Wednesday, February 20, 2019

जिगरबाज किर्ती-









रात्री साडेसातची वेळ. चिपळूण रत्नागिरी हायवे. विशीतली दोघं भावंडं गावाकडं, घराकडं निघालीयत. एका भरधाव एस.टी.बसनं दोघांनाही उडवलं आणि ती बेदरकारपणे निघून गेली. बहीण थोड्या वेळानं शुद्धीवर आली. भाऊ रक्तानं माखलेला होता. ती हायवेवरून जाणार्‍या येणार्‍या गाड्यांना मदतीसाठी विनंती करीत होती. जिवाच्या आकांतानं ती मदतीसाठी रडत-ओरडत होती. तासाभरात किमान पन्नास गाड्या तिथून आल्या - गेल्या. पण कोणीही थांबलं नाही. तासाभरानं भावानं प्राण सोडला.

त्यानंतर एकानं गाडी थांबवली. त्या दोघा बहीणभावंडांना आरवलीत आणून सोडलं. एकुलता एक मुलगा गेल्याचं बघून आई वडीलांनी, आजी आजोबांनी हंबरडा फोडला. आजोबांचा नातवावर फार जीव होता. आजोबा हाय खाऊन आजारी पडले आणि त्यातच ते गेले.

वडील हायवेवर चहाची एक टपरी चालवत होते. रस्ता चौपदरी होणार होता. शेजारच्या दोघा टपरीधारकांनी आपल्या टपर्‍यांचं मुल्यांकन करून घेतलं. प्रत्येकाला सतरा लाख रुपये भरपाई मिळाली. वडीलांना निरक्षरतेमुळं यातलं काहीच माहित नव्हतं. जेव्हा कळलं तोवर उशीर झालाय असं अधिकारी म्हणाले. गेली १८ वर्षे त्यांची चहाची टपरी आहे. ग्रामपंचायतीच्या तश्या नोंदीही आहेत. पण शून्य रुपये शून्य पैसे भरपाई मिळणार असं सांगितलं गेलं. हाताशी आलेला मुलगा नुकताच अपघातात गेलेला. घरात आई,पत्नी आणि मुलीसह खाणारी चार माणसं. त्यांनी धसका घेतला. ते हार्टॲटॅक येऊन गेले. निरक्षर कुणब्यांची परवड काही थांबत नाही.

आजीची मुलावर आणि नातवावर आभाळमाया. ती उदास झाली. खचली. पंधरा दिवसात आजीही गेली.
दरम्यान मावशी आणि काकाही वारल्याचं कळलं.

मायलेकी तशाही आघातांमध्ये पाय रोऊन उभ्या होत्या. झुंजत होत्या. पण आई गेलेल्यांसाठी झुरतही होती. वर्षभरात तीही गेली.
किर्तीनं एका वर्षात जवळचे, मायेचे, आतड्याचे एकुण सातजण गमावलेले होते.
नियती इतकी क्रूर कशी काय असते?

किर्ती सध्या चिपळूणला एम.ए.च्या प्रथम वर्षात शिकतेय.

चहाची टपरी चालवतेय. काल संगमेश्वरला शिवजयंतीला माझं भाषण ऎकायला आली होती.

पोरगी खरंच जिगरबाज आहे.

प्रा. हरी नरके,२० फेब्रुवारी २०१९

Sunday, February 10, 2019

सेवाभावी, निरलस आणि आधारवड : कृष्णकांत कुदळे








कृष्णकांतभाऊ गेली काही वर्षे कॅन्सरने आजारी होते. त्याही काळात ते नेहमी प्रसन्न असायचे. भाऊ अतोनात उपक्रमशील होते. त्यांच्या डोक्यात सदैव नवनव्या कल्पना असायच्या. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी ते पदरमोड करायचे. सर्वदूर समाजातल्या गुणी लोकांचा गोतावळा भाऊंच्या पथिकवर कायम जमलेला असायचा.
गेल्या ३१ वर्षात त्यांना मी दुर्मखलेलं कधीही पाहिलं नाही.

आपल्या कर्तबगारीच्या जिवावर मोठे झालेले भाऊ अतिशय नम्र, संयत आणि सदासतेज असायचे. समोरच्या प्रत्येक माणसाबद्दलचा अगत्यभाव त्यांच्या देहबोलीतून कायम झळकायचा. पुणे फेस्टीव्हल, समता परिषद, अ.भा.माळी शिक्षण परिषद, माळीनगर साखर कारखाना, पथिक परिवार, नर्गिस दत्त सहकारी पतसंस्था, पुणे व्यासपीठ आणि आणखी कितीतरी संस्थांचे काम भाऊ बघायचे. भाऊ शेकडो संस्था आणि उपक्रमांचे आधारवड होते. ते सदैव कामात बुडालेले असूनही कधीही कातावलेले, वैतागलेले नसायचे.सदा हसतमुख.राहणी उच्च आणि अभिरूचीही दर्जेदार.

३१ वर्षांपुर्वी सावता माळी भवनमधल्या माझ्या एक भाषणाला ते आलेले होते. भाषण खूप आवडल्याचे त्यांनी भेटून आवर्जून सांगितले. दुसर्‍या दिवशी डेक्कन जिमखान्यावरच्या त्यांच्या घरी नास्त्याला बोलावले. भाऊंची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम होती आणि मी मात्र अतिशय फाटका माणूस. सायकलवरून त्यांच्या बंगल्यावर गेलो. त्यांनी मनापासून स्वागत केलं. एखादा श्रीमंत माणूस केवळ आपलं भाषण ऎकून आपल्याला एव्हढं सन्मानानं वागवतोय हा माझा पहिलाच अनुभव होता. तोवर वर्ग बदलला की माणसं बदलतात हाच अनुभव घेतलेला. श्रीमंत माणसं गरिबांबद्दल कमालीचा तिरस्कार बाळगणारी असतात हे अनुभवलेलं. त्यामुळे अशांपासून मी मैलभर दूर राहणारा.

भाऊंनी चक्क दोस्तीचा हात पुढे केला. तो कायम निभावला.

आमच्यातल्या आर्थिक परिस्थितीतल्या फरकामुळे आमच्यात कधीही अंतर पडणार नाही याची भाऊंनी कायम काळजी घेतली. भाऊ माझ्याशी कायम सोयर्‍याप्रमाणे वागले.

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी माझ्याकडची आणि प्रकाशकाकडची सगळी पुंजी संपली. एका राजकीय नेत्याच्या निवडणुकांसाठी मी शाळकरी वयापासून खिशातून खर्च करून अनेक भाषणं केलेली, राबलेलो, गडी पुढे केंद्रीय मंत्री  झाला, खुप मोठा झाला. मी त्यांना एक हजार रूपये दोन महिन्याच्या बोलीवर उसने मागितले. त्यांनी त्यासाठी माझ्याकडे बॅंक गॅरंटी आणि पुण्यातल्या ५ नामवंतांची हमीपत्रं मागितली.


एकदा पुस्तकाचं काम कशामुळे अडलय ते भाऊंनी विचारलं. मी सांगायची टाळाटाळ करीत होतो. त्यांनी कसं कोण जाणे पण बरोबर ओळखलं. म्हणाले, " मला तुमच्या पुस्तकाच्या ५० प्रती हव्यात." ॲडव्हान्स बुकींगची रोख रक्कम त्यांनी तात्काळ हातावर ठेवली. माझे डोळे ओले झाले. त्यांची माझी नुकतीच ओळख झालेली होती. फारशी ओळखदेख नसतानाही भाऊंनी असं करणं फारफार उमेद वाढवणारं ठरलं.

भाऊ म्हणाले, "हरी, हे उपकार नाहीत. तुमच्या पुस्तकाचा विषय माझ्या जिव्हाळ्याचा आहे.पुस्तक वाचायला मी उत्सुक आहे. माझ्या मित्रपरिवाराला त्याच्या प्रती मी भेट देणार आहे. पुढच्या भेटीत पुस्तक घेऊनच या."

पुस्तक तयार झाले. मी भाऊंकडे त्यांचा फोटो मागायला गेलो. त्यांनी फोटो द्यायला नकार दिला. म्हणाले, " हरी, मी आर्थिक मदत केली म्हणुन माझा फोटो पुस्तकात छापू नका. मी तुम्हाला मदत केलेली नाही तर माझ्या आवडत्या विषयाचं पुस्तक लवकर यावं यासाठी आगाऊ नोंदणी केलेली आहे.हा विषय परत काढायचा नाही. नाहीतर आपली दोस्ती कटाप."

पुणे फेस्टीव्हलमुळे हेमा मालिनी, मिनाक्षी शेषाद्री, विनोद खन्ना, अमिताब बच्चन अशा सगळ्या नामवंतांशी त्यांची दोस्ती झालेली.पण भाऊंचं वैशिष्ट्य म्हणजे हे व्यावसायिक संबंध त्यांच्या मधाळ आणि सुहृद वागण्या बोलण्यांनी कौटुंबिक नात्यात बदलत असत. नर्गिस दत्त त्यांना सख्ख्या भावासारखं मानायच्या.

सुनिल दत्त त्यांचे खास दोस्त. जगभरातले अनेक क्रिकेटपटु भाऊंच्या गोतावळ्यात असत. राजकारणी तर सगळ्याच पक्षांचे भाऊंचे साक्षात मित्र असत. श्री सुरेश कलमाडी आणि श्री छगन भुजबळ यांचा भाऊंवर विशेष लोभ होता. सुशिलकुमार, पवारसाहेब, विलासराव, मुंडेसाहेब यांच्याशी भाऊंचा घरोबा होता.

साहित्य आणि साहित्यिक हे त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचे क्षेत्र. पुल, नेमाडे, दळवी, जीए, विंदा, या सार्‍यांनी पथिकवर उतरावं यासाठी त्यांचा प्रयत्न असे. दर्जेदार मासिकं आणि पुस्तकं यांचा भाऊंकडे संग्रह असे. निळूभाऊ, जब्बार, डॉ. लागू यांच्याशी गप्पांचे फड रंगवायला भाऊंना आवडे.

३१ वर्षातल्या असंख्य आठवणी आहेत. पुन्हा केव्हातरी---

प्रिय कृष्णकांतभाऊ, विनम्र आदरांजली...........

प्रा.हरी नरके, १० फेब्रुवारी २०१९

आता कुठे राहिलीय जातियता?







वय वर्षे ४ ते १४ [ १८९४ ते १९०४] याकाळात भिमराव सातार्‍यात राहत होते. एकदा ते भावंडांसह वडलांना भेटायला जात असताना गाडीवानाने त्यांची जात कळताच त्यांना गाडीतून खाली उतरवले.

त्यांना प्यायला कोणीही पाणी दिले नाही. ह्या घटनेने कोवळ्या भिमरावाच्या काळजाला दिलेल्या डागण्या ते आयुष्यभर विसरू शकले नाहीत. मनावरचे हे चरे आठवले की भिमराव कायम जखमी व्हायचे. या घटनेला आज सव्वाशे वर्षे उलटून गेलीयत.

त्या दहा वर्षाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सातार्‍याच्या सदर बाजार या कॅंटोनमेंट परिसरातील भाड्याच्या घरात राहात होते. त्या घराला भेट द्यायला काल गेलो होतो.

तिथे राहणार्‍या कुटुंबाकडे डॉ. बाबासाहेबांची चौकशी करण्यासाठी घराच्या उघड्या असलेल्या फाटकातून आत गेलो. ऎसपैस अंगण होते. पडवीत एक तरूण बसला होता. मी अंगणात उभं राहून त्याच्याकडे चौकशी केली. डॉ. बाबासाहेब हे नाव ऎकताच तो भडकला.

तो तरूण मुलगा चक्क चवताळून अंगावरच आला. शिविगाळ करू लागला. त्याचे नेमके काय बिघडलेय तेच मला कळेना. त्याच्या मदतीला नंतर त्याचे आजोबाही धावून आले. त्यांनी आधी मला अंगणातून हुसकावून लावले. गेटच्या बाहेर काढले. मी सार्वजनिक रस्त्यावर येऊन त्या घराकडे बघितलेलेही त्यांना खपत नव्हते. घराच्या अंगणातच काय मी सार्वजनिक रस्त्यावरही उभे राहता कामा नये असा त्यांचा तोरा होता. सगळेच अजब.

कुठून येतो एव्हढा जातीय विखार?

त्यांचा आरडाओरडा ऎकून काही शेजारी गोळा झाले. त्यांनी मला सांगितले या खानदानी मंडळींना डॉ. बाबासाहेबांच्या नावाची नफरत आहे. संपुर्ण ॲलर्जी. या घरात सव्वाशे वर्षांपुर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहात होते हा त्यांना आजही अपमान वाटतो. ते नाव ऎकले की त्यांचा संताप संताप होतो. ते पिसाळतातच. त्या घराची व जागेची बाजारभावाने होणारी किंमत रूपये एक कोटींपेक्षा अधिक असून ती अदा करून हे घर सरकारने "राज्य संरक्षित स्मारक" घोषित केलेले आहे. तशी कायदेशीर प्रक्रियाही पुर्ण झालेली आहे. तरीही हे सरंजामदार सदर स्मारक/घर बळकाऊन बसलेत. सरकारचा निर्णय ते मानायला तयार नाहीत. हे घर सातारच्या सदर बाजार परिसरात, पारशी अग्यारीसमोर आहे.

आता कुठे राहिलीय जातियता? असा साळसूद प्रश्न काही उच्चभ्रू सहजपणे विचारतात.

प्रा.हरी नरके, दि. १० फेब्रुवारी २०१९





Friday, February 8, 2019

बालाजीराव सुतार









बालाजीराव सुतार म्हण्जे फेसबुकवरचे सगळ्यात दणकट आणि पॉप्युलर लेखक.

त्यांचा "दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी" हा पहिलाच कथासंग्रह एकदम कडक म्हंजे जंक्शानच.
एकुण अवघा १६० पानांचा ऎवज. आठ भन्नाट कथा. स्वत:ची कलदार मुद्रा मराठी कथाविश्वावर पदार्पणातच उमटवणारा हा महत्वाचा गडी.

चित्रशैलीतली कथनपद्धती वापरीत बालाजीराव आजच्या गावशिवाराचा, तिथल्या माणसांच्या हाडामांसाच्या अस्सल जगण्याचा, त्यातल्या ताणांचा हादरून टाकणारा अनुभव ह्या कथांमधून थेटपणानं
पोचवतात.

गावगाड्याची घुसळण, पडझड, गावगुंडी आणि घुसमट यांचा अस्सल पट ते उलगडत जातात.

ह्या ८ कथा म्हणजे निव्वळ लेखकीय कारागिरी नसून गावशिवाराचा,शेणामुताचा गजब वास असलेली ती ८ मजबूत लेणी आहेत. अस्वस्थ होणं, सुन्न करणं, डोळे पाणावणं म्हणजे काय असतं ते अनुभवण्यासाठी हा कथासंग्रह वाचायलाच हवा.

बालाजीरावांची कळकळ, मुल्यनिष्ठा आणि समकालीन समज यांचा आवाका निव्वळ थक्क करणारा आहे. रंगनाथ पठारे, भास्कर चंदनशिव, जयंत पवार, आसाराम लोमटे, राजन गवस, किरण येले यांच्या पंक्तीतला हा नव्या दमाचा श्रेष्ठ कथाकार. 

[दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी, प्रथमावृत्ती- जाने. २०१९,पृष्ठे १६०, मूल्य- रू.२००/-]

प्रा.हरी नरके, ८ फेब्रुवारी २०१९

Wednesday, February 6, 2019

एक भाषा- एक विचार-एक दृष्टी हे सूत्र विनाशकारी







लाखो वर्षात माणसाने जमवलेल्या अनुभवाची सारी स्मृती शब्द माध्यमात आहे. आज जर आपण भाषिक विविधता जपली नाही तर आत्तापर्यंत जमवलेले अनुभव वैविध्य आपण गमावून बसू. त्यासाठी विविधता हे तत्व जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्विकारले पाहिजे. त्यासाठी जैविक विविधता, सांस्कृतिक विविधता, मत वैविध्य हे सारे एका प्रगतीशील दृष्टीकोनातून स्वीकारणारे समाज, सरकारे, देश, संस्था निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. 

त्याऎवजी "एक भाषा- एक विचार-एक दृष्टी" अशा मताच्या संस्था, सरकारे यांना आपण कवटाळले तर आपण स्वत:च्या हाताने मनुष्यजातीचा विनाश ओढवून घेऊ. 

भाषा हे सर्वाधिक महत्वाचे सांस्कृतिक भांडवल आहे. भाषा जगवायच्या असतील तर त्या बोलणार्‍या लोकांना सन्मानाने वागवले पाहिजे. 

रोजगार आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी एखाद्या भाषिक समाजातील बुद्धीजिवी जेव्हा त्या भाषेचा हात सोडून दुसरीच्या मागे पळू लागतात तेव्हा ती भाषा मरू लागते. 

समाजाच्या जाणीवा आणि भाषा यांचा जागतिक अर्थव्यवहाराशी संबंध असतो. ही पृथ्वी आणि तिच्यावरचे सगळे काही आपल्या एकट्याच्याच मालकीचे आहे असे समजून तिला ओरबाडीत सुटलेले विकासाचे मॉडेल आणि आणि ते देणारी भाषा ह्या दोन्हींना आपण नकार दिला पाहिजे. 

एखादी भाषा निर्माण व्हायला शतकानुशतके लागतात. या भाषा हे आपले सांस्कृतिक संचित आहे. त्या नष्ट करणारा भाषासंहार आपण रोखायला हवा.

-प्रा. गणेश देवी,
त्रिज्या, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती ५ नोव्हेंबर २०१८, पृष्ठे-१६८, मूल्य, रू. २३०, 

संपर्क- मो.७३ ५० ८३ ९१ ७६, ०२०-२५ ४४ २४ ५५, इमेल p.padmagandha@gmail.com