Thursday, September 5, 2019

राधाकृष्णन भांडारकरच्या निवडणुकीत पराभूत झाले होते






५ सप्टेंबर हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असल्याने शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
ब्रिटीश सरकारचे निष्ठावंत म्हणून त्यांना "सर" हा किताब देण्यात आला होता.
आयुष्यातील बहुतेक सगळा काळ त्यांनी परदेशी विद्यापिठांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यात घालवला.

त्यांनी २ टर्म भारताचे उपराष्ट्रपती आणि एक टर्म राष्ट्रपती म्हणूनही काम पाहिले. ते अपक्ष असूनही या पदांवर नियुक्त केले गेले. वेदांतावरचे वलयांकित विचारवंत असल्याने त्यांना हे सन्मान दिले गेले. त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान "भारत रत्न " ही दिला गेलेला आहे.विशेष म्हणजे हा पुरस्कार त्यांना दिला गेला तेव्हा ते तो देणार्‍या पदावर कार्यरत होते. देणाराने स्वत:लाच पुरस्कार घ्यावा हे ग्रेट आहे. राष्ट्रपती हे आपल्या देशात सर्वोच्च पद आहे. त्या पदावर असताना स्वत:चा वाढदिवस शिक्षकदिन म्हणून सुरू करा असा आदेश देणारे सर्वपल्ली राढाकृष्णन मला अतिशय थोर वाटतात. शिक्षणाने / शिक्षकाने बालकांच्या मनावर चारित्र्याचे संस्कार करणे अभिप्रेत असते. डॉ. राधाकृष्णन यांच्या चारित्र्याचे जे वाभाडे त्यांच्याच मुलाने [ थोर विद्वान प्रो.गोपाल यांनी ] काढलेले आहेत ते वाचनीय आहेत.


ज्या अर्थी त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून पाळली जाते त्या अर्थी त्यांनी शिक्षक म्हणून काहीतरी असाधारण काम केलेले असणार. तथापि ते काम कोणते याबद्दल मी आजवर असंख्य शिक्षकांना विचारले असता त्याचे नेमके उत्तर एकही शिक्षक देऊ शकला नाही.

त्यांनी शिक्षण क्षेत्राला काहीतरी महत्वाचे योगदान दिलेले असेल या दृष्टीने माहिती घ्यायचा प्रयत्न केला असता परदेशात ते प्राध्यापक होते हेच त्यांचे सर्वात मोठे योगदान असल्याचे सांगितले गेले. त्यांनी शिक्षणशास्त्राला काहीतरी भरिव दिले असेल असे म्हणावे तर ना त्यांनी कोणतीही शिक्षणविषयक थिएरी मांडली ना ते शिक्षणशास्त्राचे शिक्षक, प्राध्यापक होते. ना त्या विषयावर त्यांनी काही लेखन केले.

ते धर्मशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचे लेखन वेदांतावर आहे. ते उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती होते म्हणून त्यांच्या नावे शिक्षक दिन होत असेल असे म्हणावे तर आजवर डझनावारी लोक या पदांवर बसून गेलेत.

भारतविद्या, प्राचीन विद्या, धर्मशास्त्र, संशोधन या विषयातील सर्वोच्च काम असलेल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या निवडणुकीला ते उभे होते, तेव्हा मात्र त्यांचा दणदणीत पराभव झालेला होता. संस्थेच्या विद्वान मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले होते. विशेष म्हणजे तेव्हा ते देशाचे उपराष्ट्रपती होते आणि तरिही भांडारकरच्या निवडणुकीत ते हारले होते. उपराष्ट्रपती या पदावर असताना एका संस्थेच्या निवडणुकीत पराभूत होण्याचा विक्रम त्यांच्या एकट्याचाच नावे जमा आहे.

ज्या अर्थी त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा केला जातो त्या अर्थी त्यांचे शिक्षक म्हणून देशाला काहीतरी अभुतपुर्व योगदान असणारच. ते नेमके कोणते यावर कोणी प्रकाश टाकील काय?

-प्रा. हरी नरके, ५ सप्टेंबर २०१९

No comments:

Post a Comment