Thursday, July 4, 2019

सामाजिक विषमतेचा दाहक अनुभव-आर्टीकल १५








आर्टीकल १५ हा चित्रपट मुख्य धारेतला आजचा चित्रपट आहे. मुख्य म्हणजे हा अनुबोधपट किंवा भाषण नाही. एक क्राईम थ्रिलर वाटणारा हा चित्रपट आजच्या भारतातील जातीभेदातून येणार्‍या पक्षपात, भेदभाव शोषण आणि हिंसा यांचा जळजळीत अनुभव देतो. अनुभव सिन्हांसारखा मुख्य धारेतले मुल्कसारखे संवेदनशील विषयावरील चित्रपट बनवणारा दिग्दर्शक हा चित्रपट बनवतो आणि तरूण प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर तो पहायला गर्दी करतात हे महत्वाचे आहे.

दिग्दर्शन, अभिनय, संवाद, पटकथा, चित्रानुभव आणि परिणामकारकता यांच्याबाबतीत हा चित्रपट खूपच सरस आहे.
एक सरळमार्गी आयपीएस अधिकारी अयान रंजन [ आयुष्मान खुराणा] याची ग्रामीण भागात बदली होते. तीन दलित मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होते. पोलीस तिच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करतात. एकेदिवशी त्यातल्या दोघींची प्रेते एका झाडाला लटकावलेली सापडतात. पोलीस अधिकारी सांगतात की त्या मुलींचे आपापसात लैंगिक संबंध असल्यानं त्यांच्या वडीलांनीच त्यांची हत्त्या केलेली आहे. त्या दृष्टीने तपास करून दोघींच्या वडिलांना अटक केली जाते, त्यांच्याकडून तसा जबाबही मिळवला जातो. तिसर्‍या बेपत्ता मुलीचा तपास करण्याची गरजही या अधिकार्‍यांना वाटत नाही. अयान रंजन मात्र याच्या तपशीलात जातो तेव्हा वास्तव काही वेगळेच असल्याचे त्याला आढळते.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सामुहीक बलात्कार आणि निर्घृण हत्त्या झाले असल्याचे आढळते.
हा रिपोर्ट बदलला जातो. सखोल तपासात रस घेणार्‍या अयान रंजनकडून ही केस काढून घेतली जाते आणि ती सीबीआयकडे सोपवली जाते. अयानला निलंबित केले जाते.

त्या तिसर्‍या मुलीचे काय होते? अयान तिचा शोध घेण्यात यशस्वी होतो का? हा अत्त्याचार दाबला जातो की त्याला वाचा फुटते? राजकीयदृष्ट्या शक्तीशाली असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा होते का?
स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही राज्यघटनेनुसार समतावादी आणि मनानं जातीयवादी असलेल्या भारताचा भयावह चेहरा हा चित्रपट आपल्यापुढे उघडा करतो.

महत्वाचं म्हणजे आयुष्मान खुराणा, मनोज पाहवा, इशा तलवार, कुमुद मिश्रा, सयानी गुप्ता आणि मोहम्मद झीशान अयुब यांचा अभिनय हा अफलातून अनुभव देणारा आहे. निषाद ह्या बंडखोर दलित नेत्याच्या छोट्याशा भुमिकेत मोहम्मद झीशान अयुब याने तर कमाल केलीय.

आरपार अस्वस्थ करणारा, मुळातून हलवणारा जब्राट समकालीन अनुभव हा चित्रपट देतो.
दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी हा चित्रपट बनवून एक फार मोठे सामाजिक काम केलेले आहे. त्यांना मन:पुर्वक सलाम. जयभीम. जयहिंद.

- प्रा.हरी नरके, ४ जुलै २०१९

No comments:

Post a Comment