आजकाल अनेक वाहिन्यांवर मालिकांची भाऊगर्दी असते. त्यातल्या पाचपन्नासांनी शेकडो भाग पुर्ण केलेले असतात. अशा स्थितीत गौरवगाथेची सेंच्युरी होणं ही काही फार मोठी अपुर्वाई नसावी.
आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आजवर कोणत्याही भाषेत, कोणत्याही वाहिनीने मालिका केलेली नाही. अशास्थितीत मराठी मालिका तयार करण्याचा धाडशी निर्णय दशमी आणि स्टार प्रवाहने घेतला. मराठी भाषकांची लोकसंख्या सुमारे दहा कोटी आहे. त्यातल्या निम्म्या लोकांपर्यंत ही मालिका आजच पोचली आहे. जिथे जिथे मराठी माणसं राहतात तिथे तिथे ही मालिका आवर्जून बघितली जाते. गेल्या १७ आठवड्यात ही मालिका बघणारांची संख्या सातत्याने वाढते आहे. मालिकेचे एकुण २०० भाग असणार आहेत. उद्या मालिकेचा अर्धा टप्पा पुर्ण होईल.
अतिशय संवेदनाशील आणि आव्हानात्मक विषयाला भिडताना दशमी या निर्मिती संस्थेने आणि स्टार प्रवाह या वाहिनीने सर्व प्रकारची दक्षता घेतलेली आहे असे तुम्हाला नक्कीच जाणवत असणार.
या मालिकेला आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग मानणारे कोट्यावधी प्रेक्षक मिळणे हीच आम्हाला सर्वात मोठी दाद वाटते. बाबासाहेबांची सम्यक ओळख करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही रसिकांनी उचलून धरला याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
इतर मालिका आणि स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गौरवगाथा यात तुम्हाला खरंच काही फरक वाटतो काय? असल्यास नेमका कोणत्या प्रकारचा फरक वाटतो? दशमी क्रिएशनची ही निर्मिती हटके आहे असे तुम्हाला जाणवते काय? यातील कथाविस्तार, पटकथा, संवाद, संशोधन यावर विशेष मेहनत घेतल्याचे तुम्हाला मालिकेद्वारे प्रतित होते काय?
ही मालिका तुम्हाला थेटपणे भिडते काय? या मालिकेचे सादरीकरण, लेखन, दिग्दर्शन, छायाचित्रण, नेपथ्य, संकलन, संगीत अशी एकुणच सर्व निर्मिती तुम्हाला भावतेय काय? या मालिकेतील विविध भुमिकांसाठी अभिनेते/अभिनेत्री यांची केलेली निवड तुम्हाला कशी वाटते? ते आपल्या भुमिकांना न्याय देताहेत असे तुम्हाला वाटते ना? आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
दररोज दाखवण्याची एखादी मालिका बनवायची म्हटले की तिला वेळेची मर्यादा असते. वेळेबरोबरच इतरही अनेक बाबींची कमतरता असते. अशा स्थितीत विषयाशी प्रामाणिक राहून मालिका बनवणे ही एक मोठी कसरतच असते.
यानिमित्ताने या मालिकेच्या निर्मिती आणि यशासाठी झटणार्या सर्व चमुंचे हार्दीक अभिनंदन. जाणत्या प्रेक्षकांचे मन:पुर्वक आभार. असाच स्नेह कायम ठेवावा ही विनंती.
- प्रा.हरी नरके, १० सप्टेंबर २०१९
No comments:
Post a Comment