Friday, January 18, 2013

PIFF चित्रपट महोत्सवया वर्षी आपण भारतीय चित्रपट सृष्टीची शताब्दी साजरी करीत आहोत. यानिमित्ताने  १० ते १७ जानेवारीच्या आठवड्यात ११ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. जगातील ५० देशांनी या महोत्सवात भाग घेतला होता.वेगवेगळ्या भाषांतील एकुण २०० चित्रपटांचे ३५० शो या महोत्सवात आयोजित करण्यात आले होते.सुमारे दहा हजार प्रेक्षकांनी या महोत्सवाचा आनंद लुटला.समकालीन जागतिक चित्रपट कोणत्या उंचीवर पोचलेला आहे? जगभरचे विचारी लोक कोणत्या दिशेने विचार करतात? चित्रपटासारख्या अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी माध्यमाचा जनमत घडवण्यासाठी,अभिरुची उंचावण्यासाठी आणि जगण्यातली गुंतागुंत समजावुन घेण्यासाठी किती उत्तम वापर करता येतो याचे यानिमित्ताने आरपार दर्शन घडले.मराठी आणि अनेक भारतीय भाषांमधील श्रेष्ट चित्रपटांचा दर्जा जागतिक तोडीचा असल्याचा अभिमान वाटला.एकुण सगळा अनुभव जगण्याची ईयत्ता वाढवणारा होता.उमेद आणि उर्जा देणारा होता.अभिरुची श्रीमंत करणारा होता.जगभर भली माणसे आहेत आणि ती जग सुंदर करण्यासाठी झटत आहेत, जगात सगळीकडेच चंगळवाद, स्वार्थ आणि अंधार वाढत असला तरी निराश होण्याची गरज नाही.असे होतच असते, चिवटपणे त्याचा सामना करण्यातुनच जगण्याची ताकद वाढते असा विश्वास देणारा हा अनुभव होता.
जानु बरुवा या प्रतिभावंत असामी दिग्दर्शकाचा २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचा विषय समर्थपणे हाताळणारा असामी भाषेतील "वेव्ज आ‍‘फ सायलेन्स", अंजली मेनन यांचा मल्याळी भाषेतील केरळी जनजीवन आणि निसर्ग यांचा पट हळुवारपणे उलगडणारा "लकी रेड सीड्स", महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरलेला जर्मनीचा "बार्बरा", पोलंडचा "रोज", उरुग्वेचा "डिले", तुर्कस्थानचा "अराफ," आदी चित्रपटांचा दर्जा चित्रपटसृष्टीला सलाम करावा असा होता. किती नानाविध विषय या चित्रपटांनी हाताळले होते.विषमता,चंगळवाद, दहशतवाद, व्यसने, वृद्धांचे प्रश्न, ढासळणारी कुटुंबव्यवस्था, निसर्गाची हानी, मानवी क्रौर्य, जागतिकीकरणातुन आलेली औद्योगिक संकटे,कामगारांचे संघर्ष, अंधश्रद्धा, स्पर्धा,यु्द्ध आणि हिंसा असे अनेक महत्वाचे प्रश्न या चित्रपटांद्वारे मांडण्यात आले होते.
दुस‍र्‍या महायुद्धातील हिटलर आणि जर्मनांचा उतमात,सैनिकांनी मांडलेला उच्छाद व रानटीपणा किळस यावी असा होता. "सिंडलर्स लिस्ट"सारख्या श्रेष्ट चित्रपटातुन तो यापुर्वीही टिपण्यात आलेला होता. "रोज" या चित्रपटातील युद्धात पती मारला गेल्यानंतर एका विधवेला सोसावा लागलेला भयानक छळ अंगावर काटे आणतो. तिने धैर्याने केलेला सामना आणि तिला साथ देणा‍र्‍या एका सैनिकाची ही कहाणी मानवी जिद्दीची आणि चिवटपणाची विलक्षण प्रेमकथा आहे."फ्रोजन सायलेन्स" या स्पेनच्या चित्रपटातही या युद्धातील सैनिकी जीवनाचे वेगळे पैलु  चित्रीत करण्यात आले होते.
जगभर आयुर्मान वाढत असल्याने वृद्धांचे अनेक प्रश्न पुढे येत आहेत.इस्राईलच्या अमीर मनोर यांच्या "एपिलोग", पोलंडच्या जेर्झी डोमार्डड्जगींच्या "दि फिफ्थ सीजन ओफ दि इयर" आणि उरुग्वेच्या "डिले" या चित्रपटांमधुन ज्या उंचीवरुन हे विषय मांडण्यात आले ते मानवी करुणेला आणि काळजाला हात घालणारे होते. जिवापाड मेहनत करुन मुलांना आणि वडिलांना सांभाळणारी एक महिला शेवटी वडीलांना वृद्धाश्रमात ठेवायला जाते. आश्रमवाले नियम दाखवुन नकार देतात. ती बहिणीला वडीलांना सांभाळायची विनंती करते. बहिण कोरडेपणाने जबाबदारी झटकते. अश्यावेळी पिचलेली ती वडिलांना एके ठिकाणी बाकावर बसवुन पाणी आणते असे सांगुन पळुन जाते. घरी आल्यावर तिचा अपराधभाव तिला कुरतडु लागतो.  मुलगी काही संकटात असेल, नातवंडाना अपघात झाला असेल, आजारी असतील ती म्हणुन तिला यायला उशीर होत असावा या समजुतीने एकडे वडील दिवसभर तिथेच बसुन तिची वाट बघतात.रात्री जिवघेणी थंडी पडते. आजुबाजुचे काही लोक मदतीला येतात, घरी चला म्हणतात, पण म्हातारा नाही म्हणतो. मुलगी आली की चुकामुक व्हायला नको म्हणुन तिथेच बाकावर बसुन राहतो. रात्री म्हातारा थंडीने शेवटचे श्वास घेवु लागतो.मात्र तरीही जागा काही सोडत नाही.मुलगी एव्हाना रात्रभर वेगवेगळ्या दवाखाने आणि वृद्धाश्रमात शोध घेत फिरते. निराश होते. शेवटी ती बाकाजवळ पोचते पण खुप उशीर झालेला असतो. वडिल थंडीने बेशुद्ध पडलेले असतात. ती खुप प्रयत्न करते. आणि वडील शुद्धीवर येतात. तिला का उशीर झाला याची काळजीपोटी विचारपुस करु लागतात. ती काय सांगणार? बाकावरुन निघताना वडील मदत करणारांचे त्यांच्या घरी जावुन आभार मानायला विसरत नाहीत.काळजाला पीळ पाडणारी कथा. सादरीकरण,अभिनय,पटकथा,छायाचित्रण, चित्रभाषा, संवाद या सार्‍यातुन दिग्दर्शक रोड्रिगो प्ला यांची प्रतिभा आणि मेहनत दिसते.
जर्मनीच्या दिग्दर्शक आंद्रे ड्रेसन यांनी "स्टोप्ड एट ट्रेकहोल्ट" या चित्रपटातुन ब्रेन ट्युमर झालेला आणि हातात अवघे दोन महिने असणारा नायक मृत्युला ज्या धैर्याने सामोरा जाताना दाखवला आहे त्याला तोड नाही. मृत्युचा उत्सव ज्या गुंतागुंतीसह त्यांनी चित्रित केलाय त्याला केवळ सलामच.दक्षिण आफ्रिकेच्या  क्रेग फ्रेमोंड यांनी आपल्या "मटेरियल"या चित्रपटातुन एका मुस्लीम कुटुंबातील नव्याजुन्या पिढीतील मुल्यसंघर्ष ज्या ताकदीने आणि हळुवारपणे चित्रित केलाय तो अविस्मरणीय आहे. "अराफ:समव्हेयर इनबिटवीन" या तुर्कस्थानच्या यासीन उस्तोग्लु यांनी गरीब मुस्लीम मुलामुलींचे प्रेमविश्व,त्यातले ताणेबाणे, सनातनी कायदे आणि नायिकेचा एकाकी संघर्ष यांची जबरअदस्त मांडणी केलेली आहे.जेहरा या नायिकेची भुमिका  अक्षरश: जगलेल्या अभिनेत्री नेस्लीहान अटागुलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेल्या "बार्बरा" या नायिकाप्रधान चित्रपटात दोन जर्मनीमधील प्रेमिक डाक्टरांची घुसमट, ससेहोलपट आणि चिवटपणाची कहाणी सांगण्यात आलेली आहे.
चंद्रकांत कुलकर्णी हे बहुआयामी प्रतिभेचे श्रेष्ट दिग्दर्शक आहेत.त्यांनी मराठीतील "तुकाराम"मध्ये चमत्कार वगळुन संत तुकारामांच्या जडणघडणीचा,त्यांच्या जागतिक अश्या प्रतिभेचा तो आलेख चितारला आहे तो स्तिमित करणारा आहे.या चित्रपटाचा अवाका फार मोठा आहे.कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने तो लिलया पेलला आहे.हा तुकाराम प्रत्येक मराठी माणसाने बघायलाच हवा.जागतिक सिनेमाच्या तोडीसतोड देणारा हा मराठी चित्रपट आहे. ख्यातनाम साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी यांनी आपला पहिला चित्रपट वयाच्या ७५व्या वर्षी दिग्दर्शित केला आहे."इन्वेस्टमेंट" हा आजचा चित्रपट आहे. मध्यमवर्गियांची महत्वाकांक्षा, चंगळवाद आणि मुल्यांची मोडतोड करण्याची व्यापारीवृती मतकरींनी ताकदीने पकडली आहे.आजच्या बदलत्या महानगरी स्पर्धाभावनेचा अर्थ-सामाजिक आलेख ते छान मांडतात.
अंजली मेनन आणि जानु बरुवा यांच्यावर स्वतंत्रपणे लिहायला हवे.बदलते सामाजिक वास्तव ,दहशतवाद, कुटुंब,निसर्ग आणि मानवीजीवन यांच्यावरचे त्यांचे भाष्य अफलातुन आहे. हे जागतिक तोडीचे महान दिग्दर्शक आहेत.
जगभराचे समकालीन वास्तव चित्रभाषेत मांडण्याचा अनेक प्रतिभावंत दिग्दर्शक प्रयत्न करीत आहेत. मानवी जीवनाचा अर्थ आणि गुंतागुंत ज्या कलात्मक  उंचीवरुन टिपण्यात येत आहे ती बघुन जगण्याची श्रीमंती वाढते. अवाका वाढतो.अभिरुची उंचावते. जगभर भले लोक आहेत.ते आपल्या कलेतुन गंभीरपणे आणि अपार मेहनतीने जग समृद्ध करीत आहेत. पुणे महोत्सवाचे आयोजक जब्बार पटेल आणि त्यांच्या सहकार्‍यांना खुपखुप धन्यवाद. हा अनुभव प्रत्येक संवेदनशील माणसाने घ्यायलाच हवा.1 comment:

 1. FROM:FACEBOOK.................
  Savita Mohite, Sandip Deore, Amit Ujagare and 20 others like this.

  DrSagar Jnu: सर हिँदी मेँ भी लिखा कीजिए...
  January 18 at 5:43pm · like · 1

  Padmakar Borode: asehi lok ahet jagat. be positive I think cinemas can do better role to creat new society,Sir.
  January 18 at 6:34pm · like · 1

  Sagar Killarikar :Very True !!
  January 18 at 9:31pm · like · 1

  Anand Wingkar: aapan nehamich maze kautuk karata abhari.
  January 19 at 6:07pm · like · 1

  Dayanand Yuvraj Mane: narke sir, very nice shairing and anaysis of film festival.
  January 20 at 11:31pm · like · 1

  Hari Narke: Thanks to everybody.
  January 21 at 8:16pm · Like

  Smita Pansare: sir aaplya ya sharing mule aanekanchya jagnyachya eayatet vadh hote jagn sundar karnyasaticha chotya chotya dhadpadina veg milato

  from:facebook...........

  ReplyDelete