट रुंद होती. याशिवाय आणखी दोन बखळ जागा त्यांनी विकत घेतल्या होत्या. १८९४पर्यंत ही घरे जोतिरावांच्या नावे होती. पुढे १९०७पर्यंत ती यशवंत फुले, त्यानंतर ती १९०९ ते १९१० याकाळात चंद्रभागा यशवंत फुले यांच्या नावे होती. त्यांनी २८ ऑक्टोबर १९१०ला ही वास्तू देडगेंना १०० रुपयांना विकली. त्यांच्याकडून ती १९२३पासून सावतामाळी फ्री बोर्डिंगने खरेदी केली. १९६७ साली महाराष्ट्र सरकारने ही घरे ताब्यात घेतली.
जोतिराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केले. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे कार्यकारी संचालक होते. ही कंपनी बांधकाम आणि इतर व्यापारी क्षेत्रात कार्यरत होती. पुणे-नगर रस्त्यावरील येरवड्याचा (बंडगार्डन) पूल बांधण्याच्या १८६९ सालच्या कामाचे उपकंत्राट त्यांच्या या कंपनीला मिळाले होते. या कामाला खडी, चुना, आणि दगड पुरविण्याचा मुख्य ठेका त्यांच्याकडे होता. १०० वर्षे मुदतीचा हा पूल आज १४४ वर्षांनंतरही मजबूत आहे. जोतिरावांच्या कंपनीने केलेली महत्त्वाची कामे म्हणजे कात्रजचा बोगदा आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. जोतिरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचेही काम केले जाई. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या 'वज्रसूची' या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिले. जोतिरावांनी ते 'जातीभेद विवेकसार' प्रकाशित केले. या कंपनीचे पुस्तकविक्री केंद्र होते. सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतिरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता.
स्वत:च्या शाळांमध्ये त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून सर्व मुला-मुलींना शेती व उद्योगाचे शिक्षण सक्तीचे केले होते. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते. टिळक-आगरकरांना पहिल्या तुरुंगवासात जामीन द्यायला आणि सुटकेनंतर त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यातही तेच दोघे पुढे होते. १८६९ साली जोतीरावांनी शिवचरित्र लिहिले. १८८५ साली त्यांनी देशात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू केला. रायगडवरील शिवसमाधीची डागडुजी केली आणि शिवरायांना महानायक म्हणून लोकमानसात प्रस्थापित केले. पुण्यात हिराबागेत आणि मुंबईला लालबाग-परळ भागात करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमांच्या नोंदी उपलब्ध आहेत.
aapaly mahitipuan lekhane aamchy doly samor jyotiravancha jivan pat ubha rahila.
ReplyDeletelekhachy navachi samarpakata vachatan shabda shabdat janvali
sir,
khupch chhan
ReplyDelete11:06am
Sunil Tambe
प्रिय हरी,
महाराष्ट्र टाइम्स मधील तुझा लेख वाचला. महात्मा फुलेंच्या व्यक्तिमत्वाचा अतिशय कमी शब्दांत परंतु साक्षेपी आढावा तू घेतला आहेस. महात्मा फुले एक यशस्वी उद्योजक होते हा मुद्दा त्यातून अधोरेखीत होतो. मुंबईच्या उभारणीत तेलगू समाजाचे योगदान या ग्रंथात मनोहर कदमने या तेलगू मुन्नुरवार समाजातील उद्यमशीलतेचा तपशील मांडला आहे. म. फुले आणि त्यांचे सहकारी, अनुयायी बहुजन समाजातील विविध जातीसमूहांमधून आलेले होते. माझ्या अंदाजाने बहुजन समाजातील उद्योजकांची ही पहिली पिढी होती. जातीच्या पारंपारिक व्यवसायापेक्षा वेगळ्या उद्योगाची वाट त्यांनी चोखाळली होती. बाजारपेठप्रधान उत्पादन, बाजारपेठांसाठी लागणार्या पायाभूत सुविधा या क्षेत्रातील संधी त्यांनी शोधल्या. या समाजक्रांतिकारकांचा भर त्यागापेक्षा संपत्तीच्या निर्मितीवर होता. समाजकार्याला मिळणारी आर्थिक रसद ही प्रामुख्याने या समाजातील उद्योजकांनी पुरवली होती.
बडोद्याच्या सयाजीराव महाराजांबद्दल महाराष्ट्राला फारशी माहिती नाही. म. फुले, रियासतकार सरदेसाई, डॉ आंबेडकर इत्यादिंच्या पाठिशी ते उभे राह्यले. भारतातील बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाचं अल्पसं श्रेय त्यांनाही दिलं पाहिजे. त्यांनी प्रकाशित केलेल्या गौतम बुद्धाच्या चरित्राने बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मानंद कोसंबी ह्यांना बुद्ध चरित्र आणि दर्शनाच्या अभ्यासाची प्रेरणा दिली. कोल्हापूर संस्थानाच्या आधीच अनेक समाजसुधारणांची अंमलबजावणी सयाजीरावांनी बडोदे संस्थानात केली होती. त्याशिवाय त्यांचा क्रांतीकारकांशीही संबंध होता. सयाजीराव जातीने मराठा नव्हते त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्या कार्याचा फारसा अभ्यास झाला नाही. ह्यासंबंधात माझी एकदा द. ग. गोडसे ह्यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांना हे समजत होतं परंतु वाद टाळण्यासाठी अर्थातच जातीचा उल्लेख टाळण्यासाठी त्यांनी असं म्हटलं की सयाजीराव दीर्घकाळ परदेशात असायचे आणि महाराष्ट्राबाहेर होते त्यामुळे आपल्याकडून असं दुर्लक्ष झालं असावं. सयाजीरावांसंबंधात विशेषतः तू काही निबंध लिहावेस ही विनंती.
कळावे,
सुनील
BY :Facebook Messege from Sunil Tambe