"संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जनसागर उतरला होता. स्वातंत्र्याच्या आंदोलनानंतरचं सर्वात मोठं असं हे आंदोलन होतं. या आंदोलनाचे नेते एसेम जोशी, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, एस. ए. डांगे हे बहुतेक जण शहरी नेते होते. या आंदोलनात शहरातील कामगार, श्रमिक, कष्टकरी, निम्न मध्यमवर्गीय यांना आणण्याचे तसेच ग्रामीण महाराष्ट्राच्या काळजात हे आंदोलन पोचवण्याचे काम शाहीरांनी केले. त्यात अण्णा भाऊ साठे अग्रणी होते. त्यावेळच्या त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला एक लाखापेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित असे. म्हणूनच गृहमंत्री मोरोबा देसाई यांनी त्यांच्या तमाशांवर बंदी घातली. अण्णा भाऊंनी शक्कल लढवली आणि तमाशाचे नाव बदलून पोलिसांना चकमा दिला. आपण आता तमाशा करणार नाही, तर लोकनाट्य सादर करणार आहोत असं म्हणून त्यांनी कार्यक्रम चालू ठेवले.
तमाशात उन्मादकता असे. अण्णा भाऊंनी लोकनाट्यात राष्ट्र भक्त, हुतात्मे, स्वातंत्र्य चळवळीतील नेते यांना अभिवादन करण्याची प्रथा सुरू करून तमाशाला लोकशिक्षण, लोकसंघटन, लोकजागरण आणि रंजनातून, करमणुकीतून प्रबोधन यांची जोड दिली. माझी मैना गावावर राहिली माझ्या जिवाची होतेय काहिली... ही अण्णा भाऊंची रचना ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून जन्माला आलेले महान काव्य आहे. हे रुपक म्हणजे कलात्मकता आणि जनभावनेची नाडी पकडणारी अजरामर कलाकृती होय. मराठी भाषेच्या सन्मानार्थ अण्णा भाऊंनी केलेले लेखन मराठीत तरी अजोड आहे. त्यांच्या लेखनाची दखल पांढरपेशा समिक्षकांनी घेतली नाही. अण्णा भाऊंना आयुष्यभर लेबर कॅंप, चिरानगर आणि सिद्धार्थनगर [गोरेगाव] येथील झोपडपट्टीत राहावे लागले. ते हयात असताना आपल्या समाजाने त्यांची कदर केली नाही. गोरेगावला त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला अण्णा भाऊंचे जेव्हढे वय होते [४९ वर्षे] धड तेव्हढेही लोक उपस्थित नव्हते. अशी उपेक्षा कोणाही प्रतिभावंताच्या वाट्याला येऊ नये."
अशा आशयाचे भाषण मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ परिसंवादात केले.
परिसंवादाचा विषय संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि अण्णा भाऊ, असा होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. कौतिकराव ठालेपाटील, होते. या प्रसंगी विचारवंत अर्जुन डांगळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वि.दा.पिंगळे यांनी केले. या कार्यक्रामाचे आयोजन, सुनिल महाजन, संवाद व सुनिल कांबळे, अध्यक्ष स्थायी समिती,पुणे मनपा यांनी केले होते.
यावेळी बोलताना डांगळे म्हणाले, "मी स्वत: अण्णा भाऊंच्या अंत्ययात्रेला हजर होतो. त्यावेळी प्रचंड गर्दी झालेली होती. निदान पन्नास-साठ तरी लोक नक्कीच उपस्थित होते. त्यामुळे अण्णा भाऊंची उपेक्षा झाली ही टिका खरी नाही." ते पुढे म्हणाले, "कुसुमावती देशपांडे यांनी आपल्या कादंबरी शतक या पुस्तकात अण्णा भाऊंची दखल घेतली नाही. मराठीतील बहुतेक सर्व समीक्षकांनी अण्णा भाऊंची उपेक्षा केली."
-प्रा.हरी नरके, ३ ऑगष्ट २०१९
No comments:
Post a Comment