Thursday, August 1, 2019

अण्णा भाऊ आम्ही आपले गुन्हेगार आहोत












आज अण्णा भाऊंच्या पुतळयांवर लक्षावधींचा खर्च करणारा आपला समाज ते जिवंत असताना, हालाखीत असताना अण्णा भाऊंना आधार, सन्मान द्यायला पुढे आला नाही. भारतीय समाज हा निव्वळ कृतघ्न आहे याची प्रचिती वारंवार आलेली आहे. कमालीचे ढोंगी आहोत आपण.

ते गेल्यावर त्यांची किंमत समाजाला कळली. ते जिवंत असताना त्यांची योग्यता  देशाला कळली नव्हती.

अण्णा भाऊ आम्ही आपले गुन्हेगार आहोत.

आज त्यांची जन्मशताब्धी सुरू होतेय.

अण्णा भाऊ दारिद्र्यात जगले आणि त्यातच गेले.

ते अल्पायुषी होते. १९२० ते १९६९ असे अवघे ४९ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले.

त्यांना अनेकदा अर्धपोटी राहावे लागे.

राज्य शासनाकडून त्यांना लेखक-कलावंताचे मानधन मिळे. ते दर आठवड्याला मिळावे असे सांगत ते मंत्रालयातील अधिकार्‍यांना भेटले होते..

ते गेले तेव्हा मुंबईत खूप पाऊस पडत होता. त्यावेळी आजच्यासारखे मोबाईल नव्हते. टेलिफोनसुद्धा फार कमी लोकांकडे होते. परिणामी ते गेल्याचे निरोप लवकर मिळाले नाहीत.

त्यावेळचे समाजकल्याण मंत्री बाबूराव भारस्कर यांना ही बातमी कळताच ते अण्णा भाऊंच्या अंत्यदर्शनाला गोरेगावच्या सिद्धार्थनगरला गेले. अंत्यविधीचे सामान आणायला घरात पैसे नव्हते म्हणून  घरवाले काळजीत होते. भारस्करांनी खिश्यातून ५०० रूपये काढले आणि जवळच्या कार्यकर्त्यांना दिले. ते कार्यकर्ते अंत्यविधीचे सामान आणायला गेले ते परतलेच नाहीत.

वाट बघून भारस्करांनी स्वत: जाऊन अंत्यविधीचे सामान आणले. ज्या अण्णा भाऊंच्या कार्यक्रमांना लाखोंची गर्दी असे त्यांच्या अंत्यविधीला  कमी लोक उपस्थित होते. ही माहिती मला या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या तिघा मान्यवरांकडून मिळालेली आहे. मी तिची खात्री करून घेतलेली आहे. अर्जून डांगळे बालगंधर्वमधील सभेत जाहीरपणे असे म्हणाले की, ते स्वत: तिथे हजर होते आणि त्यांच्यासोबत पन्नास साठ लोक होते.

सुबोध मोरे यांच्यामते मात्र २५० ते ३०० लोक उपस्थित होते.

जिथे सामान्य माणसाच्या मैतीलाही हजार - दोन हजार लोक सहज उपस्थित असतात तिथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊंच्या अत्यंयात्रेला एव्हढेच लोक असणे पुरेसे आहे असा  दावा जे सुबोध मोरे करतात ते धन्य होत.

पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे [१९५८] उद्घाटक म्हणून त्यांनी केलेले भाषण अजरामर झाले. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे हे त्यांचे उद्गार अभ्यासकांच्या काळजावर कोरले गेले. अण्णा भाऊ हे प्रामुख्याने शाहीर असल्याने त्यांनी शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर यांच्या सोबत गिरणी कामगार, कष्टकरी वर्ग आणि शेतकरी यांच्यात जागृतीचे काम हिरीरिने केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात ते बिनीचे शाहीर राहिले. देशाच्या डाव्या चळवळीच्या जागरणात त्यांनी आपली ठसठशीत नाममुद्रा उमटवली.

उच्चभ्रू  नेते व समिक्षकांनी त्यांची उपेक्षा केली. माटुंगा लेबर कॅंप, चिरानगरच्या झोपडपट्टीत आणि गोरेगावच्या सिद्धार्थनगरला त्यांना आयुष्य कंठावे लागले.

उदरनिर्वाहासाठी लेखण करणे आणि कार्यक्रम सादर करणे एव्हढाच मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध होता. त्यांची एकेक कादंबरी त्यांनी प्रकाशकांना अवघ्या दहाविस रूपयांना विकलेली आहे. किरकोळ पैशांसठी तिचे कॉपीराईट त्यांना देऊन टाकलेले आहेत. ते जिवंत असताना त्यांची योग्यता  देशाला कळली नव्हती.

तुकाराम उर्फ अण्णा साठे हे प्रतिभावंत साहित्यिक होते. त्यांची फकीरा ही कादंबरी समीक्षक आणि वाचक दोघानांही आवडली. ते अल्पशिक्षित होते. मात्र त्यांनी भरपूर लेखन केले. त्यांच्या चित्रा, माकडीचा माळ, संघर्ष, वैजयंता, वारणेचा वाघ या कादंबर्‍या आणि शेकडो कथा लोकप्रिय झाल्या. विशेषत: बरबाद्या कंजारी, स्मशानतील सोनं, सापळा, निळू मांग, मरिआईचा गाडा, रक्ताचा टिळा, इरेनं गाढव खाल्लं, बिलवरी, रानगा, मकुल मुलाणी, भुताचा मळा, जोगीण, लाडी, तमासगीर, काडीमोड आदी कथांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. माझा रशियाचा प्रवास हे त्यांनी लिहिलेले प्रवासवर्णन आणि त्यांची अकलेची गोष्ट, मुंबई कोणाची, दुष्काळात तेरावा, पुढारी मिळाला, बिलंदर बुडवे ही लोकनाट्यं वेधक आहेत. रवि आला लावुनि तुरा, शिवारी चला, माझी मैना गावावर राहिली, जग बदल घालुनि घाव, मुंबईची लावणी हे पोवाडे आणि लावण्या अफाट लोकप्रिय झाल्या.

जग बदल घालुनी घाव
सांगून गेले मला भीमराव ।
गुलामगिरीच्या या चिखलात
रुतून बसला का ऐरावत ।
अंग झाडुनी निघ बाहेरी
घे बिनीवरती धाव ।
धनवंतांनी अखंड पिळले
धर्मांधानी तसेच छळले ।
मगराने जणु माणिक गिळिले
चोर जाहले साव ।
जग बदल घालुनी घाव
सांगून गेले मला भीमराव ।।
अण्णा भाऊंच्या ३५ कादंबर्‍या, ३०० कथा, ८ पोवाडे, ८ पटकथा, १ प्रवासवर्णन, १ नाटक, ९ लोकनाट्ये, १५ वगनाट्यं, १२ गाणी प्रकाशित झालीत. त्यांचे ९० हून अधिक ग्रंथ उपलब्ध आहेत.
-प्रा. हरी नरके, १ ऑगष्ट २०१९ 

No comments:

Post a Comment