त्यांचे चित्रण तथ्यानुसार असावे म्हणूनही त्यांच्यावरील पुस्तके,संदर्भ नोंदलेत. य.दि.फडक्यांचे लठ्ठे चरित्र, ज्योतिरावांवरील हरी नरकेंचे पुस्तक यांतून केलेली टिपणे आहेत. संस्थानातले तपशीलही निव्वळ आठवणींवर वा कल्पनेपेक्षा तथ्यांवर आधारावेत यासाठी या काळातल्या मिळतील त्या वृत्तपत्रातल्या संस्थानिकांसंबधीच्या बातम्या कात्रणं काढून ठेवत वा नोंदी करत.
...........................................
...........................................
डांगोरा एका नगरीचा'ही सरदेशमुखांची सर्वात महत्वाची , महत्त्वाकांक्षी अभिव्यक्ती . १९९८ मधल्या २० जूनला तिचे प्रकाशन आम्ही एकत्र जेवणाने साजरे केले .
'आशय'मधले सहकारी जयंत राळेरासकर यांच्या घरी सोलापुरातल्या साहित्य क्षेत्रातले १५-२० जण जमलो होतो . त्याआधी 'डांगोरा..'चे समारंभपूर्वक प्रकाशन व्हावे असा अपयशी प्रयत्न आम्ही केला . भागवतांनी फार आनंदाने मौज परिवारासह येण्याचे मान्य केले होते . यानिमित्ताने सरदेशमुखांच्या साहित्यावर एक दिवसीय चर्चासत्र घ्यावे असे सुचवून त्याचा आराखडाही सुचवला होता , पण जमले नाही , ( या अनुभवावरही कधी स्वतंत्र लिहीता येईल , बघु ) तसे भागवतांना कळवले . त्यांच्या उत्तरातले पहिले वाक्य होते , 'उदास वाटले फार' . पण तरी आम्ही काही करू , असे म्हणालो तर त्यांनी काही केलेत तरी त्यात सरदेशमुखांना या त्रयाबद्दल ( ते कादंबरीत्रय म्हणत ) बोलते करा , त्याचे शब्दांकन नंतर करता येईल , असे सुचवले , त्यानिमित्ताने मग २० जूनला जमलो .
कादंबरी फार कुणी वाचली नव्हती , त्यामुळे विवेकजी घळसासी , आणि मी त्यावर बोललो . बाकी सगळ्यांनी चर्चा केली , बहुतेकांना तिन्हीतल्या आत्मपर तपशीलासंदर्भात कुतुहल होते . सरांनी ते टाळले नाही , आनंदात होते , बोललेही बरेच . पण नंतर 'आशय' मध्ये ते सविस्तार लिहावे असा आग्रह मी करीत राहिलो . ' बखर , डांगोरा , उच्छाद , एक भूमिका ' हा लेख आशय दिवाळी ९८ मध्ये प्रसिद्ध झाला , भागवतांना यांचा फार आनंद वाटला .
मुळात सरांनी हे सगळे सांगावे या आग्रहामागे एक पार्श्वभूमी होती . या त्रयीसाठी , विशेषतः डांगोरा..'साठी त्यांनी दीर्घकाळ घेतलेले अफाट परिश्रम हे स्वतंत्र प्रबंधाचा विषय व्हावेत . १९६० च्या मे महिन्यात वि.म. सरदेशमुख गेले . त्याआधी सरदेशमुखांनी पौगंडावस्थेत अक्कलकोट सोडताना अनुभवलेले भयकारी दिवस , पुढे सोलापुरात असताना एकीकडे वडिलांनी सांगितलेल्या राजाच्या मैत्रीच्या रम्य आठवणी , दुसरीकडे त्यांचा सतत अन्यायनिवारणार्थ संस्थान आणि इंग्रज रेसिडेन्सी दोहोंशी एकाचवेळी सुरू असलेला अपयशी झगडा , या पार्श्वभूमीवर १९६३ साली कादंबरीचे बीज त्यांच्या मनात पडले . आरंभ आणि शेवट म्हटले तर एका महाकाव्याचे सर्ग असावेत तसे जोडलेले होते , म्हटले तर स्वतंत्र आस्वादमूल्य असलेल्या कथा , म्हणून त्यांनी त्या आधी लिहून ताण काहीसा कमी केला . तपशीलवार टिपणे काढणे अर्थात सुरू होतेच .
प्राध्यापकीतून निवृत्ती , सोबत आलेल्या कौटुंबिक अडचणी , हातातली धुके आणि शिल्प आणि रामदास ही प्रकाशने असे सगळे काहीसे मार्गी लागल्यावर १९८५ साली त्यांनी टिपणांचे बाड उघडले . काही दिवसांनंतर लगेच डोळ्यांचे दुखणे उद्भवले . दृष्टी जाईल काय भीतीत दोन-तीन वर्षे गेली . त्यातून बाहेर पडल्यावर लगेच जोमाने तयारी . जून १९८७ मध्ये प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात .
या तयारीच्या खुणा असलेल्या सहा डायऱ्या शिल्लक आहेत . या फक्त विविध तपशीलांच्या . मूळ हस्तलिखित , त्यांचे खर्डे ल.सिं.जाधव यांनी केलेली मुद्रणप्रत डोळ्यांखालून घातल्यावर लसिंच्याच घरामागे असलेल्या कंबर तलावाला त्यांनी स्वहस्ते अर्पण केले .
१३८ व्यक्तिरेखा असलेले हे मिनी महाभारत . दशकभराचा कालावधी , छोटेसे स्वतंत्र साईखेड संस्थान , सोलापूर जिल्हा , देश आणि जग सगळीकडे वेगवान घटितांची गजबज आहे , सगळ्यांचे घट्ट जोडलेले संदर्भ यात आहेत . महत्त्वाच्या पात्रांपासून छोट्यात , छोट्या सगळ्या पात्रांच्या पार्श्वभूमी असलेल्या स्वतंत्र कथा , त्यांच्या आपापसातल्या घट्ट वीणीने बांधलेले कथेचे एकसंध महावस्त्र .
'बखर' पासून 'उच्छाद' संपेतो २८ वर्षांचा कालावधी . यातल्या प्रमुख घटना आधी नोंदवून ठेवलेल्या . या तारखा इंग्रजी तारखा होत्या , त्यावेळच्या मराठी तिथ्यांची नोंद करता यावी म्हणून सर धुंडीराजशास्री दातेंकडे काही दिवस पंचांग शिकायला जात होते . जवळपास तीन दशकातली त्यांच्याकडची सर्व पंचांगं अभ्यासली , नोंदी केल्या .
तिन्ही कादंबऱ्यांत कायदेशीर कार्यवाहीचे - पोलिस आणि न्यायालयीन दोन्ही - तपशील आहेत . त्याची माहितीही सर अनेकांकडून घेत होते . काही पाने इंडियन पीनल कोडची त्याकाळातली कलमे , त्याअंतर्गत गुन्हे आणि होऊ शकणाऱ्या शिक्षा नोंदलेल्या आहेत .
सोलापूरचा मार्शल लॉ ही स्वातंत्र्यचळवळीतली तेजस्वी घटना . तिचे पडसाद कमी-अधिक संस्थानातही उमटले . ( डांगोरा'चा हाच काळ )याच काळात भगतसिंग आणि सहकाऱ्यांवर अटकेनंतर खटले चालू होते . जगातही काहीबाही घडत होते . या सगळ्यांचे तपशील मिळवण्यासाठी सोलापूरची त्यावेळच्या समाचार आणि कल्पतरू या दोन्ही वृत्तपत्रांचे या काळातले सर्व अंक , हिराचंद नेमचंद -दयानंद - संगमेश्वर अशा उपलब्ध ग्रंथातले संदर्भ , ते पुरे झाल्यावर भाचेजावई माधव मोहोळकर यांच्या मदतीने मुंबईचे एलफिस्टनचे ग्रंथालय , ब्रिटीश कौन्सिलचे ग्रंथालय ( इथून या काळातले बॉम्बे क्रॉनिकल व अन्य इंग्रजी वृत्तपत्रांचे अंक पाहिले , दोन वृत्तपत्रातले एकाच घटनेच्या बातम्यांच्या तपशीलातले फरक , मग अन्यत्र पाहून खरेखोटे करणे ) , वेगवेगळी गॅझेटियर्स अशा मिळतील तिथून , कळेल तिथून संदर्भ नोंदवणे , ते ताडून पाहणे . शेवटी शासनाच्या विधानमंडळातल्या ग्रंथालयात बसून केलेली सोलापूरच्या मार्शल लॉचे उमटलेले पडसाद , वेळोवेळी यासंदर्भात झालेली भाषणे यांचीही टिपणे आहेत .
कथेत अठरापगड जातीजमाती-धर्माचे लोक आहेत , राज्यातले शाहू , ज्योतिरावांसारखे महापुरूष ही अप्रत्यक्षरूपात आहेत , त्यांचे चित्रण तथ्यानुसार असावे म्हणूनही त्यांच्यावरील पुस्तके , संदर्भ नोंदलेत . य.दि.फडक्यांचे लठ्ठे चरित्र , ज्योतिरावांवरील हरी नरकेंचे पुस्तक यांतून केलेली टिपणे आहेत . संस्थानातले तपशीलही निव्वळ आठवणींवर वा कल्पनेपेक्षा तथ्यांवर आधारावेत यासाठी या काळातल्या मिळतील त्या वृत्तपत्रातल्या संस्थानिकांसंबधीच्या बातम्या कात्रणं काढून ठेवत वा नोंदी करत .
इतर अनेक क्षेत्रातल्या लोकांशीही सर बोलत . मिळालेले तपशील नोंदवत . उदा. तिन्हीत , विशेषतः उच्छाद ' मध्ये 'गांजेकस' या शब्दाचा वापर आहे . तर त्याचा नेमका अर्थ काय , वैद्यकीय परिभाषेत त्याने काय होते , तो ओळखावा कसा , लक्षणे कोणती ? यासंदर्भात एका चिठोऱ्यावर केलेली नोंद डायरीत टाचून ठेवली आहे .
या सगळ्या तपशीलांना अखेर वाट मिळाली ,९२ संपतासंपता , शारदीय चंद्रकळा'च्या प्रकाशनानंतर . ते पुरे झाले ९५ च्या १६ जूनला . आमच्या भेटीचा हा काळ . याकाळात अर्धेअधिक लिहून झाल्यावर त्यांची काहीशी दमछाक झाली . एक दिवस बोलावून म्हणाले ,' माझा थोडा गोंधळ होतोय . तपशील मागे आलेत का नाहीत लक्षात येत नाहीये . आलेत म्हणून गाळावे तर कदाचित राहून जाणार , घ्यावे तर कदाचित पुनरावृत्ती होणार .
आपण एकदा हे झालेले सलग वाचुया .' मग हुतात्मा स्मृती मंदिराच्या हिरवळीवर त्यांनी ते आम्हा काही लोकांसमोर सलग १५ दिवस वाचले . मग आत्मविश्वासाने पुरे केले . एफोर पेक्षा मोठ्या आकारातल्या बारीक अक्षरात गच्च भरलेल्या हजारांवर पानांच्या ४ फाईल्स . यानंतर बरोबर चार वर्षांनी २० जूनला आम्ही एकत्र जेवण घेऊन 'डांगोराचे प्रकाशन साजरे केले . त्याआधी १२ जूनला सरदेशमुखांनी मौजकडून आलेल्या गठ्ठ्यातली पहिली पर्यंत मला नाव घालून दिली .
हस्तलिखित पुरे झाले त्यादिवशी १६ जून ९५ यादिवशी सर हिरवळीवर येताना पेढे घेऊन आले होते .
- Neeteen Vaidya
- Neeteen Vaidya
No comments:
Post a Comment