Monday, August 26, 2019

आंबेडकरी प्रतिभावंताची गौरवगाथेला दाद








आंबेडकरी प्रतिभावंताची गौरवगाथेला दाद- प्रा.हरी नरके

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा" या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेचे आज ८५ एपिसोड पुर्ण झाले. आजवर जाणते प्रेक्षक आणि सर्व स्तरातील जनतेचे अमाप प्रेम लाभलेल्या या मालिकेला आंबेडकरी प्रतिभावंतानी मनापासून दाद दिलीय. आज या मालिकेत मोठ्या भीमरावांचा [ सागर देशमुख ] प्रवेश होत आहे. तो प्रोमो पाहताना [कडूबाई खरातांचा काळीज चिरणारा आवाज आणि दृश्य परिणाम बघून] छान वाटले असे ते आमच्या एका टिममेंबरला म्हणाले.

आंबेडकरी समाज हा प्रबुद्ध समाज आहे. प्रतिभावंत, बुद्धीवादी, नेते, कलावंत, साहित्यिक यांची संख्या मोठी आहे. भारतातील एकुणच बुद्धीवादी वर्ग टिव्हीवरील मालिकांकडे मनोरंजन म्हणून पाहतो. एकतर काही मालिका खरंच सुमार असतात. शिवाय हा वर्ग आपापल्या मौलिक निर्मितीमध्ये व्यस्त असल्याने त्याला मालिका बघायला वेळही मिळत नाही. जर आपण मालिका पाहिल्या तर बुद्धीवादी जगात आपली प्रतिष्ठा कमी होईल असेही वाटत असेल.

संस्कृतीकरण सिद्धांतानुसार वरच्या वर्गात जाण्याची प्रेरणा असते. त्यामुळे ज्याला सांस्कृतिक क्षेत्रात फारशी प्रतिष्ठा नाही त्यापासून चार हात दूर राहायचे असाच बहुतेकांचा खाक्या असतो. हाच प्रतिष्ठीत वर्ग आजकाल नेटफ्लिक्सची मात्र तोंड फाटेस्तोवर स्तुती करीत असतो.

बुद्धजयंतीला १८ मे २०१९ रोजी आपली "डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा" ही मालिका सुरू झाली. अनेकांनी आम्हाला मौलिक सुचना केल्या. सुधारणा सुचवल्या. आम्ही त्या अमलात आणल्या. पुढेही आणू. आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

आजवर तमाम प्रबुद्ध जनतेने आणि जाणत्यांनी कोटींच्या संख्येने या मालिकेला भरभरून दाद दिलेली आहे.
टिव्हीवरील कोणतीही मालिका न बघणारे एक आंबेडकरी प्रतिभावंत "डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" बघून आनंदित झाले आणि त्यांनी आपल्या टिमचे कौतुक केले. ही दाद आमच्यासाठी मोलाची आहे. आमचा हुरूप वाढवणारी आहे.

आपली तमाम मराठी माणसांची अभिरूची अतिशय उच्च दर्जाची असते. त्यामुळे टिकाकारांची गरजच नसते. आपल्या अनेक मित्रांना सामान्य जनतेपासून फटकून राहण्याची सवय लागलेली असते. जे जे लोकप्रिय ते ते टाकाऊ असं काही मानतात. जनता बालीश असते असे ते समजतात. त्यांचे काम तेव्हढे मोलाचे बाकी सब दुय्यम असा पुर्वग्रहही असतो.

सामुहिक शहाणपणाला सार्वभौम मानणारे तथागत बुद्ध आम्हाला प्रेरणापुरूष वाटतात. आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्या प्रत्येक घरात पोचावेत हा आमचा ध्यास आहे.

बाबासाहेबांना जाऊन ६३ वर्षे झाली. खाजगी वाहिन्या येऊन २५ वर्षे झालीत. आणि तरिही आजवर कोणत्याही भाषेतील कोणत्याही वाहिनीला ह्या विषयावर मालिका करावीशी वाटली नाही. ज्यांना गौरवगाथा आवडत असेल किंवा नसेल त्यांनी यापेक्षा अधिक धारदार, भव्य आणि अचूक तपशीलांची मालिका अवश्य कराव्यात. आमच्या त्यांना सर्व शुभेच्छा आहेत. ही पहिली मालिका असली तरी ती शेवटची नक्कीच नाही. उलट ती एक सुरूवात ठरावी. शेकडो मालिका, नाटकं आणि चित्रपट या विषयावर यावेत असेच आम्हाला वाटते.
माझ्या कोंबड्याने उगवत नसेल तर सूर्यच उगवता कामा नये ही नकारात्मक मानसिकता समाजाला पुढे नेत नसते असे आम्ही मानतो.

जगभरात जिथेजिथे मराठी माणसं आहेत तिथं तिथं ही मालिका बघितली जाते. आजवर कधीही टिव्ही मालिका न बघणारा मोठा वर्ग आवर्जून ही मालिका बघू लागला. अवघ्या पंच्याऎंशी भागात या मालिकेने टी आर पी चे नवे उच्चांक गाठले. नुकत्याच दाखवण्यात आलेल्या बाबासाहेब-रमाईंचा विवाह ह्या एपिसोडला पाच कोटींपेक्षा अधिक प्रेक्षकांची पसंती लाभली. अर्थातच ही लोकप्रियता, ही कमाई आमची नसून ती बाबासाहेबांची आहे. ही पुण्याई बाबासाहेबांच्या बावन्नकशी जीवनगाथेची आहे. त्यांच्या संघर्षाची आहे. त्यांच्या जीवनातच एवढे नाट्य आहे की ते प्रामाणिकपणे दाखवावे एव्हढीच आमची मर्यादित भुमिका होती. आहे. राहिल. आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत. यात जे काही चांगले आहे ते बाबासाहेबांचे आहे. उणीवांची जबाबदारी मात्र आमची आहे हे नम्रपणे नमूद करायला हवे.

मालिकेबाबत आम्ही मनमोकळ्या टिकेचे, सुचनांचे, उणीवा, त्रुटी दाखवणारांचे मन:पुर्वक स्वागत करतो.

ही मालिका आहे. हा अनुबोधपट [ डॉक्युमेंटरी ] नाही. मालिकेला अनेक मर्यादा असतात याची आम्हाला नम्र जाणीव आहे. मालिका चारपाच कोटींपर्यत थेट पोचते. चळवळीचे काम मोलाचेच आहे. पण तिच्या पोचण्याला मर्यादा असते. या फिक्शनची, या माध्यमाची ताकद प्रतिगाम्यांना कळली. आम्ही मात्र त्यात मागे राहिलो. आज जीवनाच्या सगळ्या आघाड्यांवर कोण मागे पडलंय आणि कोणाची सरशी होतेय ते दिसतेच आहे.

बाबासाहेबांचे जीवन अथांग आहे. त्याचा तळ सापडणे केवळ अशक्य आहे. तरिही आपल्या पाठींब्यावर गौरवगाथा टिमने हे धाडस केलेले आहे.

तुमचा प्रचंड प्रतिसाद आमचे मनोबल वाढवित आहे. आम्ही आपले कृतज्ञ आहोत.
- प्रा. हरी नरके, २६ ऑगष्ट २०१९

छायाचित्र- टिम गौरवगाथा - डावीकडून उजवीकडे- अभिजित खाडे, शिल्पा कांबळे,  नरेंद्र मुधोळकर, हरी नरके, अपर्णा पाडगावकर, नितिन वैद्य, अक्षय पाटील, निनाद वैद्य, अमित ढेकळे

No comments:

Post a Comment