कॉम्रेड सुबोध मोरे साहबकोही गुस्सा क्यों आया? - प्रा.हरी नरके
१. माझे परममित्र श्रीयुत सुबोध मोरेसाहेब यांनी माझ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यावरील फेबु पोस्टचे खंडन करणारा प्रदीर्घ लेख लिहीलेला आहे. त्यात त्यांनी माझ्यावर भरमसाठ आरोप केलेले आहेत. व्यक्तीगत पातळीवरची टिका केलेली आहे. मलाही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देता येईल. मात्र मी तसे करणार नाही. श्री मोरे हे कम्युनिस्ट चळवळीतले पिढीजात कार्यकर्ते आहेत. त्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे.
२. कॉ. मोरे, मला एक कळले नाही की माझ्या लेखावर तुम्ही का भडकलाय? मी माझ्या लेखात अण्णा भाऊंच्या उपेक्षेला तुम्हाला जबाबदार धरलेले नव्हते. माझ्यासकट आपण सारेच समाज म्हणून त्यासाठी जबाबदार आहोत हा माझा मुद्दा असताना तुम्हालाच मिरची का झोंबली? आमची तुमच्यापेक्षा वेगळी मतं असू शकतात मालक.
कॉम्रेड अण्णा भाऊ साठे, कॉ. अमर शेख, कॉ. गव्हाणकर, कॉ. गोविंद पानसरे, कॉ. बाबूराव बागूल, कॉ. एस. के. लिमये, कॉ. भास्करराव जाधव, कॉ. भाऊ फाटक, कॉ. तुळपुळे, कॉ. ज्योती बसू, कॉ. मोहित सेन, कॉ. सोमनाथ चटर्जी, कॉ. भालचंद्र कांगो, कॉ. अजित अभ्यंकर, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. मुक्ता मनोहर यांच्यासारख्या त्यागी, तपस्वी आणि राष्ट्रनिष्ठ डाव्यांबद्दल मला खूप आदर आणि जिव्हाळा वाटतो. श्रमिक, कामगार, कष्टकर्यांच्या चळवळीला प्रागतिक डाव्यांचे मौलिक योगदान आहे.
३. कॉ. मोरे, उजव्यांना मनुची तर सनातनी डाव्यांना दाखवायला मार्क्सची नी मनातून मनूची पोथी हवी असते. पोथी महत्वाची. फुले-आंबेडकरी चळवळीच्या द्वेशावर जगणारे हे वतनदार. हे चमको आणि सनातनी डावे म्हणजे निव्वळ अहंकारी, माणूसघाणे आणि पोथीनिष्ठ असतात असा माझा अनुभव आहे. केवळ वर्गिय पोपटपंची करणार्या या महाभागांना लिंगभाव आणि जातीच्या प्रश्नाबद्दल आकस असतो.
४. कॉ. मोरे, चर्चा, वादविवाद, असहमती, वादग्रस्त मुद्दे यावर तुमचा विश्वास नाही काय? तुमच्या एकेरी दृष्टीला सत्य हे एकांगीच दिसते काय? तुम्ही म्हणाल तेव्हढेच सत्य आणि सत्याचा कॉपीराईट फक्त तुमच्याकडे आहे काय? कॉ. मोरेसाहेब, एखाद्या गोष्टीला दोन किंवा अधिक बाजू असू शकतात यावर तुमचा नसला तरी माझा विश्वास आहे.
५. कॉ. मोरे, एकदा राशोमन [अकिरा कुरोसावा] हा चित्रपट बघा.
६. कॉ. मोरे, अण्णा भाऊंचा जेव्हढा सन्मान व्हायला हवा होता, तेव्हढा तो झाला नाही ही माझी खंत आहे. ती आजवर अनेक मान्यवरांनी मांडलेली आहे. अगदी कम्युनिस्ट पक्षाचे हायकमांड असलेल्या कॉ. श्रीपाद अमृत डांग्यांनीही ती मांडलेली आहे. तेव्हा मी तसं म्हटलं की लगेच मी अण्णा भाऊंचा अपमान करतोय, त्यांची बदनामी करतोय हा कांगावा कशाला करताय तुम्ही?
७. कॉ. मोरे, दुसर्यांच्या प्रसिद्धी, लोकप्रियता आणि विश्वसनियतेवर आयुष्यभर जळणारे तुमच्यासारखे चमको आणि निव्वळ पढीक बरनॉलमॅन लोकांच्या मनातून का उतरले?
रशियात किंवा चीनमध्ये पाऊस पडला की मुंबईत छत्री उघडून चालणारे तुम्ही लाल छत्रीवाले.
प्रश्न विचारणारांना तुम्ही चळवळीचे थेट शत्रू ठरवून मोकळे होता. जे तुमच्यासोबत नाहीत ते तुमचे शत्रू इतके सोपे गणित असते तुमचे.
आमच्या मुद्द्यांची आणि अडचणीच्या प्रश्नांची सप्रमाण उत्तरं देता येत नाहीत म्हणून थयथयाट करणारे तुमच्यासारखे चमको कॉम्रेड आणि उजवे एकाच माळेचे मणी होत.
८. कॉम्रेडसाहेब, अण्णा भाऊ साठे यांची उपेक्षा झाली असे मी म्हटले तर मी अण्णा भाऊंची बदनामी करतोय असा तुम्ही माझ्यावर पुन्हापुन्हा आरोप केलेला आहे. पण तुम्हीही तेच म्हणताय. फरक एव्हढाच आहे की कम्युनिस्ट सोडून उरलेल्या भारतीयांनी अण्णा भाऊंची उपेक्षा केली असे तुम्हाला वाटतेय. याचा अर्थ तुम्हाला अण्णा भाऊंशी देणंघेणं नाही. तुम्हाला फक्त कम्युनिस्टांच्या आरत्या गाण्यात आणि त्यांचं मार्केटिंग करण्यात रस आहे. शहीद कॉ. गोविंद पानसरे अण्णांनी अण्णा भाऊंच्या नावे साहित्य संमेलनं घेतली. कारण त्यांना ते स्वत:चं कर्तव्य वाटत होतं आणि पक्षाने अण्णा भाऊंची उपेक्षा केल्याचं त्यांना दु:ख होतं.
९. कॉ. मोरे, आधल्या दिवशी टॅक्सीत बेशुद्ध अवस्थेत तुम्ही अण्णा भाऊंना पाहिलेत व टॅक्सीवाल्याच्या मदतीने त्यांना तुम्हीच त्यांच्या घरी सोडलेत असा दावा तुम्ही केलाय. म्हणे टॅक्शीवाला मला विचारत आला. अख्ख्या मुंबईत टॅक्शीवाल्याला तुम्हीच सापडला असणार! दुसर्या दिवशी सकाळी अण्णा भाऊ वारले. बेशुद्ध माणसाला दवाखान्यात नेण्याऎवजी तुम्ही घरी सोडून पळून गेलात? निदान पक्ष नेत्यांच्या/कार्यकर्त्यांच्या कानावर ही बाब घालून त्यांच्याकरवी अण्णा भाऊंना दवाखान्यात नेण्याची व्यवस्था करायला हरकत नव्हती. साडेदहा वर्षाच्या लहान वयात आजारी माणसाला दवाखान्यात न्यायचे असते हे तुम्हाला नक्कीच समजत असणार! तुम्ही त्यांना घरी सोडल्यानंतर १५ ते १६ तासांनी ते वारले. मग याकाळात तुमच्या पार्टीच्या एकालाही त्यांना दवाखान्यात न्यावे असे का वाटले नाही?
१०. कॉ. मोरे, अण्णा भाऊंना ४९ व्या वर्षी प्रदीर्घ आजारपणाने अकाली मृत्य़ू आला. त्यांना जर चांगल्या दवाखान्यात उपचार मिळते तर ते वाचले असते. कर्तव्यदक्ष कम्युनिस्ट पक्षाने त्यांना उपचारांसाठी, औषदपाण्यासाठी पैसे का दिले नाहीत? त्यांना उपचारासाठी रशियाला का पाठवले नाही?
११. कॉ. सुबोध, अण्णा भाऊंचे [यकृत] लिव्हर खराब झाल्याने ते वारले असा दावा तुम्ही केलाय. म्हणजे अण्णा भाऊ दारूडे होते म्हणून त्यांचे लिव्हर खराब झाले असे सांगून तुम्हीच त्यांची बदनामी करताय.
१२ कॉ. मोरे, अण्णा भाऊंना सरकारच्या वृद्ध कलावंत सहाय्यता निधीवर जगावे लागत होते. [ जे मंत्रालयातून घेऊन ते आधल्याच दिवशी आले होते असे तुम्हीच सांगताय] त्यांना सरकारी कोट्यातून घर मिळेपर्यंत झोपडपड्डीत राहावे लागले होते. त्यांच्या पत्नीला व मुलीला मजूरी करावी लागत होती. आणि तरिही अण्णा भाऊ हलाखीत जगत नव्हते तर त्यांचे जगणे अगदी चैनीत चालू होते असे तुम्ही सांगताय. तुमचा पक्ष त्यांच्यासाठी जर जागृत होता तर पक्षाने त्यांना सरकारच्या मदतीवर जगण्याची पाळी का येऊ दिली होती? पक्षाने अण्णा भाऊंच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था का केली नाही? तुमच्या पक्षाचे श्रेष्ठी [हायकमांड] असलेले उच्चभ्रू नेते काय अण्णा भाऊंसारखे झोपडपट्टीत राहात होते? त्यांनाही सरकारकडून घर घ्यावे लागले होते काय? मग पक्षाच्या या श्रीमंत नेत्यांनी अण्णा भाऊंना राहायला घर का दिले नाही?
१३. कॉ. मोरे, ज्या अण्णा भाऊंच्या कार्यक्रमांना लाखो लोक जमत असत, त्यांच्या अंत्ययात्रेला अवघे २५० ते ३०० लोक होते असे तुम्ही सांगताय आणि पक्षाने त्यांचा महान सन्मान केल्याचा दावाही करताय, हा प्रकार संतापजनक नाही?
अहो कॉम्रेड, एखाद्या सामान्य माणसाच्याही मैतीला एक -दोन हजार लोक सहज जमतात. तिथे अण्णा भाऊंसारख्या जगप्रसिद्ध कलावंत, लोकशाहीर, साहित्यरत्न असलेल्या महान लेखकाच्या अंत्ययात्रेला लाखो लोक का नव्हते हा माझा प्रश्न आहे.
१४. कॉ. मोरे, सामान्य लोक अण्णा भाऊंना प्रेमाने खाऊ घालत होते अशी माहिती तुम्ही देताय. अण्णा भाऊंसारख्या बुद्धीवंताला लोकांच्या घरी जाऊन जेवावे लागणे यात त्यांचा आत्मसन्मान दुखावला जातोय हे तुमच्या आजही लक्षात येत नाही कारण तुमचा अण्णा भाऊंच्या सुखदु:खाशी काडीमात्र संबंध नव्हता.
१५. कॉ. मोरे, अण्णा भाऊंच्या अंत्ययात्रेला हजर असलेल्या ज्या पंचवीस लोकांची तुम्ही नावे दिलीत त्यातल्याच तिघांनी मला सांगितले की खूप कमी लोक अंत्ययात्रेला होते.
परवा पुण्यात बाल गंधर्व नाटयमंदिरात बोलताना प्रसिद्ध विचारवंत आणि अण्णा भाऊ साठे निवडक वाड्मयाचे संपादक अर्जून डांगळे जाहीरपणे म्हणाले, "अण्णा भाऊंच्या अंत्ययात्रेला मी हजर होतो. त्याठिकाणी ५० ते ६० लोक होते." या भाषणाचे व्हिडीओ रेकॉर्डींग माझ्याकडे आहे. तुम्ही तोच आकडा सराईतपणे पाचपट वाढवून २५० ते ३०० करताय. तुम्ही अर्जून डांगळे यांच्यासह अन्य उपस्थित मान्यवरांना खोटे का ठरवताय?
१६. कॉ. मोरे, कम्युनिस्ट पक्षाने, ज्येष्ठ नेते कॉम्रेड डांगे यांनी अण्णा भाऊंच्या 'शाहीर' पुस्तकाला प्रस्तावना लिहून त्यांचा गौरव केला असे तुम्ही म्हणताय. ती प्रस्तावना अण्णा भाऊ साठे निवडक वाड्मयात छापलेली आहे. [पृ.११३९ ते ११४६] त्यात कॉ. डांगे यांनी अण्णा भाऊंचा अगदी हात राखून गौरव केलाय. अण्णा भाऊंच्या लेखनावर त्यांनी प्रस्तावनेत टिका करून औचित्यभंगही केलेला आहे.
कॉ. डांगे म्हणतात, "अण्णा भाऊंचे लेखन प्रचारकी आहे." "अण्णा भाऊंच्या काव्यात न्यूनता दिसते." "अण्णा भाऊंना इतिहासाची माहिती असल्याचे दिसत नाही." हा गौरव आहे की नालस्ती?
१७. अण्णा भाऊंसाठी पक्षाने यांव केले नी त्यांव केले याची भली मोठी यादी कॉ. मोरे यांनी दिलेली आहे. पक्षाने त्यांच्यावर औषदोपचार का केले नाहीत हा अण्णा भाऊ प्रेमींचा सवाल आहे? एव्हढ्या मोठ्या प्रतिभावंताची कदर करण्याची दानत डाव्या, उजव्यात, बुद्धीवंतात आणि बहुजनात कोणातच नव्हती हेच माझे दु:ख आहे.
१८. त्यांच्या कथेवर चित्रपट तयार झाला आणि तो बघायला मात्र अण्णा भाऊंना आपल्या बायकोला स्वत: तिकीट काढून पाठवावे लागले असे कॉ. मोरे लिहितात. खुद्द लेखकाला थिएटरचा पास [सन्मानिका ] का मिळाला नाही? लेखकाला तिकीट काढावे लागणे हा त्यांचा गौरव आहे की अपमान?
१९ . अण्णा भाऊ साठे यांचे नाव कॉ. मोरे अनेकदा "अण्णाभाऊ" साठे असे एकत्र लिहितात. त्यांचे नाव तुकाराम उर्फ अण्णा असे होते. भाऊ हे त्यांच्या वडीलांचे नाव होते. तेव्हा अण्णा भाऊंचे नाव नीट लिहिता यावे यासाठी कॉ. मोरे यांनी त्यांचे चरित्र वाचावे. अण्णा भाऊंची पुस्तके चाळावीत ही विनंती.
२०. असे मुद्दे तर अनेक आहेत. तुर्तास एव्हढेच.
-प्रा.हरी नरके, ७ ऑगष्ट २०१९
No comments:
Post a Comment