दरवर्षी शाळा सुरू होताना बालभारती आणि पाठ्यपुस्तके यावर चर्चा रंगते. काही चर्चा विधायक आणि पथदर्शक असते.पाठ्यपुस्तकातील गंभीर चुका दाखवून देणारांचे अभिनंदन. मात्र अनेकदा पुस्तकात कायकाय असायला हवे होते त्याबद्दलच्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात. अपेक्षा म्हणजे चुका किंवा उणीवा नव्हेत. सर्वांचे समाधान करणे हे अशक्यप्राय होय. बालभारतीच्या कामाचे जगड्व्याळ स्वरूप माहित नसल्यानेही अज्ञानातून टिका केली जाते.मिठमसाला लाऊन वादंग रंगवले जाते. उबवले नी वाढवले जाते.
मधुकरराव चौधरी हे शिक्षणमंत्री असताना बालभारतीची स्थापना करण्यात आली. त्यापुर्वी शालेय पाठ्यपुस्तके लिहून घेणे आणि प्रकाशित करणे हा सगळा व्यवसाय खाजगी प्रकाशकांच्या ताब्यात होता. त्यात चांगले उत्पन्न असल्याने हे सगळे लोक नाराज होणे स्वाभाविक होय.आजही पुन्हा हे उत्पन्न देणारे काम त्यांना मिळावे असे वाटणे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे हे समजून घेतले पाहिजे. हा जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील विषय असल्याने माध्यमांनाही यात विशेष रस असणे स्वाभाविकच होय.
सद्ध्या दरवर्षी बालभारती किती पुस्तके छापते? आपल्याला काय वाटते?
फक्त १९ कोटी {एकोणीस कोटी}
यात ८ भाषांची सुमारे ९५० वेगवेगळी टायटल्स असतात. एव्हढी पुस्तके छापताना एखाद्या पुस्तकात {प्रतीमध्ये} बांधणी,छपाई,आदींमध्ये दोष राहणे याचा जेव्हा बाऊ केला जातो तेव्हा वाईट वाटते. विधायक टिकेचे स्वागतच केले पाहिजे.मात्र वितंडवाद आणि हितसंबंधाचे राजकारण आपण टाळायला नको का?
आपली ही पुस्तके देशातील आणि देशाबाहेरीलही काही संस्था वापरतात.
यावर्षी तिसरी,पाचवी आणि सातवी यांचा अभ्यासक्रम बदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या महिन्यात हे काम सुरू झाले. जून २०१४ मध्ये ही नवी पुस्तके अभ्यासक्रमात शिकवायला सुरूवात होईल.
इतिहासाची ही नवी पाठ्यपुस्तके तयार करण्याच्या गटात आ.ह.साळुंखे, सदानंद मोरे,गोविंद पानसरे, संभाजी भगत,अ.का.मुकादम, प्रशांत सुरूडकर, गणेश राऊत आदींच्या सोबत काम करण्याची मलाही संधी मिळालेली आहे. काम वेगाने सुरू आहे.
नमुना पुस्तक तयार झाल्यावर ते वेबसाईट वर टाकले जाईल आणि नागरिकांच्या सुचना मागवल्या जातील.
आपण जर पालक, शिक्षक किंवा शिक्षणप्रेमी असाल आणि आपल्याला या विषयात रस असेल तर, सातवीच्या "मध्ययुगीन भारताचा इतिहास " या नव्या पुस्तकासाठीच्या आपल्या अभ्यासपूर्ण सुचनांचे स्वागत आहे....
No comments:
Post a Comment