फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे लेखन अतिशय प्रवाही, रसाळ आणि वाचनीय असते. त्यांच्या धर्मगुरू असण्याचा सगळा गोडवा त्यांच्या शैलीत उतरलेला आहे. अतिशय नम्र, सौजन्यशील आणि मित्रकुलाचे ही त्यांची खरी ओळख. लोण्यासारखा मृदू आणि कमालीचा ऋजू स्वभाव. त्यांच्यामुळे अनेक साहित्यविषयक कार्यक्रमांना वसईला गेलो. त्यांच्या संपादककाळात सुवार्ता मासिक नियमितपणे घरी येत असे. त्यांच्या निवडीमुळे मराठी भाषेला श्रीमंत करणार्या फादर स्टीफनसन, आद्य मराठी व्याकरणकार विल्यम कॅरी, पहिले मराठी शब्दकोशकार मोल्सवर्थ, पं. रमाबाई, पहिले मराठी कादंबरीकार बाबा पदमनजी, स्मृतिचित्रे कार लक्ष्मीबाई टिळक, कविवर्य रे. टिळक या महान परंपरेचा गौरव झालेला आहे.
फादर दिब्रिटो सुवार्ता मासिकाचे संपादक असताना खूपदा मला त्या मासिकासाठी लिहिते करीत. माझ्यासारख्या आळशी माणसाकडून लिहून घेणं ही सोपी गोष्ट नव्हती. नाही. तेव्हा आम्ही पिंपरीला, अजमेरा कॉलनीत राहत होतो. एकदा दिब्रिटोंना मी घरी घेऊन गेलो. प्रमिती तेव्हा जेमतेम दीडेक वर्षांची होती. तिला त्यांनी उचलून कडेवर घेतलं आणि " काय नाव तुझं बाळ?" असा तिला प्रश्न विचारला. तिनं स्वत:चं नाव सांगितलं आणि ती त्यांच्या चेहर्याकडे बघत राहिली. फादर म्हणाले, " काय झालं? माझं काही चुकलं का? काय बघतेयस?"
त्यावर ती म्हणाली, " काका, तुमच्यात स्वत:चं नाव सांगायची पद्धत नसते काय? मी माझं नाव सांगितलं. आता तुमची पाळी आहे."
फादर दिब्रिटो चमकले, लाजले आणि त्यांनी स्वत:चं नाव सांगितलं. त्यावर ती म्हणाली, " दिब्रिटोचा अर्थ काय?"
त्यांनी त्याचा अर्थ सांगितला. जाताना मला म्हणाले, " यापुढे मी कोणत्याही लहान मुलाला त्याचे नाव विचारण्याआधी माझे नाव सांगत जाईन. इतर प्रश्न विचारीन आणि मगच त्याचे/तिचे नाव विचारीन. सगळेच जण भेटल्याभेटल्या लहान मुलांना पहिला प्रश्न विचारतात, तुझे नाव काय? मुलं किती इरीटेट होत असतील ना? प्रमितीमुळे मला हा धडा शिकायला मिळाला.
- प्रा. हरी नरके,२५ सप्टेंबर २०१९
No comments:
Post a Comment