काल ते पत्रकार परिषदेत रागावून बोलले. नेते सोडून चालल्याने ते रागावले असावेत, वय झाल्यामुळे चिडले असावेत, आजारपणामुळे त्यांचा तोल गेला असावा, त्या पत्रकाराने त्यांना नातेवाईंकांवरून प्रश्न विचारायला नको होता, अशी चर्चा सध्या होत आहे. मला पवारांसारख्या सराईत आणि मुत्सद्दी राजकारण्याच्या बाबतीत या चर्चा अपुर्या वाटतात. श्री शरद पवारसाहेब हे अफाट राजकीय क्षमता असलेले राष्ट्रीय नेते आहेत. त्यांचे वागणे-बोलणे अतिशय मधाळ- सुसंस्कृत असते. त्यांचा अनुभव दांडगा आहे. ते का रागावले असावेत त्याची ही कारणे मला पटत नाहीत. ती वेगळीच असणार असे मला वाटते.
१. वसंत दादांचा शरद पवारांवर पोटच्या मुलासारखा विश्वास होता. पोलीस अधिकार्यांनी जेव्हा पवारांच्या काहीतरी संशयास्पद हालचाली चालू आहेत असे मुख्यमंत्री दादांना ब्रिफिंग केले तेव्हा दादा म्हणाले, "शरद आपला माणूस आहे. त्याच्याकडून चुकीचं काही घडणार नाही. माझा त्याच्यावर संपुर्ण विश्वास आहे." आणि नेमकी त्याच दिवशी पवारांनी दादांची साथ सोडली नी जनता पक्षाच्या ताकदीवर [ज्यात जनसंघही होता] ते मुख्यमंत्री झाले. [ संदर्भ- राम प्रधान, मेटकॉफ हाऊस ते राजभवन ]
२. यशवंतराव चव्हाणांनी आपली सगळी ताकद वापरून पवारांना १९६७ साली आमदारकीचे तिकीट दिले. त्यांनी आपली सगळी प्रतिष्ठा वापरून पवारांना बळ दिले. वाढवले. पण हेच चव्हाणसाहेब जेव्हा काँग्रेसमध्ये परतले तेव्हा पवारसाहेब त्यांच्यासोबत गेले नाहीत. त्यावेळी चव्हाणांना काय वाटले असेल?
३. आजवर पवारांनी काय कमी फोडाफोड्या केल्या? खुद्द धनंजय मुंड्यांना त्यांनी काकापासून फोडले तेव्हा दिवंगत गोपीनाथ मुंड्यांना काय वाटले असेल?
४. १९८० ते ८६ याकाळात श्री पवार विरोधी पक्षात होते. त्यानंतर त्यांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत सत्ताधारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हा त्यांना एका पत्रकाराने विचारले " तुम्ही सत्ताधारी पक्षात का गेलात?"
ते म्हणाले, " ५ वर्षांपुर्वी मी ६० आमदार निवडून आणले होते. पाच वर्षांच्या शेवटी आज माझ्यासोबत फक्त चार शिल्लक आहेत. काँग्रेसवाले सत्तेशिवाय राहुच शकत नाहीत. जिकडे सत्ता तिकडे आम्ही. ह्या सोडून गेलेल्यांच्या निष्ठा सेक्युलॅरिझम, फुले-शाहू- आंबेडकर, मराठा पॉवर यावर असतात ह्या निव्वळ अफवा आहेत."
५. सर्व पक्षीय मैत्री हे त्यांचे वैशिष्ट्य. सर्व पर्याय खुले आहेत हे पवारांचे कायमचे राजकारण असते. सगळे पक्ष पवारच चालवतात असेही बोलले जायचे. आपली माणसं प्रत्येक पक्षात मोक्याच्या जागी बसवण्यात ते वाकबगार होते. आज त्यांचा तो करिष्मा संपलेला दिसतो. पवारांचे राजकीय वजन आता कमी झालेले दिसते. पवारांनी स्वत:च्या हाताने आपली विश्वासार्हता संपवलेली आहे. ते जे बोलतात तसे ते वागतील अशी कोणालाही खात्री वाटत नाही. त्यांचे राजकारण साहसवादी होते. आहे. पण मग त्यातून जशी राजकीय न्य़ुशन्स व्हॅल्यू [उपद्रवमूल्य ] वाढते तशी राजकीय विश्वासार्हता घटते.
६. पाच वर्षांपुर्वी त्यांनी काँग्रेसशी असलेली आघाडी तोडून स्वतंत्रपणे निवडणूका लढवल्या. निवडणूक निकाल येत असतानाच पवारांनी भाजपाला पाठींबा दिला होता. यावरून खुद्द शरद पवारांच्या राजकीय निष्ठा स्पष्ट होतात. गेली ५ वर्षे सत्तेत नसतानाही त्यांचे पहिल्या फळीतले नेते गेली ५ वर्षे त्यांना सोडून का गेले नाहीत? ते आत्ताच का चाललेत?
पवारांची मोदी-शहांशी राजकीय मैत्री होती. माझ्या पक्षातल्या पहिल्या फळीतल्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घ्यायचे नाही असे पवारांचे मोदी शहांशी ठरले होते. मोदी-शहानाही राज्यसभेत भाजपाचे बहुमत नसल्याने पवारांची गरज होती. आपण राष्ट्रवादी सोडून गेलो तरी भाजपा आपल्याला घ्यायला तयार नाही, पवार मोदी-शहांच्या सहाय्याने आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवतील ही भिती त्यामागे होती. आता ती राहिली नाही. राजकारणात निष्ठा वगैरे बकवास असते. राजकीय मुल्ये, विकास, लोकहित ह्या फक्त बोलायच्या गोष्टी. सोयीचे-सत्तेचे राजकरण हेच तेव्हढे खरे असते. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच एकमेव सूत्र असते. पवारांनी आपल्या अनुयायांना स्वत:च्या कृतीतून जे शिकवले त्याचाच प्रयोग ते आता पवारांवर करीत आहेत.
७. कार्यकर्त्यांचा अफाट ताफा त्यांनी संग्रहित केलेला आहे. मतदारांमध्ये - कार्यकर्त्यांमध्ये आजही त्यांना मान आहे. पवारांची राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक जाण अफाट आहे. त्यांचा व्यासंग दांडगा आहे. कितीही नेते सोडून गेले तरी एकटे पवार त्यांचा पक्ष चालवतील, वाढवतीलही अशी क्षमता त्यांच्यात काल होती. आज मात्र ती तशी राहिलेली दिसत नाही. तथापि ती सगळीच संपलीय हे खरे नाही. शेवटी ते शरद पवार आहेत. ते जेव्हा त्यांचे राखीव बाण बाहेर काढतील तेव्हा भल्याभल्यांना पळती भुई थोडी होईल.
८. पहिल्या फळीतले नेते सोडून चाललेत, आपले फोनही घेत नाहीत. त्यांच्याशी जाहीरपणे संपर्क करण्याचा हा मार्ग त्यांनी निवडला असावा.पवार जे काही करतात, ते चुकून किंवा रागात करतात हे खरे नाही. ते विचारपुर्वकच करतात. मागे ते छत्रपती-पेशवे वगैरे बोलले तेव्हा तुम्ही असे चुकून बोलून गेलात काय असे त्यांना विचारले गेले. ते म्हणाले, "मी जे काही बोलतो, करतो ते पुर्ण विचारांती करतो."
-प्रा.हरी नरके, ३१ ऑगष्ट २०१९
No comments:
Post a Comment