Saturday, July 13, 2019

उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवगाथेचे ५० भाग पुर्ण होणारआधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर दशमी क्रिएशनचे सन्मित्र नितीन वैद्य यांनी मालिका करायचे ठरवले तेव्हा एकीकडे आनंद झाला होता तर दुसरीकडे जबाबदारीच्या, जोखमीच्या जाणीवेने ताणही आला होता. ज्याअर्थी आजवर हिंदी, मराठी, इंग्रजी अथवा कोणत्याही भारतीय भाषेत या विषयावर मालिका झालेली नाही त्या अर्थी हे काम अतिशय अवघड असणार यात शंका नाही. अनेक बायोपिक मालिका लोकप्रिय होऊनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मालिका करण्याची हिम्मत आजवर कोणीही केलेली नाही.

नितीनसरांची माझी मैत्री नामांतर आंदोलनापासूनची. ४० वर्षांपुर्वी जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्याचा ठराव महाराष्ट्र विधान सभेने एकमताने केला तेव्हा त्याला मराठवाड्यात प्रचंड हिंसक विरोध करण्यात आला. गोरगरिबांची घरं जाळण्यात आली. अन्याय अत्त्याचाराचा आगडोंब उसळला. त्याच्या निषेधात पुणे-मुंबई शहरांमध्ये झालेल्या आंदोलनात अनेक मध्यमवर्गीय शाळकरी तरूण उतरले. नितीन वैद्य, सुनिल तांबे, प्रतिमा जोशी, ज्योती नारकर, सविता कुरतडकर आणि इतर अनेकांशी या आंदोलनातून माझी दोस्ती जुळली.
नितीनसर पुढे म.टा. मध्ये काम करीत होते. त्यांची दिल्ली वार्तापत्रे प्रचंड गाजली.

१९९० च्या दशकात भारतात खाजगी वाहिन्या सुरू झाल्या. प्रिंट मिडीयामधून नितीनसर इलेक्ट्रॉनिक माध्यमात गेले. स्वत:च्या कर्तबगारीवर नितीनसर झी वाहिनीच्या सर्वोच्च पदावर पोचले. झी मराठी वाहिनी सुरू झाल्यावर तिला नितीनसरांनी नावारूपाला आणले.
पुढे स्टार इंडीयाच्या अनेक महत्वपुर्ण पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले.

नंतर नितीनसरांनी दशमी क्रिएशनची स्थापना केली. दशमी नावारूपाला आली. त्यांची "कमला" सारखी मालिका खूप गाजली. "मुरांबा" हा चित्रपट यशस्वी झाला.

सामाजिक जाणीव असणार्‍या नितीनसरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मालिका बनवायचे ठरवणे महत्वाचे. स्टार प्रवाह या मोठ्या वाहिनीने रात्री ९ ते ९:३० हा सर्वाधिक महत्वाचा प्राईम टाईम या मालिकेला दिला. मालिकेचे २०० एपिसोड बनवण्याचा निर्णय झाला. स्टार प्रवाहचे सतिश राजवाडे, अभिजीत प्रकाश खाडे, Abhijeet Prakash Khade नरेंद्र मुधोळकर Narendra Mudholkar यांचा पुढाकार आणि पाठींबा मोलाचा ठरला.

आणि टीम स्टार प्रवाहसोबत टीम दशमी कामाला लागली. पडद्यावर दिसणारे कलाकार, पडद्यामागे काम करणारे लोक आणि लेखन प्रक्रियेत असलेले लोक असे सुमारे १०० जण एकत्र आले. प्रत्यक्ष शुटींगमध्ये गुंतलेले, पडद्यामागे काम करणारे, त्या सर्वांसाठी राबणारे आणि पोस्ट प्रॉडक्शनमध्ये गुंतलेल्या मंडळींचे असे एकुण २०० हात दररोज काम करतात. ते दररोज किमान १६ तास काम करतात तेव्हा तुम्हाला एक एपिसोड बघता येतो. मालिका सुरू होण्याच्या किमान सहा महिने आधीपासून शोध, संशोधन आणि लेखनकार्य सुरू झालेले होते. प्रत्यक्ष शुटींगही २ महिने आधीपासून चालू झालेले होते. ही मालिका जरी मुळात महान इतिहासकार चां.भ. खैरमोडे यांच्या डॉ. भीमराव रामजी आंबेडकर या चरित्रग्रंथाच्या भाग १ ते १२ वर आधारित असली तरी या मालिकेसाठी आम्ही हिंदी, मराठी, इंग्रजी आदी भाषांमधील किमान आठशे पुस्तकांचा धांडोळा घेतलेला आहे. सत्यकथनावर आमचा भर आहे.


आणि १८ मेपासून मालिका सुरू झाली.

दशमी क्रिएशनने अपर्णा पाडगावकर आणि शिल्पा कांबळे यांच्यावर पटकथेची तर चिन्मय केळकर यांच्यावर संवादलेखनाची जबाबदारी सोपवली. अजय मयेकरांसारखा कल्पक दिग्दर्शक, निनाद वैद्य, अक्षय पाटील, दादा गोडकर यांच्यासारखी सदैव उत्साहानं काम करणारी मंडळी मालिकेची निर्मिती प्रक्रिया सांभाळू लागली. सागर देशमुख, मिलिंद अधिकारी, शिवानी रांगोळे, चिन्मयी सुमित, अमृत गायकवाड, श्रीहरी अभ्यंकर, पूजा नायक आणि इतर अनेकांच्या भुमिका गाजल्या.

बाबासाहेबांचे कार्य अनेकांना माहित असले तरी त्यांची बालपणीची जडणघडण कशी झाली याबद्दल सार्वत्रिक अज्ञान आहे. त्यांची ज्ञानार्जनाची तहानभूक वाढवण्यात त्यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांचा किती मोठा वाटा होता हे या मालिकेतून प्रथमच लोकांना कळले.

आज कोट्यावधी लोक ही मालिका बघतात. एरवी कधीही टिव्ही न बघणारे अनेकजण या मालिकेमुळे टिव्ही बघू लागले. कित्येकांची अभ्यास न करणारी लहान मुलं मालिकेतल्या भिवाकडे बघून अभ्यास करू लागल्याचे त्यांनी कळवले. अनेक बालमंडळी नेहमी कार्टून बघतात.चित्रपट आणि क्रिकेटमध्ये रमतात. मात्र वर्ल्ड कपचा हंगाम चालू असतानाही या मालिकेची प्रेक्षकसंख्या सतत वाढती राहिली.

परवा मालिकेत भिवाच्या तोंडी नेपोलियनचा उल्लेख येताच काही मुलांनी आपापल्या घरातली नेपोलियनची चरित्रं शोधून वाचायला घेतली.

ही मालिका लोकप्रिय करण्यात तिची साधकबाधक चर्चा करणारांचा वाटा खूप मोठा आहे. या मालिकेच्या निर्मितीमागे जसा बाबासाहेबांचे कार्य सर्व जातीधर्माच्या कोट्यावधी भारतीयांच्या घराघरात पोचवण्याचा उद्देश आहे, तसाच यानिमित्ताने युवापिढीला वाचन, चर्चा, चिंतन, प्रबोधन याकडे वळवण्याचाही उद्देश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फेसबुक पेज, सन्मित्र वैभव छाया आणि टिमला खूपखूप धन्यवाद.

चिकित्सक बना, योद्धा बना, योद्धा कसा तयार होतो ते समजुन घ्या, पालक असाल तर सुभेदार रामजी बना, विद्यार्थी असाल तर भिवा बना हा संदेश या मालिकेतून घरोघरी पोचतोय याचा चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून मला विशेष आनंद वाटतो.

कोणतेही पुस्तक कितीही लोकप्रिय असले तरी, कोणाही वक्त्याचे भाषण कितीही मोलाचे असले तरी कोट्यावधी लोकांपर्यंत अवघ्या ५० दिवसात पोचत नाही. ही ताकद फक्त फिक्शनमध्ये आहे. एरवी मालिकांकडे ढुंकूनही न बघणारे सामाजिक चळवळवाले मित्र कोट्यावधी लोकांच्या हृदयात पोचलेल्या या मालिकांच्या जगाचा कधीतरी गंभीरपणे विचार करतील अशी आशा करूयात. ही दररोज दाखवली जाणारी मालिका आहे. तिला अनेक मर्यादा आहेत.

हा अनुबोधपट [ डॉक्युमेंटरी नाही ]

हा कोरड्या इतिहासाचा निरस संदर्भग्रंथ नाही.

तरिही पुढची किमान शंभर वर्षे मालिकेचा हा दस्तऎवज पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचा आम्हाला आनंद आहे.

बाबासाहेबांचे या देशावर, प्रत्येक भारतीयावर आणि विशेषत: आमच्यासारख्यांवर खूपखूप उपकार आहेत. त्यातून उतराई होणे शक्य नाही.

मात्र या मालिकेच्या माध्यमातून बाबासाहेब अनेकांच्या काळजाला भिडत असल्याचा आनंद अपार आहे.

येणारा काळ बाबासाहेबांचा असेल. जय भीम.
- प्रा.हरी नरके, १३ जुलै २०१९

No comments:

Post a Comment