Sunday, July 7, 2019

दुसर्‍या जागतिक सर्व धर्म परिषदेचे अध्यक्षपद एका भारतीयाने, मराठी माणसाने भुषवले होते - प्रा.हरी नरके










स्वामी विवेकानंदांचे ११ ते १६ सप्टेंबर १८९३ च्या शिकागोच्या पहिल्या जागतिक सर्व धर्म परिषदेतले भाषण खूप गाजले. विवेकानंद निधी उभारणीसाठी अमेरिकेत गेले असताना एका मिशनर्‍याने त्यांना परिषदेत सहभागी व्हायला सुचवले. पण विवेकानंद गाढे विद्वान असूनही त्यांच्या जातीमुळे एकाही शंकराचार्यांनी त्यांना तशी परवानगी दिली नाही. शेवटी बौद्ध प्रतिनिधी अनागरिक धम्मपाल व जैन प्रतिनिधी विरचंद गांधी यांच्या शिफारसीमुळे विवेकानंदांना बोलण्याची परवानगी मिळाली. त्यांचे भाषण गाजल्यावर मात्र ज्यांनी आधी परवानगी नाकारली होती तेच त्याचे श्रेय घेऊ लागले. त्याचे सोहळे करू लागले.

दुसरी जागतिक सर्व धर्म परिषद १९३३ साली अमेरिकेत शिकागोला झाली होती. तिचे अध्यक्षपद एका भारतीयाने भुषवले होते. एका मराठी माणसाला मिळालेला हा बहुमान आपल्या सर्वांच्या अभिमानाचा विषय असायला हवा.

१९३३ च्या या अध्यक्षांचे भाषण जगभर गाजले.

हे भाषण प्रकाशित झालेले असून ते आता उपलब्ध आहे.

या परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष होते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष हर्बट हुअर. या परिषदेला जगातीला ११ धर्मांचे ५० देशातील विद्वान उपस्थित होते. या परिषदेला जगभरातून एकुण २६००० प्रतिनिधी आलेले होते.

"जगातील सर्व धर्मांच्या मुळाशी मानवता आणि बंधुभाव ही मूल्ये असल्याचे प्रतिपादन अध्यक्षांनी केले होते."
ते अध्यक्ष होते बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड.

[ पाहा- महाराजा सयाजीराव: गौरवगाथा युगपुरूषाची, संपा. बाबा भांड, उच्च शिक्षण विभाग, महा. शासन, २०१७, पृ.६३/६४]

मात्र हा इतिहास फारसा सांगितला जात नाही. मग साजरा कोठून होणार?
त्यानिमित्ताने https://en.wikipedia.org/wiki/Parliament_of_the_World%27s_Religions या संबंधित वेबसाईटवर शोध घेतला असता १९३३ ला भरलेल्या या दुसर्‍या परिषदेची माहिती आढळली नाही.

- प्रा.हरी नरके, ०७ जुलै २०१९

No comments:

Post a Comment