Tuesday, July 23, 2019

टिळक कोण होते?




आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची जयंती आहे. १ ऑगष्ट २०१९ पासून त्यांचे स्मृतीशताब्धी वर्ष सुरू होत आहे.
लोकमान्य टिळक हे आधुनिक भारतातले देशभर पोचलेले पहिले राष्ट्रीय नेते होते. एका मराठी माणसाने हे स्थान मिळवावे ही गौरवाची बाब होय. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक वर्षे तुरूंगवास भोगला. ते फार मोठे पत्रकार-संपादक-लेखक-विचारवंत होते. सार्वजनिक गणेशोत्सवाचे ते एक प्रवर्तक मानले जातात. त्यांची लोकप्रियता अफाट होती. त्यांना मंडालेच्या तुरूंगात पाठवण्यात आले तेव्हा मुंबईच्या गिरणी कामगारांनी बंद पाळला होता.

मात्र जहाल-मवाळ वाद, टिळक-आगरकर वाद, आधी सामाजिक की आधी राजकीय यावरचा वाद यांनी तसेच वेदोक्त व ताईमहाराज प्रकरण यातनं त्यांची प्रतिमा कट्टर सनातनी नेते अशी झाली. त्यांनीही ती आवर्जून जपली.

याविषयावरची " लोकमान्य व शाहू छत्रपती- य.दि.फडके," आणि "लोकमान्य ते महात्मा- सदानंद मोरे" ही पुस्तकं वाचनीय आहेत.

टिळक नेमके कोण होते? हा एक सार्वकालिक वादाचा विषय राहिलेला आहे. त्यांच्या मृत्यूला शतक लोटत असताना तरी दुषित पुर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्याकडे निर्मळ मनाने बघता येईल का?

त्यांचा मुलगा श्रीधर हा सत्यशोधकांचा- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मित्र होता. त्याला सनातनी टिळक अनुयायांच्यामुळे आत्महत्त्या करावी लागली.

महर्षि वि.रा.शिंदे यांनी आयोजित केलेल्या अस्पृश्यता निर्मुलन परिषदेत टिळकांनी जोरदार भाषण केले मात्र "मी माझ्या खाजगी जिवनात अस्पृश्यता पाळणार नाही" या प्रतिज्ञापत्रांवर त्यांनी सही केली नाही. त्यांचे हे अस्पृश्यता निर्मुलन परिषदेतले जहाल भाषण त्यांनी लंडनच्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आणले मात्र केसरीत त्यातला एक शब्दही छापू नये अशा सुचना दिल्या.

महात्मा जोतिराव फुले आणि टिळकांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी त्यांची मैत्री होती. टिळक-आगरकरांना पहिला तुरूंगवास झाला तेव्हा त्यांना जामिन द्यायला त्यांचा एकही सनातनी कार्यकर्ता पुढे आला नाही. अशावेळी महात्मा फुल्यांनी रातोरात रामशेट बापूशेट उरवणे ह्या सत्यशोधक समाजाच्या कोषाध्यक्षांमार्फत त्यावेळच्या दहा हजार रूपयांच्या जामिनाची व्यवस्था करवली. त्यावेळी सोन्याचा भाव एका तोळ्याला पंचवीस रूपये होता, तेव्हाचे दहा हजार रूपये म्हणजे आत्ताचे सव्वा कोटी रूपये होतात. हे रोख पैसे जोतीरावांनी रातोरात उभे केले.


ते तुरूंगातून सुटल्यावर त्यांचे जाहीर सत्कार फुल्यांनी घडवून आणले. त्यांना मानपत्रे दिली. हे सारेच टिळकांनी केसरीत ठळकपणे छापलेही, मात्र महात्मा फुले वारल्यावर त्यांच्या निधनाची एका ओळीचीही बातमी त्यांनी दिली नाही. खेदाची गोष्ट म्हणजे समाजसुधारक गोपाळराव आगरकरांनीसुद्धा आपल्या सुधारकात महात्मा फुले गेल्याची बातमी दिली नाही.

ही गोष्ट बाबासाहेबांनी लक्षात ठेवली. पुढे टिळक गेल्यावर मूकनायक मध्ये बाबासाहेबांनी अवघ्या एक ओळीची बातमी दिली. पुण्याचे टिळक गेले एव्हढेच बाबासाहेबांनी छापले. सनातनी पत्रकार भडकले. त्यावर "आम्हा बहुजनांच्या जिवनात टिळकांचे जेव्हढे स्थान होते तेव्हढी बातमी दिली. टिळकांनी तर फुल्यांची एव्हढीही बातमी दिली नव्हती." असा खुलासा त्यांनी केला.

मूकनायकची जाहीरात आम्ही छापणार नाही असे केसरीने  कळवले होते. ज्याकाळात केसरीत चप्पल आणि जोड्यांच्या जाहीराती छापून येत असत त्याकाळात मूकनायकची जाहीरात छापायला आमच्या पेपरमध्ये जागा नाही असे अहंमन्य उत्तर दिले गेले.

केसरी हा भारतातला सर्वात लोकप्रिय पेपर असल्याची जाहीरात वारंवार केली जाते. केसरीचा सर्वाधिक खप जेव्हा होता तेव्हा केसरीच्या तीन हजार प्रती छापल्या जात असत.

महात्मा गांधी टिळकांना फार मानत असत. टिळक वारले तेव्हा गांधीजींना त्यांच्या पार्थिवाला खांदा द्यायचा होता.मात्र टिळकांच्या सनातनी अनुयायांनी त्यांस विरोध केला. कारण गांधीजी बनिया होते. ब्राह्मण नव्हते.

महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या शिवजयंतीचे श्रेय टिळक अनुयायांनी टिळकांना दिले. खरंतर फुल्यांनी पुण्यात शिवजयंती सर्वप्रथम सुरू केली. कामगार चळवळीचे जनक ना. मे.लोखंडे यांनी मुंबईत  ती पसरवली. त्याच्या बातम्या तेव्हाच्या दीनबंधूत अनेकदा आलेल्या आहेत. मात्र त्यानंतर अनेक वर्षांनी टिळकांनी ती आणखी मोठी केली. देशात अनेक ठिकाणी पोचवली.

टिळकांचे बहुतेक सर्व अनुयायी सनातनीच का होते? टिळकांचा बहुजनांना व स्त्रियांना शिक्षण द्यायला विरोध का होता? वेदोक्त प्रकरणात टिळक शाहूमहाराजांच्या विरोधात का वागले?

टिळकांनी आरक्षणाला का विरोध केला? टिळक जर अस्पृश्यता मानत नव्हते तर मग त्यांनी प्रतिज्ञापत्रावर सही का केली नाही? टिळकांनी आगरकर- न्या.रानडे- लोकहितवादी - गोखले या सार्‍या समाजसुधारकांना कायम विरोध केला.

सयाजीरावांनी पुण्यातला आपला गायकवाडवाडा टिळकांना दिला. मात्र पुढेमागे ब्रिटीशांचा जाच होऊ नये म्हणून खरेदीखताने तो दिल्याचे दाखवले. टिळकांच्या आत्ताच्या वंशजांनी काही वर्षांपुर्वी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नाव पुसून त्याचा केसरीवाडा केला.


प्रश्न अनेक आहेत.

- प्रा. हरी नरके, २३ जुलै २०१९

No comments:

Post a Comment