Sunday, June 9, 2013

महाराष्ट्राची दिल्लीत नवी ओळख - भव्यतम लेणे










दिल्लीतील नविन महाराष्ट्र सदनाचे उद्घाटन नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते झाले.दिल्लीतील लाल 
किल्ला,राष्ट्रपती भवन,संसद भवन यासारख्या दिमाखदार वास्तूंच्या यादीत महाराष्ट्राने ही नवी भर घातली आहे.लालकिल्ला,फतेपुर शिक्री ,ताजमहाल इथली भव्यता आणि कलात्मकता काळजाला भावते. या पार्श्वभुमीवर नविन महाराष्ट्र सदनाची वैभवशाली आणि दिमाखदार भव्यता आणि कलात्मकता मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहात नाही.
आपला पुण्याचा शनिवारवाडा आग्र्याच्या लाल किल्ल्यापुढे खुजा वाटतो.आपली राज्यातील बरीच बांधकामे अगदीच चिमुकली असतात.सरकारी कार्यालये म्हणजे तर ओंगळवाण्या बांधकामाचे नमुनेच असतात.या पार्श्वभुमीवर छगन भुजबळ यांच्या कलात्मक आणि भव्य सौंदर्य दृष्टीतून साकारलेले हे सदन बघून महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावते.
आपल्या ऎतिहासिक वाड्यांमधील शिसवी लाकडातील नक्षीदार कलाकुसर आणि महिरप या सदनात साक्षात पाषाणात उभी करण्यात आलीय. ऎतिहासिकता आणि आधुनिकता यांचा अद्वितीय मिलाफ हे या सर्व कामांचे ठळक वैशिष्ट्य आहे.हे महाराष्ट्र सदन बघुन कोणालाही आता  महाराष्ट्र बघायलाच हवा अशी ओढ निर्माण व्हावी ह्या हेतुनेच हे सारे उभे केल्याचे पदोपदी जाणवते.ही अपार चुंबकशक्ती पर्यटकांना महाराष्ट्र भुमीत खेचुन आणल्याशिवाय राहणार नाही असेच हे अद्वितीय वास्तुशिल्प आहे.जणु सह्याद्रीची सगळी भव्यता या सदनात एकवटली आहे.या सदनाचे खास आकर्षण आहे,भव्य ग्रंथालय,महाराष्ट्राच्या समग्र संस्कृतीचे दर्शन घडविणारे संग्रहालय आणि आधुनिक चित्र,शिल्प,साहित्य,संगित,नाट्यविषयक प्रदर्शनी लावण्यासाठी कलादालन.
वास्तुकला आणि वास्तुशास्त्र यांच्या क्षेत्रात महाराष्ट्राने   मोठे योगदान दिलेले आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा म्हणून अनेक भव्य राजवाडे, कलात्मक घरे आणि देखण्या इमारती दाखविता येतात. या वारशाचे जतन आणि संवर्धन करताना, त्याचप्रमाणे नवीन बांधकाम करताना उपयोगिता आणि सौंदर्य-दृष्टी यांचा मेळ घालण्याचा  प्रयत्न महत्वाचा असतो. सदनाचे बांधकाम करताना महाराष्ट्रातील नेवासा पाषाण, राजस्थानातील बन्सी पहाडपुर स्टोन आणि जगप्रसिद्ध इटालियन मार्बल यांचा वापर करण्यात आला आहे.वास्तुशिल्पांचे कलात्मक नमुने म्हणुन प्रसिद्ध असलेल्या पुणे,सातारा,नाशिक,इंदोर, महेश्वर आदी ठिकाणचे ऎतिहासिक वाडे,राजवाडे,महाल,हवेल्या अश्या नामांकीत वास्तुंचा सखोल अभ्यास करुन ती शैली इथे वापरण्यात आलेली आहे.मात्र हे बांधकाम म्हणजे केवळ प्रतिकृती होवु नये,ते एक भव्यतम लेणे व्हावे याची दक्षता घेण्यात आली आहे.त्यामुळेच प्रवेशद्वारावरील मेघडंबरी, पोर्चची भव्य आणि देखणी कमान,मुख्य प्रवेशद्वारातुन आत आल्यानंतरची थक्क करणारी विशालकाय स्वागतिका, थुईथुई नाचणारे मोर आणि समोर असलेली महाराष्ट्र मुद्रा. भव्य झुंबरे,महिरपा आणि सज्जे, होळकरी वास्तुशिल्पाची उत्कटता जिवंत करणारी भली थोरली रुंदच रुंद मार्गिका. राज्यपाल आणि मुख्यमंत्री महोदयांचे शामियाने शोभावेत असे सुसज्ज कक्ष .कुठल्याही राजवाड्यातील दरबार हा‘‍लची स्मृती जागे करणारी ऎतिहासिक पण आधुनिक सभागृहे,सारेच मराठेशाहीच्या वैभवशाली दौलतीची आठवण करुन देणारे बांधकाम.
सिरमूर प्लॉट, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली हा भूखंड तत्कालीन ब्रिटीश सरकारने हिमाचल प्रदेश येथील सिरमूर महाराज यांना 1930 साली वाटप केला होता. त्यामुळे सदर भूखंडाचे नांव ‘सिरमूर प्लॉट’ असे झाले. 1932 साली हा भूखंड बडोद्याचे सयाजीराव महाराज यांनी विकत घेतला. दुसऱ्या महायुध्दाच्या वेळी संरक्षण मंत्रालयाने सेना अधिकाऱ्यांच्या वापराकरिता आणि इमारतींच्या बांधकामासाठी सदर भूखंड आपल्या ताब्यात घेतला. तो 1999 पर्यंत केंद्र सरकारच्या ताब्यात होता. 1951 साली केंद्र सरकारने दिल्लीतील राजघराण्यांच्या सर्व मालमत्ता, संबंधित राज्य सरकारच्या मालकीच्या असतील, असे घोषित केले. त्यामुळे, हा भूखंड तत्कालीन मुंबई सरकारच्या मालकीचा झाला. “बॉम्बे स्टेट रिऑर्गनायझेशन आक्टनुसार बॉम्बे स्टेटचे गुजरात आणि महाराष्ट्र असे विभाजन झाल्यानंतर, गुजरात राज्याबाहेरील  सर्व मालमत्ता महाराष्ट्र राज्याच्या ताब्यात आल्या. महाराष्ट्र सरकारला सदर भूखंडाच्या मालकीबाबत 1970 साली कळले. त्यानंतर केंद्र शासनाकडे भूखंडाचा ताबा घेण्याबाबत पाठपुरावा व प्रयत्न केल्यानंतर 10 मे 1999 रोजी 6.18 एकर भूखंडाचा ताबा, ‘आहे त्या स्थितीत’ महाराष्ट्र शासनाला देण्यात आला.
सन 2000 ते 2005 या कालावधीत वरील भूखंडावर अर्थसंकल्प किंवा खाजगीकरणाच्या माध्यमातून नवीन अत्याधुनिक सुविधा असलेले महाराष्ट्र सदन उभे करण्याचे काम  विविध अडचणींमुळे   झाले नाही.हा परिसर "ल्युटीयन्स झोनमध्ये" येत असल्याने येथे उंच इमारती बांधायला मनाई आहे.अंधेरी (प.) येथिल लिंक रोड शेजारील महाराष्ट्र शासन व प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताब्यातील भूखंड झोपडपट्टीने वेढला होता.सदर भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी प्राधिकरणाने मे. के.एच.चमणकर यांची खाजगी विकासक म्हणून नेमणूक केली होती.उपरोक्त झोपडपट्टी विरहित जागेवर उपलब्ध होणारे चटईक्षेत्र विकासकास देऊन, त्या बदल्यात रु.100 कोटी किंमतीची अनेक शासकीय  इमारतींची बांधकामे व 1000 कायम स्वरुपी संक्रमणकालीन निवासस्थाने, अशा एकत्रित प्रस्तावास मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीने दि.28 ऑगस्ट 2006 रोजी मान्यता दिली. य़ातून नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाची अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज इमारत, मुंबई येथील हाय माऊंट अतिथीगृहाची पुनर्बांधणी, प्रादेशिक परिवहन विभागाची कार्यालये, निवासस्थाने व इतर बांधकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला.  त्यानुसार, महाराष्ट्र सदनाच्या नवीन इमारतीच्या कामाची दि.27 नोव्हेंबर 2006 रोजी सुरूवात झाली. सदर भूखंडावरील अतिक्रमणे, न्यायालयीन बाबी तसेच बांधकामासाठीच्या विविध परवानग्या मिळविण्यासाठी लागलेला वेळ, यामुळे बांधकामास विलंब झाला.
सदर प्रकल्पाचे वास्तुशास्त्रज्ञ मे.पी.जी.पत्की यांनी पुणे येथील विश्रामबाग वाडा, शनिवार वाडा, इंदौर व महेश्वर येथील होळकरांचे वाडे तसेच नाशिक व सातारा येथील ऐतिहासिक वास्तु-शिल्पांचा सखोल अभ्यास करुन महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा यांचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची आखणी केली. त्यानुसार नवी  दिल्ली  येथील  इतर सर्व  राज्यांच्या  अतिथीगृहांच्या  तुलनेत  अव्वल दर्जाचे महाराष्ट्र सदन उभे राहिले. ही संपूर्ण इमारत सेंट्रली एसी आहे.
महाराष्ट्र सदनाच्या नवीन इमारतीचे बांधकाम 1,70,707 चौ.फु. इतके असून त्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री यांचेकरीता विशेष कक्ष आहेत. मंत्री व राज्यमंत्री यांच्याकरीता 24 तर मुख्य सचिव व अप्पर मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकरिता 6 कक्ष असून  आमदारांकरिता 20 कक्ष तयार करण्यात आले आहेत. 80 साधारण कक्ष, अपंगांकरिता 2 विशेष कक्ष आणि कर्मचाऱ्यांकरिता 4 कक्ष असे एकूण 138 कक्ष उभारण्यात आले आहेत. या  नवीन  इमारतीमध्ये  अत्याधुनिक  सुविधांसह  एक मोठे सभागृह, स्वतंत्र व्हिडीओ कॉन्फरन्स कक्ष तसेच 5 बैठक कक्षांसह एक पत्रकार परिषद कक्ष देखील आहे. तसेच व्ही.आय.पी.भोजनकक्ष, सामान्य भोजनकक्ष, सांस्कृतिक केंद्र, संग्रहालय, वाचनालय, सुसज्ज व्यायामशाळेसह ३६० गाडयांकरिता पार्किंगची सोय देखील करण्यात आली आहे.
या सदनाच्या प्रांगणात राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पुर्णाकृती पुतळे उभारण्यात आले असून सदनात राजर्षी शाहू महाराज व यशवंतराव चव्हाण यांचे पुर्णाकृती तर सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांचे अर्ध-पुतळे बसविण्यात आले आहेत.
स्मारकाची उभारणी महाराष्ट्रातील वैभवशाली वास्तु-शिल्प, कला, संस्कृती यांच्याआधारे करण्यात आली आहे. उपयोगिता आणि सौंदर्यदृष्टी यांचा मेळ साधून एक भव्य असे “श्रेष्ठ वास्तुशिल्प”  दिल्लीत साकारले आहे.महाराष्ट्राची ही वास्तूमुद्रा दिल्लीत महाराष्ट्राची मान आणि शान उंचावल्याशिवाय राहणार नाही.
................................................................

1 comment:

  1. सुंदर लेख लिहीला आहे.....धन्यवाद........

    ReplyDelete