गेले पंधरा दिवस देशभरातील काही माध्यमांमध्ये एका गुन्हेगाराला महापुरुष म्हणून गौरविण्याची आणि त्याच्यामागे अनेक तथाकथित मान्यवर असल्याचे चित्र रंगविण्याची जणू अहमिहिकाच लागलेली आहे. २२ वर्षांपुर्वी [१२ मार्च १९९३ रोजी] मुंबईत झालेल्या भीषण आरडीएक्स स्फोटांची ती भयानकता आजही माझ्या मनात जशीच्या तशी जागी आहे. मी तो स्फोट स्वत:च्या डोळ्यांनी बघितला होता. केवळ थोड्या अंतरावर दूर होतो म्हणूनच केवळ वाचलो. दै.सकाळच्या पुणे आवृत्तीच्या पहिला पानावर ह्या स्फोटाबद्दल मी लिहिलेले वृत्त १३ मार्चला प्रकाशित झालेले होते.
ज्यांना या बंद्याचा कळवळा येत होता त्यातल्या किती लोकांना या स्फोटाची झळ बसलेली होती? जे २५७ या स्फोटांमध्ये मारले गेले, जे ७५३ गंभीर जखमी झाले आणि जे हजारो जखमी झाले त्यातले कोणीही यांचे कुटुंबिय / नातेवाईक नव्हते आणि ते यांना आपलेही वाटत नव्हते एव्हढाच याचा अर्थ. यातले काही महाभाग, विशेषत: आबू आझमी, सलमान खान आदी तर तो बंदी संपूर्ण निर्दोष असल्याचीच ग्वाही देत होते. [ हे जर खरे असेल तर मग या लोकांनाही या स्फोटाची आतली सगळी माहिती होती असे मानावे लागेल आणि यांचाही या स्फोटात सहभाग होता किंवा कसे हेही तपासावे लागेल. ]
जे निवृत्त न्यायाधीश, डावे आणि तथाकथित पुरोगामी या बंद्याच्या मदतीला धाऊन आले त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातला आजवरचा आदर कमी झाला हे मला स्पष्टपणे नोंदवावेसे वाटते. आबू आझमी, शशी थरूर, दिग्विजय सिंग, शत्रुघ्न सिन्हा, आदी भंपक, संधीसाधू राजकारणी, जेठमलांनीसारखे धंदेवाईक पोटार्थी वकील अशांना किंमत द्यायची गरज नाही. जे बंद्याचे मानसिक साथीदार आहेत, समर्थक आहेत त्यांच्यात आणि केवळ या केसची तांत्रिक पुर्तता झाली नाही म्हणून आणि तात्विक भुमिका म्हणून फाशीला विरोध असणारे काही विचारवंत यांच्यात फरक करायला हवा. मात्र सद्ध्या तरी हे सर्वच लोक मी अदखलपात्र मानतो. जेव्हा फाशी हवी की नको ही चर्चा करायला हीच वेळ त्यांना मिळते तेव्हा ते आपल्या या कृतीने अतिरेक्यांचे आणि शत्रूराष्ट्राचे मनोबल वाढवित असतात हे आता उघडपणे मांडले पाहिजे. खरेतर खतरनाक अतिरेक्यांना तुरूंगाऎवजी या अशांच्या घरी ठेवावे म्हणजे यांची खरी परिक्षा होईल.
२९१ लोकांच्या सह्या एव्हढ्या कमी वेळात कोणी घेतल्या?
यातले अनेकजण मोबाईल किंवा इंटरनेट वापरीत नाहीत हे मला माहित आहे. हे लोक वेगवेगळ्या शहरात राहतात. अशा स्थितीत यांच्या सह्या एव्हढ्या कमी वेळात कोणी जमवल्या याची माहिती जर बाहेर आली तर यामागचे खरे सुत्रधार आणि शक्तीशाली यंत्रणा यावरही प्रकाश पडू शकेल.
यात तीन प्रकारचे हौसे, नवसे आणि गवसे आहेत. तांत्रिक बाजू, तात्विक मुद्दा आणि बंद्याला मानसिक सहानूभुती असणारे जरी हे तीन प्रकारचे लोक वेगवेगळे असले तरी तुर्तास त्यांचा कोणाचाही मुलाहिजा करण्याची गरज मला वाटत नाही. प्रशांत भुषण, आनंद ग्रोव्हर, माजिद मेमन आणि राजू रामचंद्रन यांच्यासारखे केवळ पैशांसाठी अतिरेक्यांचीही वकीली करणारे जे मानवताद्रोही वकील लोक आहेत त्यांचा तर यापुढे तिरस्कारच करायला हवा. या फाशीचे राजकारण करणारे खासदार ओवेशी, आमदार जलील, अबू आझमी आणि इतर भंपक लोक हे ज्या प्रकारचे युक्तीवाद करीत होते ते फारच गमतीदार होते. बकवास होते. म्हणे रेल्वेतून इतरही विना तिकीट प्रवास करीत आहेत तुम्ही एकालाच पकडून शिक्षा का करताय? आधी इतरांनाही पकडा मग याचे बघू. हा तर निर्दोषच आहे. कारण माझ्याकडे तिकीट नाही असे त्याने स्वत:हून टीसीला भेटून सांगितले सबब त्याला तुम्ही कारवाई न करता सन्मानित करायला हवे होते. कारण रेल्वेला मदत व्हावी या प्रामाणिक भावनेनेच त्याने तिकीट काढलेले नव्हते वगैरे वगैरे.... केवळ संतापजनक.
बिहार, प. बंगाल च्या आगामी निवडणुका, तिथली बंद्याबद्दल सहानुभुती असू शकेल अशी मोठी मतदारसंख्या बघून अनेक राजकारण्यांना बंद्याचा पुळका आलेला होता का याचाही शोध घेतला जायला हवा. ज्यांनी अंत्ययात्रेत 'याकूब मेमन अमर रहे'च्या घोषणा दिल्या त्यांचीही कसून चौकशी झाली पाहिजे. हे सारे भयंकर आहे, अशा घोषणा देणारांचा धिक्कारच केला पाहिजे.
अनेकांना फाशीची शिक्षाच नकोय. यातल्या कितीजनांना व्यक्तीश: गुन्हेगारांचा छळ सोसावा लागलाय? ज्यांना कायम संरक्षणात राहायची सवय झालेली आहे आणि ज्यांना गुन्हेगारीची कोणतीही झळ बसलेली नाही अशांच्या या प्रसिद्धीलोलुप मुक्ताफळांना का किंमत द्यावी? मुळात जोवर आपल्याकडच्या कायद्यात ही फाशीची शिक्षा आहे तोवर यांच्या टिवटिवीकडे साफ दुर्लक्षच केलेले बरे. काही जणांना तांत्रिक पुर्तता झाली नाही याचे भांडवल करायचे होते. नेमकी गंमत बघा. हे सारे सह्याजीराव निवृत्त झालेले होते. हे जेव्हा पदांवर होते तेव्हा नोकरीसाठी डोळ्यावर कातडे ओढून तांत्रिकतेकडे कायम डोळेझाक करणारे आणि निवृत्तीनंतर आता कंठ फुटणारे हे तथाकथित मान्यवर कितपत गंभीरपणे घेण्याचे पात्रतेचे आहेत? काटजू वगैरे लोक तर विदुषक होत.
अफजल गुरू, अजमल कसाब आदींची फासी पार पडल्यानंतर मिडीयाला समजले. मात्र ज्यांनी या बंद्याच्या फाशीची ही बातमी पंधरा दिवस आधीच ज्यांनी फोडली आणि मिडीयाला खाद्य पुरवले तसेच आपल्या वेगळ्या अजेंड्यासाठी वापरून घेतले त्यांचेही हेतू फार शुद्ध होते असे म्हणता येणार नाही.
या फाशीची गरज होतीच. यातून अतिरेक्यांना फार महत्वाचा संदेश गेलेला आहे. यापुढे अशा मानवताद्रोही कारवाया करताना दहशतवादी गुन्हेगारांना दहादा विचार करावा लागेल.
आजवर झालेल्या सर्वच जातीय दंगलींमधले सुत्रधार आणि भागीदार यांनाही तातडीने कठोर शिक्षा व्हायला हवी. शत्रूराष्ट्राचे सर्व हस्तक वेचून वेचून फासावर लटकावले गेले पाहिजेत. कोणाचीही गय केली जाता कामा नये. हे सारे मानवतेचेच शत्रू आहेत. त्यांना क्षमा नाही.
.......................................